Sunday 24 March 2019

डियर तुकोबा...

कशी बुडवलीस रे तुका तू इंद्रायणीत आपली सावकारी खते?

आपुलाच आपणासी वाद घालण्यास कुठून आणावा आता चिंतन-मननासाठी तुझा भांबनाथाचा डोंगर...?

कशा बुडून तरल्या असतील ब्राम्हणी व्यवस्थेला लाथा घालणाऱ्या तुझ्या विद्रोही अभंगांच्या गाथा...?

सदेह वैकुंठाला जातानाही  कशा पाहिल्यास तू जगण्यामरण्याचे प्रश्न किर्तनाऱ्या आपल्याच वीणेच्या तुटणाऱ्या तारा?

डियर तुकोबा,
आता इथे भांबनाथाचा डोंगर नाही...
नशेत तल्लीन करणारे भोंदूचे मठ आहेत...

शब्दांतून प्रसवणाऱ्या अभंगांची शस्त्रे नाहीत...
तर भेदाभेदाचा भ्रम मंगळ ठरवणाऱ्या व्हाट्सप फॉरवर्डचं स्लो-पोईजनिंग आहे...

आता इथे रामभक्तीच्या नशेत सगळेच बनलेत टाळकुटे भक्त...
रामालाही खडा सवाल करणारं, कुणाच्याच मुखी नाही कबिराचं उद्बोधक गाणं...

आता ना व्यवस्थेवर हल्ला बोलणारी वीणा आहे...
ना त्यासोबत बुडूनही तरणारी गाथा...

आता नाठाळांच्या झुंडीचं समाजातली नैतिकता ठरवतात...
इथं आता सारं काही मंबाजीने हायजॅक केलंय...
अगदी पांडुरंगाची वीट सुद्धा...

- विनायक होगाडे


No comments:

Post a Comment