माय सावित्री...
सस्नेह नमस्कार...
तुझ्या अनेक लेकांपैकी मीही एक तुझाच ल्योक...तुझ्याच वाटेवरुन चालणारा...!
तू आणि बा जोतिबानं १८६३ ला विधवांच्या बाळंतपणाची सोय म्हणून बालहत्त्याप्रतिबंधक गृह काढलं होतं...त्यातूनच निपजलेलं एक बाळ तुम्ही दत्तक घेतलं होतं...! यशवंत...! हवं तर तू मला 'यशवंत'च समजू शकतेस...!
साऊ...! हां...मी तुला साऊ म्हणूनच हाक मारेन बरं कां...अन् माझा बाप जोतिबाला 'जोतिबा'च म्हणेन...! यातून जी जवळीच,आपुलकी,मैत्री व्यक्त होईल ना...ती इतर शब्दातून नाही गं होणार...! असो...!
साऊ...आजच्या दिवशी तुला वीरमरण आलं...! प्लेगच्या रुग्णांची सेवा करता करता मीही दगाऊ शकते...हे माहित असून देखील तू तुझ्या कामात दंग राहिलीस...! ही चिकाटी आणि हे धैर्य तू आणलस तरी कुठून ...?
माई खरं तर ...पत्र लिहायचं कारण हे की...परवाच ८ मार्चला महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि अजुनही तो ठिकठिकाणी साजरा होतोय...! आणि अशा या वेळी एका मुलाने तुला पत्र लिहायचं कारण काय असा प्रश्न तुला नक्कीच पडेल...! त्याचं कारण पुढे स्पष्ट होईलच...!
माई...तू त्यावेळी आमच्यासाठी...आमच्या माय-भगिनींसाठी ठाम उभी राहिलीस म्हणूनच तर आज बाई शिकून अगदी पंतप्रधान,राष्ट्रपती इतकंच काय अंतराळात देखील गेली गं...!
केवळ तू तेंव्हा सनातनी लोकांचे शेण-दगड सोसलेस म्हणूनच हे घडलं...
साऊ...सांगायला आनंद होतोय पुढच्याच वर्षी आणखी एक तुझी लेक अंतराळात उड्डाण घेतीय...!
अग तू जोतिबासंग ठाम उभी राहिलीस म्हणूनच तर हे घडलं...अगदी तो गेल्यानंतरदेखील तू 'सत्यशोधक'च काम पुढे नेतच राहिलीस...!
पण बघ ना...कसाय आपला समाज...!
विद्येची देवता कोण? तर देवी सरस्वती...! देवता एक महिला...पण महिलांनाच शिकायला बंदी...! अशी ही...एका बाजूला बाईला भजणारी आणि दुसऱ्याच बाजूला पायाखाली भरडणारी संस्कृती थैमान घालत असताना तू जोतिबासंग पाटीवर ग-म-भ-न गिरवलस...!
ही अक्षरं गिरवताना एका मोठ्या क्रांतीचीच तयारी तेंव्हा सुरु होती...नाही का...?
तुझ्यामुळे बायांच्या नशिबात कधीच नसलेले शिकायचे योग आता येत्या काळात मात्र धडाधड कुंडलीत येऊन धडकणार होते...! काय गम्मत आहे नाही...!
माई...तू आणि जोतिबानं काय नाही केलं त्यावेळी...!
मुलींची पहिली शाळा काढली...त्यासाठी गृहत्यागही केला...नंतर शूद्रांसाठी,अस्पृश्यांसाठीही शाळा काढल्या...रात्रशाळा काढल्या...विधवांना पुनर्विवाहासाठी सहाय्य केलं...बालहत्त्या प्रतिबंधक गृह काढलं...इतकंच काय...विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संपही घडवून आणला...दुष्काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला...दारु दुकान सुरु करण्यास विरोध केला...सत्यशोधक समाज स्थापिला...आणि त्यामार्फत पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरवात केली...!
बापरे...! माई.....या साऱ्या कामाचा डोंगर पाहिला की कसं थक्क व्हायला होतं बघ...!
पण माई...आज तुझ्या लेकी शिकल्या-सवरल्या असल्या...घरातनं बाहेर पडल्या असल्या... तरीही अजुनही काही लेकी मानसिक गुलामगिरीतून बाहेर नाहीच पडल्या...!
तूच सुरु केलेलं पण आताचं शिक्षण आम्हाला नुसतचं 'साक्षर' बनवतं ग...'सुशिक्षित' नाहीच...!
आजही तुझ्या मूली कसले-कसले व्रत आणि उपासतापासातच गुरफटल्या आहेत...! अगदी आजही तुझी लेक फ्लॅट मध्ये राहत असली तरीदेखील वडाची फांदी घेऊन येते...आणि घरात फेऱ्या मारत बसते...! त्यांना आता कोण सांगणार की आताच्या जगात सत्यवानाच्या 'त्या' सावित्रीपेक्षा 'सत्यशोधका'च्या ह्या सावित्रीच्या अनुकरणाची जास्त गरज आहे म्हणून...!
आजही तुझी पोरं वास्तु-जोतिषशास्त्राच्या (?) नादाला लागून लुबाडल्या जाताहेत गं...! पण त्यांना कोण सांगणार की, "ज्या घरात मूली आणि सुनांचा खळखळुन हसण्याचा आवाज येतो ना...त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो..."
साऊ...तुझ्या सगळ्याच लेकी अशा आहेत...असंही नाहिये...बदल घडतोय...तो घडेलंच...!
पण आजचे तुझे ल्योक तरी कुठे गं पूर्णपणे सुधारलेत...?
सावित्रीच्या लेकी घरोघरी...जोतिबांचा मात्र शोध जारीच आहे...! सांगायला वाईट वाटते पण आजही इथं तुझ्या मुलींवर अमानुष बलात्कार होतो...! पण त्याहीपेक्षा ही गोष्ट सांगायला लाज वाटते की आता बलात्कार बाईवर नाही तर जातीवरच होतात गं...! जातीच्या चौकटी पुन्यांदा इतक्या भक्कम झाल्या आहेत की मुलीची जात वा धर्म पाहून लोक आता हळहळतात...! हे सगळ आपल्याला कुठल्या वळणावर घेऊन जाणाराय..याची कल्पनाच करवत नाहीय...!
अगं अगदी परवा-परवा तर स्त्रीभ्रूणहत्त्या करणाऱ्या एका डॉक्टरला पकडलं...! समाजाने आता विधायकपणे कुस बदललीय...आणि आता बदल घडतोय...असं वाटत असतानाच हाच समाज या कुशीखाली सुप्तपणे उमलत्या कळ्यांना चिरडून टाकतोय...ही जाणीवच फार भयंकर वाटतेय ...!
'तयास मानव म्हणावे का..?' हा तू तुझ्या अखंडातून उभा केलेला सवाल पुन्हा-पुन्हा विचारण्याची गरज आहे याची आता जाणीव होतीय बघ...!
हां आत्ता आठवलं...!
माई...तुझ्या बरोबर शिकवायला तुझी एक जीवलग मैत्रीण होती बघ तुझ्या शाळेत...फातिमाबी शेख...! समाजाचा रोष पत्करुन तुझ्यासंगे बाईला गुलामीच्या बेडीतून मुक्त करण्यासाठी सरसावलेली तुझीच ती सखी...! पण आजही मुस्लिम महिलांची अवस्था फार चांगलीय...असं म्हणवत नाही गं...! तोंडी तलाक पद्धत,पोटगीबंदमुळे आणि इतर अनेक प्रथा-परंपरांमुळे अजुनही ती त्या सनातनी बुरख्यातच अडकून पडलीय बघ...!
तिच्या हक्कासाठी अनेक फातिमा लढताहेत...पण त्या पुरेश्या नाहियत...!
माई...तुझ्या पहिल्या विद्यार्थिनीचं नाव 'मुक्ता'...या नावाप्रमाणेच त्यादेखील या जंजाळातून मुक्त होतील...अशी आशा मात्र आम्ही सोडलेली नाहिये...!
माई...जेंव्हा जोतिबाला मारायला 'त्यांनी' मारेकरी धाडले होते...तेंव्हा तर अगदीच घाबरली असशील ना तू...? अग ज्यांच्यासाठी म्हणून माझा नवरा प्रस्थापित समाजासमोर शड्डू ठोकून उभाय...त्यांनीच सनातन्यांनी दाखवलेल्या मोहाला बळी पडून तुटपुंज्या पैशासाठी असं करावं...? पण बघ ना...आपल्या बा जोतिबाची बी किमयाच न्यारी...त्यानं तर मारेकऱ्यांनाही पार बदलवून टाकलं...! कुऱ्हाड घेऊन तुकडे-तुकडे करायला आलेले मारेकरी तीच कुऱ्हाड घेऊन जोतिबाच्या अंगरक्षणांची जबाबदारी घेते झाले...! इतकंच काय...ते दोघेही तुझे विद्यार्थी झाले...! ग-म-भ-न शिकुन त्यातल्या धोंडीबा नावाच्या एकानं तर पुढ जाऊन 'वेदाचार' नावाचा ग्रंथदेखील लिहला...!
माई...खऱ्या अर्थाने इथंच तर आपण जिंकलो होतो...!
पण काय सांगू तुला माई..
आजही तुझ्या वाटेवर चालणाऱ्या लोकांना मारायला असेच मारेकरी धाडले जातात ग...! अगदी संवाद साधायचा अवधीही न देता गोळी घालून पळून जातात डरपोक कुठले...!
तू आणं जोतिबांनी सुरु केलेली धर्माची चिकित्सा नकोय गं त्यांना...! नकोय त्यांना माणुसकी शिकवणारा धर्म...त्यांना मुखी धर्माचा जयघोष करुन फक्त नाचायचय
माणुसकीच्या छाताडावर...! पण आम्ही लढतोय...तू आणि जोतिबानं पेटेवलेली सत्यशोधनाची मशाल आजही तितक्याच तडफेन तेवत ठेवतो आहे...!
परवाच तुझ्या एका लेकीने मोठ्या धाडसाने एक उदात्त विचार मांडू पाहिला...आणि मग काय...? नेहमीप्रमाणे तुझ्या लेकीला तुला झालेल्या विरोधाइतकाच विरोध सहन करावा लागला...! गुरमेहर कौर नाव तिचं...!
'माझ्या बाबांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं..!' असं सांगून द्वेषापेक्षा प्रेमाची शिकवण सांगू पाहणारी गुरमेहर या समाजाला नकोशी झालीय गं...वाईट वाटतं...पण तिला बलात्काराचा धमक्या देण्यापर्यंत सनातन्यांची मजल गेली...त्यांच्या बुद्धिची किव करावीशी वाटते!
हे सगळं असं घडत असताना तुझी आणि जोतिबांची आठवण प्रकर्षाने येतेय गं...!
नाही...नाही...! 'तुम्ही पुन्हा जन्माला या..!' असं टाळ्याखाऊ वाक्य बोलून आम्ही जबाबदारी झटकणार नाहीय...!
तुमचा आदर्श ठेऊन आम्ही लढणार आहोत...!
माई...आम्ही लढणार आहोत...अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी...
आम्ही लढणार आहोत समतेसाठी....
आम्ही लढणार आहोत विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी...
आणि आम्ही लढणार आहोत आपलं संविधान बळकट करण्यासाठी...!
ही सारी ग्वाही देऊनच मी माझं पत्र पुरे करतोय...!
तुला आणि जोतिबालाही प्रणाम...!
तुझाच ल्योक...
विनायक...!
No comments:
Post a Comment