Tuesday, 11 April 2017

साथी भगतसिंग यांना अनावृत्त पत्र....!



साथी भगतसिंग...
सविनय वंदे....

हे खरंय की,तू मला ओळखत नाहीस...पण मी मात्र तुला पुरेपूर ओळखतो...!
तू ज्या भारत देशासाठी प्राण दिलेस ना त्या स्वतंत्र भारतातील तुझ्याच वाटेवरून चालणारा मी एक तरुण...!
तुझ्यापेक्षा लहान आहे मी...पण ज्या वयात तू देशासाठी फाशी पत्करलीस साधारण त्याच वयाचा मी तुझा साथी आहे...!
हवं तर तू मला तुझा लहान भाऊ म्हणू शकतोस...!
तुला 'भाई' म्हणून हाक मारायला मला खूप आवडेल बरं का...!

तर भाई...! आजच्याच दिवशी तू फासावर गेलास...त्या ब्रिटिशांनी 24 मार्चला सूनवलेली फाशी जनक्षोभाला घाबरून प्रत्यक्षात एक दिवस अगोदरच दिली...आणि तू,सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू अगदी हसत - हसत फासावर गेलात...!

अगदी आपल्याला उद्या फाशी देणार आहेत,हे माहीत असूनही तू पुस्तक वाचत बसला होतास...लेनिनचं...!
आपण आता काही तासातच मरणार आहोत, तेंव्हा आता या वाचनाचा काय उपयोग...? असा दरिद्री विचार तू नाही केलास..!
भाई,ही निर्भिडता,हे वैचारिक सामर्थ्य तू जमवलंस तरी रे कसं...?

आजकालच्या आमच्या युवकांना तू स्वातंत्र्यासाठी,क्रांतीसाठी हातात बंदूक-बाँब घेतलेलं दिसतं...पण बंदूक घ्यायची कशासाठी आणि त्यामागचे तत्वज्ञान काय होतं हे आम्हा तरुणांना कधी रे समजेल...?
क्रांतीसाठी रक्तरंजित युद्ध अनिवार्य नाही,तसेच त्यामध्ये व्यक्तिगत,प्रतिहिंसेला कसलेही स्थान नसते. क्रांती म्हणजे केवळ बाँब व पिस्तुलांचा पंथ नव्हे...! शत्रू पक्षाला दहशत बसवून निव्वळ मुडदे  पाडत सुटणारी ही अमानुष गोष्ट नव्हे...आणि क्रांती म्हणजे दहशतवादही नव्हे...!
क्रांती म्हणजे प्रगतीसाठी,परिवर्तनाची इच्छा आणि आकांक्षा...!
'मानवतेबद्दल प्रेम हा स्थायीभाव असल्याने क्रांतिकारक हे मानवतेचे पूजक असतात'
क्रांती ही आधी मेंदूत व्हायला लागते...आणि त्यासाठी बौध्दिक मशागतीसाठी पुस्तकांशी मैत्री करावी लागते...हे सगळं इथल्या तरुणांना कधी रे समजणार...?

भाई...वाईट वाटतंय पण तुझ्या देशातल्या तरुणांना तुझ्या शहिदत्वाची तारीखदेखील नाही रे माहीत...!
अलीकडे गेल्या काही वर्षांपासून ना फेब्रुवारी महिन्यातच तुला फाशी दिली जाते...! अरे दचकू नको...थांब सविस्तर सांगतोय...!
14 फेब्रुवारीला म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे' या प्रेम दिवसाला विरोध करण्यासाठी काही कथित संस्कृती रक्षक तुला 14 फेब्रुवारीलाच फाशी दिली गेली असा अप्रचार करतात...! तुला तर चांगलंच माहितीच की, प्रेमापेक्षा त्यांना द्वेषाची संस्कृतीच महत्वाची वाटते...!

भाई,तू तुरुंगात असताना अफाट वाचन करून विविध विषयावर टिपणे काढली होतीस...त्यातील प्रेम आणि प्रणय अशा विषयावर भाष्य करणारी अप्टन सिंक्लेअर, बॅ.लिंडसे अशा लेखकांची तू काढलेली काही टिपणेही आहेत...
"प्रणय हा जरी प्रामाणिक प्रेमाचा आणि उत्कट भावनांचा परिपाक असला,तरी तो करणे हे लाजिरवाणे आणि अनैतिक आहे ह्या परंपरेचा पगडा आपल्या तरुण लोकांवर आहे ही किती दुःखाची बाब आहे."

'प्रेमाचा नैतिक दर्जा' या सुखदेवला लिहलेल्या पत्रात तू म्हणतोस की, "शेवटी प्रेम ही एक मानवी भावना आहे आणि ती अतिशय सुंदर आहे. प्रेम हे पशुत्वाचं लक्षण असू शकत नाही. प्रेम खरं असेल तर त्याने माणसाच्या चारित्र्यावर कधीही डाग लागत नाही.तरुण मुलगा आणि मुलगी एकमेकांवर खरं प्रेम करत असतील तर त्या प्रेमच्या शक्तीच्या प्रभावाने ते त्यातल्या वैषयिकतेवर मात करू शकतात...!"

भाई...
'व्हॅलेंटाईन डे' असो वा इतर कोणत्याही दिवशी असो...तरुण प्रेमी युगुलांना मारहाण करणे,उठ-बशा काढणे यासारख्या शिक्षा देणे,जबरदस्ती लग्न लावून देणे या आणि अशा कृत्यांनी दडपशाही करुन संस्कृतीचे रक्षण होईल असं ज्यांना वाटतं त्यांना तुझ्यासारख्या मुक्तचिंतकाचे हे वरील विचार पेलवतील असं कोणाच्यानेही म्हणवणार नाही...!
पण बघ ना...! शहीद आणि देशभक्त असा तुझा उद्घोष करणं सोपं आहे पण बुद्धिप्रामाण्यवादी ,चिकित्सक आणि देव या कल्पनेची चिकित्सा करणारा नास्तिक भगतसिंह मात्र त्यांना सोयीचा नाहिये...! तुझ्याच खांद्यावर बंदूक ठेऊन ते तुझ्याच विचारांना गोळ्या घालतात...!
तू आज असतास तर आधी या दांभिक प्रवृत्तीविरुद्ध लढला असतास...!

भाई...तुम्ही सगळे क्रांतिकारक अंतिम पर्यंत स्वातंत्र्यासाठी लढलात आणि मरण देखील पत्करलंत...!
आपण अटक करून घेतली तर आपल्याला आपलं म्हणणं मांडता येईल...! आपल्या बलिदानाने या देशातील तरुणांमध्ये असंतोष पसरेल आणि मग क्रांतीसाठी अनेक तरुण तयार होतील...हा मूलभूत दृष्टिकोन ठेऊनच तुम्ही 8 एप्रिल 1929 ला केंद्रीय असेंब्लीत जुलमी विधेयकांविरोधात हिंसेसाठी नव्हे तर सरकारला जागं करण्यासाठी फक्त आवाज करणारे बॉंब फेकले आणि स्वतःला अटक देखील करून घेतलीत...!

भाई...तुला माहितीय जे लोक स्वातंत्र्यलढ्यापासून कोसो दूर होते...ज्यांनी नंतर गांधींची हत्त्या केली आणि तुमच्यासारख्या अनेकांच्या बलिदानातून मिळालेला स्वातंत्र्यदिन ज्यांनी काळा दिवस म्हणून साजरा केला...आज तेच लोक तुझा वापर गांधींच्या विरोधासाठी करतात...
भाई...मला माहितीय की स्वातंत्र्यप्राप्तीच्या मार्गाबद्दल तुझे गांधींजींशी काही मतभेद होते...पण तू या गांधीहत्त्यारांसारखा द्वेष्टा माणूस नक्कीच नव्हतास...!

'तत्कालीन जनमताचा अनादर करून गांधींनी तुझी फाशी रोखली जावी म्हणून काहीएक प्रयत्न केले नाहीत...' असा अप्रचार हेच गांधीद्वेष्टे-हत्त्यारे करतात...! पण गांधींनी तुझी फाशी रोखली जावी यासाठी व्हाईसरॉयला पत्र लिहून शिक्षा रद्द करण्याचे आवाहन केले होते, हा इतिहास मात्र सोयीस्कररित्या लपवला जातोय...!

आणि मुळात तुझी फाशी रोखली जावी... अशी तुझी अजिबात इच्छा नव्हती...!
दयायाचना करून स्वतःची सुटका करून घेणारा 'माफीवीर' तू कधीच झाला नसतास...
इतकंच काय तुझा बचाव करण्यासाठी तुझे वडील इंग्रजांना आवाहन करताहेत हे  कळताच क्षणी तू सविस्तर पत्र लिहून त्यांना उद्विग्न भावनेने त्यांच्यासमोर फाशी पत्करण्याची भूमिका मांडलीस...आणि वडिलांचे कृत्य चुकीचे आहे,हे स्पष्टपणे त्यांना दाखवून दिलंस...!

भाई...आताचा काळ इतिहास विकृतीकरणाचा काळ आहे असंच म्हणावं...!
सत्यपलाप करून भावनिकतेच्या आधारे राजकारण करण्याचा हा काळ आहे...!

'धार्मिक अंधश्रद्धा व कर्मठपणा ही आपल्या प्रगतीमधील फार मोठी धोंड आहे' असं तू म्हणालास...!
पण तुझ्या वाटेवरून चालणाऱ्या धर्मांची चिकित्सा करनार्या,मनामनात वैज्ञानिक दृष्टिकोन पेरणाऱ्या माणसांचे आता सरेआम मुडदे पाडले जाताहेत...विवेकाचे आवाजच दाबले जाताहेत..!

'आपल्या स्वातंत्र्याचा अर्थ केवळ इंग्रजांपासून सुटका करून घेणे एवढाच नाममात्र नसून ज्यात सर्व लोक परस्परांशी मिळून-मिसळून राहतील आणि बौद्धिक गुलामगिरीतूनही मुक्त होतील,ते खरे संपूर्ण स्वातंत्र्याचे नाव आहे...!' असं तू म्हणाला होतास...! पण भाई, आता लोक फक्त धर्मातच नाही तर जातीय अस्मितेतही विभागले जाताहेत...!

भाई...अशा या परिस्थितीत भारताचा विकास होणार तरी कसा...?
आता 'सब का साथ...सब का विकास' म्हणून रस्ते बांधले जातीलही...पण त्या रस्त्यावरून हिंदूंनी चालायचं की मुसलमानांनी हे मात्र सरकार पुरस्कृत दहशतवाद ठरवतोय...!

तू म्हणाला होतास की,'हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न व्हावेत हीच आमची अंतिम इच्छा आहे...'
पण आज दोन्हीकडे कट्टरता आणि तिरस्काराची भावना अधिक वाढत चाललीय...!

भाई...ही परिस्तिथी नक्कीच चिंताजनक आहे...!
पण हे सारं असलं तरी आम्ही लढणार आहोत...!
तुझी प्रेरणा...तुझा आदर्श...तुझी क्रांती...तुझं ध्येय...तुझा आशावाद...तुझा त्याग...तुझी वैचारिक सामर्थ्यता....हे सगळं सगळं उराशी कवटाळून
आम्ही लढणार आहोत...!

होय भाई...!
आम्ही लढणार आहोत...! आम्ही लढणार आहोत समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या क्रांतीसाठी...!
आम्ही लढणार आहोत शोषणविरहीत व्यवस्थानिर्मितीच्या क्रांतीसाठी...!
आम्ही लढणार आहोत विवेकाच्या आवाज बुलंद करण्यासाठी...!
आणि आम्ही लढणार आहोत संवैधानिक मूल्ये जनामनात रुजण्यासाठी...!

भाई ही ग्वाही देऊन थांबतो...!

इन्कलाब जिंदाबाद....!

तुझाच विवेकसाथी...
विनायक होगाडे...



1 comment: