Wednesday 3 May 2017

साथी हमीद दलवाई यांना अनावृत्त पत्र...!




प्रिय हमीदभाई...
सविनय वंदे...

मी तुला 'हमीदभाई' याच नावाने संबोधेन,बरं का...! याचं एक कारण म्हणजे तू आणि मी एकाच वाटेवरचे मुसाफिर  आहोत...आणि तू मला माझ्या मोठ्या भावासारखा वाटतोस...! दुसरं कारण म्हणजे 'हमीदभाई' अशा उल्लेखातच इतका गोडवा आहे की तो इतर उल्लेखातून व्यक्त होत नाही...!
असो...!
अरे हा...माझी ओळख करून द्यायची राहिलीच...
बरं का भाई...तू ज्या राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून तयार झालेला सैनिक आहेस त्याच मुशीत माझीही जडणघडण झाली आहे...आणि होत आहे...!
त्यामुळे आपल्या दोघांची नाळ थेट जोडली गेलेली आहे...याचा मला खासा आंनद आहे...आणि म्हणूनच मी लहान भावाप्रमाणे हक्काने तुझ्याशी संवाद साधू शकतो...!

खूप काही गांभीर्याने मांडायचंय...बोलायचंय...पण सुरवात कुठून करावी हेच समजत नाहीय...!
आज तुझा स्मृतिदिन...आजच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी मूत्रपिंडाच्या विकाराने तुझा अंत झाला...!
खरं तर...तुझ्या सुधारणावादी भूमिकांमुळे जिवंतपणीच स्वतःची प्रेतयात्रा पाहिलेला माणूस तू...! आणि तू ज्या विचारांवर आपलं आयुष्य उभं केलंस...ज्या विचारांच्या पेरणीसाठी खस्ता खाल्ल्यास...ते पाहता तुझा मृत्यू नैसर्गिकरित्या होणं...हीच आश्चर्याची बाब आहे, असं डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणाले होते...आणि ते खरंच होतं...!

पण हमीदभाई...सांगायला अत्यंत वेदना होताहेत की, तुझ्याच वाटेवरून चालणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा मात्र खून झाला रे...! निव्वळ त्यांचाच नव्हे तर तुझ्याच विचारांचा वसा घेऊन तुझी वाट गडद करणाऱ्या गोविंद पानसरे...आणि एम. एम  कलबुर्गी यांचाही भर दिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला...! हे सगळं प्रचंड क्लेशदायक आणि अनपेक्षित आहे रे...!
तू म्हणाला होतास की, "जे जे कालविसंगत असेल त्याच्या विरोधात बोललं पाहिजे..."
आणि हेच तर काम ही मंडळी करत होती...!

तू म्हणाला होतास की,"मुसलमानांच्या धार्मिक विचारात उदारता येण्यासाठी त्या समाजाचे विचारप्रबोधन
करणे आणि त्याला पोषक अशा वैज्ञानिक दृष्टिकोणाची जोड मिळावी,धर्माकडे बघण्याचा मुस्लिमांचा दृष्टीकोण बदलला जावा आणि ते आपल्या राष्ट्रवादी विचारप्रवाहात सामील व्हावेत,म्हणून प्रयत्न करायला हवेत...म्हणजे खऱ्या अर्थाने दोन्ही समाजाचे ऐक्य होऊ शकेल...!"
आणि याच उद्देशाने 800 वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड पुकारत तू सुरू केलीस 'दगडावरची पेरणी'...!
अर्थात...22 मार्च 1970...मुस्लिम समाजात धर्मनिरपेक्षता,लोकशाही,समता, बंधुभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोण ही संवैधानिक मूल्ये पेरण्यासाठी 'मुस्लीम सत्यशोधक मंडळाची' स्थापना केली गेली...!

"सर्व मुसलमान आपलं सोडून जगाचे बोलतात; मी फक्त आपलंच बोलतो;कारण ज्यांना आपला समाज सुधारता येत नाही त्यांनी जगाच्या गप्पा मारू नये तर आधी आपल्या घरातील घाण काढुया...!'' अशी बेधडक लढाऊ वृत्ती आणि तडजोड न करणारी आधुनिकता यामुळेच एसेम जोशी यांनी तुला मुस्लीम समाजातील आगरकर असं संबोधलं आहे...!
पण तू गेल्यानंतर एकही नवा 'हमीद' उभा राहू शकला नाही यातच तू केलेल्या कामाच्या गांभीर्याची पोहोचपावती मिळते...!

भाई...."मी प्रथम मानव आहे,नंतर मी भारतीय आहे व त्यानंतर मुसलमान आहे." असं तू म्हणायचास...! आणि म्हणूनच मुस्लिम समाजाला धर्माच्या कोषाबाहेर काढून त्याचं भारतीयकरण करण्यासाठी तू आयुष्य खर्ची घातलंस....!
पण...काय सांगू तुला...आजकाल तर हिंदू-मुस्लिम धार्मिक फुटीरतेची बीजे आता हळूहळू मूळ धरू पाहताहेत...

अगदी परवाचंच उदाहरण देतो...
प्रसिद्ध गायक सोनू निगमने मंदिर-मस्जिदीच्या भोंग्यांच्या आवाजामुळे त्रास होतो...त्यामुळे धार्मिक कार्यात भोंगे हवेतच कशाला...? असा सवाल उभा केला तर त्यावर साहजिकच प्रचंड गदारोळ झाला...! एका मौलनाने तर सोनूने हिंदुस्थान के शान के खिलाफ बात की है...असं म्हणत त्याला चपलांचा हार घालणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीस दिलं जाईल, असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा फतवाच जाहीर केला...! बरं...हे सगळं ज्या दिवशी चालू होतं...त्या 18 एप्रिलला बरोबर 51 वर्षांपूर्वी तू तोंडी आणि ट्रिपल तलाकविरोधात 7 महिलांचा कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला होतास...मुस्लीम महिलांचा जगातला पहिला मोर्चा...!
दुसरं असं,ज्या वेळी सोनू निगमवरील ही चर्चा तूफान चालू होती त्याचवेळी 'सादिया' नावाच्या मुस्लीम महिलेला तिच्या नवऱ्याने व्हाट्सपवरून तलाक दिलं म्हणून तिच्या न्यायासाठीचा एक विषय ज्वलंत होता...हा डिजिटल तलाक ग्राह्य मानायचा की नाही यावरची ही चर्चा,पण दुर्लक्षित...!

खरं तर ट्रिपल तलाक,तोंडी तलाक,पोटगी प्रश्न हे मुस्लिम बाईचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त करणारे महत्वाचे प्रश्न आहेत,की ज्या विषयांना धडका मारत तू सत्यशोधक मंडळाच्या कामास सुरवात केली होतीस...!
जे मौलाना 10 लाखाचे बक्षीस सोनू निगमला चपलाचे हार घालणाऱ्याला जाहीर करतात ते मुस्लीम महिलांच्या वा मुस्लीम समाजाच्या महत्वाच्या प्रश्नावर काम करण्याबाबत मात्र अगदी सोयीस्कररित्या गप्प राहतात...!

हे सगळं पाहिलं की मन उद्विग्न होतं आणि पुन्हा पुन्हा वाटत की या सामान्य मुस्लीम समाजाला केंव्हा रे जाग येईल...? तू कसं काय झुंजलास या विषयावर...? तू असा एक प्रबोधनकार ज्याचं आयुष्य केवळ 44 वर्षे 7 महिने...! आणि त्यातही केवळ 25 वर्षे कार्य करूनही तू आधुनिक भारताच्या शिल्पकारांमध्ये गणला गेलास...! खरच रे...अगदी थक्क व्हायला होतं बघ...!

हमीदभाई...आजची परिस्थिती थोडी निराशाजनक जरी असली तरी अजूनही काही निर्णायक वेळ आली नाही...
आजही तुझ्या फोटोतील चेहऱ्याकडे पाहिलं की नवी उमेद मिळते... तुझ्या घाऱ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं की वाटतं ते करारीपणे आग ओकत सांगताहेत...
"करू नका चर्चा एवढयात आमच्या पराभवाची...रणात आहेत झुंझणारे अजून काही...
विझून माझी चिता युगे लोटती तरीही...जिवंत निखारे अजून काही...!''

भाई...आम्ही तुझ्या चितेचे जिवंत निखारे आहोत...अजूनही अनेक दिवे नव्हे तर मशाली पेटणार आहेत...!

होय हमीद...तू एक आशेचा 'उम्मीद' आहेस या काळरात्रीसाठी...!
हमीद...तू धगधगतं 'इंधन' आहेस...'दगडावरची पेरणी' करणाऱ्या आम्हा सत्यशोधकांसाठी...!
हमीद...सनातनी बुरुजांना नेस्तनाबूत करणारी त्सुनामी 'लाट' आहेस तू...!

तुझ्या या साऱ्या विचारशलाका उराशी घेऊन आम्ही लढणार आहोत समतेसाठी...न्यायासाठी...आणि विवेकवादासाठी...!
हा आशावाद व्यक्त करूनच थांबतो...

तुझाच छोटा भाई...
विनायक होगाडे...


4 comments:

  1. Vinayak,
    tujhyamule aanakhi javal jata aale vivekacha buland aavaj asnarya Hamid Dalwainchya...

    ReplyDelete
  2. विवेकाचा आवाज बुलंद करूया।

    ReplyDelete
  3. मित्रा,
    ऊर्जा मिळाली बघ ...!

    ReplyDelete
  4. खूप छान मांडलंय मित्रा, तुझ्या लिखाणाने थोडं का होईना हमीद भाई लोकांपर्यंत नक्कीच पोचतील

    ReplyDelete