Sunday, 11 September 2016

अरे बंदूकीच्या नळकांड्यांनो...

अरे बंदुकीच्या नळकांड्यानो...
आजवर भलेही तुम्ही झाडल्या असतील हरतऱ्हेच्या गोळ्या
आम्हा 'माणसांवर'...
कधी शिव्याशापातून..
कधी मारहाणीतून...
वा कधी आमच्या छाताडावर गोळ्या झाडून...
आणि गेला आहात पळपुट्यांसारखे पळून..!
नाही नाही..! तुम्हाला षंढ म्हणून मी 'बाईपणाचा' अपमान नाही करणार...!
पण इतकं मात्र सांगतोच...
की तुमच्यापेक्षा शूर आणि निडर आमची सावित्री होती...!

पण लक्षात ठेवा...
तुम्ही नळकांड्याच आहात... त्या बन्दुकिच्या...की ज्या मागे हात आहेत...
तुमच्या त्या पूजनीयांचे...वंदनियांचे...
की जे खुशाल वापरतात तुम्हाला...
या माणुसकीवरच्या बलात्कारात...
अगदी त्या निरोधासारखे...
आणि देतात फेकून काम झाल्यावर...

अरे नळकांड्यांनो...
विकलाय तुम्ही आपला भेजा...
की ज्यावर पदोपदी करताहेत ते माणूसद्वेषांचे बलात्कार...
आणि म्हणून पैदा होताहेत इथं मच्छरासारखं नवे नथुराम...
त्या तुंबलेल्या माणुसघाण्या डबक्यातून...!
की जे उठसुठ करताहेत एकमेकाच्या धर्मद्वेषाचं स्खलन...

अरे...
माणुसकीवर गोळ्या झाडून जर स्वतःला तुम्ही समजत असाल देशभक्त...
तर पुन्हा एकदा आठवण करून देतो त्या इतिहासाची...
त्या कोपऱ्यातील अब्राहम लिंकन पासून या कोपऱ्यातील मार्टिन ल्यूथर किंगपर्यन्त...
त्या विद्रोही तुकारामापासून ते महात्मा गांधींपर्यंत...
आजवर इतिहास रचला गेलाय...
या माणसांचा...
की ज्यांनी माणसांना मनुष्यभानात आणलं..!

अरे शोधू नका तुमचा इतिहास...
बलात्काराच्या इतिहासात का कुठे बलात्काऱ्यांचा गौरव असतो.?
आणि तुम्ही तर निरोधांचा गौरव शोधायला निघालात...!

अरे नळकांड्यांनो...
पोखरा रे...खुशाल पोखरा इतिहास...
वापरा तुमच्या कुजबुजीचं हत्यार...
ठरवा तुमच्या बापजाद्या नळकांड्यांना देशभक्त...
आणि खुशाल नाचा तुमचे जात-धर्म घेऊन माणुसकीच्या छाताडावर...

पण लक्षात ठेवा...
तुम्ही मारलेल्या हरेक माणसाच्या रक्तातुन जन्मतील
नवे दाभोलकर...नवे पानसरे...आणि नवे कलबुर्गी...
की जे लढतील न्यायासाठी...लढतील समतेसाठी...आणि लढतील माणसांतील माणुसकीसाठी...
अविरत...न थकता...न घाबरता...

पण तुम्ही मात्र कालही...
माणूसकीवर रोखलेल्या नळकांड्या होतात...
आजही नळकांड्याच आहात...
आणि तुमच्या अधर्मी विचारांच्या औलादीही तशाच नळकांड्या असतील...

अरे भेजा विकलेल्या नळकांड्यांनो...
लक्षात ठेवा...
उषःकाल होणारय...
आणि प्रकाशणार आहे हे सारे विश्व...
या साऱ्या विवेकसूर्यांच्या प्रकाशाने...

No comments:

Post a Comment