Thursday, 8 August 2019

‘नमष्कार, मैं भी रविश कुमार...’



‘नमष्कार, मैं रविश कुमार...’ हे वाक्य ऐकलं की त्या सयंत आवाजात एक विश्वास जाणवतो आणि चेहऱ्यावरील त्या स्मितहास्यात एक आश्वासकता. रविश कुमार. हे नाव आहे त्या पत्रकारांचं जो बिहारमधल्या चंपारण्य जिल्ह्यातील मोतिहारी या छोट्या गावातून आपली स्वप्नं आजमावण्यासाठी दिल्लीच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’मध्ये १९९४ साली दाखल झाला.

आशिया खंडातला नोबेल म्हणून ज्याला ओळखलं जातं असा रॅमन मॅगसेसे पुरस्कार आज सकाळी रविश कुमारला जाहीर झाला आणि मला जणू मलाच पुरस्कार मिळाल्यासारखं वाटू लागलं. या माणसाशी आपली कधी भेट नाही पण मग याच्याशी आपलं काहीतरी आंतरिक नातं आहे ब्वा, अशी जाणीव माझ्यासारख्या कित्येक नवख्या पत्रकारांना का व्हावी? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर रविशच्या पत्रकारितेत आहे. शिक्षण, आरोग्य, महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, हिंसाचार या आणि अशा नानाविध प्रश्नांना पुरेपूर माहितीच्या सामग्रीसह थेट विवेकाला साद घालणाऱ्या आपल्या खास शैलीत श्रोत्यांसमोर मांडणारा हा जागल्या पत्रकार.

ज्याला सुरवातीला एनडिटीव्ही चॅनेलचं भव्यदिव्य ऑफिस नासाच्या ऑफिससारखं वाटत होतं. इंग्रजी भाषेचा बाऊ त्याच्या डोक्यावर इतका जबरदस्त बसला होता की बस्स! दिल्ली शहर, त्याचे रस्ते, ते उंचपुरे मॉल्स आणि त्या शहराचा तो वेग त्याला सतत न्यूनगंडाने गिळायला उठायचा. पण तरीही तो मागे वळला नाही. ‘इश्क मे शहर होना है’ हे जणू त्याने स्वतःशीचं पक्कं केलं होतं.

मिडिया ‘प्रिंट’पणाची कात टाकून आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नव्याने दाखल झाला होता आणि पत्रकारितेच्या एका नव्या ग्लॅमरस आणि प्रोफेशनल युगाची ती सुरवात होती. बी.ए. हिस्ट्रीमधून शिकून आय.आय.एम.सी. मधून पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमातून आपली पत्रकारिता पूर्ण करून रविशने अल्प मानधनावर एनडिटीव्ही जॉईन केलं. राजदीप सरदेसाई म्हणतात त्याप्रमाणे ‘नव्या पत्रकारासाठी संधी आणि स्वातंत्र्य या दोन गोष्टी फार महत्वाच्या ठरतात.’ ते त्याला त्यांच्याच नेतृत्वाखाली एनडिटीव्हीमध्ये मिळालं. पण शहराचा धाक आधीच मनात बसलेल्या रविशचा ऑफिसतील वावर एखाद्या भिजलेल्या उंदरसारखाच होता. राजदीप सरदेसाईंचाही धाक असल्यामुळे सुरवातीला कित्येकदा तो मागच्या दारानेच ये-जा करायचा. ‘तुम यहा रिपोर्टर बनने आये हो या हिरो बनने? क्या देवानंद जैसे बाल बना रखे है?’ रविशने वाढवलेल्या केसांवर राजदीप सरदेसाईंनी ओरडल्याचं तो एका आठवणीत सांगतो.

आपला बिहारी गावंढळ बाज आणि मनातली भीती सोबत घेऊन रविश दिल्लीच्या रस्त्यावरून वेगवेगळे नवे विषय शोधून त्यावर ‘रविश की रिपोर्ट’ बनवू लागला. त्याच्या बोलण्यातला बिहारी लहेजा आणि रिपोर्टिंग करताना कुठल्याही वातावरणात आणि परिस्थितीत मिसळून जाण्याचा लाघवीपणा हा त्याच्या मांडणीचा कणा होता. निवडलेले विषय हे थेट सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याशी निगडित आणि तो विषय मांडण्यासाठी हसत-खेळत सहज मुद्दे पोहोचवण्याची त्याने वापरपेली पद्धतही तितकीच हटके. कधी तो बिहारी कामगारांच्या ताटात जेवत जेवत त्यांच्यासोबत बोलायचा तर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निघालेल्या मोरच्यात तो तरुणाच्या खांद्यावर हात टाकून सहजतेने मित्रासारखा संवाद साधायचा. त्याचं असं मिसळणं हा त्याचा प्लस पॉईंट होता.

‘रविश की रिपोर्ट’ नंतर त्याला रात्री ९ ते १० हा प्राईम टाइम स्लॉट मिळाला आणि ‘नमष्कार, में रविश कुमार...’ हे शब्द ऐकण्यासाठी अनेक जागरूक प्रेक्षक त्याची वाट पाहू लागले. चॅनेलवर चार-पाच आणि कधी कधी आठ-नऊ पॅनेलिस्ट बोलवून टीआरपी देणाऱ्या विषयावरील वांझोट्या चर्चांचे तावातावाने चर्वण करण्याच्या ट्रेंडला फाट्यावर मारत रविश मात्र मोजक्या चार-पाच लोकांसोबत सयंत पद्धतीने आपल्या चर्चेला हाताळतो. जो विषय निवडलाय त्याची सुरवातीला तो अशापद्धतीने साधकबाधक मांडणी करतो की जेणेकरून श्रोत्यांना त्या विषयाची सगळी पार्श्वभूमी स्पष्ट होते. चर्चा सुरू झाल्यावरही इतर चॅनेल्सवर होणारा आरडाओरडा वा गोंधळ रविशच्या स्क्रीनवर दिसत नाही हेच रविशचं अँकर म्हणून असलेलं कौशल्य दाखवतं. बोलताना असलेलं चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि हलकासा उपरोध वा कोपरखळीने मुद्दा पोचवण्याची खास शैली हे त्याचं वैशिष्ट्य.

आपल्या प्राईम टाइममध्ये सातत्याने लोकांचे प्रश्न घेऊन उभा राहणारा हा सच्चा पत्रकार सातत्याने झुंडशाहीला सामोरे जातो. कधी कधी २४ तास सतत येणारे धमक्यांचे फोन, मेल्स, मेसेजेस आणि ट्रोल्सकडून सोशल मीडियावर होणारा हल्ला हे सारं पचवून तो आपलं निखळ टवटवीत हास्य घेऊन स्क्रीनवर हजर होतो तेंव्हा माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराला आशा वाटते.

‘हा. मुझेभी डर लगता है!’ असं प्रांजळपणे सांगत प्रयत्नपूर्वक त्या भीतीवर मात करत धैर्य एकवटणारा रविश ‘डरा हुवा पत्रकार, मरा हुवा लोकतंत्र पैदा करता है’ असं म्हणतो तेंव्हा तो एका अर्थाने जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमधल्या चौथ्या खांबावरील मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारा आशेचा दिवा बनून उजेड पेरू पाहत असतो.

२०१६ मध्ये आपल्या चॅनेलची पूर्ण स्क्रीन काळी करून ‘यही आज के टीव्ही की तसविर है’ असं म्हणत आजच्या पत्रकारितेची हरवलेली मूल्ये जगासमोर मांडणारा रविश असो वा देशातील प्रश्नांवर न बोलण्यापेक्षा ‘क्या बागों मैं बहार है?’ असा प्रश्न विचारणेच आता फायद्याचे कसे आहे, असे उपरोधिकपणे म्हणणारा रविश असो. त्याचा प्रत्येक प्राईम टाइम देशातील नागरिकासाठी ‘नागरिक’ म्हणून आकलनाची परिपक्वता निर्माण करतो.

रविशची दखल घेताना रॅमन मॅगसेसे पुरस्कार समिती त्याच्या या साऱ्या निडर कर्तृत्वाचा पुढीलप्रमाणे उल्लेख करते. “चर्चेचे संचालन करताना रविश शांत परंतु भेदक असतात. संबंधित विषयाची सांगोपांग माहिती त्यांच्यापाशी असते. ते पाहुण्यांवर कुरघोडी करायला जात नाहीत. आपले म्हणणे नीट मांडण्याची पुरेशी संधी ते त्यांना देतात. मात्र अत्युच्च अधिकाऱ्यांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव करुन द्यायला, माध्यमांवर आणि देशातील सार्वजनिक चर्चेच्या स्तरावर टीका करायला  ते कचरत नाहीत. यामुळेच या किंवा त्या बाजूच्या माथेफिरु पक्षपाती लोकांकडून त्यांना त्रास आणि धमक्या दिल्या जातात. या साऱ्या संकटांना आणि संतापाला तोंड देत  दोषदर्शी आणि सामाजिक दृष्ट्या जबाबदार अशा माध्यमाचा अवकाश सुरक्षित राखून त्याचा विस्तार करण्याचे आपले काम रविश सातत्याने करत आहेत. लोकांची सेवा हीच  केंद्रस्थानी असलेल्या पत्रकारितेवर त्यांची दृढ श्रद्धा आहे म्हणून रविशनी पत्रकार कुणाला म्हणावे हे अगदी सोप्या शब्दात थोडक्यात सांगितलंय, 'तुम्ही लोकांचा आवाज बनला असाल तरच तुम्ही पत्रकार आहात.'

 २०१९ च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी रविश कुमार यांची निवड करुन विश्वस्त निधीचे संचालक अत्युच्च दर्जाच्या  व्यावसायिक, नीतिमान पत्रकारितेशी असलेल्या त्यांच्या अविचल निष्ठेचा; सत्य, स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा यांच्या बाजूने सतत उभे राहताना त्यांनी दाखवलेल्या नैतिक धैर्याचा आणि ज्यांना आवाज नाही त्यांना सन्मानपूर्ण आणि खणखणीत आवाज देण्याने, धैर्याने पण सौम्यपणे सत्तेला सत्य सुनावण्यानेच  लोकशाही व्यवस्था प्रगतीपथावर नेण्याच्या आपल्या उदात्त ध्येयाची पूर्ती पत्रकारिता करते. यावरील त्यांच्या विवेकी विश्वासाचा सन्मान करत आहे.”

पुरस्कार मिळाल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना रविश म्हणतो, “हा फक्त माझा सन्मान नाही तर माझ्याकडे आशेने पाहणाऱ्या त्या सर्वांचा सन्मान आहे. पत्रकार म्हणून जनतेच्या समस्यांना मी मांडू शकतो, असं वाटून मला समस्यांची अनेक पत्रं पाठवून माझ्याकडे विश्वासाने पाहणाऱ्या सर्वांचा हा सन्मान आहे. हे खरंय की एकेकाळी ऑफिसमध्ये आलेल्या श्रोत्यांच्या चिठ्ठ्यांना वाचून वर्गीकरण करण्याचं काम मला सुरवातीला देण्यात आलं होतं. तिथपासून ते प्राईम टाइम स्लॉट हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. एखादा विषय घेऊन त्याचा संपूर्ण अभ्यास करून फक्त ४० मिनिटांत ४ लोकांसमवेत विषय हाताळणे अवघड असतच. पण पत्रकारितेतील मूल्यांवरील विश्वासाने ते होत गेलं. सध्या पत्रकारितेत येऊ पाहणारे अनेक तरुण पत्रकार गुणवत्तेने चांगले आहेत. परंतु प्रस्थापित माध्यमांचे संपादक खूप खराब आहेत. क्षमतेबाबत परिपूर्ण असूनही संधीअभावी अनेक नवे पत्रकार मागे पडतात. मी नव्या पत्रकारांना सांगू इच्छितो की, नोकरी टिकवण्यासाठी आपली पत्रकारिता मारून टाकू नका. त्यातून मुक्त व्हा. जनतेमध्ये विष पेरण्याचं वा टीआरपीसाठी भावनेच्या लाटेवर स्वार होणारे मुद्दे चघळणे हे आपलं काम नाही.”

सत्य, चिकाटी आणि स्वातंत्र्यासाठी उभे राहण्याचे नैतिक धैर्य रविशने सातत्याने दाखवलं आहे. ‘व्हॉइस ऑफ या व्हॉइसलेस’ बनलेला हा पत्रकार जेंव्हा मॅगसेसे पुरस्काराने नावाजला जातो तेंव्हा एक आयआयएमसीएन म्हणून हा पुरस्कार मलाच मिळाल्याचा आनंद होतो. कारण पत्रकारितेत उतरू पाहणाऱ्या माझ्यासारख्या आयआयएमसीएनची नाळ ही थेट आयआयएमसीएन असणाऱ्या त्या रविशशीच जोडली गेली आहे. आणि मग स्वतःच्या चेहऱ्यावर तेच स्मितहास्य ठेऊन आणि बोलण्यात तोच सयंतपणा ठेऊन म्हणावं वाटतं, 'नमष्कार, मैं भी रविश कुमार...'


- विनायक होगाडे

No comments:

Post a Comment