Sunday 11 September 2016

तो....ती....आणि त्याचा तिच्यावरचा 'मर्द'पणा...!




मला नेहमीच असा प्रश्न पडतो...
"आईघाल्या...उंडगीच्या...रांडेच्या...आईझवाड्या....मादरचोद...भैनचोद..."
या आणि अशा मी नेहमीच ऐकतो...
या शिव्यांऐवजी "बापघाल्या...उंडग्याच्या...प्लेबॉयच्या...बापझवाड्या...भाईचोद...बापचोद किंवा फादरचोद..." या आणि तत्सम शिव्या का नाही निर्माण झाल्या...?

वरीलपैकी सर्रास दिल्या जाणाऱ्या शिव्या दिलेल्या व्यक्तीच्या नकळतपणे आईला किंवा बहिणीलाच जातात...आणि बाई ही केवळ 'संभोगवस्तु' आहे अस दर्शवतात...! ह्या शिव्या त्याच्या बापाला किंवा भावाला जात नाहीत....किंवा स्वतः त्याला तर जातच नाहीत..! असे का...?
किंवा फार-फार तर पुरुषाला "छक्क्या...फलक्या...वगेरे-वगेरे तृतीयपंथी क्लेशकारक नावानी हिणवलं जातं...
म्हणजे मुद्दा पुन्हा "बाईपणा" वरच येतो...
'बाई' म्हणून जन्माला येणं हा बाईचा जन्मदत्त गुन्हा आहे का..?
आणि पुरुष म्हणून जन्माला येणं हां परमोच्च पराक्रम आहे का..?
पुरुष असणं म्हणजे बाईवर सत्ता गाजवण्याचं लायसन आहे का..?

मग बाईबद्दल असा हिनकस,अमानवी दृष्टिकोण का..?


घरातील मुलगा रडला...मित्र रडला...तर त्याला "काय बाईसारखा मुळूमूळू रडतोस.." असा शब्दप्रयोग नेहमीच केला जातो...
का..? 'रडणे' ही बाईची आणि 'न रडणे' अगदी कितीही दुःख झालं तरी...ही पुरुषाची मक्तेदारी आहे का..?
का रडू नये पुरुषानं..?
दुःख झालं तर जरूर रडावं...अगदी ओक्साबोक्सी...टाहो फोडून रडावं..!

मुळात गडबड जी आहे ना...ती इथल्या सडक्या 'मर्द'पणाच्या मानसिकतेत आहे...
प्रोब्लेम आहे तो बाईला केवळ "संभोगवस्तू'' म्हणून पाहणाऱ्या इथल्या पुरुषी सडक्या मेंदुचा..!
तिच्यावर सत्ता गाजवू पाहणाऱ्या हिनकस मनोवृत्तीचा...!

आणि म्हणूनच इथे पुरुषावर नगण्य (नाहीच म्हटले तरी चालेल) आणि बाईवर सर्रास बलात्कार होतात..
आणि बलात्कारी व्यक्ती आयुष्यात उठत नाही...मात्र बलात्कारपीडिता न्याय मिळो वा ना मिळो...ती कायमचीच समाजासाठी नालायक ठरते..उध्वस्त होते..!

कारण प्रश्न विकृत पुरुषी मानसिकतेचा आणि कुणी कुणावर तरी सत्ता गाजवावी याचा आहे..!

घरी कपडे-भांडी-जेवण-झाडूपोछा...सगळी-सगळी कामें बाई करते...
आणि हीच कामे बाहेर पुरुष पैसे घेऊन व्यवसाय म्हणून करतो...
कधी धोबी म्हणून..वेटर म्हणून..आचारी म्हणून...वा शिपाई म्हणून..!

"पैसा मिळतो तिथं पुरुष..!"

तीच सगळं आयुष्य हे पुरुषी वर्चस्वाशी जोडलेले असते..
स्त्री ही कुमारी असते..प्रौढ कुमारिका असते...सौभाग्यकांक्षिणी असते..!तिची ही प्रत्येक अवस्था पुरुषाच्या संदर्भात असते..
सौभाग्यवती,घटस्फोटिता,परित्यक्ता,विधवा अशी कोणीतरी ती असते...आणि पुरुष हां तीचा 'मालक' असतो..!

आणि या व्यवस्थेला कोंदण लाभलय त्या 'धर्म' नावाच्या गोड-गोंडस गोष्टीचं...की ज्याने सरस्वतीला विद्येची देवता बनवलं...पण बाईला 1848 आधी शिकू दिलं नाही...की ज्याने तिला महिषासुरमर्दिनी वा लक्ष्मी बनवलं....पण तिला काडीचाही न्याय दिला नाही..!
की ज्याने 'हुंडा प्रथा' पोसली...'सती प्रथा' पोसली...'केशवपन प्रथा' पोसली...
की ज्याने बाईच्या सुखासाठी पुरुषाला करावे लागेल अशा एकाही 'व्रताची' तजवीज केली नाही...
की ज्याने बाईलाच बाई असूनही 'अंबाबाईच्या' मंदिरात प्रवेश नाकारला...!
की जो आजही मासिक पाळीत बाईला मंदिरात येऊ देत नाही वा घरात देव-धर्म करू देत नाही..! की जो आजही पुरुषानं नुस्तं 'तलाक दिया' अस म्हटलं तरी तलाक मान्य करतो आणि तिची पोटगी नाकारतो...!
की जो 'अग्निपरीक्षा' तिलाच द्यायला लावतो...आणि त्याच्यासाठी 'मर्यादापुरुषोत्तम'
एवढं बिरुदच काफी आहे...
त्याने एक म्हाळसा असूनही बानू आणलेली या समाजाला चालते...पण म्हाळसेनं दूसरा खंडोबा शोधला तर समाजाला चालेल का...याची शंकाच वाटते...
कारण सडकी मानसिकता पुरुषपणाची आहे,मर्यादित का होईना सत्ता भोगण्याची आहे..मर्दपणाच्या अहंकाराची आहे...

बलात्कार बाईवर होतो...तो पुरुष करतो...पण म्हणून काय बंधन 'त्याच्या' वर येत नाही...बंधन "तिच्यावरच" येतं...'धर्म' म्हणून...!
कुठे top to bottom बुरखा म्हणून...कुठे 'घुंगट' म्हणून...'स्त्रीभ्रूण हत्येमधुन'....आणि सगळीकडेच
'सातच्या आत घरात..' यामधून...!

लग्न दोघांचं होतं पण मंगळसूत्र...सिंदूर...जोडव्या तिलाच घालाव्या लागतात...
'त्या'ला 'लग्न झालय' हे समाजाला  दाखवण्याची गरज वाटत नाही...!
लग्नानंतर तो तिला हवं तेंव्हा जवळ घेतो..आणि स्वताच्या भोगाची भूक भागवतो...त्याला तिच्या परवानगी गरज वाटतच नाही...
तो तृप्त झाला की तो तीला बाजूला सारतो...
तीच्या तृप्ततेची पर्वा त्याला नसतेच..!
9 महीने 9 दिवस बेंबीपासून ते छातीपर्यंत मूल 'बाई' वाढवते...त्याला जन्म देते..त्याचं संगोपन करते...
पण मुलाच्या पूर्ण नावात 10 वीचं सर्टिफिकेट सोडलं तर आईचा उल्लेखच कुठे नसतो...
'family planning' साठी ऑपरेशन तिचं होतं...
त्याची 'नसबंदी' शक्यतो होतचं नाही...किंबहुना 'होत नाहीच...!'


कारण गडबड आहे...'मानसिकतेत..!'

काय राव...काहीही काय सांगता...आता कुठे राहिले ते दिवस...? आता बाई पंतप्रधान-राष्ट्रपतीपदावर पोचली...बाई आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करते की....!

नोकरी करते ओ...पण अपवाद वगळता घरी आल्यावर जेवणापासून घरकामापर्यन्त तिलाच कराव लागतं...कारण हे त्याचे काम नसते...कारण तो पुरुष आहे..!

प्रश्न मानसिकतेचा आहे...
'केशवपन,हुंडा,सती प्रथा,शिक्षणबंदी या तथाकथित धर्म म्हणून उभ्या ठाकलेल्या आणि बाईचं 'माणूसपण' नाकारणाऱ्या अमानुष प्रथा त्या-त्या काळात समाजसुधारकांनी घालवल्या पण बाईकडे केवळ 'संभोगवस्तू'म्हणून सत्ता गाजवू पाहणारी विकृत मानसिकता आजही तशीच आहे...!

बदल हवाय...

हे सगळ चालतं...याचं कारण 'ती' गप्प आहे..! ती आवाज उठवत नाही...प्रश्न विचारत नाही...विद्रोह करत नाही...ती मुकाट्यानं सहन करते...या बंधनाच्या बेड्यांच तिला गजरे वाटतात...त्यामुळे ही तिला मानसिक गुलामगिरी वाटत नाही...

गरज आहे तिला...

नव्या आत्मभानाची....
मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची...
या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची...
बंड पुकारण्याची...
संभोगवस्तु म्हणून पाहणाऱ्या मानसिकतेविरोधात विद्रोह करण्याची...

आणि त्याला गरज आहे...
'तिच्याकडे' 'बाई' म्हणून नव्हे तर 'माणूस' म्हणून पाहण्याची...!
नवरेपणा सोडून 'माणूसपणा' स्विकारण्याची..!
तिला समजून घेण्याची...!
आणि या 'विद्रोहात' तितक्याच हळुवारपणे तिच्यामागे 'जोतीराव' म्हणून उभे राहण्याची...!


वर मांडलेला हरेक मुद्दा संघर्ष आहे...
संघर्ष तिचा आहे...
आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचा आहे..!
कारण अवघड आहे 'मर्दपणा' सोडणे...आणि तिला 'माणूस' म्हणून हक्क मिळवून देणे.!

मी स्वतः लढतोय माझ्या या अमानुष पुरुषी मानसिकतेविरुद्ध...
तिच्या न्यायासाठी...तिच्या हक्कासाठी...तिच्या माणूसपणासाठी...

आणि मला आशा आहे मित्रा...
यात तूही नक्की सहभागी होशील....


मित्रांनो...

विचार तर कराल..!!!


      -विनायक होगाडे

4 comments:

  1. कठोर वाटले तरी हेच वास्तव आहे ... अगदी परखड़ विनु .....!��

    ReplyDelete
  2. सडेतोड चपराक आहे ही ह्या व्यवस्थेला लावलेली. ग्रेट...

    ReplyDelete
  3. Unfortunately that mentality has been moulded in our mindset from thousands of years. It reminds the reader to implement few new mindsets. Gender equality and the existence of women as human being are some of them.

    ReplyDelete