Sunday, 24 March 2019

लेट्स फाईंड 'मोहनदास'...

महात्मा म्हणवल्या गेलेल्या 'गांधी'चं सोडा ओ...
मला जास्त आकर्षण मोहनदासाचं आहे...

गांधी स्वतः कधी पूर्णांशाने 'गांधी' बनू शकले नाहीत...
ते स्वतः मोहनदास बनून जगत राहिले... अगदी शेवटापर्यंत... आपणच उगाच त्या म्हाताऱ्याला 'महात्मा' म्हणवलं... आणि इथंच सगळं गंडलं...

उगचंच सतत आपण म्हणत राहतो...
गांधी समजून घ्यावा लागतो... त्याला समजणं सोपं नाही वगैरे वगैरे...
म्हणूनच तूर्तास त्याला सोडा ओ...
मोहनदासवर फोकस करा...

कोण आहे हा मोहनदास...

ज्याला ज्याला म्हणून द्वेषापेक्षा 'प्रेम' या मूल्यावर विश्वास आहे... तो तो मोहनदास...

मोहनदास समन्वय करत नाही... तो थेट संघर्ष करतो... प्रश्नाला भिडतो...
मनातील हिंसकपणा वगळून जो अहिंसेने पण तितक्याच निर्भयपणे प्रश्नांना भिडू पाहतोय... तो आहे मोहनदास...

एका फटक्यात यशस्वी झालेला माणूस गांधी होत नसतो...
मानवी आयुष्याच्या प्रत्येक बाबींवर  प्रयोग करत राहणारा... आणि समाजातील शेवटच्या माणसाला त्याचा फायदा होईल का? हा उद्देश ठेऊन आपल्या सर्वसामान्य आयुष्यात आपापल्या पातळीवर प्रयोग करत राहणारा प्रत्येक व्यक्ती मोहनदास आहे...

मोहनदास कधीच परफेक्ट नसतो...
परफेक्ट व्यक्ती कधीच 'गांधी' बनू शकत नाही...
चुकत चुकत प्रयोग करणं... हे मोहनदासाचे व्यवच्छेदक लक्षण आहे... माणसाला चुका करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, हे मांडणारा मोहनदास आहे...

त्यामुळे गांधींचं सोडा...
मोहनदासला आपल्यात शोधा...

मोहनदास प्रश्नाला भिडताना नेहमी द्वंद्वात सापडतो... हिंसा की अहिंसा? द्वेष की प्रेम? शांती की अशांती ?
अशावेळी तो कुठलंच प्रामाण्य आपल्या गणितात धरत नाही... तो 'आतला आवाज' शोधतो...

ज्याची माणसाच्या चांगुलपणावर श्रद्धा आहे ना, त्याला आतला आवाज ऐकू येतो बरं का !
आणि असा आवाज ज्याला ज्याला ऐकू येतो, तो हरेक व्यक्ती मोहनदास आहे...

आणखी एक...
'महात्मा गांधी' हा मनुष्य आता होऊन गेला... त्याला गोळ्या घालून 71 वर्षे झाली... त्यामुळे गांधी होण्याच्या भानगडीत पडू नका...
मोहनदास व्हा...

मोहनदास नेहमी अपडेट होतो...
अँड्रॉइड व्हर्जन सारखा...

आपल्या चुका तो मान्य करतो... नवं स्विकारतो... तो काहीच लपवून ठेवत नाही... तो आत एक आणि बाहेर एक... असा असत नाही... तो आरपार पारदर्शक असतो....
आपलं म्हणणं तो कृतीतून मांडतो...
तो परिस्थितीनुसार आपले प्रयोग करतो... आणि निष्कर्षही ठरवतो... जुने, चुकलेले निष्कर्ष स्वतःच खोडून काढतो...

त्यामुळे गांधीला पुतळ्यात सोडा ओ... त्याला फोटो फ्रेम मधून निखळ हास्य करू राहू देत...

मोहनदासला शोधा...
मोहनदास अंतिम सत्य नाही...
पण तो सत्याच्या सातत्यावर उभाय... चुकण्याच्या वेशीवर उभाय... निर्भयपणे प्रयोग करणं हा त्याचा आत्मा आहे...
त्याला ह्रदयात जागा द्या...

- विनायक होगाडे
 

No comments:

Post a Comment