Sunday 11 September 2016

होय...आम्ही पाहिलाय विवेकसूर्य...!


             विवेकवादी आणि समताधिष्टित समाजनिर्मितीसाठी झटणारे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 ऑगस्टला 2016 वर्षे पूर्ण होतील.
त्यांचा उभा आयुष्यपट हा अपार करुणेचा,अविरत संघर्षाचा,आणि अज्ञानाच्या महासागरातला ज्वलंत दीपस्तंभ वाटतो !
आज डॉ.दाभोलकर आपल्यात नाहीत, ही मनाला सलत असलेली बोचणी सतत असताना त्यांनी समजाजीवनात केलेले अफाट कर्तुत्व पाहुन आजही चाट पडायला होते.
बंधू डॉ.देवदत्त दाभोलकर यांची प्रेरणा घेऊन 1971 साली समाजवादी युवक दलाच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने ते सामाजिक जीवनात कार्यप्रवण झाले.
महाराष्ट्र अंनिस च्या स्थापनेपूर्वी बाबा आढाव यांच्या सोबत 'एक गाव,एक पाणवठा' मोहीम असो,मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ असो वा सामाजिक कृतज्ञता निधीसाठी चालवलेली मोहीम असो,या सगळ्यातच त्यांची आघाडी होती.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाला त्यांनी हात घातला तो बी.प्रेमानंद यांच्यासोबत 1982 साली निघालेल्या लोकविज्ञान मोहिमेतून..!
          1987 साली त्यांनी शाम मानव यांच्यासोबत अखिल भारतीय अंनिसच्या कामास सुरुवात केली आणि नंतर 1989 साली वेगळे होऊन त्यांनी मुठभर कार्यकर्त्यांच्या समवेत 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ची स्थापना केली.
आणि इथून खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या सामाजिक संघर्षाला सुरुवात झाली.मअंनिसच्या संघटनात्मक वाटचालित अनेक सामाजिक विषयांना टक्कर देताना त्यांच्या पुढाकाराने अनेक मोहिमा राबवल्या गेल्या.1992 साली मुंबईत 'स्त्रीया आणि अंधश्रद्धा निर्मूलन' परिषद व 'शोध भुताचा,बोध मनाचा' या विषयावरील भव्य यात्रा,1997 साली 'भानामती प्रबोधन धडक मोहीम',2003 साली नाशिकच्या सिहंस्थ मेळाव्याला विरोध
व इचलकरंजीतील बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद,2009 साली 'राज्यव्यापी खगोलयात्रा',2012 साली विवेकवाहीनीतर्फे 'राज्य युवा संकल्प परिषद' आणि अखेरच्या काळातील 2013 मधील 'जातपंचायत विरोधी परिषद' या त्यांच्या काही भव्य आणि समाजात विधायक हस्तक्षेप नोंदवणाऱ्या मोहिमा होत्या.
           डॉ.दाभोलकर असं म्हणायचे की," चमत्कारावर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बाबा-बुवाला मान्यता देणे,यातील मुख्य तोटा हा की,अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यावरचा स्वतःचा विश्वास गमावतात,आणि इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करतात..!"
आणि म्हणून या बुवाबाजीच्या जोखडात होरपळून निघालेल्या शोषितांना न्याय आणि श्रद्धेचा बाजार मांडणार्या कुप्रवृत्तीला कायद्याचा धाक बसावा,म्हणून जादूटोना विरोधी कायद्या होण्यासाठीची लढाईही ते नेटाने आणि अविरत लढत होते...1995 पासून सुरु झालेल्या या कायद्याचा प्रवास विरोधकांच्या खोडकर प्रचाराच्या आणि नाहक विरोधाच्या गर्तेतून मार्ग काढत अखेर 2013 ला दाभोलकरांच्या खूनानंतरच संपला...अखंड 18 वर्ष डॉ.दाभोलकर या विधेयकासाठी आपल्या रक्ताचे पाणी करत होते...
पण जणूकाही डॉ.दाभोलकरच एक खमका कायदा म्हणून आता परिवर्तित झाले आहेत...

          दाभोलकरांनी सर्वच धर्मातील असंख्य भोंदू बुवाबाबांची दुकानदारी बंद पाडली...नरेंद्र महाराज सारख्या अनेक बुवाशी ते आमने सामने भीडले...
चमत्काराचा,अलौकिक शक्ती असल्याचा, भुत दाखवण्याच्या दावा करणाऱ्या बुवांचे त्यांनी सप्रमाण पुराव्यानिशी नामोहरण केले...
"चमत्कार करुण दाखवा,आणि 21 लाख मिळवा" हे मअंनिसचे आव्हान आजतागायत कुणीच पेलू शकले नाहिये.
आणि म्हणूनच गेल्या 27 वर्षात महाराष्ट्रात चमत्काराचा उघड दावा करणारे भोंदू बाबा आता दिसतच नाही.


           पण डॉ.दाभोलकर फक्त अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामापुरते मर्यादित नव्हते.त्यांची दृष्टी त्या पलिकडील होती.अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरु झालेला संग्राम त्यांना"अंधश्रद्धा निर्मूलन ते वैज्ञानिक दृष्टिकोण,वैज्ञानिक दृष्टिकोण ते धर्मचिकित्सा,धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता,आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवादी समाजनिर्मिती" या मार्गाने पुढे न्यायचा होता...!
अर्थातच,ते प्रामाणिकपणे हेही कबूल करायचे की," मी ज्या कार्यक्षेत्रात आहे तेथे कामाचा विचार दशकांच्या नव्हे तर शतकांच्या कालावधीत करावयास हवा,याची मला जाणीव आहे..."
पण त्यांच्या लिखाणामधुन त्यांच्या अफाट वैचारिक द्रष्टेपणाची जाण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही...
'प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारणभाव असतो आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोनाने तपासता येतो' ही मानसिकताच मुळात भारतीय समाजात अजुन तितकीशी रुजलेली नाहिये.मुळात जे काम फार पूर्वी व्हायला हवं होतं त्यासाठी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या प्रचार,प्रसारासाठी डॉ.दाभोलकरांना आपलं उभं आयुष्य वेचावं लागलं.अर्थातच हेही काम तितकं सोपं नव्हतं आणि नाहिये.

          डॉ.दाभोलकरांच्या म्हणण्याप्रमाणे "धर्म आणि राजकारण यांच्या एकत्र करण्याच्या घातक कृतीला हिंसेची जोड देण्याचा प्रयत्न झाला, तर लोकशाही पण संपुष्टात येते...!"
आणि म्हणूनच, देशात एका बाजूला सारासार विवेक गहाण ठेऊन कट्टर धर्मांध शक्तीच्या धर्माधिष्टित राष्ट्राच्या संविधानद्रोही कारवाया वाढत चाललेल्या असताना दुसऱ्या बाजूला याविरोधात धर्मनिरपेक्ष,लोकशाही, विवेकवादी देशाच्या उभारणी साठी तयार राहण्याची सुपिक जमीनीची मशागत डॉ.दाभोलकर आपल्या कामातून करत होते.
          डॉ.दाभोलकर लढाऊ नेते होते...कुशल संघटक होते...विचारवंत होते...द्रष्टे लेखक होते...उत्कृष्ट वक्ते होते...!
'क्रोधापेक्षा करुणा आणि उपहासापेक्षा आपुलकी' हाच त्यांच्या संपुर्ण कार्याचा मुलमंत्र होता...
1998 पासून सलग 16 वर्षे ते साने गुरुजींच्या 'साधना' साप्ताहिकाचे संपादक होते.या काळात त्यांनी साधनेला जे वैभव प्राप्त करुण दिले ते वाखानण्याजोगे आहे.
एवढेच काय...डॉ.दाभोलकर यापलीकडे जाऊन उत्कृष्ट कबड्डीपटू होते...त्यांचा खेळ कौशल्यपूर्ण आणि चपळ असा होता.त्यांनी महाविद्यालयीन जीवनात आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीमध्येे भारताचे नेतृत्व केले होते.'हनुमान उडी' ही केवळ दाभोलकरांच्यामुळेच कबड्डीमध्ये लोकप्रिय झाली.

       व्यसन मानवाचा मूल्यविवेक नष्ट करतो म्हणून दाभोलकरांनी सातार्यात 1989 साली 'परिवर्तन' या व्यसनमुक्ती संस्थेचीही स्थापना केली...आजही ही संस्था समाजात व्यसनमुक्तीचे 'परिवर्तन' घडवून आणत आहे...!
          दाभोलकरांकडे माणूस पारखण्याची कला उपजत होती.आणि 'माणूस बदलतो' या उक्तीवर त्यांची श्रद्धा होती...!
"अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही महाराष्ट्रातील संतसमाजसुधारकांचा वारसा कृतीशील करण्यासाठी समाजाच्या सदसदविवेकबुद्धीला घातलेली साद आहे..असं दाभोलकर म्हणायचे,आणि म्हणूनच,डॉ.दाभोलकरांनी निळू फुले,श्रीराम लागू,सदाशिव अमरापुरकर यांच्यापासून ते उमेश कुलकर्णी,सोनाली कुलकर्णी या चित्रपटसृष्टितील अनेक कलाकारांना आपल्या चळवळीत सामिल करुण घेतले...!
          डॉ.दाभोलकरांचा ज्या उद्देशांनीे सनातनी प्रवृत्तीनी निर्घृण खून केला त्यातला एकही उद्देश पूर्ण झाला नाही...
जगाचा इतिहास हेच सांगतो की मुळात 'व्यक्ती मारून विचार संपतो' ही अंधश्रद्धा जोपासणार्यांनी आजवर विचारांची लढाई विचारांनी न लढता नेहमीच अशा भेकड मार्गाचा अवलंब केला आहे...ब्रूनो,सॉक्रेटीस पासून ते मार्टिन ल्यूथर किंग,म.गांधी आणि त्यानंतर दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी या सर्वांनाच हिंसेने संपवले गेले...संतपरंपरेतील अनेक संत आणि समाजसुधारकांनाही अशा अतोनात छ्ळाला सामोरे जावे लागले...!
मुळात या विवेकसूर्यांनी कधीच कोणाला आपला शत्रु मानला नाही...
तरीही यांचा खून झाला,पण विवेकाच्या वाटेवरून चालणारे लोक हबकले नाहीत...घाबरले नाहीत...ते नेहमीच विवेकाचे वाटसरू राहिले..!
           डॉ.दाभोलकर यांच्या खुनानंतर गेल्या 3 वर्षात प्रलंबित जादूटोनाविरोधी कायदा पास झाला...मअंनिसच्या गावागावात असणाऱ्या शाखा वाढून 250 वरुन 325 भर झाल्या...
अनेक तरुण कार्यकर्ते रस्त्यावर उतरले...मनात संताप,चिड,उद्विग्नता या आणि अशा संमिश्र भावना असतानाही कुठेही हिंसेने निषेध नोंदवला गेला नाही...तर 'रिंगण नाट्य' या सांकृतिक अभिव्यक्तीद्वारे कार्यकर्ते गावागावात...शाळा-कॉलेजमध्ये जाऊन विवेकाचा जागर अधिक जोमाने करू लागले...या आणि अशा माध्यमातून आजही दाभोलकरांच्या हत्येचा विधायक पद्धतीने निषेध नोंदवला जातोय...खुनाचा तपास संथगतीने असला तरी त्याबद्दलची न्यायलयीन लढाई चिकाटिने सुरु आहे...जादूटोनाविरोधी कायद्याअंतर्गत 350 हुन अधिक केसेस गेल्या 3 वर्षात नोंदवल्या गेल्या...

मुळात डॉ.दाभोलकर म्हणायचे की,"अंधश्रद्धा हा श्रद्धेच्या कक्षेत्रातील काळा बाजार असतो,आणि काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीचा धर्म पाहण्याची गरज नसते..!"
या कायद्याअंतर्गत अनेक केसेस हिंदू सोडून इतर धर्मातल्या बाबाबुवावर नोंदवली गेल्या आहेत. हां कायदा हिंदूधर्मविरोधी आहे...असा कुप्रचार करणार्यांना यातून आपोआपच योग्य प्रत्युत्तर मिळाले...
"जात हीच एक अंधश्रद्धा आहे..!" असं म्हणनार्या डॉ.दाभोलकरांनी ज्या सामाजिक विषयाला आपल्या अखेरच्या काळात हात घातला होता तो म्हणजे 'जातपंचायत विरोधी अभियान'...!
आणि अभिमानाची गोष्ट अशी की,जादूटोनाविरोधी कायद्यानंतर महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने 'जातपंचायतीच्या मनमानी कारभाराला मुठमाती' देणारा कायदा विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंजूर झाला...लवकरच तो राष्ट्रपतींच्या सहीनंतर लागूही होईल...डॉक्टरांच्या खुनानंतर 2014 साली अंनिसच्या रौप्यपुरती वर्षानिमित्त 3 दिवसीय "विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद" घेण्यात आली...!

अंनिसचे मुखपत्र असलेल्या "अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र" या मासिकाच्या रौप्यपुरतीनिमित्त
गेल्या मे 2016 मध्ये 'अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन' प्रचंड उत्साहात पार पडले...महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाच्या वैज्ञानिक मनोवृत्तीच्या या मासिकाला वाढता पाठिंबा आहे...!
    अंनिसच्या कामाचे खरे सामर्थ्य हे केवळ वैचारिक मांडणीत नाही तर लोकांशी कृतिशील संवाद साधण्यासाठी जी प्रचंड उपक्रमशीलता आहे...त्यात आहे..!आणि गेल्या तीन वर्षात अंनिसचा एकही उपक्रम बंद पडला नाही,उलट नव्याउपक्रमासहित आणखी जोमाने चळवळ जनमाणसात गेली...
"हिंसा के खिलाफ,मानवता की और" असं म्हणत गेल्या तीन वर्षात...डॉ.दाभोलकरांच्या खुनाचा संताप आणि निषेध केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात झाला...
अनेक राज्यात महाराष्ट्राप्रमानेच 'जादूटोनाविरोधी कायदा' पारित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत...पंजाब,कर्नाटक,बिहार,केरळ,गोवा या आणि अशा राज्यात मअंनिस सारखेच काम उभं करण्यासाठी अनेक विवेकवादी संघटना प्रयत्नशील आहेत...
महाराष्ट्र अंनिसने मार्गदर्शकाच्या भूमिकेत इतर राज्यात हे काम वाढावे म्हणून विडा उचलला आहे...!

         दाभोलकरांच्या उत्तरार्धात गेल्या 3 वर्षात हे सर्व झालं... हां सर्व वरील उहापोह करण्याचे कारण इतकेच की ज्यांनी ज्या उद्दशांनी 'दाभोलकर' आणि पर्यायाने 'विवेकवादी चळवळ' संपवण्याचा प्रयत्न केला...तो उद्देश सफल झालेला दिसत नाही...!
थोडक्यात असं की...
"They Tried To Bury Us...But They Didn't Know...We Were Seeds...अर्थात,त्यांनी आम्हाला गाडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना माहीत नव्हतं की आम्ही बीया आहोत...!"

           आज डॉ.दाभोलकर आपल्यात नाहीत...एक 'पृथ्वीमोलाचा माणूस' सनातनी धर्मांध शक्तींनी आपल्याकडून हिरावून घेतला...ही भावना मन उद्विग्न करते...त्याबरोबर संघर्षासाठीचा निर्धारही पक्का करते...!
कधीही भरून न निघनारी पोकळी आणि कुशल नेतृत्वाला हरपल्याची बोचणी मनाला सतत सलत असली तरी...अशावेळी त्यांची ग्रंथसंपदा 'स्वतः दाभोलकर बणून उभी राहते...!'
भ्रम आणि निरास,अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम,अंधश्रद्धा विनाशाय,विचार तर कराल,श्रद्धा-अंधश्रद्धा,मती-भानमती,प्रश्न मनाचे आणि लढे अंधश्रद्धेचे हा त्यांच्या समग्र वैचारिक मांडणीचा अमूल्य ठेवा आहे...
'तिमिरातून तेजाकडे' हे पुस्तक म्हणजे त्यांच्या समग्र वैचारिक कार्याचा आणि विचारांचा परिपाक आहे..!

           'ज्ञान आहे तिथे भीती नाही आणि भीती आहे तिथे ज्ञान नाही...'या उक्तीप्रमाणे आज दाभोलकर आपल्यात त्यांच्या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून नक्कीच साद घालत आहेत...
म्हणूनच,डॉक्टरांच्या जाण्यामुळे घरोघरी पणत्या तेवणार आहेत...अंधाराच्या विरोधात त्या आता एलगार पुकारणार आहेत.त्या पणत्यांचे परस्परांशी एकच नाते आहे..."होय,आम्ही सूर्य पाहिलाय...!"
      विवेकाधिष्टित,धर्मनिरपेक्ष समताधिष्टित,संवैधानिक मानवी मूल्यांसाठी झटणाऱ्या आणि विचारांच्या चिरंतन स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळ्या खालेल्या या विवेकसूर्याला सलामी देताना कोणालाही असेच म्हणावे वाटेल...

        विचारांची लढाई विचारानेच लढला...
        सत्यासाठी शेवटी आचारानेच भांडला...
        तो भ्याड नव्हता तो पळूनही गेला नाही...
       रणांगनी लढताना तो गळूनही गेला नाही...
       सत्याचा सच्चा सैनिक सत्यासाठी लढत राहिला...
       खोट्याला हरवण्यासाठी छातीवर गोळ्या झेलत राहीला...
       छातीवर गोळ्या झेलत राहिला...!

       - विनायक होगाडे

1 comment:

  1. सर्व कार्यावर दृष्टीक्षेप टाकलाय. खूप मस्त. विनायक.... ग्रेट

    ReplyDelete