फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य,समता आणि बंधुता ही तीन सांस्कृतिक मूल्ये नव्या जगाच्या उभारणीसाठी दिलीत...! आणि मग जात-वर्ण-धर्म-प्रदेश या आणि अशा जन्मदत्त निष्ठांकडून माणसाचा प्रवास प्रामुख्याने या तीन मानवी मूल्यनिष्ठांकडे सुरु झाला...अजूनही ही मुल्ये म्हणावी तितकी मानवी समाजाने धारण केलेली नसली तरी माणसाचा या मुल्यांच्या प्रस्थापनेसाठीचा लढा अजूनही चालूच आहे...!
एखाद्या निर्जन बेटावर राहणाऱ्या एकट्या मनुष्याला ही मुल्ये लागू पडणार नाहीत..कारण मुळातच ही मुल्ये माणसांच्या,मानवी समाजाच्या सामाजिक पातळीवरील न्याय्य जीवनासाठी आवश्यक आहेत...! पण माणूस म्हणून अधिक परिपूर्णतेने जगण्यासाठी व या तीन मुल्यांकडे जाण्यासाठी वैयक्तिक पातळीवर माणसाने काही मुल्ये अंगीकार करणे अधिक आवश्यक आहेत असं मला वाटतं...
आणि म्हणूनच त्या मूल्यांवर म्हणजेच, 'विज्ञान,निर्भयता आणि नीती' या विषयावर मला लिहावंस वाटत आहे याचं मुख्य कारण हे आहे...!
स्वातंत्र्य,समता बंधुता ही जशी परस्परपूरक मुल्ये आहेत तशीच विज्ञान निर्भयता नीती हो देखील परस्परपूरक मुल्ये आहेत व त्यामध्ये एक अदृश्य साखळीही आहे...!
विज्ञान हे अंतिम सत्याचा दावा कधीच करत नाही...ते अंतिम सत्यावर नव्हे तर सत्याच्या सातत्यावर उभे असते...'सध्याच्या पुराव्याप्रमाणे मला एवढेच समजले आहे,मात्र त्यापेक्षा नवीन काही पुरावा पुढे आल्यास,मी माझे मत पूर्णपणे बदलेन..!' ही वागणूक अर्थातच नम्रतेची आणि पर्यायाने नीतिमत्ता दर्शवणारी आहे...!
गॅलिलिओने बायबलमध्ये असलेला पृथ्वीमध्य सिद्धान्त नाकारून 'पृथ्वीच सूर्याभोवती फिरते' हे नव्या पुराव्यानिशी समोर आणले...अर्थातच,ख्रिश्चन धर्मपीठाचा त्याला रोष पत्करावा लागला ! आणि भीतीपोटी त्याने आपले संशोधन मागे घेतले...! पृथ्वी सपाट नसून ती गोल आहे,या आपल्या सिद्धांतासाठी किंवा विचारांच्या चिरंतन स्वातंत्र्यासाठी निर्भयतेने प्राणाची बाजी लावणारे अनुक्रमे ब्रूनो,सॉक्रेटीससारखे लोकही इतिहासाला ज्ञात आहेत...!
वैयक्तिक पातळीवर 'विज्ञान' हे मूल्य आत्मसात करणे म्हणजे 'विज्ञानवादी दृष्टी' आत्मसात करणे...!
माणसाने आजवर विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी मात्र घेतली नाही....!
माणूस हा पूर्णपणे विचारप्रधान असा प्राणी कधीच नव्हता...विचारांच्याखेरीज निराळ्या भावना,कल्पना,प्रेरणा या अशा काही बाबी मानवी मनात आहेत...! यातीलच एक मुलभूत सहजप्रेरणा भीतीची आहे...!
या जगात इंद्रियापलिकडले,तर्काच्यापलिकडले वा अनाकलनीय,अलौकिक असे काहीतरी आहे,असे मानण्याची माणसाची पद्धतच त्याच्या मनात असलेल्या मुलभूत भीतीचे एक प्रक्षेपण आहे...!
आणि श्रद्धा हा त्या भीतीचाच एक अविष्कार आहे...पण या श्रद्धांच्या पराभवातूनच नवे विचार जन्माला येत असतात..आणि हा पराभव करण्यासाठी गरज असते निर्भयतेची...! न्यूटनसारखा आस्तिक मनुष्य ज्यावेळी या सृष्टीचे रहस्य भेदू पाहतो...त्यावेळी एका अर्थाने तो देव-धर्मविरोधी काहीही थेट भाष्य न करता त्याच्या अस्तित्वालाच व या श्रद्धावादालाच मुलभूत आव्हान देत असतो...!
भीतीपोटी,आधारासाठी,प्रेरणेसाठी श्रद्धा बाळगणारा मनुष्य आजवर आपल्या श्रद्धा तपासतही आला आहे...! श्रद्धेने झाकोळलेल्या भितीवर निर्भयतेने,प्रयत्नपूर्वक मात तो करत गेला म्हणूनच तो या सृष्टीत "Man the homosepian sepian" म्हणजेच अधिकाधिक प्रगल्भ होत जाणारा असा प्राणी ठरला...!
स्त्री-पुरुष संयोगातून अपत्यनिर्मिती होते,हे सांगण्याचे काम विज्ञानाचे आहे,पण एखाद्या स्त्रीला लग्नाआधीच मातृत्व आले तर...ते नैतिक समजावे की अनैतिक...? याचे उत्तर विज्ञान देत नसते..!
किंवा...
अणूचा वापर 'क्षणार्धात नष्ट करणाऱ्या बाँबच्या निर्मितीसाठी करायचा की 'मानवी जीवनाच्या आधुनिकतेसाठी करायचा..?' याचे उत्तर 'अणू' शोधणारं विज्ञान देत नसते..!
त्यासाठी नितीमूल्यांचा आणि सारासार विवेकाचा आधार घ्यावा लागतो..! आणि हा विवेक मगाशी म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोणातूनच येतो...कारण विवेक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण अधिक नीतीमूल्यभावना...!
म्हणजे मानवी समाजाला केवळ विज्ञानाधिष्टित आधुनिकता उपयोगाची नाही तर नितिमित्तेची चाड असणं ही आवश्यक आहे..!
मानवी समाजात सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणावीत अशी तत्वं म्हणजे नीती...!
या नीतीमूल्यांच्या प्रस्थापनेसाठी धर्म निर्माण केले गेले...असा सर्वच धर्माचा इतिहास सांगतो...! सर्व धर्माची मूळ शिकवण करुणा,प्रेम,त्याग अशी नितिमूल्यांची आहे असे सांगितले जाते,पण प्रत्यक्षात मात्र आपला धर्म अधिक श्रेष्ठ,उदात्त,प्राचीन आहे,हे सिद्ध करण्यासाठी त्याच प्रेम,करुणेच्या नितीमूल्यांना पायदळी तूडवून मनुष्य अपार हिंसेला नव्हे तर जगाच्या विध्वंसालाही तो अत्याधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाने स्वतःला सिद्ध करतो...!
अण्वस्त्रांची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान धार्मिक दहशतवाज्ञाना मिळाल्यास...मानवी जगाच्या विध्वंसाची शक्यता अगदी जवळ येईल...!
आणि हा विध्वंस तर आपल्या दाराशीच आला आहे...!
विज्ञानाने निर्माण केलेली दुचाकी घेऊन...विज्ञानाने निर्माण केलेल्या पुलावरून चालवत....विज्ञानाने निर्माण केलेल्या बंदुकीने...विज्ञानवादाचा प्रचार,प्रसार करणाऱ्या माणसावर गोळ्या झाडण्याइतपत नितीमूल्यांचे अधःपतन धार्मिक दहशतवादाने केलेले आहे...!
आणि म्हणूनच,धर्माशिवाय माणसाच्या विचारातून,मानवी विवेकातून नीती निर्माण होऊ शकते...!
'इतरांनी आपणाशी जसे वर्तन केलेले आपणाला आवडते तसे वर्तन आपण इतरांशी करावे आणि इतरांनी जसे वर्तन केलेले आपणाला आवडत नाही तसे वर्तन आपण इतरांशी करू नये...!' ही नीतीची सर्वात सोपी व्याख्या आहे असं मला वाटतं...!
विज्ञान-निर्भयता आणि नीती ही तीनही मुल्ये परस्परपूरक आहेत...यातील हरेक मूल्यांचे मानवी जीवनातील महत्व सारखेच अनन्यसाधारण आहे...!
विज्ञानाची करणी घेतलेल्या मानवाने विज्ञानाची विचारसरणी घेणे आता काळाची गरज बनली आहे...!
पण,बर्ट्रान्ड रसेल एका ठिकाणी म्हणतात की,'मानवाची अशी तर्कशून्य श्रद्धा कशातून निर्माण होते..?' रसेल यांनी पुढे म्हटले आहे की,'याचे एक कारण माणूस हा इररॅशनल म्हणजेच विवेक/तर्कशून्य प्राणीही आहे...आणि तरीही त्याने तितक्याच अतार्किकतेने स्वतःला 'रॅशनल एनिमल' ऊर्फ सूज्ञ विवेक प्राणी असे म्हणवून घेतले आहे...!
म्हणजेच...स्वतःला विवेकी समजणारा मानवी समाज पूर्ण अर्थाने विवेकी नाही...! विध्वंसाच्या उंबरठ्यावर विवेकमूल्यांच्या प्रस्थापनेसाठी मी काय करु शकतो...? हा प्रश्न स्वतःला विचारल्यावर आपण नक्कीच या तीन मूल्याप्रत पोहचू...खऱ्या अर्थाने विवेकी होण्यासाठी मानवाला 'विज्ञान,निर्भयता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नितीचीही कास धरावीच लागेल यात शंका नाही...!
- विनायक होगाडे...
No comments:
Post a Comment