Wednesday, 29 May 2019

असत्याचे प्रयोग...


नथुराम हात जोडून अखंड हिंदुस्थानच्या मानचित्रासमोर उभा. डोळे मिटलेले. चेहऱ्यावर शांत तरल भाव. आणि ओठातून एकच घोष...

“नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिंदुभूमे सुखं...”

तिकडून तावातावाने आलेला नारायण त्याला मध्येच अडवत म्हणाला, “नथुराम... नथुराम... अरे पाहिलेस का हे काय अघटित घडते आहे?”

नथुराम त्याच शांत अवस्थेत म्हणाला, “नाना, अरे काय झालं? इतका गर्भगळीत का झाला आहेस?”

पंडित, अरे पहा ना, तात्यारावांच्या पुण्यस्मरणादिनी ‘सावरकर नायक की खलनायक’ अशा शीर्षकाखाली या मूढ वृत्तवाहिनीने चक्क चर्चासत्र आयोजित केले.

“हा मग?”

“पंडित, अरे हे ऐकून तू इतका उदासीन कसा? तात्यारावांना खलनायक असं बिरुद पुढे लावून असले वांझोटे चर्चाचर्वण करताना यांना लाज कशी नाही वाटली. म्हणजे तात्यारावांच्या सावलीखाली आपण केलेलं क्रांतिकार्य वाया गेले की काय?” नाना अत्यंतिक क्रोधाने म्हणाला.

नथुराम छद्मी हसत म्हणाला “शांत हो... आधी पाणी पी थोडस...”

“नाही. अरे अखंड हिंदुराष्ट्रापासून अलिप्त करुण यवनांच्या स्वाधीन केलेली माझी सिंधू नदी...तिच्या उदरातील पवित्र जलाच्या पावन स्पर्शानेच माझा हा गळा थंड पडेल...! तुला समजत कसं नाहीय? तू चक्क हसतोयस?” नथुरामने समोर केलेला पेला बाजूला सारत नाना आश्चर्याने म्हणाला.

“हो, अरे आपण स्वतंत्र भारतातले पहिले दहशतवादी ना? तो कुणी दाक्षिणात्य छपरी अभिनेता मला म्हणालाच होता की...”
नथुराम दीर्घ हास्य करत म्हणाला.

“पंडित अरे बघ ना, हे आणि काय? अरे हे ऐकून तर माझ्या कानात कुणी शिष्याचा रस ओतावा अगदी तसे झाले पहा...” नाना कळवळीने म्हणाला.
“आणि यानंतर उठलेल्या गदारोळातही आपल्याला देशभक्त म्हणणाऱ्या त्या साध्वीला पुन्हा माफी मागावी लागते?वरून आपला सेनापती तिला कधीही माफ करणार असे खुशाल वक्तव्य करतो...? श्या... हे खूपच हृदयद्रावक आहे पहा...”

“हे बघ... तुझी तडफड मला समजतीय... पण एक नक्की कळतंय की, राजकारणात तू तेंव्हाही कच्चा होतास आणि आजही... म्याडोबा कुठला...!” नथुराम हसत म्हणाला.

“म्हणजे...” नारायण अभावितपणे म्हणाला.

“म्हणजे असं की, भाकरी परतली जातीय...” नथुरामने नारायणच्या डोळ्यात नजर रोखली...

काही वेळ निरव शांतता...

“काही समजले नाही ब्वा... कसली भाकरी...?”

“सांगतो...”

“मला दहशतवादी म्हटल्यावर गदारोळ होणे, या गोष्टींकडेही मी सकारात्मकपणे पाहतो. म्हणजे आपल्याला शिरसावंद्य मानणारे आपले सजग हिंदूबांधव आजही आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत किंबहुना ते सध्या वाढले आहेत याचेच हे द्योतक नाही का?”

“अरे पण मग साध्वीने पुन्हा माफीनामा का द्यावा? वरून आपल्याच सेनापतीने तिला कधीही माफ करणार नाही असा सूर आळवावा? हा सेनापती मला काही धड वाटत नाही.”

“होय...पाहतोय मी... पण गांधींचा वध केल्यावर आपल्याला ईप्सित असलेल्या हिंदूराष्ट्राला पटकन गवसणी घालता येणे शक्य नाही...
अरे... इंग्रजांच्याविरुद्ध लढून शक्तीअपव्यय करण्याऐवजी आपलेच स्वकीय की जे हिंदूराष्ट्राच्या आड येऊ पाहत होते त्यांना संपवण्यात आपण आपली हयात घालवली... आणि गांधीवध ही हिंदूराष्ट्राची नांदी ठरावी ही आपली मनीषा सत्यसृष्टित उतरवण्यासाठी आपली मातृसंस्था आपल्या फाशीनंतरही कार्यरत राहिली. हिंदुत्वाच्या प्रखर संस्काराच्या मुशीतून जसे आपण घडलो... तसेच आपला सेनापतीही घडला आहे... हे विसरू नको...! त्याच्यावर विश्वास....”

नथुरामचे वाक्य मध्येच तोडत नाना बोलू लागला, “उतुंग हिमालयाएवढे... सिंधू नदीच्या शतप्रतिशत पावित्र्याइतके जाज्वल्य असे तात्यारावांच्या स्वप्नातील हिंदूराष्ट्र परदेशात जाऊन ‘ये बुद्ध और गांधी का देश है..!’ असं म्हणून का पूर्णत्वास जाईल...? हा गांधींच्या नावे ‘स्वच्छता अभियान’ काय राबवतो. आलेल्या पाहुण्यांना साबरमती आश्रमात काय नेतो,गांधींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक काय होतो? आणि आता असे वागून तर आपण दहशतवादी आहोत आणि आपल्याला हा मानत नाही अशा वर्तनावर शिक्कामोर्तबच केले. अरे नथुराम हा तर घात आहे...आपल्याच पट्टशिष्याने केलेला...! अरे सत्ता हाती येताच का हिंदुत्व विसरोनी गांधीचे गुण गावे...?”

“नारायणा, भाकरी परततीय हे खरंय, पण गडबड करून चालणार नाही. आणि हीच तर ती कुटनीती आहे....
साध्वी हे आपलं खरं रूप आहे. तर गांधीसमोर नतमस्तक होणारा सेनापती हा आपला मुखवटा... साध्वीवर आलेला दबाव वा सादर करावा लागलेला माफीनामा हा मला देशभक्त म्हटल्यासाठी नव्हता. तर मुखवटा काढून खरा चेहरा प्रकट केल्याबाबतीत होता. समजतंय का?”

“अच्छा...” थोडं थोडं समजतंय अशा अविर्भावात नारायण उत्तरला.

“अरे अनेक दहशतवादी कारवायात सामील होऊन हिंदुराष्ट्राची धगधगती ज्वाला सदैव तेवत ठेवण्यासाठी कृतिशील असणारी ही साध्वी हाच आपला आश्वासक चेहरा आहे.
तात्याराव ज्या तलवारीची मूठ होते, त्या तलवारीचे आपण जसे पाते होतो अगदी तसेच आपला सेनापती ज्या तलवारीची मूठ आहे त्या तलवारीचे ती पाते आहे. आणि बघ ना.. या निवडणूकीत त्या भरभक्कम मतांनी विजयी झालेल्या आहेत.
आतातरी कळतंय का की भाकरी परततीय... पण थोडं संयमाने घेतलं तर हिंदुराष्ट्राचा सूर्य या मातीवर तळपण्याचा तो सुदिन आता दूर नाही.

“हो, पण आता पाशवी बहुमतानंतर हे सैतानी बहुमत प्राप्त झाल्यावर आता हिंदुराष्ट्राच्या प्रस्थापनेसाठी ‘अच्छे दिन’ येतील असे म्हणावे का?”

“निश्चितच... पण मुखवटा तसाच राहील.... मुखवटा काढण्याची ही वेळ नव्हे. कारण अजूनही जग या भूमीला गांधींची मातृभूमी म्हणूनच ओळखतो.”

“इथेच तर माशी शिंकते ना?” नारायण हताश होऊन म्हणाला.

“गांधीवधाचे प्रयत्न आपण चार वेळा केले...पण अखेरच्या प्रयत्नात आई गंगेने आपल्या पदरी यश घातलं...५५ कोटी पाकिस्तानला दिले म्हणून आम्ही वध केला हे कारणही प्रस्थापित करण्यास आपण आणि आपले सेनानी यशस्वी जाहलो...
गांधीवधानंतर कुजबुज करुन आपल्या सैनिकांनी का कमी प्रयत्न केले... गांधी बदनामीचे...?
पण तरीही या राष्ट्रात गांधी नाव राहिलेच ना...?
अरे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे माझ्यावरील नाटक किती सत्यपलाप करतं..हे तुला आणि मला चांगलच ज्ञात आहे...पण तरीही ते इतिहासाचं विकृतीकरण करण्यात सफल झालेच ना...? अरे हीच कूटनीती आहे...!”

“पण पंडित... अरे तात्यारावांच्या खलनायकी बद्दल काय?”

“त्याचे असे आहे की, गांधीहत्येच्या आरोपात तात्यारावही होते. ते गेल्यानंतर जवळपास काही दशके तात्यारावांना तसा कुणी वालीच नव्हता. पण आता पाहतोयस ना, आता तात्यारावांची चिरपरिचित छबी संसदेत उभी आहे. स्वच्छ, शुभ्र धोतर, कॉलरचा पांढराशुभ्र शर्ट, बटण लावलेला फिक्या रंगाचा कोट नि किंचित उंच गोल टोपी, सोनेरी काडीचा चष्मा लावलेली, मध्यमसर गोरी,रुपसुंदर अशी मूर्ती तेही गांधींच्या समोरच... तात्यारावांसमोर नतमस्तक व्हाल तर आपोआपच गांधींना पाठ दाखवावी लागते. कळतंय का?

“म्हणजे तात्यारावांना आता ‘भारतरत्न’ निश्चित मिळेल, हे निश्चित ना?...” नारायण खुललेल्या चेहऱ्याने म्हणाला. “पण ही संसदीय लोकशाही, हे संविधान हे सारं हिंदुराष्ट्राच्या पदोपदी आड येत राहील, त्याचं काय? वरून आपला सेनापती तर संसदेत प्रवेश करताना नतमस्तक होतो. संविधानाला वंदन करतो.”

नथुराम पोट धरून दात विचकत विकट हास्य करू लागला.
“काय रे काय झालं?” नारायणे भाबडेपणाने विचारलं.

“हे २०१९ साल आहे. गांधींच्या दिडशेव्या जयंतीचं वर्ष. याच वर्षी झालेल्या या निवडणुकीमधला कल पाहतोयस ना ? भाकरी परततीय हे स्पष्टच दिसतंय... आणि आठवतय का? गांधींचा वध करताना मीही त्यांना वंदन केलेच होते...” नथुराम पुन्हा दीर्घहास्यात बुडून गेला.

“वाह पंडित वाह...
खरय... तुझं मृत्युपत्र वाचल्यावर तुझ्या अस्थींची अस्त्रं होतील... असं म्हणून तात्यारावांनी तुला आधुनिक भारताचा दधिची ऋषी म्हटलं होतं... पण तू तर त्या पुढचा आहेस नथुराम...”

“अरे नाही रे... असं काही तात्यारावांनी नव्हतं म्हटलं. कारण मी फाशीच्या आदल्या दिवशी मृत्युपत्र लिहलं होतं आणि तात्याराव तर आधीच गांधीहत्येच्या आरोपातून ते मुक्त झाले होते. त्यामुळे माझं मृत्युपत्र वाचून ते असं काही म्हणणं कसे बरे शक्यय? पण माझ्यावरच्या ‘मी नथुराम बोलतोय’ या नाटकात हे कुठून आलं, ते माझे मलाही माहीत नाही..."

दोघेही एकमेकांकडे पाहत क्षणभर थांबले आणि पुन्हा मोठमोठ्याने दीर्घ हास्य करत राहिले...

पुन्हा थोडा वेळ शांत होतात...

चेहऱ्यावर ठाम निश्चयाचे भाव...

आणि नारायण कडे करारीपणाने पाहत नथुराम गाऊ लागतो..

“नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोहम्...
महन्मंगले, पुण्यभूमे त्वदर्थे
ददाम्येष कायो नमस्ते नमस्ते...”

- विनायक होगाडे

#लवकरच
#OhMyGodse
#ओह_माय_गोडसे
#NathuRamCharitManas
#नथुरामचरितमानस
#DwandwaRamayan
#द्वंद्वरामायण


1 comment: