Sunday, 11 September 2016

नास्तिकतेच्या पल्याड...




          "माणसाचा आजवरचा इतिहास हे दुसरं तिसरं काही नसून श्रद्धा तपासण्याचाच इतिहास आहे...
जुण्या श्रद्धांच्या पराभवातूनच नवे विचार जन्माला येतात...!"
माणूस वेळोवेळी आपल्या श्रद्धा तपासात गेला म्हणून तो इतर प्राण्यापेक्षा जगावर प्रभुत्व मिळवणारा ठरला...आणि "Man the Homosepian sepian" म्हणजेच अधिकाधिक प्रगल्भ होत जाणारा प्राणी ठरला...
निरीश्वरवाद ही संकल्पना पाश्चिमात्त्य आहे...असा बुद्धिभेदी कांगावा काही धार्मिक लोक करताना दिसतात...वास्तविकतः नास्तिकतेची पाळेमुळे 'चार्वाक','बौद्ध' आदी दर्शनातून आधीपासूनच भारतीय संस्कृतीत असल्याचे दिसते..
'वेदप्रामाण्य नाकारणारे' असा जरी नास्तिक शब्दाचा अर्थ त्याकाळी असला तरी आता मात्र लौकीक अर्थाने 'देव-धर्म यांना नाकारणारे' लोक म्हणजे नास्तिक अशीच सर्वमान्य आणि सोपी व्याख्या आहे...
'बुद्धिप्रामाण्यवादी, सतत चिकित्सक आणि वैज्ञानिक दृष्टिकोणाचा स्वीकार करणे'...ह्या गोष्टी नास्तिकतेचा कणा म्हणायला हव्यात...!
         'नास्तिक मनुष्य असणं' हा काही चांगुलपनाचा निकष अजिबात नाही..! नास्तिक असणारा माणूस बलात्कारी,गुन्हेगारीही असू शकतो...याऊलट आस्तिक माणूस नीतीमुल्यांधिष्टित वर्तन करणारा असू शकतो...म्हणजे 'नास्तिक असणं म्हणजेच विवेकी असणं' असं आपण छातीठोकपणे म्हणू शकत नाही...
नास्तिकता हा समग्र विवेकवादातील छोटासा टप्पा म्हणता येईल...'विवेकी दृष्टिकोण' हा वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या पुढील टप्पा म्हणता येईल की जो...कार्यकारणभाव आणि तर्कासोबतच सोबतच नितिमूल्याधिष्टित कृतिशील संवादालाही महत्व देईल...
मला अभिप्रेत असणारा विवेकी दृष्टिकोण वस्तुस्थितिवर आधारलेला आहे...
         धार्मिकतेपेक्षा धर्मांधता ही विवेकाला अधिक मारक असते...धर्मांधता म्हणजे धर्मावर असलेला आंधळा,कट्टर,ताठर विश्वास..!
निव्वळ धर्मच नव्हे तर कुठल्याही विचारसरणीवरचा असा कट्टर आणि अंध ताठर विश्वास हा सुद्धा विवेकाला मारकच असतो..'ईश्वरावर विश्वास न ठेवणे...हां एकच मार्ग भावनिक,मानसिक स्वावलंबन देऊ शकतो...' ही विचारसरणीसुद्धा हट्टवादी आहे...एकदा का अशी हटवादी विचारसरणी स्वीकारली की इतर विचारांवर,मतांवर विचार करण्याची विवेकी मानसिकताच नष्ट होते...
म्हणजेच नास्तिकता सुद्धा आंधळी आणि कट्टर असू शकते...आणि ती तशी असेल तर ती विवेकाला मारक आहे..

        नास्तिक असूनही माणूस म्हणून मलाही काही श्रद्धा आहेत...'कोणत्याच श्रद्धा तर्काधिष्टित नसतात.'..हेही आधीच नमूद केलेलं बरं...
मग नास्तिक म्हणवून घेणार्याची श्रद्धा काय बरं असेल...?
"श्रद्धा म्हणजे भावनेचं विचारामधे विकसित झालेलं सत्याधिष्ठित कृतिशील मुल्यात्मक रूप...!" अशी व्याख्या डॉ.नरेंद्र दाभोलकर करतात...माणसाच्या भावभावना त्याच्या कल्पनातून,दृष्टिकोनातून अथवा जीवन तत्वज्ञानातून येतात...'
उदाहरणार्थ,'माझी सत्यमेव जयते या ब्रीदावर श्रद्धा आहे'
सत्यमेव जयते म्हणजे सत्याचाच शेवटी विजय होतो...याचा काही ठोस पुरावा नाही...वा त्यामागे तर्कही नाही...पण तरीही ही गोष्ट मानवी मनाला भावनिक आधार देते...ज्याची बाजू सत्याची असेल त्याला विजयापर्यंत कूच करण्यासाठी कृतिशील मुल्यात्मक रूप देते...!
म्हणून ती श्रद्धा आहे...! आणि ती मी घटनेच्या चौकटीत राहून पाळू इच्छितो...
'हिंसा करणारी,असत्य आणि चिकित्सेला नकार देणारी..मूल्यविवेक अवनत करणारी आणि श्रद्धा म्हणवून घेणारी श्रद्धा मला मान्य नाही,ती अंधश्रद्धाच असते...!

        विवेकवादी नास्तिक म्हणून देव-धर्म नाकारताना माझी नास्तिकेतर लोकांबाबत वागतानाची भूमिका काय असावी हाही एक चर्चेचा आणि वादाचा मुद्दा आहे...
समोरच्याच नास्तिक असणं हा त्याच्याबरोबरच्या संवादाचा वा त्याच्या विवेकी असण्याचाच एकमेव निकष मानावा का..?
धार्मिक असूनही नितीमूल्याचा आग्रह धरणाऱ्या अनेक लोकांबाबत एक विवेकवादी नास्तिक म्हणून माझी भूमिका
त्यांना वैचारिकरित्या परिवर्तित करण्याची असावी का वैचारिकरित्या पराभूत करण्याची...? संवादाची असावी का वादवितंडाची...?
समोरच्याच्या विचारसरणीकडे पाहण्याचा दृष्टिकोण विवेकी असेल तर कार्यकर्ता म्हणून त्याची ती नास्तिकेतर विचारसरणी आपल्या संवादाच्या आणि परिवर्तनाच्या कार्यात अडथळा आणत नाही...म्हणूनच माझी वैयक्तिक भूमिका नास्तिकतेला अनुकूल असली तरीही ती माझ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात वा दैनंदिन जीवनात अडथळा आणत नाही...

          बौद्ध धम्माची मांडणी,शिकवण मानवातावादी वा विवेकवादी विचारसरणीच्या आसपास जाणारी आणि नास्तिक दर्शन म्हणून विख्यात असणारी असली..तरीही लोकांमध्ये विवेकवाद रुजण्यासाठी बौध्द धम्म स्वीकारायलाच हवा...हाही हटवादी तर्क मला हास्यास्पद वाटतो...
कार्यकर्ता म्हणून बौद्ध धम्माचा दुराग्रह आणि कट्टर नास्तिकतेचा दुराग्रह ह्या दोन्ही गोष्टी विवेकवादासाठी हानिकारक आहेत...असं माझं स्पष्ट मत आहे...
मी नास्तिक आहे म्हणून मी इतरांपेक्षा ''Bright म्हणजेच तेजस्वी'' आहे,ही भाबडी अंधश्रद्धा आहे...असं मला वाटतं..!
"माझा देवांवर विश्वास नाही
माझा धर्मावर विश्वास नाही...पण
देव आणि धर्म यावर विश्वास असणारी लाखो माणसे माझ्या अवती-भोवती आहेत...त्यांच्यापासून तुटून पडण्यावर माझा विश्वास नाही...
त्यांना माझ्यासोबत विवेकाकडे खेचून नेण्यासाठी आवश्यक असणारी व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे...विचारात मात्र करणार नाही...याच कारण असं आहे की 'विचार' हे तुम्हाला कुणीकडे जायचे याची दिशा दाखवणारे असतात आणि व्यवहार तुम्हाला तिथपर्यंत खेचून नेण्यासाठी असतो..."

ही उपरोक्त नरहर कुरुंदकर यांची मांडणी मला वरील सर्व भूमिकेचा सार वाटतो...
काही जणांना ही सर्व भूमिका ही 'अर्धवट नास्तिकता किंवा सोयीची नास्तिकता' वाटते...पण 'समोरच्याशी संवादापेक्षा वादावर आणि समोरच्याला परिवर्तीत करण्यापेक्षा पराभूत करण्यावर ज्यांचा विश्वास आहे'...त्यांचापेक्षा ही भूमिका नक्कीच वास्तवाला धरून आणि कृतिशील करणारी आहे...अस मला वाटतं...! महाराष्ट्रातील संतपरंपरेने त्यांच्या काळात एका बाजूला हीच भूमिका जिवाचं रान करुण बजावली...त्यांची भूमिका एका बाजूला सतत संवादी आणि दुसऱ्या बाजूला मूल्यविवेक अवनत करणाऱ्या गोष्टींबाबत कठोरही राहिली...

        एका बाजूला आपण 'अस्तिक-नास्तिक' यांच्यातला वाद जगाच्या अंतापर्यन्त चालूच राहिल,अस म्हणतो...मग मुळात प्रश्न 'देव आहे की नाही वा तो मानावा की नाही...'हा मध्यभागी उरतच नाही...आवश्यक आणि खरा प्रश्न उरतो तो 'नीतीने वागणाऱ्या समाजाची निर्मिती कशी व्हावी...?'
ज्यावेळी विचारांना प्रत्यक्ष 'कृतीच'अधिष्ठान असतं,त्यावेळी स्वतःशी उघड सामना करण्याचं धाडस येतं...स्वतःचे विचार समाजाशी जुळणारे नसले,तरी समाजाशी खंबीर टक्कर देण्याचे नैतिक धैर्यही आपल्यात आपोआप येतं...त्यामुळेच मला 'कृतिशीलता'ही याबाबत अधिक महत्वाची वाटते...!
         विवेक याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टिकोण अधिक मूल्यभावना...संवाद करताना व्यक्तीला विवेकाकडे नेणारा,बदलासाठी प्रेरित करणारा वैज्ञानिक दृष्टिकोण दिल्यानंतर त्याच्यापेक्षा अधिक काही द्यावे...अस मला वाटत नाही...'निव्वळ नास्तिकत्वाची नव्हे तर विवेकवादी नास्तिकत्वाची भूमिका व्यक्ती स्वतःच आत्मनिर्भरतेने स्वीकारते...'आणि हाच भारतीय कसावर आधारित विवेकवादाचा गाभा आहे,अस  मला वाटतं...की जो आपल्या भारतीय राज्यघटनेला अनुसरूनच व्यक्त होतो...

     
         - विनायक होगाडे

No comments:

Post a Comment