Monday 11 June 2018

पांडुरंग...!

वारीत हरवलो मी, माऊलीस शोधताना
कितीवार कुटू मी टाळ, तू सांग पांडुरंग ?

घुमतोच रोज कानी, गजर संतकृपेचा
हरिजन प्रवेशासाठी, का झुरतो पांडुरंग ?

वैकुंठास तुकोबाच्या, फूस तुझ्या नावाची
हातात मंबाजीच्या, का गेलास पांडुरंग ?

गाथेच्या पंढरीत, घुसतात धारकरी
तलवार या हातात घेशील पांडुरंग ?

या संकुचित दिंड्या, तू टाक पेटवून
किर्तनास उभा माझ्या राहशील पांडुरंग ?

उघडेन मी मनाच्या, कुलूपबंद ताटी
आता पुन्हा समाधी, ना शक्य पांडुरंग !

रचतोय नवे अभंग, तू सांग इंद्रायणीस
वाजेल पुन्हा ही विना, तू ऐक पांडुरंग !

- विनायक होगाडे

No comments:

Post a Comment