Friday 5 May 2017

राजर्षी शाहू महाराज यांना अनावृत्त पत्र....!



राजं...
मानाचा मुजरा...!

म्या तुमच्याच कोल्हापूर राज्यातला तुमच्याच विचारांची वाट चालणारा एक सत्यशोधक...! आज तुमचा स्मृतिदिन...केवळ अठ्ठेचाळीस वर्षांच तुमचं आयुष्य...पण सामाजिक क्षेत्रात...इतक्या कमी वेळात...इतक्या उत्तुंग  कामगिरीचा डोंगूर उभा करणारं फक्त तुम्हीच एक राजं...! "माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही ! पण माणसाला माणुसकीपासून वंचित करणारी रूढी मला मोडायची आहे...!" अशी गर्जना करत...तुमी मोठ्या हिंमतीनं बहुजन समाजाचे स्वातंत्र्याचे हक्क नाकारणाऱ्या वर्णवर्चस्वाविरोधात शड्डू ठोकून लढा उभा केलात...!

"आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा, हा वाद समंजसपणाचा नाही. या सुधारणा स्वतंत्र नसून एकात एक गुंतलेल्या आहेत. सामाजिक सुधारणांची तूर्त गरज नाही असे प्रतिपादन ऐकू येते तेंव्हा तेथेच काहीतरी कपटी काव्याचे पाणी मुरत आहे असे समजावे...!" हा पवित्रा घेऊन तुमी सामाजिक सुधारणांना आधी प्राधान्य दिलंत...!
दबलेल्या...पिचलेल्या घटकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे वळखून शाळा काढल्या तसेच निरनिराळ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती केलीत,मागास जातींना नोकरीत 50% जागा राखीव ठेवल्या,अगदी स्वराज्यातल्या वकिलीच्या सनदा महार,मांग, चांभार इत्यादी लोकांना दिल्या...पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाहास मान्यता देणारे अनेक कायदं तुमी पारित केले...कुलकर्णी वतने बंद करून तलाठी पद्धत सुरू केली...त्यातही तलाठी म्हणून नेमणूक करताना अस्पृश्याला प्राधान्य दिलंत...गुन्हेगारी जमातींची हजेरी पद्धत कायद्याने बंद केलीत...सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून कायदा केलात...!!!

अबाबाबाबाबा....राजं...तुमच्या कार्यकर्तृत्वाचा हा डोंगूर निस्ता उल्लेख करूनही काही सरता सरणार न्हाई....इतकं अफाट काम तुमी तुमच्या राजवटीत आमच्यासाठी करून ठेवलत बगा...!
महात्मा फुले,न्या.रानडे व आगरकरांच्या नंतर पोरकी झालेली समाजसुधारणेची ही चळवळ...पुन्यांदा फक्त आणि फक्त तुमच्या आश्रयामुळेच बहरली बगा...! राजं...सामाजिक क्षेत्र सोडलं तरी अजून बऱ्याचं क्षेत्रात तुमचं कर्तृत्व हाये...याची जाणीव हाय मला...पण तूर्तास ह्या विषयावरच बोलतो...!

राजं... हे सगळं पाह्यलं की वाटतं 'कोल्हापुरनगरी' ही आपल्या आताच्या संविधानाची प्राथमिक प्रयोगशाळाच हुती बगा...! तुमी आपल्या राज्यात जे जे काही कायदे केलेत...जे काही राबवलंत...ते ते सगळं पुढं या संविधानाच्या रूपानं या देशांनं स्वीकारलं बगा...म्हणून मला वाटतं की तुमचं राज्य पुन्हा एकदा यावं असं ज्याला कुणाला वाटत असेल त्यांनं ओळखलं पाहिजे की आपलं राजं आता ह्या संविधानाच्या रूपांनं आपल्यात हायत...!

"दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना...
वेदना जाणवयाला जागवू संवेदना...
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना..."
ह्या ओळीतूनच तुमच्या समद्या कामाचं सार लक्ष्यात येतं बगा...!

पर राजं...खरं तर सांगवत न्हाईय पर सांगितल्याबिगर बी मला रहावणार न्हाई...!
राजं...आता काळ लय सोकावलाय बघा...!
तुमी म्हणाला होतात की,"जितक्या लवकर आम्ही आमची जाती-बंधने तोडून टाकू तितक्या लवकर आपली स्वराज्याबद्दलची लायकी वाढत जाईल हे तत्व ज्यादिवशी आमचे मनात बिंबेल तोच राष्ट्राचा सुदिन होय..!"
पर माफ करा राजं... आजकाल बरोबर याच्या उलटं घडतंय बगा...! 'एक मराठा लाख मराठा','एक मुसलमान लाख काफीरो पे भारी','एक महार लाखोची हार','एक सरदार सव्वा लाख के बराबर'...!
ह्या आणि असल्या वल्गना कानावर सारखं सारखं धडकाल्यात बगा...! राजं... या असल्या वल्गनांनी मोठं काय हुणार नसून सगळं छोटं छोटं होत जाईल...आणि ही आपल्या अंतर्गत यादवीचीच नांदी ठरलं...हे या लोकासनी कधी ओ कळणार...?

"आमच्यातील अंतस्थ कलह नाहीसे करण्यास आणि आम्हास स्वराज्यास पात्र करून घेण्याकरीता ही अनर्थकारी जातीपद्धती झुगारून देणे आम्हाला अत्यंत आवश्यक आहे...!" हे तुमचे बोल..!
आता स्वराज्य बी मिळालंय...पर...या फुकाच्या जातीय अभिमानातून आम्ही आमच्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत...हे जोवर आपल्याला कळणार नाही तोवर काय खरं नाही बगा...!

राजं...या समाजाला जागं कराया जीवाचं रान करून लय काम करावं लागणार बगा...! पर राजं... दिस काय अजून तितकंस बदललं नाहीत...! आजबी तुमच्या कार्याचा वारसा छातीला धरून वसा पुढं घेऊन जाणाऱ्या आपल्याच लोकांचं मुडदं पाडलं जात्यात ...
तीन वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा पुण्यात खून झाला...इतकंच काय राजं... हिथं तुमच्याच मातीत तुमच्या विचारांची पालखी म्होरं घेऊन जाणाऱ्या गोविंद पानसरेंचा बी खून केला गेला .....! राजं...अशा या काळात कसं ओ आपलं काम तडीस न्यायचं...विचारांची लढाई विचारानं न लढता इथं तर डायरेक्ट गोळ्याच घालत्यात बगा..?ते बी पाठीमागनं...भ्याड साले...!

पर राजं...हे काम करताना तुम्हाला बी काय कमी तरास झालता व्है...! तुम्ही "माणसातील राजा आणि राजातील माणूस" हुतासा...! पर ज्यांना ह्या माणुसकीच्या छाताडावर नाचून आपलं वर्चस्व टिकवायचं हाय त्यांनी बी तुमच्या चारित्र्याच्या बदनामीचं...इतकंच काय तुमाला ठार मारण्याचं बी प्रयत्न केलंच की...!
25 जून 1908 ला सनातनी दहशतवाद्यांनीे तुमच्या गाडीवर बॉम्बस्फोट घडवून आणून तुम्हाला खलास मारण्याचा प्रयत्न केलाच हुता...त्यातून तुमी वाचलात खरं...पर त्यानंतर बी जुलै 1908 ला निनावी पत्र लिहून तुमाला खुनाची धमकी दिली हुती...! त्यानंतर 30 जानेवारी 1918 ला तुमाला खुनाची धमकी देणारी भिंतीपत्रके कोल्हापुरात लावली होती...!

राजं...यावरून लक्ष्यातच येतं बगा...आपण सुरू केलेलं काम काय साधंसुधं नाय...त्यात अडचणी येणार...प्रसंगी जीवावर बेतणार...पर आपण आपली माती सोडायची न्हाय...जोवर अंगात रगात...आणि छातीत दम हाय तोवर शड्डू ठोकून उभं रहायचंच...! पुढचा गडी नियमापरमानं कुस्ती खेळत नसला तरी....काय बी झालं तरी आपण नियमात राहून ही कुस्ती खेळायची आणि याच मातीत असलेलं न्याय,समता,बंधुता आणि माणुसकीचं लेणं ह्या आपल्या मातीला पुन्यांदा
मिळवून द्यायचंच बगा...!

या मातीला साक्षी धरून ही आन घेऊन थांबतो...!

तुमचाच पाईक...
विनायक होगाडे...


No comments:

Post a Comment