Sunday, 11 September 2016

'त्या' दगडाभोवतीच्या माझ्या 'श्रद्धा'...!


       
         
           त्याचं झालं असं कि,मी असा एकदा रस्त्याने गाडीवरुन चाललो होतो...आणि मला मध्येच वाटेत एक असा एक बऱ्यापैकी मोठा आडवा पडलेला दगड दिसला...
खरं तर मधेच दगड असा आडवा पडल्यामुळं मी त्याला धडकून कोसळणारच होतो...पण थोडक्यात बचावलो...कुणी दुसरं धडकुन पडू नये म्हणून मी खाली उतरलो...आणि दगड उचलून बाजूला करण्यासाठी सरसावलो...तर माझ्या असं लक्षात आलं की दगड जरा वेगळ्या बांधणीचा दिसतोय...हा असा रस्त्याकडेला पडून राहण्यापेक्षा यातून गांधीजींची चांगली मूर्ती आकाराला येऊ शकते अस मला वाटलं आणि मी तो दगड घरी आणला...कामानिमित्त महिनाभर बाहेरगावी जावं लागणार असल्यान काही दिवस तो दगड तसाच माझ्या घराबाहेरच्या अंगणात पडून होता...साधारण महिन्यानं काम आटोपून मी पुन्हा घरी आलो...तर माझ्या असं लक्षात आलं की तो अंगणात गांधींची मूर्ती तयार करण्यासाठी ठेवण्यात आलेला दगड तिथे नाहीचयं...घरातल्याना विचारलं तर ते काही बोलायलाच तयार नाहीत...सरतेशेवटी मला असं कळालं की गल्लीत 'रंगोबा' नावाच्या कोणत्यातरी देवाचं एक नवीन छोटसं मंदिर बांधण्यात आलयं...आणि तो दगड तिथे शेंदूर फासून ठेवण्यात आला आहे...दररोज त्याची पूजा होते...आणि अमावस्या-पौर्णिमेला तर बराच गोतावळा तिथे जमलेला असतो...महिन्याभरातच एक छोटेखानी मंदिर मोठ्या दिमाखात उभा राहिलं होतं...आणि तिथं माझा 'भावी गांधी' कोणत्याही आकराविना अनेकांचा 'देव' होऊन बसला होता...!
        मी तडक तिथं गेलो...आणि माझा दगड उचलू लागलो...तेवढ्यात मला काही जणांनी मागे ओढलं...आणि "काय करतोयस हे..?" अशी दमदाटी ते करू लागले...मी नम्र स्वरात सांगितलं की,"हे पहा,हा माझा दगड आहे...तो माझ्या अंगणात होता...तुम्ही तो पूर्वपरवानगी न घेता इथं आणलाय...आणि त्याचा वापर करताय.."
इतकं बोलल्याबरोबरच जे चार-दोन लोक जमले होते त्यांचा आवाज आणखी उंचावला...'हे रंगोबाचं मंदिर आहे आणि हा आमचा रंगोबा देव आहे...असं देवाला घेऊन जाण्याचा मूर्खपणा तू केलासचं कसा...?' या आणि अशा भाषेत ते अंगावर येऊन हमरी-तुमरीची भाषा बोलू लागले...मी पुन्हा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू लागलो...की हा माझा दगड आहे...एव्हाना बरीचशी गर्दी जमली होती...वातावरण तापलं होतं...एकेकजन अंगावर धावून येऊन बोलत किंबहुना आपला मुद्दा रेटत होता...तो दगड माझा आहे असं सांगून उचलणे हा त्यांचा भावना दुखावण्याचा प्रश्न बनला होता...मला माघार घेण्यापासून गत्यंतर नव्हतं...मी त्या गर्दीपुढे हतबल होऊन माघार घेतली...!


        आता वरील घटनेची चर्चा मला माझ्या सामाजिक अभ्यासातून अनेक अंगाने...अनेक पैलूंनी करायची आहे...मुळात तो दगड मला सापडला त्यावेळी तो रस्त्याच्या मधे पडला होता.त्याला धडकून अनेक अपघात होऊ शकले असते.त्यानंतर तो दगड मी गांधींच्या मूर्तीसाठी वापरूया अस ठरवलं,म्हणजे त्यातून काही तरी नवनिर्मिती करावी असा माझा मानस होता...पण तो दगड देवळात देव होऊन बसला.आणि अनेकांसाठी श्रद्धास्थान बनला...!
मुळात इथं दगड तोच आहे...पण प्रत्येक ठिकाणी त्याची जागा बदलली आहे...आणि प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळ्या भूमिका निभावतोय आणि त्याच्यासंदर्भात समाजाच्या भूमिकाही बदलत आहेत...पहिल्या ठिकाणी अपघाताला कारणीभूत ठरणारा दगड नैतिकतेच्या दृष्टिकोनातून मी बाजूला सारला...जर तिथे मला मघाशी अरेरावी करुन हाकलून देणारे  दोनजन जरी असते तरी त्यांनी मला याकामी मदत केली असती...त्या दगडाची गांधींची मूर्ती व्हावी का...याबाबत कुणाला काही आक्षेप असण्याचं कारणच नाही...फार-फार तर गांधींची मूर्ती नको...अमुक-अमुक व्यक्तीची मूर्ती या दगडातून छान आकाराला येईल,अस कुणीतरी मत व्यक्त करू शकतं...
या दगडातून 'गांधींची' छानशी मूर्ती आकाराला येऊ शकते,ही माझी श्रद्धा आहे...! नाही,यातून अमुक एकाची मूर्ती छान बनू शकते असं जर कुणी म्हटलं तर त्याचं ते वैयक्तिक मत आहे..आणि अस मत व्यक्त करणे,हां त्याचा स्वातंत्र्याचा भाग आहे...यातून माझ्या गांधीची मूर्ती बनवू पाहणाऱ्या श्रद्धेला तडा नाही जात...
ज्यावेळी एखादा दगड एखाद्या मंदिरात 'रंगोबा देव' म्हणून उभा ठाकतो...त्यावेळी मला त्याबद्दल काहीच आक्षेप असण्याचं कारण नाही...पण जर माझा दगड...माझी जागा...माझे पैसे तुम्ही त्या कामी श्रद्धेच्या नावाखाली बळजबरी वापरणार असाल तर ती 'श्रद्धा कशी असेल...?
श्रद्धा म्हणजे काय..?
तर माझ्या लेखी श्रद्धेची ही कमीत-कमी शब्दात केलेली मांडणी आहे...ती अशी की...."श्रद्धा म्हणजे भावनेचं विचारामधे विकसित झालेलं सत्याधिष्ठित कृतिशील मुल्यात्मक रूप...!"

         आता ही व्याख्या जर समोर ठेवली तर मला त्या दगडात गांधींची मूर्ती व्हावी असं..वाटणं ही माझी भावना झाली..ती भावना उचलून धरून तिला मूर्तीत रूपांतरित करण्यासाठी घरी घेऊन येणं...हे त्या भावनेचं विचारामधे विकसित झालेलं आणि त्याहीपुढे जाऊन सत्याधिष्ठित कृतिशील मुल्यात्मक रूप आहे...!"
श्रद्धा ही नेहमी कृतिशीलच असते...आणि ती माणसाचा मूल्यविवेक उन्नत करणारी असते...याचा अर्थ असा की श्रद्धेतून माणसाला काहीतरी करण्याची उर्मी मिळायला हवी...आणि ते जे 'काहीतरी' आहे ते नेहमी माणसाला माणूस म्हणून पुढे घेऊन जाणारं असावं...त्याचा विवेक उन्नत करणारं असावं...!
           डॉ.नरेंद्र दाभोलकरांसारखा विवेकवादी माणूस श्रद्धेबाबतीत पुढील चार निकष मांडतो..!
श्रद्धेचे महत्वाचे चार निकष आहेत...की ज्याविना श्रध्दा ही श्रद्धा मानता येणार नाही...!
श्रद्धेचा पहिला निकष आहे-'सत्याचा'..! म्हणजे तपासणेचा...चिकित्सेचा...! ज्या श्रद्धेला सत्याच्या आधारे प्रश्न विचारलेला चालत नाही, ती श्रद्धाही अंधश्रद्धाच असते...! माझी श्रद्धा हीच सत्य आहे,आणि माझ्यापेक्षा वेगळ्या श्रद्धा बाळगणाऱ्याला येथे अजिबात स्थान नाही...अस म्हणणं हीच मोठी अंधश्रध्दा आहे...!
श्रद्धेची दूसरी कसोटी आहे अहिंसेची..! हिंसा ही मानवाचा मूल्यविवेक कधीच उन्नत करत नाही...उलट ती मानवी विवेकाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते...श्रद्धेची तिसरी कसोटी म्हणजे श्रद्धा माणसाला कृतिशील करते...
जी श्रद्धा माणसाला कृतिशील बनवत नाही,ती अंधश्रध्दा असते...
श्रद्धेचा चौथा निकष आहे...ती माणसाचा मूल्यविवेक उन्नत करते...माणसाला 'माणूसपणा' प्राप्त करुण देते...नैतिक मूल्यांना पायदळी तुडवणारी श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते..!

          "माणसाचा आजवरचा इतिहास हे दुसरं-तिसरं काही नसून श्रद्धा तपासण्याचाच इतिहास आहे..!"
एक काळ असा होता की,जंगलात शिकार करुन, मांस खाऊन ,गुहेत राहणारा माणूस प्राणी पृथ्वी,आप,तेज,वायु,आकाश यांना श्रद्धेपोटी देव मानत होता...वीजा कशा चमकतात? ढग कसे गडगडतात? वणवा कसा पेटतो? या आणि अशा गोष्टीबद्दल माणसाला कुतूहल वाटायचं...आणि या अचाट-अलौकिक गोष्टी त्याच्या श्रद्धेचा भाग होता...त्याला पंचमहादेवता म्हणून पूजनीय होत्या...
पण आज माणूस प्राण्याने अग्नी काडीपेटीत बंद केला...वायू सिलेंडर मधे बंद केला...आकाशातून कृत्रिम पाऊस पाडू लागला...जमीन खोदून धातू मिळवू लागला...
म्हणजे त्यांच्यासाठी कधीकाळी ज्या महादेवता होत्या..त्या त्याच्या हातात आल्या..!

याचं कारण काय...?
तर त्याने आपल्या श्रद्धा तपासल्या...!
मुळात कोणत्याच श्रद्धा कोणत्याही तर्कशास्त्रावर आधारलेल्या नसतात...!

माझी माझ्या आईवडिलांवर श्रद्धा आहे...!
माझी भारतीय संविधानावर श्रध्दा आहे..!
माझी लोकशाही या मुल्यावर श्रद्धा आहे...!
माझी माणसाच्या 'माणुसकीवर' श्रद्धा आहे..!
माझी 'सत्यमेव जयते' या ब्रीदावर श्रद्धा आहे..!

आता वर उपरोक्त केलेल्या श्रद्धा चार निकषात बसतात...म्हणून त्या अंधश्रद्धा नाहीत..!
सत्यमेव जयते म्हणजे सत्याचाच शेवटी विजय होतो...याचा काही ठोस पुरावा नाही...पण तरीही ही गोष्ट मानवी मनाला भावनिक आधार देते...त्याची बाजू सत्याची असेल तर त्याला विजयापर्यंत कूच करण्यासाठी कृतिशील मुल्यात्मक रूप देते...!
म्हणून ती श्रद्धा आहे...! आणि ती मी घटनेने बहाल केलेल्या 'श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य' या आधारे पाळू इच्छितो...माझ्या श्रद्धाची चिकित्सा करण्याचा अधिकार घटनेने इतरांना बहाल केला आहे...त्याचप्रमाणे इतरांच्या श्रद्धेची विधायक चिकित्सा करणे...हाही मला अधिकार आहे...

जे हा अधिकार 'भावना दुखावल्या' असा कांगावा करुण नाकारतात...
ते घटनाविरोधी कृत्य करताहेत...हे आपण लक्षात घ्यायला हवं...!


सरतेशेवटी आपण नक्की मला विचाराल की आपला भावी कृतिशील होऊ पाहणारा गांधी आता 'रंगोबा' बनून त्याचा देव झाला आहे...यासाठी आपण पुढे काही करणार आहात की नाही...?

तर मी या प्रश्नाचे उत्तर नरहर कुरुंदकरांच्या या पुढील मांडणीने करू इच्छितो...

माझा देवांवर विश्वास नाही
माझा धर्मावर विश्वास नाही...पण
देव आणि धर्म यावर विश्वास असणारी लाखो माणसे माझ्या अवती-भोवती आहेत...त्यांच्यापासून तुटून पडण्यावर माझा विश्वास नाही...
त्यांना माझ्यासोबत विवेकाकडे खेचून नेण्यासाठी आवश्यक असणारी व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे...विचारात मात्र करणार नाही...याच कारण असं आहे की 'विचार' हे तुम्हाला कुणीकडे जायचे याची दिशा दाखवणारे असतात आणि व्यवहार तुम्हाला तिथपर्यंत खेचून नेण्यासाठी असतो..."

     

        -विनायक होगाडे

No comments:

Post a Comment