Sunday, 24 March 2019

बाकी शून्य...

विभाजक, भाज्य आणि भागाकार...
गुंता यांचा कधी सुटला नाही आजवर...

तसं वरवर गणित सोपंच दिसतं...

विभाजकाने भाज्याला भागावं...
आणि बाकी शून्य आली...
की तसं भागकाराने उगचंच स्वतःला मिरवावं...!

पण सोपी नसतात आयुष्यातली सगळीच गणिते...
भागाकार निःशेष व्हावा म्हणून धडपड मात्र आपली सुरू असते...

पण मांडत जाऊ गणिते, तसं तसं...
भाग भाग सरत जातो...
आणि काहीतरी बाकी उरत जातो...

बाकीलाच पुन्हा भाज्य बनवायचं...
पुन्हा भागायचं... भागत राहायचं...

हूश्श...!

हा इतका आटापिटा कशासाठी?
तर म्हणे बाकी शून्य येण्यासाठी...!

किती खाडाखोडी झाल्या तरी...
हे गणित सुटता सुटत नाही...
खाडाखोडीने गिरबटलेली...
वही आयुष्याची भरत नाही...

भागाकारचं वाढत जाणं आणि बाकीचं घटत जाणं...
प्रक्रिया निरंतर सुरू राहते...
भाजकाचे स्थिर राहून... दमूस्तोवर भागणे सुरूच राहते...

हे इतकं सारं कशासाठी...?
तर म्हणे बाकी शून्य येण्यासाठी...!

मी म्हणतो,

निःशेष भागाकार हवाच कशाला?
सगळंच सोप्याने सुटावं कशाला...?
आयुष्याचे गुंते बघुयात की गुणून...
बाकी शून्य उरू नये म्हणून....

- विनायक होगाडे


No comments:

Post a Comment