Sunday 11 September 2016

अरे मर्दा...कल्पना करून तर बघ....!




चल मर्दा....

आज थोडीशी हटके कल्पना करू...
चल...! अरे मर्दा...घाबरतोस काय..?
कल्पना करून तर बघ...!
तुझं लग्न चालुये...लग्न होतयं...अक्षता पडल्या...आणि मंगळसूत्र घातलं जातयं...!
अहं...तिच्या नाही...तुझ्या गळ्यात...!
अरे...मर्दा..? इतक्यात लगेच मला मूर्ख म्हणून हसायला काय झालं..? मी आधीच सांगितलय...
कल्पना करून तर बघ..!
संसाराचा गाडा चालू झालाय तुझ्या..! गळ्यात मंगळसूत्र...पायात जोडव्या...! अरे वा...तो तुझ्या माथ्यावरचा सिंदूर पण काय उठून दिसतोय नै...
हां...! आता ह्या सगळ्यामुळं इथल्या समाजाला कळतयं बघ...की तुझं लग्न झालयं...!
अरे...कल्पना तर करून बघ...!
चल मर्दा अशी कल्पना कर...की तूला एकापाठोपाठ एक अशा दोन मुलीच झाल्या आहेत...
पण काय करणार... मर्द मुलगा नाहिये ना होत...! शेजारी-पाजारी सगळे तुला डिवचतात...घरातले तर छळतात...कारण बहुतेक आता त्यांना कळलय वाटतं की मर्दा तूच जबाबदार आहेस तुला दोन मुली होण्याला...!
घरातले छळताहेत...पदोपदी अक्षरशः बोंबलताहेत...
पुन्यांदा राहिलय तुझ्या बायकोला...आणि सगळे भरताहेत दम तुला...यंदा घरात वंशाचा दिवा मर्द जन्मलाच पायजे...
काय रे...धडकी भरतीये...?
अरे कल्पना तर करून बघ...

चल आता अशी कल्पना कर...
रस्त्याने चालत जातोयस...एकटाच...!
उन्हं तापलय...खूप तापलय...
आणि तू चालतोयस त्या कच्च्या रस्त्यावरून...
आणि अचानक कच्चकन लागलीये तुला ठेच...! तू कोसळतोयस...इतक्यात तू सावरलयस स्वतःला...!
"आईई गं...!" फुटलाय पायाचा अंगठा...उचकटुन वर आलय नख...रक्ताच्या धारा त्या तापलेल्या मातीत वाट शोधताहेत...
पण मर्दा खरचं दुखतयं का रे...?
नाही असं ऐकलय मी कि
'मर्द को कभी दर्द नहीं होता..' म्हणून म्हटलं..!

अरे साधी ठेच लागल्यावर घायाळ झालास..? अरे...किती कन्हतोयस मर्दा...? भळभळतेय का रे जखम...?

पण याहिपेक्षा जास्त मोठी जखम झाली तर..? फक्त शरीरावर नाही तुझ्या कठोर...आणि काय ते...?
हां..! फौलादी मनावर..?

बर चल इतक्या कल्पना केल्याच आहेस...जाता जाता शेवटची कल्पना कर...!

मर्दा आता शेवटची कल्पना करून तर बघ...

पुन्हा रस्त्याने जातोयस...अहं...काळजी नको करू...आता ठेच नाही लागणार...!
रस्त्याने जातोयस...एकटाच नेहमीप्रमाणे...साधारण रात्रीचे साडेनऊ वाजलेत..! रस्ता जरा आडवळणाचाच आहे...!

आणि अचानक...
काही लोक आले...तोंडावर कापड बांधून...
त्यांनी तुझी गाडी अडवली...
तुला गाडीवरून खाली खेचलं...
तू जीवाच्या आकांताने ओरडणार...इतक्यात त्यातील एका व्यक्तीने तुझं तोंड कापडी बोळा घालून बंद केलं...आणि दुसऱ्याने तुझे हात दोराने बांधले...!
तूला जबरदस्ती त्या आडवळणावरून पुन्हा एका शांत निर्मनुष्य ठिकाणी ओढत-खेचत आणलं...

आणि आता मात्र त्या चार व्यक्तींनी आपल्या तोंडावर बांधलेली कापडं काढून फेकून दिली...
आणि तू पाहतोयस की कुणी आडदांड काळ्या-भरड्या,निबार चार बायकांनी तुला या नीरव शांततेत खेचून आणलय...तू त्या चौघींकडे नीटसं पहायच्या आतच त्यातल्या एकीने तुझ्यावर धाव घेतली...एकीने तर चक्क तूला जोरात खाली दाबलं आणि आडवं पाडलं...तेवढ्यात तिसरीने तुझा तो बायकोने वाढदिवसाला गिफ्ट केलेला निळा ड्रेस जोरात फाडून काढला...
एकटीने तुझ्या पँटेकडे धाव घेतलीये...

तू त्या बांधलेल्या तोंडामधूनही आर्जव करतोयस...
बिनआवाजाच्या जोराच्या किंचाळ्या फोडतोयस...
इतक्या की गळ्याच्या शिरा ताणल्या आहेत...
आणि आता त्या लाल डोळ्यातून भळाभळा पाणी वाहतय...
तुझे हात तर त्या नराधमींनी कधीच बांधलेत...!

काही सुचायच्या आणि काही कळायच्या आतच तुझ्या नग्नतेचा पुरेपूर फायदा उठवायला त्यांनी चालू केलय...!

दोघींनी तुला जाम धरलय...तुझ्या त्या सुटकेसाठीच्या हालचालीचा प्रयत्न त्या हाणून पाडतायत....तुझ्या शरीराचा एकेक हिस्सा बाकी दोघींनी वाटून घेतलाय...
एकटी तुझ्या छातीवर तुटून पडलीये...
एकटी तुझ्या लिंगाशी भिडायचा प्रयत्न करतीये...
ती करतीये नको ते चाळे...

तू अगतिक आहेस...नकोय तुला तो घाणेरडा स्पर्श...त्या जाड्याभरड्या ओठांचे मुके...ते घाणेरड्या नजरेने,वासनेने वखवखलेले आणि कुत्सितपणे पाहणारे ते बाकीच्या दोघींचे डोळे...

तुझ्या हालचालीमुळे...आणि त्यांच्या दाबून धरण्यामुळे...
होताहेत तुझ्या शरीरावर जखमा...ओरखडले जाताहेत नखांचे घाव...घेतला जातोय चावा...
तुझ्या वेदनेची पर्वा न करता...
नको तिथे आणि नको तसा...

त्या एकापाठोपाठ एक येतायत...आळीपाळीने....
आणि घेताहेत तुझ्या शरीराचा ताबा...आलटून-पालटून..!
आणि तुझं लिंगही हतबल आहे या निसर्गापुढे...की जे नको त्या स्पर्शाने उद्युक्त होऊन खडं होतय...
तुला कळतय...तुला जाणवतय...तुला नकोय हे...
तुझ्या मनाविरुद्ध आहे हे...

पण तू मात्र अगतिक आहेस...हारला आहेस...त्या परिस्थितिपुढे...की जी तुझ्या स्वत्वावर बलात्कार करतीये...
जखमा करतीये...शरीरावर... आणि तुझ्या मनावरही...!

तू तरीही आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करतोयस...कुणी आहे का 'माणूस'...? की जो मला मुक्त करेल...माझ्यावरचा हा बलात्कार थांबवेल...
तू फोडतोयस टाहो...आर्त भावनेंन...जीवाच्या आकांतानं...!

पण समोरच्या मात्र हसताहेत...मनमुराद...आणि जेत्या भावनेंन...!

आता मात्र तुला जाणीव झालिये...की आता काहीच उरलं नाहिये...सगळं संपलय...तुझ्या प्रतिकाराचा आता नाहिये फायदा....
तू आता सोपवलयस शरीर त्यांच्या हाती...त्या अगतिकतेतून...

त्या मात्र उपभोगताहेत तुला मनसोक्त...हवं तसं...आणि हव तेवढं...

एव्हाना तुझ्या लिंगाचा पुरता उपभोग घेतलाय त्यांनी...
तेही आता केंव्हाच गळून पडलय...
त्याच अगतिकतेतून...

निपचित कोसळलायस तू...
त्या केंव्हाच निघून गेल्याहेत..!
तू मात्र आता विचार करतोयस...

हे काय झालय माझं..?
हे माझ्यासोबतच का...?
कोण होत्या त्या नराधमी..?
की ज्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली...
की ज्यांनी माझ्यावर बलात्कार केला...?
चक्क उपभोगलं मला...?

काय लायकी राहिलीये माझीे..?
आता या घटनेवर हळहळतील सारे..!
कदाचित 'निर्भय' म्हणून घोषित करतील मला...
आणि काढतील मोठी निषेध रॅली...!
पण त्या चार नराधमी पकडल्या जातील..?
पकडल्या तरी त्या गुन्हेगार सिद्ध होतील...?
त्यांना शिक्षा होईल..?
पण शिक्षा होऊन तरी काय उपयोग..?
माझं तर स्वत्व लुटलयं यांनी...
काय अस्तित्व उरलय आता..?
सगळचं तर लुटलय..!

काय करावं मी...?
काय करावं मी...?
काय करावं मी...?

ये मर्दा...भानावर ये...
माणसात ये....
माणुसकीत ये...

आणि एव्हडी कल्पना करून तर बघ...!




- विनायक होगाडे...

No comments:

Post a Comment