Sunday, 11 September 2016

अधर्माच्या पलीकडे....विवेकनीतिच्या दिशेने...!



        कोणे एके काळी आटपाट नगर नावाच एक राज्य होतं. तसं ते खूप समृद्ध,शांतातामय अस नगर होत. "धर्म" नावाचा एक राजा या राज्यात राज्य करायचा. त्या राज्यात सगळी'माणसं' सुखासमाधनात नांदत होती. राज्याचा विस्तार तसा खुप मोठा होता.
"धर्म" राजाला दोन बायका होत्या. एक होती आवडती आणि दूसरी नावडती. आवडतीच नाव होतं "नीती" आणि नावडतीच नाव होतं "अनीती"..!
"धर्मा" चा कारभार सुरळीत चालला होता.'धर्म' आणि 'नीती' राज्यात सुख शांती कशी नांदेल, माणसं शांततामय-समृद्ध जीवन कस जगतील याकडे लक्ष्य देत होती..!

         धर्म राजाच्या राज्यात विविध जीवन पद्धती होत्या..! माणसं  वेगवेगळ्या जीवनपद्धतीला अनुसरुण आपलं जीवन जगत होती. 'धर्म' राजाने प्रत्येक जीवनपद्धतीचा एक मंत्री निवडला होता. आणि हे मंत्री त्या-त्या जीवनपद्धतीच कामकाज पाहायचे..!
आशा पद्धतीने एकंदरित 'धर्माचे' आणि 'नीतीचे' राज्य चालू होतं..!
"माणसांन नीतीनं वागावे", "चोरी करू नये", " अनावश्यक संपती गोळा करू नये.", " नेहमी खरे बोलावे" ही आणि अशी शिकवण धर्म आपल्या राज्यातील जीवन पद्धतीना देत असे.
धर्माचे राज्य कल्याणकारी होत. आटपाट नागरातील माणसं म्हणूनच की काय, धर्माचा आदेश, त्याची शिकवण मनावर कोरुण घ्यायचित. कारण धर्म राजा माणसाच्या कल्याणाचाच विचार करायचा. माणसाला दुःख येऊ नये याची काळजी घ्यायचा. अशापद्धतीने धर्माचे राज्य नीतीनं चालू होतं.
         धर्माची नावडती बायको 'अनीती' ला हे बघवेना. आपण राज्याची राणी असून आपल्या हातात काहीच नाही,ही भावना तिला सारखी सतावत होती. ती स्वार्थी वृत्तीची होती आणि  मनोमन  राज्याविषयी द्वेष बाळगून होती..! 'आटपाटनगर' आपल्या हातात यायचं असेल तर काहीतरी करायलाच हव.. असा चंग अनीतीने मनोमन बांधला..!
        'धर्म'ला नीती पासून एक मुलगा झाला आणि साऱ्या राज्यात आनंद पसरला. 'आटपाट नगर' तर भलतंच आनंदात होत..!
धर्म-नीतीने आपल्या मुलाचं नाव "विज्ञान" ठेवलं..."विज्ञान" आता मोठा होऊ लागला होता. त्याच्या उच्च शिक्षणासाठी धर्म-नीतीनं त्याला परराज्यात शिकण्यासाठी पाठवलं..!

         एव्हाना या सगळयाविषयी द्वेष बाळगुन असणारी अनीतीने आता हालचाल करायचे ठरवले. 'अनीती'ने सत्तेसाठी 'धर्म' राजाला आपल्या बाजूला वळवण्यास सुरवात केली. ती त्याच्याशी गोडीगुलाबीने वागू लागली.धर्माची रात्रंदिवस सेवा करू लागली. आता 'नीती' पेक्षा 'अनीती'च 'धर्माजवळ' जास्त असायची. त्याची रात्रंदिवस सेवा करायची. त्याला काही हवं नको ते बगायची. धर्म या सेवेमुळे भलताच खुश झाला.
'अनीती' ने संधी साधून धर्माजवळ मिलनाची इच्छा व्यक्त केली. तिच्यावर खुश असणारा धर्म तिच्या या चालीला बळी पडला. पण धर्म या सगळ्याच्या परिणामाशी अनभिज्ञ होता... त्याला काही कळायच्या आतच अनीती ने त्याला आपलंस केलं होत. खरं तर धर्माला याचे दूरगामी परिणाम  स्वतः वर व आपल्या राज्यावर इतके होतील, हे माहीत असतं तर त्याने कधीच तिच्याशी जवळीक साधली नसती. पण व्हायचं तेच झाल. दोघांच्या मिलनाने अनीतीला "जात" आणि "वर्ण"नावाची जूळी अपत्ये झाली. 'धर्म' मात्र याच्या परिणामाशी अजूनही अनभिज्ञ होता.!
        अनीतीशी झालेल्या मिलनामूळे धर्माला 'धर्मांध विषाणुंची' लागण झाली. आणि धर्म यामुळे अधिकच खांगला, पिचला, आणि दबला गेला.!
नीतीला धर्माची ही अवस्था पाहवेना,ती धर्माच्या आजारपणात त्याची सेवासुश्रुषा करण्यात व्यस्त झाली. धर्माचं आणि नीतीचं आपल्या राज्यावरुन लक्ष्य उडालं, आणि हेच अधिक धोक्याचं ठरलं..!
        आजवर धर्माच्या राज्यात विविध जीवन पद्धतीचे मंत्री म्हणून काम करणारे मंत्री मंडळ आपापसात भांडू लागले. 'धर्मानंतर' राज्याचा कारभार कसा व्हावा, यावर बरिचशी अनागोंदी माजली. मंत्र्यांनी आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या मंत्र्याच्या जीवनपद्धती विषयी लोकांना भडकवायला सुरवात केली..! आणि आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत आणि आम्ही कस  चांगल्या प्रकारे धर्माचे राज्य स्थापन करू शकतो..असा दावा प्रत्येक जीवन पद्धती करू लागली..! आणि या मुद्द्यावरुन सगळ्या जीवन पद्धती एकमेकाविरोधात 'धर्माच्याच' नावावर उभ्या राहिल्या..!
       'अनीती'ने ओळखले की,जर यातील एक जरी जीवन पद्धती ताकदीने मोठी झाली तर आटपाटनगरावर सत्ता गाजवेल. हे ओळखून अनीतीच्या दोन अपत्यांनी राज्यात धुमाकूळ घातला. जात आणि वर्णाने विविध जीवन पद्धतीत शिरकाव केला.!
काहीत जातीने तर काही जीवनपद्धतीत वर्णाने शिरकाव केला..!आटपाट नगरातील माणसं आता विविध जीवनपद्धतीत धर्माच्या नावावर जाती आणि वर्णात सुद्धा विभागली गेली होती. धर्माला तर आधीच धर्मांध विषाणुची लागण झाली होती. धर्माला त्याच्या दोन मुलाविषयी काहीच करता येइना. कारण शेवटी धर्माच रक्तच जात आणि वर्ण याचं रक्त म्हणून वाहत होतं..!
'धर्माचें राज्य स्थापन करू...!' असा दावा करणारी प्रत्येक जीवन पद्धती आता एकामेकांशी भांडत होती. त्या सर्वानी जात आणि वर्ण हे धर्माचे अपत्य आहेत हे मान्य केलं होतं..!

       'माणसांने कस वागाव' हे सांगणारा "धर्म"  आता मात्र धर्मांध विषाणुंच्या लागणाने  माणसांन असं वागलेलं चालणार नाही' अशी बंधने घालू लागला..!
जात आणि वर्णच बंधनाच्या स्वरुपात धर्म म्हणून पुढे आले..! आणि त्यांनी माणसाच्या मेंदूचा ताबा घेतला.! आटपाटनगरीयांना धर्म फक्त पाळायचा एवढंच माहित होतं..कारण धर्माच राज्य कल्याणकारीच असतं असा त्यांचा समज होता. पण हे सगळ धोकादायक ठरत होतं..!
माणसं आता माणसापासून दूर चालली होती.. फक्त 'माणूस' म्हणून ओळखली जाणारी माणसं आता जात आणि विविध धर्मावरून ओळखली जाऊ लागली..! सगळीकडे धर्माच्याच नावावर अनीतीचा हाहाकार माजला..! माणस धर्म-जातीवरून माणसालाच कापत सुटली! आपल्या मुलभुत गरजाच्या अपूर्ततेला इतर जात व धर्मच कारणीभूत आहेत अस समजून एकमेकांविषयी द्वेष बाळगुन होती.. मंत्र्यांनी ह्या भांडणाला सोईस्कर अशी भूमिका घेतली व आपल्या पोळ्या भाजुन घेतल्या.! 'अनीतीच्या' हातात धर्माच्या नावावर सत्ता होती आणि जात-वर्ण मेंदुवर आपला ताबा दिवसेंदिवस घट्ट करत होते!
        पोटाची भूक भागना...दुःख सरना म्हणून काही लोक अंधश्रध्देला बळी पडू लागली! लोकांच्या या अगतिकतेचा फायदा काही स्वार्थी अनीतीच्या समर्थकांनी घ्यायला सुरवात केली!  नगरातील काही सुज्ञ 'नीतीवादी' लोक हे पाहत होती. त्यांना धर्माच अनैतिक राजकारण दिसत होतं! त्यांनी याविरुद्ध थोडाफार आवाज उठवायला सुरवात केली...पण तो आवाज कायमच दाबला गेला...खरा धर्म आणि निती तर केव्हाच मरून गेले होते..!
        उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेला धर्माचा मुलगा 'विज्ञान' एके दिवशी परत आला. त्याने 'निर्भयता' नावाच्या मूलीशी विवाह केला होता.."विवेक" नावाचा एक छोटा गोड मुलगा ही त्यांना झाला होता! आटपाटनगर आपल्या ज्ञानाने आणखी प्रगत करू असा निश्चय विज्ञानाने केला होता!  पण राज्यात आल्यावर मात्र त्याला सगळच आलबेल दिसल.!
       राज्याची परिस्थिती त्याला पाहवेना! गेल्या काही वर्षात सगळं अनपेक्षित घडल होतं! विज्ञानाला हे बघवेना.! त्याने "निर्भयतेशी" बोलणं केल!  परिस्थिती हाताबाहेर दिसत होती पण विज्ञानाच्या पाठीशी आता निर्भयता होती!
       त्यांनी विचारांती ठरवल की या राज्यातून उपासमार,गरीबी,बेरोजगारी नष्ट करायला हवी..! लोकांचे जीवन समृद्ध करायला हवे!
दोघांनी काम करायला सुरवात केली.! नगरातील सुज्ञ मंडळी त्यांच्या सोबत आली!  विज्ञानाने ज्ञानाच्या आधारे नवनवीन शोध लावले!  माणसाचे जीवन सुसह्य,सहज केले..! विज्ञानाने शिक्षण क्षेत्राची भरभराट झाली..! बेरोजगारी नष्ट झाली..गरीबीही हळूहळू कमी होत गेली...लोकांना आता दोन वेळचं खायला मिळत होत..!
पण धर्मांध आणि जात्यांध मानसिकता काही माणसाच्या मेंदूचा ताबा सोडेना..! भौतिक विकास झाला पण मानवी मेंदू अजुन तसेच भुरसटलेले होते.!
विज्ञानाची महती लोकांनी मान्य केली..विज्ञानाची करणी आत्मसात केलं...पण विज्ञानाची विचारसरणी लोकांनी घेतलीच नाही..! अजूनही लोक जात-वर्ण-धर्म यावरून भांडत होते..सगळी कडे विषमता होती..!अंधश्रद्धा तर पुराच्या पाण्याप्रमाणे वाहत होती..!
       लोकानां केवळ भौतिक सुख सुविधा देऊन चालणार नाहीत तर 'आपन जात-धर्माच्या मानसिक गुलामगगिरित आहोत' हे पटवून द्यायला हवे..! हे विज्ञानाला उशिरा कळाल! एव्हाना विज्ञान  व निर्भयतेचा मुलगा विवेक वयात आला होता..! तो समाजाची स्थिती पाहत होता..आपल्या बाबांनी केलेल काम आणखी जोमाने पुढे न्यायला हव..आणि आता समाजप्रबोधन करायला हव,हे त्यानं ओळखल.! "विज्ञान-निर्भयता-विवेक" यांच्यामागे बरिचशी लोक आता जात-वर्ण-धर्मांधता सोडून उभी राहिली..! अनेक "माणसं" "विज्ञानासोबत" "निर्भयता" बाळगुन "विवेकाकडे" वाटचाल करू लागली..!
आणि हळूहळू " विवेकाचा आवाज बुलंद होऊ लागला..!"
         धर्मांध-जात्यांध विषाणुना हे पाहवेना..! त्यांनी या " विवेकी" लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. पण हे"विवेकसाथी" खचले नाहीत. त्यानी विवेकाची साथ सोडली नाही..! अनेक धर्मांध विषाणुनी विवेकसाथीना धमक्या दिल्या..मारहाण केली...प्रसंगी त्यांची हत्याही केली..!
पण विवेकसाथी घाबरले नाहीत...! हातात हात आणि 'हम होंगे कामयाब' च गाणे गात ती इतर लोकांना शहाणं करू लागली!
विवेकसाथीनी पहिल्यांदा अंधश्रद्धेवर प्रहार केला..माणसाना अंधश्रध्दा कशा वाईट आहेत हे विविध उपक्रमातुन पटवून दिले..!
नगरातील माणसं आता डोळस बनू लागली!  मात्र धर्मांध विषानुंचे त्रास देण्याच् काम चालूच होतं..!
       विवेकसाथिंनी विज्ञानदृष्टीचा प्रचार प्रसार केला..! लोकांना ' वैज्ञानिक दृष्टीची' महत्ता सांगीतली..!
कार्यकारणभाव तपासायला शिकवला..! लोकाना आपल्या अधोगतीच कारण धर्मांध-जात्यांध मानसिकतेत आहे...हे हळूहळू लक्षात आल..!
          विवेकसाथींनी धर्मातील शोषण करणाऱ्या कर्मकांडावर प्रहार केला ..धर्माची कालसुसंगत चिकित्सा केली.! अधर्मी धर्माला विवेकाचा पर्याय दिला..! पण धर्मांधांचे हितसंबंध मानसिक गुलामगिरित दडले असल्याने त्यांनी नेहमी प्रमाणे हिंसा करुण या कामात अडथळे आणले..!
त्यांचे हिंसक वागने आणि धर्मसुधारणेला विरोध करणे आता विवेकसाथींच्या अंगवळनी पडले होते..!त्यानी धर्मांधकडे दुर्लक्ष केले..! विवेकसाथींचे काम वाढत होतं..! नगरात आता बऱ्यापैकी शांतता होती..कुणी जात-धर्म घेऊन भांडत नव्हते.. जणु काही त्यांना धर्माचा खरा अर्थच समजला होता..! विवेकसाथींनी आटपाटनगर "धर्मनिरपेक्ष" केलं! आता नगरातील माणसं आपपला धर्म आपल्या घरात पाळत होती...त्यानी निरर्थक कर्मकांडांचा धर्म त्यागला होता...!
सारी माणस आता 'माणूस' म्हणून जगत होती.! विवेक-विज्ञान- निर्भयतेच काम समाजाला समृद्धीकडे नेत होतं..!
       धर्मांध विषाणूंची संख्या आता फारच कमी झाली होती...ते अधे-मधे लोकांना जात-धर्मावरून भडकवायचे...पण आता माणसं त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती..!आता नगरात शांतता...समृद्धी,समता होती..!
         विज्ञान आणि निर्भयतेने विवेकाचा विवाह "समतेशी"लावून दिला..! दोघांचा सत्यशोधकी विवाह थाटामाटात पार पडला...!
त्यांना एक छोटीशी गोड मुलगीही झाली...तीच "नीती" नाव ठेवण्यात आलं..!


आटपाटनगरातील माणसानं आता
"विज्ञान"  आत्मसात केलं..!
"निर्भयतेन" प्रश्न मांडायला सुरवात केली..!
"विवेक"वापरून त्या प्रश्नांची उत्तरे शोधली..!
"समतेंन" विषमतेचा नायनाट केला...!
पुन्हा मानसाला "नीती" गवसली होती...!

नगरातील माणसानी "विवेकवादी नीतीधर्म" धारण केला होता...आणि विवेकी वाटचाल केली होती....


"अधर्माच्या पलीकडे....विवेकनीतीच्या दिशेने...!"

- विनायक होगाडे

   

No comments:

Post a Comment