Wednesday 8 March 2017

युवकांच्या प्रेमदिनाला सनातन्यांचा खोडा...


                            
           
           युगानयुगे 'ती' आणि 'तो' प्रेमात पडत राहिलेच...मात्र 'तिचं' आणि 'त्याचं' प्रेमात पडणं सनातन्यांना नेहमीच खटकत राहिलं...! मग काय...? नेहमीप्रमाणे त्यांनी हाती धर्म आणि मुखी संस्कृतीचा जयघोष मांडला आणि प्रेमाभावनेविरोधात दंड थोपटून त्यांनी द्वेष-हिंसेचाच आसरा घेतला...! पण त्यांना कधी कळलीच नाही ती तितक्याच सनातन असणाऱ्या प्रेमाची महत्ता...! पण हीर-रांझा,रोमियो-ज्युलिअट,लैला मजनू,वासु-सपना,आर्ची-परश्या ही सारी प्रेम युगूलं कथित सांस्कृतिक दडपशाही सहन करत धर्म जात,प्रांत,वंश या भेदांच्या सीमा ओलांडून प्रेमाचा पुरस्कार मात्र करतच राहिले...!
            'व्हॅलेंटाईन डे' या प्रेम व्यक्त करण्याच्या दिवसाला नेहमीप्रमाणे यावर्षीही कथित संस्कृतीरक्षकांचा विरोध झालाच. पण या विरोधाची धार गेल्या काही वर्षात जितकी आक्रमक आणि हिंसक होती...तितकी मात्र या वर्षी पहायला मिळाली नाही. निवडणुकांचे पडघम वाजत असताना तरुणाईचा रोष ओढवून घेणे कुठल्या राजकीय विचारधारेला परवडेल...? पण प्रेमाबद्दलच्या ह्या घमासान युद्धाला अगदी गेल्या काही वर्षात नवं रणक्षेत्र उपलब्ध झालेलं आहे ते सोशल मिडियाचं...!
या 'व्हॅलेंटाईन डे'ला विरोध करण्याचे फार रोचक फंडे कथित संस्कृतीरक्षकांनी गेल्या काही वर्षापासून वापरलेले दिसताहेत...यंदाही यात ते कमी पडले नाहीतच...! या वादातील काही मोजक्या पण  बहुढंगी-बहुरंगी अशा कॉमेंट्स पाहणं मजेशीर ठरेल...!
                   
खरा प्रेम दिवस तर वटपौर्णिमा म्हणावी लागेल...ज्या दिवशी सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा वडाचा झाडाला प्रदक्षिणा घालून 7 जन्म हाच पती मिळो ची प्रार्थना केली जाते...
पाश्चात्त्य व्हॅलेंटाईन दिवसाचे प्रेम म्हणजे...??
एक वर्षाची ही नो गॅरेंटी..!!
- वंदना साठे

व्हॅलेंटाईन डे हा प्रियकर-प्रियसीसाठींचा दिवस आहे. सनातन्यांना आज या दिवसाला विरोध करण्यासाठी दिखावू देशभक्तीचा पुळका येतो. संस्कृतीवर आक्रमण होत असल्याचा आव आणतात. काही संघटना तर प्रेमी युगुलांना मारहाण देखील करतात. प्रेम करण्याला यांचा विरोध कशासाठी?
-  सुप्रिया कोष्टी

समाजात विद्वेष पसरविणाऱ्या अनेक गोष्टी सुरु असताना प्रेम पसरविणाऱ्या सणाच्या आपण नक्कीच पाठीशी असायला हवे!!
- अवधूत खचनाळे

प्रेम करत असल्याचं गिल्ट फीलींग का ?
माझी व्हॅलेंटाइन तर माझी आई / माझे वडील. देशच माझा व्हॅलेंटाइन वगैरे वगैरे बोलणा-या लोकांचा मला प्रॉब्लेम कळत नाही. प्रियकर/ प्रेयसी असणं हा या मंडळींना गुन्हा वगैरे वाटतो का ? प्रियकर/प्रेयसी असल्यामुळं आई वडीलांवरील प्रेम कमी होते, असे यांना वाटते का ? किंवा त्यामुळे देशप्रेम घटत जाईल, अशी भीती वगैरे वाटते का ?
मुलगा आणि मुलगी यांच्यात प्रेम असणं यात त्यांना अनैसर्गिक काही वाटते का ?
सतत अपराधी भाव का आणि कसा जोपासला जातो ?
- सुशांत भोसले

व्हॅलेंटाईन डेसारख्या व्यभिचारी पाश्‍चात्त्य कुप्रथांचे उच्चाटन करून भारतीय संस्कृती जोपासा !
आज आपले दुदैव असे की, ज्या दिवसांना महत्त्व नाही, ते आपण आंधळ्यासारखे साजरे करत आहोत. आजच्या मुलांना आपल्या सणांचे महत्त्व ठाऊक नसल्याने ते पाश्चात्त्यांचे ‘फ्रेंडशिप डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ असले निरर्थक आणि अर्थहीन ‘डे’ (दिवस) साजरे करतात. मित्रांनो मला सांगा, या ‘डे’ साजरे करण्यातून कोणती पवित्र नाती समाजात निर्माण होतात ? समाजाला यातून कोणता लाभ होतो ? उलटपक्षी हानीच होते.
भारत माता की जय...!
- प्रकाश वाडेकर

आपन भारतीय लोक किती इंग्रजळलोय पहा...!
14 फेबुवारी हां व्हेलेंटाईन डे आहे माहीत आहे...
पण याच 14 तारखेला या देशासाठी तीन युवकांनी आपल्या प्राणांचे बलिदान
दिले...ते भगतसिंग ,राजगुरु आणि सुखदेव...!
विसरु नका यांचे बलिदान...!
- सुषमा माने

प्रत्येक दिवस स्मरण करावं असे व्यक्तिमत्व म्हणजे शहीद कॉम्रेड भगत सिंग,
मुक्त विचारांचे समर्थक भगत सिंग यांना नको त्या गोष्टीत बंदिस्त करणे म्हणजे त्यांच्या विचारणं फाशी देणे होईल,
07/10/1930 ला फाशीची सूनवाई झाली होती..!
23/03/1931 ला फाशी देण्यात आली...!
- विजय साळुंखे

माझ्या माहितीप्रमाणे 'शहीद दिन' 23 मार्चला असतो.....!!! आज म्हणजे 14 फेब्रुवारीला नसतो....!!! व्हॅलेंटाईन डे ला विरोध करायचा अधिकार तुम्हाला आहे पण इतिहासाची मोडतोड नको...!!! कृपया,असं करु नका....नाहीतर मग राहुन राहुन मनी एकच प्रश्न पडतो कि हे "यांच्या संस्कृतीचे रक्षण आहे कि आपल्या इतिहासाचे भक्षण...???"
- सलोनी पाटील

यांचा प्रेमाला सुद्धा विरोध... कारण काय तर व्हॅलेंन्टाईन परदेशी.
हेच जर आसाराम नी सुरू केल असत तर चौका चौकात उत्सव झाले असते.
आसाराम बापूंनी जर त्यांच्या मातृ-पितृ वर प्रेम केलं असतं तर ते आज जेलमध्ये नसते..
- आनंद झपाटे

अरे कसले पाश्च्यात संस्कृती चे व्हलेंटाईन डे साजरे करता , आज १४ फेब्रुवारी ला त्या ३ वीर जवानांना फाशी ची शिक्षा सुनावन्यात आली...! भगतसिंग , राजगुरु आणि सुखदेव यांनी भारत स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलीदान दिले , अश्या थोर शहिदांना विनम्र अभिवादन...!
- शुभम साठे

हिंदू युवकांनो, व्हॅलेंटाईन डे या पाश्चात्त्य विकृतीच्या अंधानुकरणाने हिंदु संस्कृतीचे होणारे अधःपतन रोखा... या दिवशी मातृ-पितृ दिवस साजरा करुण उदात्त संस्कृतीचे आचरण करा...!
- गणेश जोशी

व्हॅलेंटाईन डेच्या नावावर प्रेम साजरे करणे म्हणजे रोज जोडीदार बदलणे, गाडीवरुण फिरणे,भेटवस्तु देणे,रासलीला करणे..!
या सारखे दिवस साजरे करुण भारतीय संस्कृती नष्ट करु नका.असा प्रयत्न करणाऱ्या लफडेबाजांना योग्य तो समज देण्यात येईल...!
- संजय केसरकर

व्हॅलेंटाईनने प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी, प्रेम करण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी म्हणून बलिदान दिले म्हणून जगभर हा दिवस साजरा केला जातो...! तो केवळ प्रेमी युगुलांनीच साजरा करावा असे काही नाही...ज्या कुणा व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम,आपुलकी वाटते...त्यांना आपण आपल्या प्रेमाची कबूली देऊ शकतो..! मुळात हा प्रेमाला साथ देण्याचाच दिवस आहे...!
- माधुरी तोडकर

                        
           वरील कॉमेंट्स वाचता असं लक्षात येतं की,ही समर्थन-विरोधाची बाब फक्त या दिवसापुरती मर्यादित नाही...तिचा व्यापक अंगाने उहापोह करायला हवा...!
व्हॅलेंटाईन डे साजरा करावा की नको हा ज्याचा त्याचा प्रश्न...! साजरा करण्याचे आणि त्याचे समर्थन करण्याचे जसे स्वातंत्र्य आहे तसेच घटनात्मक चौकटीत राहून त्याला विरोध करण्याचं देखील स्वातंत्र्य आहेच...! पण या वादातील सर्वात मोठा कहर म्हणजे,गेल्या काही वर्षांपासून असे कथित संस्कृतीरक्षक "शहीद भगतसिंग,राजगुरु व सुखदेव यांच्या फाशीचा आणि 14 फेब्रुवारी म्हणजेच "व्हॅलेंटाइन डे" चा मुद्दाम बुद्धिभेद करणारा संदर्भ जोडत आलेले आहेत...!
काही कथित संस्कृतीरक्षकांकडून 'या दिवशी क्रांतीकारकांना फाशी दिली गेली...' असा गैरसमज पसरवून भावनिक आव्हान करण्यात आले...!
त्यानंतर काहींकडून 'या दिवशी या तिघांना फाशीची शिक्षा जाहिर केली गेली...' असाही प्रचार करण्यात आला...त्यानंतर काहींनी या दिवशी 'गांधींनी भगतसिंग यांना फाशी द्यावी म्हणून सही केली...' असा नवा जावाईशोध लाऊन इतिहासात आणखी एक अमूल्य अशी संशोधनात्मक भरही घातली...!
            व्हॅलेंटाईनला विरोध करण्यासाठी म्हणून ज्यांनी हे असे बुद्धिभेद करणारे भंपक मॅसेज फॉरवर्ड केले त्यांनी आपण आता संगणक नव्हे तर आता स्मार्ट फोन युगातील युवा लोक असून भगतसिंग यांना फाशी कधी जाहिर झाली आणि कधी दिली गेली...? एवढी साधी चिकित्सा गूगल वर जाऊन करण्याचे कष्टदेखील घेतले नाही...!
जे तथाकथित संस्कृतीरक्षक भगतसिंग यांचा वापर या दिवसाला विरोध करण्यासाठी करतात मुळात त्यांना काडी इतकाही भगतसिंग माहीत नसतो...हे वेगळे सांगायला नको...! स्वतः भगतसिंग यांचं प्रेमाबाबतीत मत काय होतं हे जाणून घेणं इथं प्राधाण्याचं ठरेल...!
भगतसिंगानी तुरुंगात असताना वाचन करुण विविध विषयावर टिपणे काढली होती...त्यातील प्रेम आणि प्रणय अशा विषयावर भाष्य करणारी अप्टन सिंक्लेअर, बॅ.लिंडसे अशा लेखकांची काही टिपणे आहेत...त्यातील काही मोजकी इथे उदधृत करणं आवश्यक ठरेल...
"प्रणय हा जरी प्रामाणिक प्रेमाचा आणि उत्कट भावनांचा परिपाक असला,तरी तो करणे हे लाजिरवाणे आणि अनैतिक आहे ह्या परंपरेचा पगडा आपल्या तरुण लोकांवर आहे ही किती दुःखाची बाब आहे."
"माझा विवाहावर विश्वास आहे आणि माझे असे म्हणणे आहे, की विवहाचा अर्थ असा असला पाहिजे,की ते एका पुरुषाचे एका स्त्रीवरचे प्रेम आहे आणि त्यात त्यांचा मिलाफ व सहचर्य आहे... जेंव्हा ते असे किंवा यासारखे नसते तेंव्हा ते लग्न आहे असे मला वाटत नाही,मग त्यांचा विवाहसमारंभ झालेला असो अथवा नसो. एकमेकांबद्दलचे प्रेम हेच लग्न आहे, बाकी काही नाही. लग्नसोहळा म्हणजे एक पुरुष व स्री यांच्यातील अशा नात्याला असलेली केवळ सामाजिक मान्यता होय. आणि तसेच ते, समाजाने असे नाते अस्तित्वात आहे,हे औपचारिकरित्या स्वीकारणे होय."
             'व्हॅलेंटाईन डे' असो वा इतर कोणत्याही दिवशी असो...तरुण प्रेमी युगुलांना मारहाण करणे,उठ-बशा काढणे यासारख्या शिक्षा देणे,जबरदस्ती लग्न लाऊन देणे या आणि अशा कृत्यांनी दडपशाही करुण संस्कृतीचे रक्षण होईल असं ज्यांना वाटतं त्यांना मुक्तचिंतक भगतसिंगाचे हे विचार पेलवतील असं कोणाच्यानेही म्हणवणार नाही...! शहीद आणि देशभक्त असा भगतसिंगांचा उदघोष करणं सोपं आहे पण बुद्धिप्रामाण्यवादी ,चिकित्सक आणि देव या कल्पनेची चिकित्सा करणारा नास्तिक भगतसिंग मात्र सोयीचा नाहिये...!
            धर्म आणि संस्कृतीच्या नावावर काय खावे काय खाऊ नये,काय कपडे घालावेत-घालू नयेत...अमुक गोष्टी कराव्यात..तमुक करू नयेत ही आणि अशी बंधने अभिव्यक्तीवर घालून असंवैधानिक आणि हिंसक दडपशाहीचे प्रकार नेहमीच घडत आलेले आहेत...पण या दडपशाहिला कडवा आणि घटनात्मक  विरोधही झालेला आहे आणि होत आहे...2011 मध्ये केरळपासून सुरु झालेलं आणि पुढ सोसल मिडियामुळेे देशभर पसरलेलं 'किस ऑफ लव्ह' हे आंदोलन अशाच स्वरूपाच होतं...
आम्हाला आमच्या प्रेम करण्याच्या, प्रणयाराधना करण्याच्या हक्कापासून कोणीही रोखू शकत नाही हाच संदेश या "प्रेम-चुंबन" आंदोलनातून द्यायचा होता. ..!
           संस्कृती ही कधीच स्थिर नसते,ती प्रवाही असते...संस्कृती ही बाब अभिव्यक्तीवर गदा आणण्यासाठी वापरली जात असेल तर त्याहुन दूसरी विकृती मुळीच नाही...!
मुळात प्रेम ही गोष्ट लपून छपुन करावी लागणं,हीच मोठी शोकांतिका आहे...उलट ह्या भावनेला खुलं वातावरण उपलब्ध करुण देणं...हे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे...आणि हे पुरेसं निकोप स्वातंत्र्य उपलब्ध करुण देणं ही प्रत्येक पालकाची आणि पर्यायाने समाजाचीच जबाबदारी ठरते...!

- विनायक होगाडे

पूर्वप्रसिद्धी : अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मासिक 
                  अंक : मार्च 2017

No comments:

Post a Comment