Monday, 2 April 2018

राजगुरु, संघ आणि स्वातंत्र्यलढा...


राजगुरु संघाचे स्वयंसेवक होते, असा दावा संघाने केला आहे...
यात नवल वाटावं अशी काही बातमी आहे असं मला वाटत नाही... कारण त्यांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले वा फाशी गेलेले स्वतःचे असे नेते नाहींयत...
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एकंदर आढावा घेतला... तर त्यातील संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वा स्वयंसेवक म्हणून वैयक्तिक योगदान कवडीमोलाचे इतपत ही भरणार नाही...

शिवराम राजगुरु व सुखदेव थापर हे सशस्त्र क्रांतिकारक होते... ते 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन'चे प्रमुख कार्यकर्ते होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंगासोबत फासावर गेलेले ते महान देशभक्त होते... 'द लेजंड ऑफ भगतसिंग' या चित्रपटात या राजगुरुची प्रतिमा विनोदी,बालिश अशी रंगवण्यात
आली आहे... जी खरं तर इतिहासाशी प्रतारणच म्हणावी लागेल... मुळात इतिहासाशी निगडित चित्रपट, नाटक वा कादंबरी हे खरा इतिहास नसतात... ती मसालायुक्त सोयीस्कर भेसळ असते,हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला हवं...

भारतीय स्वातंत्र्यलढा प्रामुख्याने गांधींच्या नेतृत्वाखाली सत्य आणि अहिंसक मार्गाने लढला गेला आणि तो यशस्वी झाला... हे सर्वज्ञात आहे... पण सगळेच अहिंसक मार्ग पत्करून लढले अस नाही... काहींनी सशस्त्र मार्ग निवडला...
पण ज्यावेळी अख्खा देश येनकेन मार्गाने स्वातंत्र्यासाठी झगडत होता... तेंव्हा हे संघाचे निष्क्रीय लोक शाखा भरवून लाठीकाठी फिरवण्यात मश्गुल होते... आणि बौद्धिकांच्या माध्यमातून गांधींना शिव्या घालण्याखेरीज यांनी काहीही केलं नाही... 

गांधींचा अहिंसक मार्ग मान्य नव्हता... हे एकवेळ मान्य केले तरी संघाने हिंसेने केलेले आंदोलन संघाला दाखवता येईल काय...?
मुळात गांधींची चेष्टा करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी एकही सशस्त्र उठाव देखील केला नाही...
गांधींच्या नेतृत्वाखाली कधीही घराबाहेर न पडलेल्या स्त्रिया बाहेर पडल्या... लहान शाळकरी मुले तिरंगा घेऊन घराबाहेर पडली...
देशातील प्रत्येकांच योगदान मिळवण्यात गांधी यशस्वी ठरले...
पण , सशस्त्र चळवळी या कधीच जनतेच्या चळवळी होऊ शकत नाहीत... त्या नेहमीच गुप्त असतात... भारतासारख्या देशात बाया- बापयांना निडरपणे कृतिकार्यक्रम देऊन रस्त्यावर आणलं ते गांधींच्या चळवळीने...

या असोसिएशनमधील क्रांतिकारकांना आपली मतं तत्कालीन नेतृत्व महात्मा गांधींशी जुळणार नाहीत याची कल्पना होती...
म्हणून त्यांनी स्वतंत्र मार्ग पत्करला... अनेक तरुणांना त्यांनी सोबत घेतलं... प्रेरणा दिली... या लढ्यात सहभागी व्हायला उद्युक्त केलं... तो मार्ग भलेही हिंसेचा होता... पण ते लढले...

मुळात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीकार्याची वाटचाल नीट समजून घेतली पाहिजे...
या देशात क्रांतिकारकांची कधीच एकमेव अशी आणि देशभर विस्तारलेली संघटना नव्हती... सगळेच क्रांतीकारक एका विचाराचे नव्हते... बंगालमधले क्रांतिकारक अध्यात्मवादी होते त्यांच्यावर स्वामी विवेकानंद यांचा प्रभाव होता...
महाराष्ट्रातील क्रांतिकारक हिंदुत्वावादी होते...
आणि भगतसिंग यांची संघटनेतील क्रांतिकारक ही समाजवादी, कम्युनिस्ट विचारांची होती...
म्हणजे देश स्वातंत्र्य करण्यासाठी सशस्त्र लढा द्यायचा... हे एक साम्यस्थळ सोडलं तर त्यांच्या विचारातील तफावत दिसून येते... सशस्त्र मार्गाने देश स्वतंत्र झालाच असता तरीही देश चालवायचा कोणत्या विचारसरणीने यात किती मतभेद झाले असते हे उघड उघड दिसून येतं...
ही सशस्त्र चळवळ दडपून टाकण्यात इंग्रजांना यश आल्याचं दिसून येतं... कारण भगतसिंग यांच्या फाशीनंतर कोणत्या क्रांतिकार्याचे संघटन उभे राहिल्याचे दिसत नाही...

1925 साली संघ स्थापन झाला... 1942 च्या लढ्यावेळी काँग्रेस नेते अटकेत असताना समाजवाद्यांचा नेतृत्वाखाली सगळा देश रस्त्यावर असताना हे हिंदुत्ववादी मात्र बाजूला राहिले...
'आमची ताकद तेंव्हा कमी होती' हे त्यांचे म्हणणे एकवेळ मान्य केले तरी... 'शक्ती कमी असणे हा गुन्हा नाही तर असलेली शक्ती न वापरणे हा गुन्हा आहे..' कारण त्यावेळी संघ 17 वर्षाचा म्हणजे कुमारवयात होता...
भगतसिंगांची असोसिएशन कुठे 50 वर्षांची आणि ताकदीची होती...? तरीही ते उतरलेच ना...? सुभाषचंद्र बोस यांनी तर स्वतःची सेना उभारली... शिरीशकुमारसारख्या लहान मुलाने गोळ्या झेलल्या... तेंव्हा संघाचे कार्यकर्ते होते कुठे...?यावेळी संघ करत तरी काय होता...?

प्रश्न निशस्त्र वा सशस्त्र मार्गाचा नाही...
मुळात ज्यांना लढायचंच नव्हतं... ते निष्क्रिय राहून चालू असलेल्या लढ्याच्या नेतृत्वाची बदनामी करत इंग्रजांचे हात बळकट करत राहिले...
आम्ही एक सांस्कृतिक संघटन असून राजकारणापासून दूर आहोत असं सांगत संघ स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहिला...
या हिंदुत्ववाद्यांच्या बंदुकीला इंग्रज अधिकारी दिसला नाही...
त्यांच्या गोळ्या आपल्याच नेतृत्वावर म्हणजे गांधीवर रोखल्या गेल्या... गांधींचं खून करणारा, संघाचा कार्यकर्ता असणारा, सावरकवादी नथुराम गोडसे हा क्रांतिकारक नव्हता... तो माथेफिरूही नव्हता...आपल्या पद्धतीचा भारत आणि आपल्या हातात असलेला भारत निर्माण होणार नाही, या रागाने पछाडलेला शांत डोक्याचा तो खुनी होता... ते कृत्य वेडेपणातून नव्हते...
त्यात द्वेष होता... असूया होती...
त्यामुळे यांना क्रांतिकारक व शहीद समजणार्यांनी यांचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तपासून पहावं...

मुद्दा हा नाहीय...
मुद्दा हा आहे की... आता राजगुरु आमचाच आहे असं संघाला म्हणावं लागतं... याचं कारण काय...?
तर क्षणभरासाठी असं गृहीत धरू की राजगुरु संघाचा होता... तरी त्याने दिलेलं योगदान हे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या माध्यमातून देशासाठी दिलेलं होतं...
त्यावर आता तो आमचाच होता असं म्हणण्यात संघाचा उर भरून येत असेल तर तो बापडा येवो...
हे तेच लोक आहेत ज्यांनी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हातात भगवतगीता घेऊन फाशी गेले अशा वावड्या मागे उठवल्या होत्या... हे तेच लोक आहेत ज्यांनी गांधींचा खून 55 कोटी वा फाळणीसाठी केला अश्या वावड्या उठवल्या...

महत्वाचं म्हणजे...
या सशस्त्र क्रांतिकारकांच महत्वाचा कृतिकार्यक्रम होता तो हिंदू मुस्लिम ऐक्याचा... 
अश्फाक उल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल या दोन क्रांतिकारकांची मैत्री आणि त्यांचं योगदान इतिहासाला ज्ञात आहे... आपल्या राजकारणासाठी या अश्फाक आणि बिस्मिलचा एकतेचा विश्वास पदोपदी पायदळी तुडवणार्या हिंदुत्ववाद्यांनी राजगुरुला हा आमचाच असा भंडारा लावणं खुद्द राजगुरुला ही आवडणार नाही...

कुजबुज प्रचार आणि दुट्टपीपणा यात यांचा हात कुणीही धरू शकणार नाही...
गांधींना बदनाम करण्यासाठी भगतसिंगांच्या फाशीला पुढे करणारे हेच आणि गांधी-नेहरूंना बदनाम करण्यासाठी सुभाषबाबूना पुढे करणारे हेच...

कधीतरी हा सगळा इतिहास नीट समजून घेतला पाहिजे...

सुभाषचंद्रांनी रेशीमबागेत आश्रय घेतला होता...नेहरूंनी त्यांना संपवल...
गांधींच्या हातातील काठी हेडगेवारांनी शाखेत फिरवून त्यांना दिली होती... पण गांधी नालायक...!
भगतसिंगाची हॅट हेडगेवारांनीच दिली होती... पण त्यांच्यावर पाश्चात्य विचारांचा पगडा होता... ( ते साम्यवादी म्हणायलाही नाकारतात)
हा... पण नथुरामच्या बंदुकीशी मात्र आमचा कडीचाही संबंध नाही बरं का... पण तो सच्चा देशभक्त आणि शहीद होता...
असा विकृत इतिहास भविष्यात आपल्या माथ्यावर मारला जाईल...
त्याआधीच जाग व्हायला हवं...


No comments:

Post a Comment