Monday 8 October 2018

गांधी टोपी...

गांधी टोपी...

मला गांधी टोपीविषयी नितांत आदर आहे...
नीती, प्रेम, शांती आणि बंधुतेने जगू पाहणाऱ्या सर्वसामान्य हिंदूंचे ते प्रतीक आहे...
पण हल्ली त्या टोपीखाली असलेल्या मेंदूला काकडा लावलेली लेंडकं पाहिली... की कसंसच व्हायला लागतं...
गांधी टोपीचं वैशिष्ट्य असं की स्वतः गांधींनी ती तयार केली होती. गांधी तसा जाम प्रयोगशील माणूस... त्याने टोपी घातली... तर साऱ्या भारताने ती स्वीकारली... गांधींनी टोपी घालणं सोडून दिलं तरीही ही तशीच आजतागायत विराजमान आहे...! भलत्या सलत्या पगड्यांना मागे टाकून आज खेडोपाड्यात सर्वसामान्य आयुष्य जगू पाहणाऱ्या हिंदूच्या डोक्यावर ही कशी बरं जाऊन पोहोचली असेल...?
या टोपीला शह देण्यासाठी सुरु झालं ते काळ्या टोपीचं राजकारण...!
पण आजही हिंदूंवर या पांढऱ्या टोपीचाच प्रभाव आहे तसाच आहे... पर्यायाने हा प्रभाव अर्थातच गांधींचा आहे...!
आजही तो तसूभरही कमी झाला नाही, म्हणूनच हे प्रतीक वापरून त्या मागचा मूल्यात्मक आशय बदलवून तरुणांना बहकवणाऱ्या प्रवृत्ती या काळ्या टोपीचे वारसदार आहेत,ज्यांनी कधीच समग्र हिंदूहिताचा विचार केला नाही, हे आपण ओळखलं पाहिजे...!

आपली सर्वसमावेशक गांधी टोपी सध्या रोगग्रस्त आहे... ती ज्यांच्या डोक्यावर आहे, तिला खरवडलं की आतून तिचा काळा रंग दिसून येतो.. आणि त्या काळ्या रंगालाही खरवडलं की आत शेंडीचं अस्तित्वही दिसून येईल...! बहुजन समाजाला अक्षरशः गंडवून टोप्या घालण्याचं हे राजकारण आहे...

पांढऱ्या टोपीचं खरंखुरं स्वरूप तिला परत मिळवून देणं, हे आपलं काम आहे, कारण ती नव्या भारताच्या निर्मितीच्या संघर्षाची खरी वारसदार आहे...!

- विनायक होगाडे

No comments:

Post a Comment