Wednesday 12 July 2017

मुखवट्यामागील सच्चा माणूस - निळू फुले...!


एका हातात धोतराचा सोगा पकडलेला, डोक्यावरच्या तिरक्या टोपीसारखीच तिरकी चाल चालत येणारा, पाठीत थोडासा पोक काढून, ओठांचा चंबू करून मग्रूरीची आग ओकणारे डोळे रोखत, पिळदार मिशा असलेला क्रोधी, लंपट असा जबरी खलनायक...!
आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर मराठी रुपेरी पडद्यावर जवळपास चार दशके एक कलाकार थैमान घालत होता...! तो अस्सल कलाकार म्हणजे नीळकंठ कृष्णाजी फुले अर्थातच निळू फुले...!

13 जुलै... निळूभाऊंचा स्मृतिदिन...!
मराठी चित्रपट सृष्टीत कितीतरी कलाकार आले आणि गेले... परंतू कलाकार म्हणून असलेला अस्सलपणा आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते म्हणून असलेला सच्चेपणा फारच कमी कलाकारात दिसतो की जो निळूभाऊंच्यात पुरेपूर भरला होता...!
1930-31 चा त्यांचा जन्म...! स्वतःची जन्मतारीखही माहित नसलेला (पण नंतर अंदाजे बांधलेली तारीख म्हणून 4 एप्रिलला मित्रमंडळी वाढदिवस साजरा करायचे) हा निळू आपल्या आठ-दहा भावंडांसह खडकमाळच्या रस्त्यावर गोट्या खेळत असताना अलगदच राष्ट्र सेवा दलाकडे खेचला गेला. त्याचीही एक मोठी रंजकच कहाणी आहे...! त्यांच्या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा होती... खेळायला मिळतं म्हणून निळूभाऊ आणि त्यांचे मित्र त्या संघाच्या शाखेत जायचे...पण काही दिवसांनी त्यांना सांगितलं गेलं की ख्रिश्चन-मुस्लिम मित्रांना इथं आणू नका...! पण आपल्या मित्रांना संघात यायला प्रवेश नाही, हे लक्ष्यात आल्यावर त्यांचं संघशाखेवर जाणं थांबलं... त्याच दरम्यान आप्पा मायदेव आणि लालजी कुलकर्णी राष्ट्र सेवा दलाची शाखा सुरू करण्याच्या प्रयत्नात होते... तेंव्हा सेवा दलाच्या शाखेत सर्व जातीधर्मातल्या मुलांना मुक्त प्रवेश आहे...हे समजल्यावर निळूभाऊ आपल्या मित्रांसोबत सेवादलात जायला लागले...! त्या वयात फारसं काही कळत नसलं तरी संघात जसा भेदभाव होतो तसा सेवादलात होत नाही, हा महत्वाचा फरक त्यांच्या मनात खोलवर रुजला गेला... आणि त्यांच्या मनावर झालेला हाच पहिला महत्वपूर्ण संस्कार होता...!

घरी अठराविश्वे दारिद्रय. पण वडील बंधू मात्र स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.लहानगा निळूसुद्धा स्वातंत्र्य चळवळीच्या प्रभात फेऱ्यात वा सत्याग्रहाच्या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सामील व्हायचा.यातूनच निळूने एका दिवसाच्या कच्च्या कैदेचा अनुभवही घेतला.1945 सालापासूनच निळूभाऊंचा सेवादलाशी संबंध आला. बालवयातच देशप्रेमाचे संस्कार त्यांच्यावर झाले. सेवादलाच्या शाखेवरच खऱ्या अर्थाने त्यांना सामाजिक जाणिवेचे भान मिळाले. चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी सेवादलाच्या कलपथकाने उभारी घेतली. आणि निळूभाऊंनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला तो याच कलापथकाच्या माध्यमातून...! तिथेच त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. 'कथा अकलेच्या कांद्याची','पुढारी पाहिजे','बिन बियाचं झाड' या आणि अशा अनेक वगनाट्यातून  त्यांची सुरवात झाली.रूढ अर्थाने अभिनयाचं कोणतंच प्रशिक्षण त्यांनी घेतलं नव्हतं. पण अभिनय क्षेत्रातल्या त्यांच्या चमकदार कामगिरीमुळेच 1958 साली ते पुणे शहरशाखेच्या कलापथकाचे प्रमुख झाले. निळूभाऊ 1951 ते 1961 या दरम्यान ते पुण्याच्या आर्म्ड मेडिकल कॉलेजमध्ये माळीकाम करायचे ! 1962 साली ते सेवादलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. एकीकडे माळीकाम करत झाडांना आपुलकीने, काळजीने बहरवणाऱ्या निळूभाऊंच्या स्वतःच्या अभिनय कलेचे रोपटेही कलापथकातून बहरायला लागले होते...!


सेवादलाने त्यांना वैचारिक दृष्टी तर दिलीच पण निळूभाऊंना स्वतःला वाचनाची खूप आवड होती. माळीकाम करत असतानाच मेडिकल कॉलेजच्या ग्रंथालयाचा त्यांनी पुरेपूर वापर केला. भरपूर वाचन, चिंतन आणि सेवादलाने दिलेल्या वैचारिक सामर्थ्यामुळेच त्यांचे सामाजिक भान व्यापक झाले.

कलापथकतील दमदार अभिनयाच्या झंझावाताने त्यांना 'एक गाव,बारा भानगडी' या चित्रपटात पहिली संधी मिळाली आणि त्या संधीचे निळूभाऊंनी अक्षरशः सोने केले. या चित्रपटात त्यांनी साकारलेला 'झेलेअण्णा' इतका अफाट लोकप्रिय झाला की त्या भूमिकेने ते महाराष्ट्रात घराघरात पोहोचले, आणि इथूनच मग त्यांची व्यावसायिक रंगभूमी आणि चंदेरी चित्रपट सृष्टीतील घोडदौड काही थांबलीच नाही...! 'सोंगाड्या','सामना','पिंजरा','सिंहासन','शापित','जैत रे जैत' असे एक ना अनेक चित्रपट त्यांच्या कसदार अभिनयाने गाजले. 'सामना'मधील त्यांनी रंगवलेला 'हिंदुराव धोंडे-पाटील' असो वा 'सखाराम बाईंडर' नाटकातील 'सखाराम' असो वा इतर अनेक चित्रपटांत त्यांनी रंगवलेला खलनायक असो...प्रत्येकांत एक वेगळेच वेगळेपण त्यांनी आणले...
खरं तर ना त्यांच्याकडे देखणा चेहरा होता... ना आकर्षक व्यक्तिमत्त्व ना रांगडं शरीरसौष्ठव होतं...! त्यांनी आपला धीरगंभीर आवाज आणि बोलका चेहरा अशा काही खुबीने वापरला की त्याला तोड नाही. नजरेत कठोर कणखरपणा, मग्रूर क्रूरता,वासना, विखार, क्रोध,धाक,दमदाटी याबरोबरच लाडीगोडी,समजूतदारपणा, लाचारी,लंपटपणा या निरनिराळ्या छटांनी त्यांनी आपला खलनायक वेधक केला...!
नीच,पापी,दुष्ट हे शब्द जणूकाही या माणसांनंतरच शब्दकोशात आले,असं वाटावं...!


धोतर,कोट,शर्ट,झब्बा,पायजमा, जाकीट आणि गांधी टोपी अपवाद वगळता ठरलेलीच...! पण त्यांनी खलनायक वगळता साकारलेल्या भूमिकांचेही सोनं केलं...! 'पिंजरा'मधला सोंगाड्या असो,'सिंहासन'मधला पत्रकार 'दिगू टिपणीस' असो वा 'शापित'मधला शोषित दलित असो...! आजही या व्यक्तिरेखा अविस्मरणीय आहेत. निळूभाऊंचा सखाराम बाईंडर बघून आपण त्यांना कसा मनोमनी सलाम केला आणि त्यांचे पाय धरावे अशी भावना मनात आली, याचे लिखित वर्णन श्रीराम लागूंनी केलं आहे...!

निळूभाऊ जितके श्रेष्ठ कलाकार होते,तितकेच सच्चे कार्यकर्ते होते.त्यांचे स्पष्ट आणि प्रखर राजकीय, सामाजिक भान थक्क करणारं होत...! निळूभाऊ राममनोहर लोहिया यांचे कट्टर चाहते होते. लोहियांचा जेवढा प्रभाव तेवढाच एसेम जोशींचा प्रभाव...! खरं तर खाजगी जीवनात अत्यंत अबोल,बुजरा,लाजाळू आणि संकोची पण तितकाच संवेदनशील असा हा माणूस पडद्यावर इतका दुष्ट होतोच कसा? हे कोडंच पडावं इतका हा सच्चा माणूस...!


प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्यावर त्यांच्या सामाजिक जीवनास अर्थातच काही मर्यादा पडू लागल्या...प्रसिद्धीचा सोनेरी मुकुट नेहमीच खुल्यादिलाने माणसांत वावरलेल्या सच्च्या कार्यकर्त्यांस टोचला नसेल तर नवलच...! "अशा पद्धतीने लोकांनीच लोकांपासून आपल्याला तोडून टाकणं, ही महाभयंकर दुःखद गोष्ट आहे,ती मी भोगतोय...!" असं ते म्हणायचे...!

खरं तर प्रत्यक्ष आयुष्यातले निळूभाऊ पडद्यावरच्या 'खलनायकी निळू'पेक्षा अगदी उलट...!
निळूभाऊ नवीन आलेल्या कलाकाराला मार्गदर्शन करीत...त्याला असं काही आपलेसे करत की 'माणूस' म्हणून हा व्यक्ती किती मोठा आहे,याची कबुली त्यांच्या अनेक सहकलाकारांनी दिलेली आहे.

आपल्याला नाटक-चित्रपटांतून मिळणारा पैसा हा एका अर्थी समाजाकडून आलेला असतो. आपल्या गरजा भागल्यानंतर उरलेला पैसा सामाजिक-राजकीय चळवळीत काम करणार्यांना ते देत असत.  बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर अशा समाजधुरीणांनी सुरू केलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीसाठी 'लग्नाची बेडी' या नाटकाचे अनेक प्रयोग निळूभाऊ,श्रीराम लागू,सदाशिव अमरापूरकर या आणि अशा नामवंत  कलाकारांच्या संचात झाले...! नाटकाचे प्रयोग झाले की नरेंद्र दाभोलकर, बाबा आढाव यांच्यासोबत निळूभाऊ वगैरे ही सर्व मंडळी कार्यकर्त्यांच्या घरी,वाडी-वस्तीवर त्यांना भेटायला जायची...संवाद साधायची...!
परिवर्तनाच्या चळवळीला एक पैसाही न घेता मदत करणे,ही निळूभाऊंची खासियत होती..! डॉ. दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी जवळ-जवळ दीड दशक त्यांनी दर महिन्याला दोन दिवस दिले. "रस्त्यावर गारुड्याचा खेळ चालू होण्यापूर्वी ढोलकिवाला ढोल वाजवून लोकांना जमवतो तसे ढोलकीवाल्याचे काम मी या चळवळींसाठी करत आहे...!"
असे अनेक ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितले आहे. समाजवादी विचारांची बांधिलकी मानून अखेरपर्यंत त्यांनी आपले कार्यकर्तेपण तितक्याच साधेपणाने जपले. अंगमेहनती कष्टकर्यांचे आंदोलन असो,समान पाणीवाटपाची संघर्ष चळवळ असो वा राष्ट्र सेवा दल,अंनिस व मुस्लिम सत्यशोधक मंडळ या संघटनांना वेळोवेळी खुल्या दिलाने नेहमीच मदत केली...!


निळूभाऊ म्हणायचे,"सत्तेवर असणाऱ्या माणसावर मुजोरपणा स्वर होतो.साधा माणूस मात्र आयुष्यभर अनेकदा पराभूत होऊनही विवेकावर स्वार होण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे चित्रपटात पैसे मिळूनही माझ्यावर पैसा कधी स्वार झाला नाही.कारण मला कष्ट करण्याऱ्या माणसाचे आयुष्य, त्याची गस्त रोज दिसत असे. त्यांनीच माझे आयुष्य घडवले.त्यामुळेच साधा माणूस हाच माझ्या मैफिलीचा राजा असतो...!"
आकाशाला कवेत घेतलेला पण तरिही नेहमीच जमिनीवर पाय असणारा असा हा अत्यंत 'साधा माणूस'...!

आजकालच्या तरुणाईला 'निळू फुले' समजला नाहीय...! किंबहुना त्यांना 'मुखवट्यामागचा हा सच्चा माणूस' समजवायला आपण कमी पडलोय,हे मान्य करायला हवं...पण निळूभाऊंच्या या साऱ्या सामाजिक कार्याला आदरांजली म्हणून महाराष्ट्र अंनिस आणि राष्ट्र सेवा दलाने महाराष्ट्र भरात ठिकठिकाणी 'निळू फुले फिल्म सर्कल' उभा करण्याचा संकल्प केला आहे. लघुचित्रपटांच्या माध्यमातून सामान्यजनांना 'मनोरंजनातून प्रबोधनाकडे' नेणाऱ्या ह्या फिल्म क्लबचे आजच्या दिवशी अनेक ठिकाणी उद्घाटन होत आहे,या फिल्म क्लबची पायाभरणी खऱ्या अर्थाने इचलकरंजीत झाली ही इचलकरंजीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे...
अशा या मोठ्या कलाकारास...समता संगराच्या साथीदारास...एक सच्च्या कार्यकर्त्यास आणि कार्यकर्त्यांच्या भक्कम आधारास...माणुसकीच्या जित्या-जागत्या अविष्कारास....त्रिवार सलाम...!

- विनायक होगाडे

8 comments:

  1. विनायक खूप छान लिहलय..
    नीळू भावूंच्या पडद्यावरील खलनायकी प्रतिमा वास्तव जीवणात काही वेळा जीवघेणी संकटे बनली होती..नीळूभाऊ नंतरची तिसरी पिढी प्रबोधनाच्या माध्यमातून नीळू भाऊच्या आठवणी जागविते आहे ही खूप आनंद देनारी गोष्ट आहे..!!

    ReplyDelete
  2. मस्तच...... ब-याच अभ्यासानिशी लिहिला गेलेला व अवश्य वाचावा असा लोख....

    ReplyDelete
  3. माझ्या घरात माझी आई आणि आजी अजूनही निळूभाऊ ना शिव्या देतात. त्यांना कितीदा सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसत नाही. खरंतर हिंदी चित्रपट अभिनेत्यांपेक्षा निळूभाऊंचा अभिनय कितीतरी सकस होता.

    ReplyDelete
  4. Mi tari nilu bhau vishayi bolnya itaka motha nahi pan tyache anek chitrapat mi parole.songady,samana,shapit,pijara ha Dr.shriram lagu sobat cha ase ane chitrapat pahile. Tasech Ashok saraf,laksmikant berde, sachin,suryakant,ranjana,usha sobatche anek chitrapat aathwatat.kalakar mhanun te khup chhan hote tyachya sarkha kalakar sapadne mushkil aahe.tuchya lekhatun tyachya jiwanacha dusara pailu dakhwilya baddal dhanwad.

    ReplyDelete
  5. Mi tari nilu bhau vishayi bolnya itaka motha nahi pan tyache anek chitrapat mi parole.songady,samana,shapit,pijara ha Dr.shriram lagu sobat cha ase ane chitrapat pahile. Tasech Ashok saraf,laksmikant berde, sachin,suryakant,ranjana,usha sobatche anek chitrapat aathwatat.kalakar mhanun te khup chhan hote tyachya sarkha kalakar sapadne mushkil aahe.tuchya lekhatun tyachya jiwanacha dusara pailu dakhwilya baddal dhanwad.

    ReplyDelete
  6. Mi tari nilu bhau vishayi bolnya itaka motha nahi pan tyache anek chitrapat mi parole.songady,samana,shapit,pijara ha Dr.shriram lagu sobat cha ase ane chitrapat pahile. Tasech Ashok saraf,laksmikant berde, sachin,suryakant,ranjana,usha sobatche anek chitrapat aathwatat.kalakar mhanun te khup chhan hote tyachya sarkha kalakar sapadne mushkil aahe.tuchya lekhatun tyachya jiwanacha dusara pailu dakhwilya baddal dhanwad.

    ReplyDelete
  7. विनायक राव खूप खूप आभार आपले खरंच मी खूप जबरी चाहता आहे निळू फुलेंचा खूप त्यांचा बदल खूप वाचलंय, ऐकल्या, पहिल्या आज त्यात आजून भर पडली एक कलाकार आणि एक माणूस म्हणून हा माणूस खूप साधा माणूस होता खूप आभार आपले परत एखादा

    ReplyDelete
  8. छान लेख !!
    खरा तर RSS चा उल्लेख हे थोडा विचित्र वाटत! कारण मी स्वतः माझ्या लहानपणी कितेयक नॉन हिंदू मित्रांसोबत शाखेत खेळलो ,तेही 4/5 वर्ष. असो मोठ्या लोकांना असल्या chowkti मध्ये आपण आजपर्यत बसवत आलो आहे .

    ReplyDelete