Friday 5 April 2019

गांधी तितुका हेटाळावा...

तुम्ही गांधीला मानता का? हा टकल्या तुम्हाला आदर्श वाटतो? फाळणी करून देशाची वाट लावणारा हा पुळचट थेरडा आणि तुम्ही याला चांगला म्हणता? वगैरे वगैरे...
'गांधी'...
जणू हा शब्दच हेटाळणीसाठी बनलाय... तो द्वेषासाठी हक्काचा... आणि चेष्टेसाठी समानार्थी वाटावा, इतपत...
खरं तर भारत देशाच्या उभारणीच्या समुद्र मंथनातला हा बाप माणूस... राष्ट्रपिता म्हणूनही गौरवला गेलेला ! अमृताचं काही माहीत नाही पण सारं विष मात्र प्राशन करून अगदी शंकरासारखाच आता हा नीलकंठ बनलाय...
आपल्या अफाट कर्तृत्वाने मानवाचे महामानव बनलेले इतर अनेकजण आता दैवत्वाकडे वाटचाल करत निघालेले असताना हा 'महात्मा' मात्र याला जमिनीत गाडण्याचे सारे प्रयत्न होऊनही तसाच उभाय.
शिवाजी-आंबेडकरांवर
बिनधास्तपणे टीका नाही ओ करता येत. त्यांच्यातील उणिवा वा दोष काढणं तर लांबच! कारण तेही चुकू शकतात वा आयुष्यात चुकले असतील ही गोष्टच डोक्याबाहेरची आहे ना मुळात!
पण गांधी टीका-द्वेष आणि या देशातील एकूण एक चुकांची सगळी खापरं आपल्या टकलावर फोडून घेण्यासाठी नेहमीच उपलब्ध राहिलाय. त्याच्यावर हवी तेवढी टीका करा... वा प्रेम करा... द्वेषाचं स्खलन करा वा त्याला त्याच्या मरणानंतरही सतत गोळ्या घालून मारत रहा... तो सतत उभाय... तितकाच टवटवीत चेहरा आणि तेच निखळ हास्य घेऊन.
त्याचं हे लाघवीपण हीच मला त्याची खासियत वाटते. हे दुर्दैवाने इतर महामानवांच्या वाट्याला आलेलं नाही. मला तुलना नाहीय करायची पण याबाबतच गांधीबाबतच वेगळेपण मांडताना हे मला नमूद करावं वाटतं की इतर महामानव हळूहळू आखडत चाललेत 'माणूस' म्हणून...
चारशे वर्षांपूर्वीचा 'तुक्या' आज 'तुकाराम महाराज' आहे. आणखी हजार वर्षांनी कदाचित 'आंबेडकर'
बुद्धाच्या जागी असतील आणि शिवाजी 'महाराज' नसून विष्णूचा अवतार बनलेले असतील. त्यांच्यातलं माणूसपण तितक्याच निर्दयीपणाने काळाने मारून टाकलेलं असेल जितक्या घृणास्पदरित्या गांधींला गोळ्या घालून संपविण्यात आलं.
अगदी वस्तुनिष्ठ विश्लेषण करायचं झालं तर तुम्हाला इतर महामानव आचरणीय वाटत नाहीत. ते आचरण्याच्या पल्याड गेलेले देव वाटतात. ते असामान्य वाटतात. 'अस काहीतरी अचाट कर्तृत्व आपल्या बापाचं काम नाही बुवा' आणि म्हणून त्यांना पुजणं-भजणं याव्यतिरिक्त दुसरं आपल्याला त्यांच्याप्रती काही करता येत नाही. कारण ते एकमेवाद्वितीय वाटतात.
गांधी असा नाही. गांधी अद्वितीय नाही. तो तुम्ही तुमच्या जगण्यामरण्यात शोधू शकता. तो तुम्ही यासाठी शोधू शकता कारण त्यानं आपलं जगणंच यापद्धतीने मांडून ठेवलंय. त्याने स्वतःच्याच जगण्यावर इतके प्रयोग केलेत आता असे प्रयोग करत जगू पाहणाऱ्या प्रत्येकात गांधी वास करतच असतो.
याला हर अंगाने बाद करण्याचे प्रयत्न तो जिवंत असतानाही झाले. शेवटी त्याला मारावं लागलं. आणि ज्याने याला मारलं त्याचे वारसदारही आता उघडपणे गांधीला मात्र टाळू शकत नाहीत. त्याला प्रातःस्मरणीय म्हणावं लागतं. म्हणजे गांधी अजूनही आडवा येतोच.
त्याच्या मरणानंतर त्याला कुजबुज प्रचारातून अफवांच्या धुक्यात अडकवण्यात आलं. जेणेकरून त्याच्याकडे कुणाला उघडपणे पाहताच येऊ नये. त्याला संपवण्याचे सारे प्रयत्न केले गेलेत आणि विशेष म्हणजे आजही ते तितक्याच जोमाने सुरुयत. आजही मी फेसबुकवर पाहतो अनेक चित्रं. ज्यात काळ्या बॅकग्राऊंडवर हसरा गांधी आणि बाजूला अत्यंत हीनकस अशी कमेंट quote स्वरूपात असते ज्याखाली गांधी लिहून त्याचा सतत उपमर्द केलेला दिसेल. त्याला आजही बायकांसोबत फोटोशॉपवर जोडून स्त्रीलंपट ठरवण्याचा प्रयत्न केला जातो.
इतकंच नव्हे... 'एबीसीडीइएफजी... 'जी'तून आला टकला गांधीजी...' अशा लहान मुलांच्या बडबडगीतापर्यंत याची बदनामी पेरली गेलीय. याला जितक्या पद्धतीने आणि जितक्या माध्यमातून बाद करण्यासाठी वा बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेलेत तितकी हेटाळणी या जगात इतर कुणाची झाली असावी असं मला तरी अजिबात वाटत नाही. जगात क्रूरकर्मा म्हणून ओळखला जाणारा हिटलरही याबाबतीत नशिबवानच वाटतो मला तर... पण प्रेमाची भाषा मांडूनही आपल्याच लोकांकडून इतक्या द्वेषास का बरं हा कारणीभूत ठरला असावा? इतका काय असा डेंजर होता हा? याने गॅस चेंबरमध्ये घालून ना हजारो लोक मारले ना याने माणूस मारण्याचं तत्वज्ञान मांडलं. मग इतकी बदनामी याला आपल्याच लोकांकडून का बरं मिळत असावी?
इतरांची वाटचाल दैवत्वाकडे भलेही सुरू रहावी. पण गांधींचं मात्र खत व्हावं. अलबर्ट आइन्स्टाइनचं त्याच्याबाबतीतलं म्हणणं एक पाऊल पुढे नेऊन मला अस वाटतं की, 'तो मातीत पाय रोवून उभा आहेच. तो सतत हेटाळणी-बदनामी करणाऱ्यांचा आडवा येऊन निखळ हास्य करत राहील. पण येणाऱ्या काळात या पृथ्वीतलावर गांधीच्या हाडामांसाचं खत व्हावं. ते इथल्या जमिनीत आरपार मुरावं. कारण उद्या उगवणारी कोंबचं येणाऱ्या जगाचं भवितव्य ठरवणारेत.

- विनायक होगाडे




No comments:

Post a Comment