Sunday, 11 September 2016

ऐसे कैसे झाले 'संत'...?


       
4 सप्टेंबरला मदर टेरेसा यांना ख्रिश्चन धर्मपीठाने 'संतपद' बहाल केले...मदर तेरेसा यांचे सेवाक्षेत्रातील कार्य प्रचंड आहे...!
भारतात आल्यानंतर 1946 पासून त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली...गरजू,पीडित,रोगी लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य वेचले...
अनाथ,बेघर,अपंग मुलांसाठी शाळा-अनाथालय काढले...महारोगी,क्षयरोगी,एच आय व्ही,एड्सग्रस्थ लोक आणि म्हातारपणाने आजारग्रस्त होऊन खंगलेल्या लोकांसाठी त्यांनी सेवाकार्य चालू केले..!
त्यांच्या या उल्लेखनीय आणि अफाट अशा सेवाकार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले...1962 साली त्यांना पद्मश्री आणि मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला...1979 साली त्यांना जगातील सर्वोच्च नोबल पुरस्कार मिळाला..
1980 साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने भारतात गौरवणयात आले...
1997ला त्यांच्या मृत्यूनंतर 123 देशांमध्ये 4000 सिस्टर्स,300 ब्रथर्स,610 मिशन्स कार्यरत होते...त्यांनी सेवामार्गात घालून दिलेल्या परोपकाराच्या शिकवणीचा हा परिपाक होता...
एवढं मोठं काम मदर तेरेसांनी आपल्या 87 वर्षाच्या आयुष्यात उभं केलं होतं...
           त्यांच्या या अफाट कामामुळे त्यांना 'संत' ही उपाधी भूषणावहच आहे...! त्यांचे हे संतपद त्यांनी केलेल्या मानवतावादी सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार नाही तर त्यांनी केलेल्या कथित चमत्कारांसाठी दिलेले आहे...! ख्रिश्चन धर्मपद्धतीप्रमाणे कोणाही व्यक्तीस संत ही पदवी दिली जाण्यापुर्वी निर्विवाद सिद्ध झालेले (!) काही चमत्कार त्या व्यक्तीने केले आहेत,हे सिद्ध व्हावे लागते...!
     आणि म्हणून मदर तेरेसा यांच्या मृत्यूनंतर त्यांना संतपद देण्याबाबत पोप जॉन पोल दूसरे यांनी भारतात एक पथक पाठवले होते आणि त्यांनी त्यांच्या परिभाषेतील कॅननाइझेशनची म्हणजेच धार्मिक कायद्यानुसार मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु केली होती...! या पथकाद्वारे 19 ऑक्टोबर 2003 साली पहिला चमत्काराचा दावा करण्यात आला होता...!
           मोनिका बसेरा नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोच्या मधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा दावा त्या वेळी करण्यात आला होता. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता. चौकशी मध्ये पुढे हे देखील समोर आले होते की, प्रत्यक्षात मोनिका बसेरा ह्यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता आणि त्यांच्या पोटातील गाठ देखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारानेती गाठ बरी झाली होती.तिच्यावर उपचार करणारे डॉ.रंजन मुस्ताफी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेला मुलाखतीत याला पुष्टी दिली होती...मोनिकाच्या पतीनेही 'माझी बायको उपचाराने बरी झाली आहे,चमत्काराने नाही' असा निर्वाळा दिला होता...!
           त्यानंतर, 17 डिसेंबर 2015ला देखील त्याच पद्धतीने,  2008 मध्ये केवळ मदर तेरेसा ह्यांचे नाव घेवून प्रार्थना केल्या मुळे ब्राझील मधील एका व्यक्तीच्या मेंदुतील गाठी बऱ्या झाल्याचा चमत्काराचा दावा केला गेला आहे. ही व्यक्ती कोण आहे? त्याला नक्की कोणता आजार होता? प्रार्थने मुळेच हा आजार बारा झाला हे कशावरून सिद्ध होते? ह्या मधील कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न देता,केवळ चमत्कार झाला असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवर देखील उतरत नाही...! पण, 15 मार्च 2016 ला ख्रिश्चन धर्मपीठाने कॅननाइझेशनची ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे घोषित केले...!

          मुळात,वैज्ञानिक दृष्टिकोणाने पाहता चमत्कार होऊच शकत नाहीत...! मदर तेरेसा यांच्या अलौकिक मानवतावादी कार्यामुळे त्यांना 'संत' ही पदवी सहज प्राप्त होऊ शकते...मानवी कल्याणासाठी याचप्रकारे झटणाऱ्या अनेक महामानवांना महाराष्ट्राने आदराने 'संत' ही पदवी दिली आहे... अत्यंत उच्च दर्जाचे सेवाकार्य करणाऱ्या मदर तेरेसा यांना 'संत' ही पदवी देण्यासाठी चमत्काराची गरज अजिबात नाही... वैज्ञानिक दृष्टिकोण आणि शोधक बुद्धिचा आग्रह धरण्याचे नागरिकांसाठीचे कर्त्यव्य भारतीय संविधान सांगते...! परंतू,अशापद्धतिचे चमत्काराचे दावे हे घटनाविसंगतच आहे...!

          गंभीर स्वरूपाचे आजार हे चमत्काराने बरे होतात असा समज लोकांच्या मध्ये पसरणे हे त्यांना शास्त्रीय उपचारांच्या पासून दूर नेणारे ठरते आणि त्याच मुळे हानिकारक देखील ठरू शकते त्यामुळे एखाद्या व्यक्तीला संत जाहीर करण्यासाठी चमत्कारांची अट ही विज्ञान विरोधी आहे आणि लोकांच्या शोषणाला देखील कारणीभूत ठरू शकते. मदर तेरेसा ह्यांनी केलेले दिनदुबळ्यांच्या सेवेचे काम हाच त्यांच्या संतप्रवृत्तीचा पुरावा आहे त्यामुळे खरे तर अवैज्ञानिक चमत्काराची अट हे त्यांच्या मानवतावादी कामाचे अवमूल्यन आहे...!
         'चमत्कारांना शरण गेलेले मन संघर्षासाठी उठू शकत नाही...कारण चमत्कार माणसाचे मन दुबळे,आंधळे आणि पांगळे करते...!एका अर्थाने चमत्कार हे सिद्ध होण्यासारखे नसतातच.चमत्कार सिद्ध करावयास सांगणे म्हणजे स्वतःला नेमकी किती वाजता झोप लागली हे स्वतः लिहून ठेवण्यासारखे आहे...!

मदर तेरेसा यांच्या मानवतावादी कार्याला दुर्लक्ष करुण चमत्काराधारित संतपद देण्याच्या प्रक्रियेचा जगभरात अनेक बुद्धिवादी संघटनांनी विरोध केला आहे...!
भारतात 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने पहिल्यापासून डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली या अशा पद्धतीच्या संतपदाला आपला विरोध दर्शवला...! आणि  चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हानही दिले आहे...! ख्रिश्चन पोप यांना ईमेलद्वारे या गोष्टीचा विरोधही करण्यात आला होता...! नेमकं अंनिसने याबाबतीत काय काय केले...याचा उहापोह "अंनिस आणि मदर तेरेसाचे संतपद" या मागील ब्लॉगमध्ये केला आहे...तोही वाचकांनी जरूर वाचावा...!

         गॅलिलिलोने 'पृथ्वीमध्य सिद्धांत' नाकारुन सप्रमाण दाखवून दिले की,'सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरते..!'
त्याने केलेल्या सत्यशोधनाला ख्रिश्चन धर्मपीठाने बायबलद्रोही ठरवून त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला कठोर शासन केले होते...गॅलिलिओने भीतिपोटी आपले संशोधन मागे घेऊन ख्रिश्चन धर्मपिठाची माफी मागितली होती...!
त्यानंतर या चुकीच्या शिक्षेबद्दल त्याच्या मृत्यूनंतर 350 वर्षांनी ख्रिश्चन धर्मपीठांनी गॅलिलिओची माफी मागितली आहे...हे लक्षात घेता मदर तेरेसांचे संतत्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेले कथित चमत्कार शोधणे,हा त्यांचा सन्मान नसून अवमान आहे...असे आमचे मत आहे...ख्रिश्चन धर्मपीठाने गॅलिलिओ प्रकरणी जशी सद्बुद्धिने माघार घेतली तशाच सद्बुद्धिने ख्रिश्चन धर्मपीठ 'चमत्काराधारित संतपद' ही अवैज्ञानिक प्रक्रिया बंद करेल,आणि संताच्या मानवतावादी कार्याचा सन्मान करेल,अशी आशा आहे...!
            -विनायक होगाडे...

1 comment:

  1. खोटे चमत्कार करणारे भोंदू बाबा होतात, संत होण्यासाठी विवेकाने मानुसाकीचाच स्वीकार करावा लागतो. अगदी योग्य व्यक्तिमत्व होत. उशिरा का असेना पण धर्मपिठाना शहाणपण सुचल.

    ReplyDelete