Sunday, 11 September 2016

न्यूमरॉलॉजी : विज्ञानाच्या कसोटीवर...!

       


 खरं तर दररोज सकाळी fm वर एका प्रसिद्ध अंकशास्त्रीचा कार्यक्रम लागतो.एकदा-दोनदा ऐकला होता.लोकांच्या समस्येवर नावाचं स्पेलिंग बदलण्याचे  उपाय फारच हास्यास्पद वाटायचे,म्हणून कधी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही.पण एवढं पक्कं माहीत होतं की शास्त्राचा दावा करून ही उघड-उघड लोकांची फसवणूक केली जात आहे.ती फसवणूक कशाप्रकारची आहे ,हे पुढच्या मांडणीत येईलच! आता हा लेख लिहायला मी उद्युक्त झालो तेही अशाच एका कार्यक्रमावरून! नावात बदल करायला सांगून भविष्य बदलणाऱ्या एका प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्टचा आमच्या इथल्या स्थानिक tv वाहिनीवर हाच प्रोग्राम चालू होता!
        नेहमीप्रमाणे फोन आला...अँकरने फोनवरील व्यक्तीला नाव,जन्मतारीख व समस्या विचारली.नाव-जन्मतारखेनंतर मूल होत नसल्याचं समोरच्या बाईनं सांगितलं.मग ही समस्या ऐकून त्या न्यूमरोलॉजिस्टनी त्यांना घर नंबरही विचारला,आणि त्यानंतर मूल होण्यासाठी पटकन पुढील उपाय सुचवले...

1. नाव Tejashri चे Tejashrri करा
2. 24 हा अंक 24 वेळा कागदावर सकाळी उठल्यावर लिहा.
3.तोच अंक अंगठ्याच्या खाली तळहातावर लिहा.
4.झोपताना डोके दक्षिणेला करून झोपा.
5.बेडवर निळे बेडशीट अंथरा.
6.बेंबीखाली 24 हा अंक लिहा.

        आता या उपायांनी एखाद्या दांपत्याला मूल होईल का...? वगेरे-वगेरे प्रश्नाची उत्तरे पुढे क्लिअर होत जातीलच.नेमकं हे न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकशास्त्र की जे स्वतःला शास्त्र म्हणवून घेतं ते आहे तरी काय..? त्यातून माणसाचं भलं होईल का...? शिवाय या प्रशांची उत्तरे हे अंकशास्त्री कशाआधारे देतात..? या उत्सुकतेपोटी मी प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट 'श्वेता जुमानी' यांच्या वेबईटला भेट दिली! आणि त्याआधारे या कथित शास्त्राची पोलखोल करण्याचा प्रयत्न केलाय..! इथे वाचकांनी आवर्जून एक गोष्ट लक्षात घ्यावी की पुढे जी मांडणी अंकशास्त्राबद्दल येणारे,ती फक्त इंटरनेटवरुन आणि त्यातल्या त्यात जुमानींच्या वेबसाईटवरुन घेतली आहे. याचं कारण असं  की न्यूमरोलॉजी असं सर्च केल्यानंतर जगभरातील अनेक न्यूमरॉलॉजी साईट्स माझ्यापुढे उभ्या राहिल्या. आणि प्रत्येकांत या शास्त्राची मांडणी कमी-अधिक प्रमाणात वेगळी होती! विषयाची व्याप्ती पाहता फक्त जुमानीच्या अंकशास्त्रावर अभ्यास करून,ते शास्त्र आहे का...? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केलाय..! 

【संदर्भ : jumaani.com 】
      
        कोणतीही बाब शास्त्र म्हणून कसोटीला उतरवण्यासाठी एक गृहितक (हायपोथेसिस) मांडावे लागते. हे विधान निरीक्षण,परीक्षण,काटेकोर तर्क,गणित,प्रत्यक्ष प्रचिती व प्रयोग यांच्या आधारे सिद्ध करता यावे लागते.अंकशास्त्रांची अशी गृहितके यात कुठेच आढळून येत नाहीत.त्यामुळे ही गृहितके कठोर तपासणीला उतरण्याचा प्रश्नच येत नाही! मात्र अंकशास्त्राचा जो व्यवहार होतो,तो कोणत्या गृहितकाला धरून होतो,ते अगदी स्पष्ट आहे.त्याबद्दल पुढीलप्रमाणे गृहितक मांडता येईल आणि त्याबद्दल आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही! आता इथून पुढे हे शास्त्र का नाही,या प्रयत्नात मी असणारे त्यामुळे 'अंकशास्त्र' असा उल्लेख न करता 'अंकजोतिष' असा उल्लेख कटाक्षाने करणार आहे!
आता अंकजोतिषाचा जो सर्व व्यवहार आहे तो पुढील गृहितकांवर आहे -
1) जन्मांकांचा मानवी जीवनावर परिणाम होतो !
2)1 ते 9 हे जन्मांक आकाशस्थ नवग्रहांशी जोडलेले आहेत,की ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो.
3) या 
 व्यक्तीचे भविष्य ठरते आणि जे ठरले आहे ते बदलता येते !

          पहिल्या गृहितकाकडे वळू..!
जन्मांकाचा मानवी जीवनावर परिणाम होतो,असं अंकशास्त्र मानतं! पहिल्यांदा आपन जन्मांक म्हणजे काय ते समजून घेऊ! जुमाणींच्या अंकजोतिषानुसार प्रत्येक इंग्रजी अाद्याक्षराला निश्चित अशी काही किंमत आहे.आणि व्यक्तीच्या नावातील अद्याक्षरांच्या या किंमतींची बेरीज आणि जन्मतारखेच्या अंकांची बेरीज यांच्यात निश्चित असा संबंध आहे. आणि या दोहोच्या समन्वयावरुन मिळणाऱ्या जन्मांकावर मानवी जीवन ठरलेले आहे.या दोहोंमधील जन्मतारीख ही निश्चित असते,ती बदलता येत नसते,त्यामुळे नावातील अद्याक्षरे बदलली तर त्या नावाची किंमत बदलेल आणि मूळ जन्मांकावरून ठरलेले भविष्य आपल्याला बदलता येऊ शकते ! असं पहिलं गृहितक थोडक्यात सांगतं..!
        तुर्तास सोईसाठी जन्मतारखेवरून मिळणाऱ्या अंकाला 'ज-1' असं आपण संबोधू आणि नावावरुन मिळणाऱ्या अंकाला 'ज-2' !
आता नावांच्या अाद्याक्षरांची किंमत कशी काढली जाते ? इंग्रजी अाद्याक्षराला काय किंमत आहे याची माहिती जुमानीनी दिलेली नाहिये..!याच कारण काय..? ते मात्र त्यानाचं ठाऊक..! तरीही तो कसा काढला जात असावा ? यासाठी दुसऱ्या स्त्रोतावरुन माहिती मिळवली असता तो साधारण पुढीलप्रमाणे काढतात !

【संदर्भ : How to Calculate your Name Number in Numerology -wikiHow.com

या वरील तक्त्याआधारे प्रत्येक अाद्याक्षाराची किंमत ठरते! आता A ला 1 च का..? आणि J ला ही 1 च का..? किंवा यांची किंमत कशा आधारे ठरवण्यात आली..? असे खुळचट प्रश्न विचारणे,अर्थातच अंकजोतिषींना चालत नाही! असो!
एक उदाहरण घेऊ,म्हणजे समजेल...

       आता 9 हा अंक झाला 'ज-2' ! 'ज-2' काढण्याची ही पद्धत दुसऱ्या वेबसाईटची आहे...
जुमानीनी ती आपल्या वेबसाईटवर दिलेली नाही ! पण साधारण अशीच पद्धत असावी, असं आपण गृहीत धरु ! आता 'ज-1'कसा काढतात ते पाहूया ! समजा,तुमची जन्मतारीख 29 असेल तर 2+9=11 आणि 1+1=2 ! म्हणजे 2 हा झाला तुमचा 'ज-1' ! हि पद्धत जुमानींची आहे! यामधे फक्त जन्मदिनांकांतील अंकांची बेरीज होते..! मगाचच्या वेबसाईटवर मात्र फक्त जन्मदिनांकाची बेरीज होत नाही...तर त्याबरोबर महिना आणि सालातले अंकही ऍड केले जातात ! असो!
आता इथेच बऱ्यापैकी या तथाकथित शास्त्रातील गोंधळ लक्षात येतो ! एकतर शास्त्र म्हणवून घेण्यासाठी ते वैश्विक असावं लागतं म्हणजे शास्त्राचे निकष सगळीकडे सारखेच असतात ! दोन अधिक पाच बरोबर सात ! हे सगळीकडे सारखेच असतं ! गुरुत्वाकर्षणाचे नियम सगळीकडे सारखेच असतात,त्यात कुठेही बदल नाही ! म्हणजे शास्त्राला कुणीही,कुठेही,कधीही तपासले असता सगळीकडे त्याचे निष्कर्ष वा त्याची सत्यता ही सारखीच आढळते ! पण अंकजोतिष शास्त्र म्हणवून घेत असताना ते सगळीकडेच सारखे नाहिये! जन्मांक काढण्याची पद्धतच मुळात सगळीकडे बदललेली दिसते ! म्हणजे इथे शास्त्र म्हणवून घेण्याचा मुलभूत पायाच ढासळतो ! शिवाय, ज-1 व ज-2 काढण्याच्या पद्धती बरोबरच इंग्रजी अाद्याक्षरांना तशाच किंमती का..? हा प्रश्नही उद्भवतोच !या किंमती कोणत्या निरीक्षणाआधारे,तर्काआधारे ठरवण्यात आल्या? आणि ज1 व ज2 यांच्यात निश्चित असा संबंध आहे,याला पुरावा तो काय?
असेल तर तो संबंध काय आहे? या जन्मांकातून व्हायब्रेशन म्हणजे ऊर्जा बाहेर पडतात व ते मानवी जीवनावर परिणाम करतात,याला पुरावा काय..? आणि नावातील स्पेलिंग बदलामुळे या ऊर्जेत बदल होईल व तो सकारात्मक बदल घडवेल,यामागे तर्क तो कोणता? म्हणजे इथे पहिल्या सिद्धांतातच अंकजोतिष गोंधळलेलं आहे!
असो!

         दुसऱ्या गृहितकाकडे वळू!
अंकजोतिषाचे दूसरे गृहितक आहे,की 1 ते 9 हे अंक आकाशस्थ ग्रहगोलांशी जोडलेलं आहेत,की ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो! खरं तर या गृहितकावरून अंकजोतिष हा फलजोतिषाचा नक्कीच धाकटा भाऊ आहे,असं म्हणायला हरकत नाही...पण तो सावत्र धाकटा भाऊ आहे !तो का, हे ही पुढं स्पष्ट होईल! गंमतीचा भाग सोडला तर नवग्रहांचा मानवी जीवनावर खरचं परिणाम होतो का? शिवाय फलजोतिष हेही स्वतःला शास्त्र म्हणवून घेतं !यात तथ्य आहे का? 
याची याच तर्कशुद्ध पद्धतीने सोप्या भाषेत सुंदर मांडणी डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या 'तिमिरातूनी तेजाकडे' या पुस्तकात "फलजोतिष: विज्ञानाच्या कसोटीवर" या विवेचनात केली आहे ! पुन्हा त्यात मी घुसणे,हे विषयाला बगल देण्यासारखं होईल!पण तरीसुद्धा गरज भासेल तेंव्हा 'अंकजोतिष ज्यावर आधारलेलं आहे,ते फलजोतिष' शास्त्र का नाही ? याचेही काही मुद्दे आवश्यकतेनुसार येत राहतील !
        अंकजोतिषाने सूर्याला 1, चंद्राला 2, गुरुला 3, यूरेनसला 4, बुधाला 5, शुक्राला 6, नेपच्युनला 7, शनीला 8, आणि मंगळाला 9 हा अंक दिला आहे ! कृपया, हे असेच का?असा आडमुठा सवाल विचारण्याची गुस्ताखी अर्थातच कुणीही करू नये !
आता गम्मत अशी आहे, की फलजोतिषांच्या नवग्रहांमधे'नेपच्यून' आणि 'युरेनस' यांना अजिबात स्थान नाहिये !मात्र हे दोन ग्रह अंकजोतिषात दिसताहेत !फलजोतिषात या दोन ग्रहांऐवजी 'राहू' आणि 'केतू' हे दोन आहेत !आणि बाकीचे सात ग्रह मात्र दोन्हीकडे कॉमन आहेत! आता मुळात आपल्या आकाशगंगेत 'राहू' आणि 'केतू' या नावाचे कोणतेच ग्रह नाहियेत!पण ते काल्पनिकरित्या फलजोतिषात घुसडले आहेत! असो!आता प्रश्न असा निर्माण होतो की फलजोतिषातले राहू आणि केतू हेच युरेनस आणि नेपच्यून आहेत का? आहेत तर मग यातला युरेनस राहू आहे की केतू ? त्याचप्रमाणे नेपच्यून कोण आहे ?हा प्रश्न ओघाने आलाच ! जरी याचे उत्तर आम्ही आडमुठा प्रश्न न विचारता ग्राह्य धरले तर मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की फलजोतिषात राहू आणि केतू या नावानी माणसाच्या भविष्याची वाट लावणारे ग्रह अंकजोतिषात आल्यावर आपले नाव का बदलतात ?की त्यांनाही आपल्या भविष्याच्या काळजीपोटी अंकजोतिषिंच्या सल्ल्यावरून नाव बदलण्याची गरज भासावी ?हे हास्यास्पद नाही का ? मग फलजोतिषाच्या नवग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो की अंकजोतिषाच्या नवग्रहांचा ?
यापुढेही जाऊन अंकजोतिषी श्वेता जुमानी असा दावा करतात की हे अंकजोतिष 5000 वर्षे जूने आहे,व त्यांच्या वडिलांनी ते पुन्हा एकदा पुनरुज्जिवीत केलं आहे !पण जवळपास 250 वर्षांपूर्वी तर युरेनस व नेपच्यून नावाचे ग्रह माणसाला माहितच नव्हते ! मग 5000 वर्षापूर्वी ते अंकजोतिषात होते का..? की आताच टपकले ? याचं उत्तर हे कथित शास्त्र काय देऊ इच्छिते ? आणि हो, फलजोतिषाबाबतीतही हा प्रश्न आलाच की ! शिवाय 5000 वर्षांपूर्वी इंग्रजी भाषा होती का ? असेल तर ती अशीच होती का ?त्यातले अाद्याक्षरे हीच असतील कशावरून ?
         खरं वास्तविक पाहता त्या नवग्रहांचा आणि आपल्या मानवी जीवनातील घडामोडींचा काडीचाही संबंध नाही ! फलजोतिषसुद्धा थोतांडच आहे. आजवर ते स्वतःला शास्त्र म्हणवून घेत असलं तरी ते स्वतःला शास्त्राच्या कसोटीवर सिद्ध करू शकलेले नाहिये !


         आता तिसऱ्या गृहितकाकडे वळू ! या कथित शास्त्राचे तिसरं गृहितक आहे, 'जन्मांकावरून व्यक्तीचे भविष्य ठरतं आणि ते नावात केलेल्या बदलांमुळे बदलता येतं !'
अंकजोतिषिंच्या मते प्रत्येक जन्मतारखा काही ग्रहांनी वाटून घेतल्या आहेत !आणि 1 ते 9 या जन्मांकांचा एकेक ग्रह स्वामी आहे !
म्हणजे 1 या जन्मांकाचा स्वामी सूर्य....2 चा चंद्र वगेरे...वगेरे...!
आता 2,11,20,29 या जन्मतारखांना जन्मलेल्यांचा जन्मांक अर्थातच 2 हा येतो! मग अशा लोकांचा स्वामी झाला चंद्र !याचप्रमाणे, प्रत्येक ग्रहांनी जन्मतारखा वाटून घेतल्या आहेत !आता अंकजोतिषाच्या पहिल्या गृहितकात जन्मांक हा दोन अंकांच्या म्हणजे ज1 व ज2 यांच्या समन्वयातून मिळतो..हे आपण पाहिलय ! पण 'संख्या आणि ग्रह' या तिसऱ्या गृहितकात 'ग्रह' नेमून देताना फक्त ज1 चा म्हणजे जन्मतारखेचा विचार केलाय! नावावरून मिळणाऱ्या ज2 चा विचारच केला नाहिये ! शिवाय, लहान मूल ज्यावेळी जन्मतं,त्यावेळी त्याला जन्मतारीख जन्माबरोबरच मिळते. पण नाव लगेच नाही मिळत !किमान भारतात तरी बाळाचं नाव काही दिवसानी- महिन्यांनी ठेवायची पद्धत आहे ! म्हणजे इथे ग्रह नेमताना घोळ आहे. तरीसुधा वादासाठी असं मान्य करू की जन्मतारखेवरुन मिळणारा ज1 च ग्रह कोणता, हे ठरवतो ! पण मग ज2 ची किंमत बदलल्याने ग्रहांचा स्वभाव कसा काय बदलतो? एकतर ज1 व ज2 यांचा समन्वय हा ग्रहांच्या स्वभावाला...परिणामाला कारणीभूत असायला हवा ना ! पण इथे ग्रह ठरवताना ज2 चा विचार न करता फक्त ज1 एकवरून ग्रह ठरवलेले दिसताहेत ! मग ज2 ला म्हणजे नावाच्या किमतीला किंमत ती काय उरते ? आणि ज2 व ग्रह यांच्यात परस्पर संबंध काय लावाल?

लावला तर त्याच्या मागे तार्किक निकष काय? हा सवालही उभा राहतोच !
मग ज2 ची नाव बदलून बदलणारी किंमत फक्त ज1 च्या किमतींवरुन ठरणाऱ्या ग्रहाच्या प्रभावाला बदलण्यास कारणीभूत कशी काय ठरते ? या प्रश्नाचे उत्तर काय ?
असो ! अंकजोतिषाने पुढे जाऊन प्रत्येक ग्रहांमधे 12 राशींचे वाटप केलेलं आहे !ते पुढीलप्रमाणे....

सूर्य - सिंह रास
चंद्र - कर्क रास
गुरु - मीन व धनू रास
*युरेनस - रासच नाही
बुध - मिथुन व कन्या
शुक्र - वृषभ व तुळ
नेपच्यून - कर्क
शनी - मकर व तुळ व कुंभ
मंगळ - मेष व वृश्चिक

आता इथे प्रत्येक ग्रहांना 1,2 किंवा 3 राशी वाट्याला आल्या आहेत . अंकजोतिषाने यूरेनसला रास देण्यापासून वंचित का ठेवलय ?याचा काही तर्क लागत नाही ! मात्र काही राशी दोन ग्रहांकडे जातानाही दिसतात ! उदा. कर्क रास चंद्र व नेपच्यून या दोघांकडे जाते. या दोघात कर्क राशीच्या माणसावर प्रभाव टाकण्यास भांडणे होत असतील का? हे अंकजोतिषीच जाणोत ! आता यापुढे जाऊन 9 पैकी 4 ग्रह जास्त यशस्वी मानले गेले आहेत ! सूर्य,गुरु,बुध आणि शुक्र म्हणजे अनुक्रमे 1,3,5 व 6 या जन्मांकांचे लोक जन्मतःच भाग्यवान असतात.! त्यांना आयुष्यात जे अपेक्षित आहे ते मिळतचं किंबहुना जास्त मिळतं ! का, ते अर्ताथच विचारू नये...!
नवग्रहामधे महत्वाची भूमिका बजवणारा तारा 'सूर्य' हा ग्रह म्हणून वावरताना दिसतोय तर उपग्रह असणारा 'चंद्र'सुद्धा ग्रहच मानला गेलाय !हे दोघेही ग्रह कसे काय झाले याचे उत्तर दोन्हीही कथित शास्त्रे देत नाहीत..!

        आता वरील गृहितकांचा अंतर्विरोध आपण एक उदाहरण घेऊन स्पष्ट करू....!
ज्या बाईची नैसर्गिक प्रसूती होणार नसते,तिचे बाळ सिजेरियन ऑपरेशन करून बाहेर काढले जाते. हे ऑपरेशन पूर्वनियोजित असल्याने ते एखाद-दुसरा दिवस अलिकडे-पलिकडे केले तरी चालते ! आता एक उदाहरण घेऊ,म्हणजे लक्षात येईल..!
एकाच हॉस्पिटलमधे प्रशस्त ऑपरेशन थिएटरमधे बरोबर एकाच सेकांदाला सिजेरियन करून तीन बालकांना जन्म देता येणे,शक्य आहे..! आता अशापद्धतिने जन्म दिलेल्या या तीन बालकांचीही नावे आकाशस्थ ग्रहगोलांच्यानुसार एकसारखीच ठेवली.म्हणजे या तिघांचेही जन्मांक एकसारखे झाले. पण समजा यातील...एक बालक अतिश्रीमंत घरातील कन्येचे आहे...दुसरे मध्यमवर्गातील सुनेचे आहे...तिसरे शेतमजुराच्या पत्नीचे आहे..!
तर या तिन्ही बालकांच्या भविष्याची वाटचाल एकसारखीच असेल का..? शेतमजुराचा मुलगा आणि गर्भश्रीमंत मुलगा यांची भविष्यातील यशस्वीता सारखीच असेल का? अर्थातच नाही ! मग जरी शेतमजुराच्या मुलाला यशप्राप्ती व्हावी म्हणून भविष्यात त्याने नावात बदल केले तरी तो गर्भश्रीमंताइतकेच यशस्वी होईल याची ग्यारंटी काय..? आणि जरी झालाच तर मग असा बदल करण्याची गरज गर्भश्रीमंताला का भासू नये..? कारण जन्मांक तर एकच आहेत...त्यामुळे परिणाम तर सारखाच व्हायला हवा ना!
खरं तर या एकाच उदाहरणावरून या तथाकथित शास्त्राची पोलखोल होते...!

        आता लक्षात घ्या...आयुष्य म्हटलं की असंख्य अडचणी आल्या...संकटे आली..!
हे अंकजोतिषी एखाद-दुसरं संकट घेऊन गेलं तरी नाव बदलण्याचा सल्ला बऱ्यापैकी देतात.. आता एकदा त्यांच्याकडे गेलेला माणूस नाव बदलून परत दूसरी समस्या घेऊन काही दिवसांनी गेला तर..? ते परत नाव बदलतील का...?
थोड्या वेळासाठी असं गृहीत धरु की आयुष्यातल्या सगळ्या संकटासाठी अंकजोतिषी एकदाच नाव बदलतात...!
म्हणजे मग प्रत्येकालाच सुखी-समाधानी व्हायला यांना पैसे देऊन...आपलं नाव बदलून घ्यावंच लागेल ना...!म्हणजे थोडक्यात जुमानीसह सगळ्या अंकजोतिषी मडळींनी जगातील सर्व लोकांची नावे बदलायचा उपक्रम या न्यूमरोलॉजीच्या आधारे घेतलाय..!
किती हास्यास्पद आहे हे..!

आणखी एक उदाहरण घेऊ..!
जर समजा,अस केलं की...एखाद्या अंकजोतिषीने आजवर नावात बदल करायला सांगितलेल्या दहा लोकांच्या जन्मतारखा व बदल केलेली नावे त्यांना परत सुपूुर्द केली...आणि या माहितिवरून त्यांना संबधित व्यक्तीच्या समस्या काय होत्या...? याचा तर्क लावणे शक्य होईल का..? अशी उलटतपासणी केल्यास तितक्याच शिताफीने अंकजोतिषींना आपली मांडणी करणे शक्य आहे का..?

तरीही अजून बरेचसे असे मुद्दे आहेत,की जे बाकी आहेत..! संख्या ही संकल्पना मानवाने निर्माण केलीये! या विश्वातील जवळपास सगळ्याच गोष्टी तो अंक आणि गणिताच्या माध्यमातून व्यक्त करतो.! त्यावर प्रक्रिया करतो! आज आयुष्याची सगळी क्षेत्रं गणिताविना अधूरी आहेत..! पणअंकजोतिषासारखं थोतांड हे गणितशास्त्राला लागलेली किड आहे..असे मी मानतो..!
या कथित शास्त्रात शून्य कुठेच दिसत नाहिये..का ? तर व्यक्तीचा जन्मांक शून्य असू शकत नाही..! खरं त्या ज्या शून्याच्या शोधाने गणित खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाले त्या शून्याला या शास्त्रात स्वतंत्र अस स्थानच नाहिये..!
अंकशास्त्र म्हटल्यावर सगळ्याप्रकारचे अंक आले...इंग्रजी अंकापासून ते रोमन अंकापर्यन्त...अरबी अंकापासून ते ग्रीक अंकापर्यंत...! पण या अंकशास्त्राचे सगळे सिद्धांत इंग्रजीपुरते मर्यादित आहेत..!
आता रोमन अंकाचेच उदाहरण घेऊ..
समजा एखादी व्यक्ती चार तारखेला जन्मली..! मग रोमन अंकात चार 'IV' असे लिहतात! आणि त्यांची बेरीज 'I+V=6 ' अशी होते! मग इथं पुढें सगळचं चुकतं! 5000  वर्षापूर्वीच्या या अंकशास्त्राचं यावर मत काय..? इंग्रजीपुरते मर्यादित राहणारे हे शास्त्र व्यापक म्हणता येईल का ?
याप्रकारचे असंख्य प्रश्न विचारता येतील..!

      श्वेता जुमानी आपल्या 'जुमानी.कॉम' या वेबसाईटवर सगळ्यात शेवटी असं म्हणतात की "अंकशास्त्र म्हणजे कष्ट करण्याला पर्याय नाही..! तुम्हाला कष्ट करावेच लागतील...आणि यात तुम्हाला आमचे हे अंकशास्त्र मदत करेल..!" म्हणजे लोकांनी कष्ट करायचे तसे करायचे,आणि कष्टाचे जे काही फळ मिळेल...यश मिळेल...ते मात्र या अंक्षास्त्राच्या नावी जमा होणार..! आहे की नाही गंमत...! आजच्या जगात 'विज्ञान नाकारणे'कुणालाच शक्य नाही...त्यामुळे या अंकशास्त्रींनाही आपली भाषा थोडीबहुत शास्त्रीय बनवावी लागते...त्यामुळेच ते मांडणी करताना ऊर्जा...व्हायब्रेशन्स...सकारात्मकता...गती..आत्मशांती वगेरे-वगेरे...शब्दांचा वापर करतात..!
या थोतांडाला खपवण्यासाठी विज्ञानाचा मुलामा देण्याचा प्रयत्न करतात..!
आणि त्यामुळेच सामान्य लोकांपासून फ़िल्म स्टार पर्यन्त सगळे याला बळी पडतात..! स्वतःची नावे बदलण्यापासून चित्रपटांची नावे बदलण्यापर्यन्त फिल्मी जगतातले लोक तयारी दर्शवतात...आणि चित्रपटाची यशस्वीता अंकशास्त्राचा परिणाम म्हणून गणतात..! जी-जी भाकितं चुकून खरी ठरली आहेत...ती तेवढी सारखं-सारखं सांगायची आणि चुकलेल्या भाकितांबद्दल मूग गिळून गप्प बसायचं...हे तर ठरलेलच आहे..!
आणि अंकशास्त्री हे नावाचे स्पेलिंग बदलण्यातच लुडबुड करतं असं नाही...तर ते कधी-कधी फलजोतिषासोबतच भ्रामक वास्तूशास्त्रातही घुसतात..!
सगळ्यात सुरुवातीच्या उदाहरणात हे अंकजोतिषी त्या बाईला मूल होण्यासाठी फक्त नाव बदलायला सांगत नाहीत...तर दक्षिणेकडे तोंड करुण निळ्या बेडशीटवर झोपायलाही सांगतात...आणि कहर म्हणजे त्या बेंबीखाली  24 हा आकड़ा लिहायला सांगतात...आता बेडशीट निळेच का किंवा अंक 24 च का लिहायचा..?असा प्रश्न कुणी ग्राहक त्यांना विचारत नाहीत..!
दक्षिण दिशेचा आणि अंकजोतिषाचा संबंध कुठून आला..? बेंबीखाली 24 लिहून जर मुलं झाली असती तर आपण तुकारामांपासून डॉ. दाभोलकरांपर्यंत सगळ्या समाजसुधारकांना मूर्ख ठरवतोय..!
       400 वर्षापूर्वी तुकाराम सवाल करतात की...
"नवसे कन्या-पुत्र होती...
मग का कारणे लागे पती..?"
नवसाने....निळ्या बेडशीटने वा 24 अंकाने मुलं होत असती तर मग नवऱ्याची गरजच काय..?
          खरं तर आता या भ्रामक अंकजोतिषाचं लोन आधी फक्त उच्चभ्रू वर्गात व फिल्मी-क्रिकेट जगतात होतं...पण जुमानीसारख्या लोकांमुळे ते आता पापभीरु सर्वसामान्यांच्यात येऊ पाहतय..!
1,13,21,51,101,108,786,1008 या आणि अशा अंकाना विविध धर्मात शुभ-अशुभ मानलेलं आहे..!
याला काहीच तर्क नाही,हे खरं..! पण आता पुढे जाऊन या आकड्याच्या खेळावर माणूस आपलं भविष्य शोधू लागला तर तो विज्ञानवादी कसा म्हणता येईल..?
"म्यान द होमोसेपिअन सेपियन" म्हणजे अधिकाधिक शहाणा होत जाणारा ही बिरुदावलीच तो गमावून बसेल..!
       fm वरुन वा टिवी शोजमधून या थोतांडाच्या कानात सतत घुमण्याने सामान्य माणूस डोळे झाकून बळी पडतोय...!
वरील सर्व व्यापक मांडणीचा अर्थ इतकाच आहे की,अंकजोतिष जर काही असेल तर ती स्वप्न विकण्याची कला आहे...की जी जुमानीसारख्या अंकजोतिषीना चांगली अवगत आहे..!  पण अंकजोतिष जेव्हा विज्ञान असण्याचा दावा करतं...आणि प्रत्यक्षात दैववादी विचारांनी माणसाला जेरबंद करत असेल...तर हे चुकीचं नाही का...?
या दोन्हीचाही प्रतिकार व प्रतिवाद नको का करायला..? या देशात आधीच दैववादी असलेल्या लोकानां आणखी दैववादी बनवणं..आणि वर त्याला विज्ञानाचा मुलामा देणं...या गुन्ह्याला क्षमा ती काय..?
खरं तर वास्तुश्रद्धाशास्त्र,फलजोतिषशास्त्र...अंकजोतिषशास्त्र...या आणि अशा थोतांडाला बळी पडणारा माणूस आधीच अगतिक असतो..असहाय्य असतो..! पुन्हा अशा थोतांडाला बळी पडून तो प्रयत्नवाद सोडतो...! इच्छा आणि विवेकाला तिलांजली देऊन दैववादाला बळी पडतो...आणि सर्वात भयानक म्हणजे यामुळे तो मानसिक गुलामगिरीच्या बेड्यांना फुलाचे गजरे समजू लागतो...!

गरज आहे विचार करण्याची...!

विचार तर कराल...?

          - विनायक होगाडे...

पूर्वप्रसिद्धी : मासिक राष्ट्र सेवा दलपत्रिका - एप्रिल 2017 अंक

                     


No comments:

Post a Comment