रंग लाल...
इथे काल सूरजने प्रियाला गुलाब दिला आहे...
काल तिथेही कुणा अमनने तस्लिमाला गुलाब दिला असावा...
काल इथे मूठभरांनी संस्कृतीच्या नावावर कित्येक गुलाब चिरडलेत.. तिथेही काल गुलाबाच्या पाकळ्या विखुरल्या गेल्या असतीलच...
पण प्रेम तर तिकडेही बहरतय...
आणि प्रेम तर इकडेही बहरतय...
मग मध्येच द्वेषाच्या भिंती कोण बरं उभं करतंय...?
रंग तोच लाल...
मग प्रेमातून बहरणारा हवा...
की द्वेषातून ओघळणारा...?
मूठभर लोकांच्या द्वेषाचं उत्तर संपूर्ण जमातीचा द्वेष, हे कसं बरं असेल...?
साधं गणित आहे राव, द्वेषच पेरला मनात, तर द्वेषच द्वेष उगवेल...!
तिकडच्या अमनचे असो वा इकडच्या सूरजचे...
दुःख तर सारखंच आहे... आणि नोकरीची वणवणही सारखीच आहे...
प्रेमही सारखंच आहे... आणि पोटापाण्याचे प्रश्नही सारखेच आहेत...
मग 'अमन'चा प्रकाश घेऊन उगवणारा 'सूरज' द्वेषाच्या ढगांनी कोण झाकू पाहतंय बरे...?
मूठभर द्वेष इकडेही आहे... आणि तिकडेही आहे...
माफ करा... पण ह्या दोन्हीकडच्याही मूठभरांच्या मी विरोधात आहे...
तिकडे बुरख्यातली तस्लिमा अमनला भेटण्यासाठी तीळ तीळ तुटतेय...
आणि इकडे प्रिया सुरजची होण्यात त्याची जात आडवी येतेय...
असो! प्रेमाच्या नेहमी सोबत राहणं, हे तर माझं माझ्यापुरतं गणित आहे...
तिकडच्या अमन आणि तस्लिमाला अल्लाह सलामत रखो...
आणि इकडच्या सुरजची प्रिया प्रेमात लालेलाल होवो...
प्रेम रुजवा, प्रेम मुरवा...
लाल रंग तर तिकडेही आहे... इकडेही आहे...
- विनायक होगाडे
No comments:
Post a Comment