Wednesday, 8 March 2017

त्यानं प्रेम केलं...तिनं प्रेम केलं...सांगा तुमचं काय गेलं...?

  
                         
              युगानयुगे 'ती' आणि 'तो' प्रेमात पडत राहिलेच...मात्र 'तिचं' आणि 'त्याचं' प्रेमात पडणं सनातन्यांना नेहमीच खटकत राहिलं...! मग काय...? नेहमीप्रमाणे त्यांनी हाती धर्म आणि मुखी संस्कृतीचा जयघोष मांडला आणि प्रेमाभावनेविरोधात दंड थोपटून त्यांनी द्वेष-हिंसेचाच आसरा घेतला...! पण त्यांना कधी कळलीच नाही ती तितक्याच सनातन असणाऱ्या प्रेमाची महत्ता...! पण हीर-रांझा,रोमियो-ज्युलिअट,लैला मजनू,वासु-सपना,आर्ची-परश्या ही सारी प्रेम युगूलं कथित सांस्कृतिक दडपशाही सहन करत धर्म जात,प्रांत,वंश या भेदांच्या सीमा ओलांडून प्रेमाचा पुरस्कार मात्र करतच राहिले...!


            'व्हॅलेंटाईन डे' या प्रेम व्यक्त करण्याच्या दिवसाला नेहमीप्रमाणे यावर्षीही कथित संस्कृतीरक्षकांचा विरोध झालाच. पण या विरोधाची धार गेल्या काही वर्षात जितकी आक्रमक आणि हिंसक होती...तितकी मात्र या वर्षी पहायला मिळाली नाही. निवडणुकांचे पडघम वाजत असताना तरुणाईचा रोष ओढवून घेणे कुठल्या राजकीय विचारधारेला परवडेल...? पण प्रेमाबद्दलच्या ह्या घमासान युद्धाला अगदी गेल्या काही वर्षात नवं रणक्षेत्र उपलब्ध झालेलं आहे ते सोशल मिडियाचं...!
या 'व्हॅलेंटाईन डे'ला विरोध करण्याचे फार रोचक फंडे कथित संस्कृतीरक्षकांनी गेल्या काही वर्षापासून वापरलेले दिसताहेत...यंदाही यात ते कमी पडले नाहीतच...! ,ही समर्थन-विरोधाची बाब फक्त या दिवसापुरती मर्यादित नाही...तिचा व्यापक अंगाने उहापोह करायला हवा...!
व्हॅलेंटाईन डे साजरा करावा की नको हा ज्याचा त्याचा प्रश्न...! साजरा करण्याचे आणि त्याचे समर्थन करण्याचे जसे स्वातंत्र्य आहे तसेच घटनात्मक चौकटीत राहून त्याला विरोध करण्याचं देखील स्वातंत्र्य आहेच...! पण या वादातील सर्वात मोठा कहर म्हणजे,गेल्या काही वर्षांपासून असे कथित संस्कृतीरक्षक "शहीद भगतसिंग,राजगुरु व सुखदेव यांच्या फाशीचा आणि 14 फेब्रुवारी म्हणजेच "व्हॅलेंटाइन डे" चा मुद्दाम बुद्धिभेद करणारा संदर्भ जोडत आलेले आहेत...!
काही कथित संस्कृतीरक्षकांकडून 'या दिवशी क्रांतीकारकांना फाशी दिली गेली...' असा गैरसमज पसरवून भावनिक आव्हान करण्यात आले...!
त्यानंतर काहींकडून 'या दिवशी या तिघांना फाशीची शिक्षा जाहिर केली गेली...' असाही प्रचार करण्यात आला...त्यानंतर काहींनी या दिवशी 'गांधींनी भगतसिंग यांना फाशी द्यावी म्हणून सही केली...' असा नवा जावाईशोध लाऊन इतिहासात आणखी एक अमूल्य अशी संशोधनात्मक भरही घातली...!
            व्हॅलेंटाईनला विरोध करण्यासाठी म्हणून ज्यांनी हे असे बुद्धिभेद करणारे भंपक मॅसेज फॉरवर्ड केले त्यांनी आपण आता संगणक नव्हे तर आता स्मार्ट फोन युगातील युवा लोक असून भगतसिंग यांना फाशी कधी जाहिर झाली आणि कधी दिली गेली...? एवढी साधी चिकित्सा गूगल वर जाऊन करण्याचे कष्टदेखील घेतले नाही...!
जे तथाकथित संस्कृतीरक्षक भगतसिंग यांचा वापर या दिवसाला विरोध करण्यासाठी करतात मुळात त्यांना काडी इतकाही भगतसिंग माहीत नसतो...हे वेगळे सांगायला नको...! स्वतः भगतसिंग यांचं प्रेमाबाबतीत मत काय होतं हे जाणून घेणं इथं प्राधाण्याचं ठरेल...!


भगतसिंगानी तुरुंगात असताना वाचन करुण विविध विषयावर टिपणे काढली होती...त्यातील प्रेम आणि प्रणय अशा विषयावर भाष्य करणारी अप्टन सिंक्लेअर, बॅ.लिंडसे अशा लेखकांची काही टिपणे आहेत...त्यातील काही मोजकी इथे उदधृत करणं आवश्यक ठरेल...
"प्रणय हा जरी प्रामाणिक प्रेमाचा आणि उत्कट भावनांचा परिपाक असला,तरी तो करणे हे लाजिरवाणे आणि अनैतिक आहे ह्या परंपरेचा पगडा आपल्या तरुण लोकांवर आहे ही किती दुःखाची बाब आहे."
"माझा विवाहावर विश्वास आहे आणि माझे असे म्हणणे आहे, की विवहाचा अर्थ असा असला पाहिजे,की ते एका पुरुषाचे एका स्त्रीवरचे प्रेम आहे आणि त्यात त्यांचा मिलाफ व सहचर्य आहे... जेंव्हा ते असे किंवा यासारखे नसते तेंव्हा ते लग्न आहे असे मला वाटत नाही,मग त्यांचा विवाहसमारंभ झालेला असो अथवा नसो. एकमेकांबद्दलचे प्रेम हेच लग्न आहे, बाकी काही नाही. लग्नसोहळा म्हणजे एक पुरुष व स्री यांच्यातील अशा नात्याला असलेली केवळ सामाजिक मान्यता होय. आणि तसेच ते, समाजाने असे नाते अस्तित्वात आहे,हे औपचारिकरित्या स्वीकारणे होय."
             'व्हॅलेंटाईन डे' असो वा इतर कोणत्याही दिवशी असो...तरुण प्रेमी युगुलांना मारहाण करणे,उठ-बशा काढणे यासारख्या शिक्षा देणे,जबरदस्ती लग्न लाऊन देणे या आणि अशा कृत्यांनी दडपशाही करुण संस्कृतीचे रक्षण होईल असं ज्यांना वाटतं त्यांना मुक्तचिंतक भगतसिंगाचे हे विचार पेलवतील असं कोणाच्यानेही म्हणवणार नाही...! शहीद आणि देशभक्त असा भगतसिंगांचा उदघोष करणं सोपं आहे पण बुद्धिप्रामाण्यवादी ,चिकित्सक आणि देव या कल्पनेची चिकित्सा करणारा नास्तिक भगतसिंग मात्र सोयीचा नाहिये...!
            धर्म आणि संस्कृतीच्या नावावर काय खावे काय खाऊ नये,काय कपडे घालावेत-घालू नयेत...अमुक गोष्टी कराव्यात..तमुक करू नयेत ही आणि अशी बंधने अभिव्यक्तीवर घालून असंवैधानिक आणि हिंसक दडपशाहीचे प्रकार नेहमीच घडत आलेले आहेत...पण या दडपशाहिला कडवा आणि घटनात्मक  विरोधही झालेला आहे आणि होत आहे...2011 मध्ये केरळपासून सुरु झालेलं आणि पुढ सोसल मिडियामुळेे देशभर पसरलेलं 'किस ऑफ लव्ह' हे आंदोलन अशाच स्वरूपाच होतं...
आम्हाला आमच्या प्रेम करण्याच्या, प्रणयाराधना करण्याच्या हक्कापासून कोणीही रोखू शकत नाही हाच संदेश या "प्रेम-चुंबन" आंदोलनातून द्यायचा होता. ..!
           संस्कृती ही कधीच स्थिर नसते,ती प्रवाही असते...संस्कृती ही बाब अभिव्यक्तीवर गदा आणण्यासाठी वापरली जात असेल तर त्याहुन दूसरी विकृती मुळीच नाही...!
मुळात प्रेम ही गोष्ट लपून छपुन करावी लागणं,हीच मोठी शोकांतिका आहे...उलट ह्या भावनेला खुलं वातावरण उपलब्ध करुण देणं...हे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे...आणि हे पुरेसं निकोप स्वातंत्र्य उपलब्ध करुण देणं ही प्रत्येक पालकाची आणि पर्यायाने समाजाचीच जबाबदारी ठरते...!

ज्या संस्कृतीच्या नावावर प्रेम भावनेला,प्रेमाच्या अविष्काराला विरोध केला जातो ती वैदिक संस्कृती काय सांगते...? वैदिक संस्कृतीत यज्ञाभोवती सामूहिक संभोगाचे कार्यक्रम चालत असत...इतकेच नव्हे तर यज्ञ संस्थेचा जन्मच या लैंगिककतेतून झाला आहे...या आणि अशा अनेक बाबी इतिहासतज्ञ वि. का.राजवाडे यांनी 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' यामध्ये नोंदवल्या आहेत...! व्यभिचार आणि प्रखर अश्लील वाटणारे असे आणखी बरेच दाखले देता येतील...पण असो...!
प्रेम करणं,ते व्यक्त करणं,त्यासाठी एकत्र येणं ह्या गोष्टी अगदी नैसर्गिक आहेत. आलिंगन-चुंबन यादेखील स्वाभाविक गोष्टी आहेत...ज्या संस्कृतीच्या नावे या प्रेमभावनेला विरोध केला जातो तीचेच दाखले देऊन "हीच का तुमची संस्कृती..?" असा सवाल उभा करण्यालादेखील आता तरुणाई मागेपुढे पाहणार नाही...!
"त्याने प्रेम केलं...
तिने प्रेम केलं...
मला सांगा...त्यात तुमचं काय गेलं...?"
या कवितेतून मंगेश पाडगावकरांनी उभा केलेला असा सवाल आपल्याला वेळोवेळी सोशल मिडियातूनही लाऊन धरणं गरजेचं आहे...
आणि हो,"खरा तो एकचि धर्म,जगाला प्रेम अर्पावे..!" ही द्वेषमुक्त उदात्त शिकवण जेंव्हा हे कथित संस्कृतीरक्षक आत्मसात करतील तो तर खरा "सोनियाचा दिनु" असेल...असं मानायला हरकत नाही...!


- विनायक होगाडे

पूर्वप्रसिद्धी : राष्ट्र सेवा दल पत्रिका
                  अंक : मार्च 2017


1 comment:

  1. त्याचं काय गेलं??? मी तर म्हणतो... त्याचं काशीत (वाराणसी) गेलं...

    ReplyDelete