Wednesday, 28 March 2018

बापू & मी..

गांधी पुतळ्याखाली जाऊन गांधींची काठी वढत वढत मी गांधींना गंमतीतच विचारलं...

ये बापू...
लका, पाडू का तुला बी...?

बापू हसतच म्हणाला...!

बरं होईल लका...
पाय लय अवघडल्यात...
जरा भारत फिरून आलो तर बरं वाटल...

आता कशाला फिरायला चाललायस...?
बस इथं गप्प... आधीच वातावरण गढूळ झालंय...
त्यात तसबी तुला पाडायला न्हाय येणार कोण...!
तुझ्यामागे जात हाय... का भावना दुखावणारी जमात...?
सगळ्यांना तुझा फोटू असलेली नोट चालते... पर तू कुणालाच परवडत न्हायस...!

का रं...? अस का म्हणायलईस...?

आरं... तुला अंगावर घेतलं की तू पेलायला नको व्हई...
तुला आपलं म्हणणार्यांनीच तुला न पेलवून इथं पुतळा बनवून उभा केलाय...!

आणि आपलं न माणनार्यांनी...?

आरं...
तेंना तर तेंच तेंच्यावरच भरवसा न्हाय... तुला तवा मारून बी तेंना अजून असच वाटतय की तू जिवंतच हायस लका अजून...
ती सारख सारख तुला मारायचं ट्राय कर्त्यात...!

पर तेच्यातलं एकटं बेणं माझ्याकडं सारख सारख कुणाला ना कुणाला तर घेऊन येतंय नव्ह...

ते व्हई... ते न्हाय शानं...

का रं...

गुजरातचं हाय ते...

ऑ... म्हणजे...?

काय नाय सोड...!
आईस्क्रीम खाणार..?

नगं....
म्हणजे लका...
माझी इथणं सुटका न्हायच म्हणा...?

न्हाय...
बस इथंच...
त्यापेक्षा तुला मोबाईल आणून देतो...
Fb वर पोस्टी टाकत बस...

ऑ... तेनं काय हुनार...?

आरं आता समदं तेच्यातच हुतय...

नको बाबा...
त्यापेक्षा चरखा आणून दे...
जरा बसून सूत कातीन म्हणतो...
तेवढाच बसल्या बसल्या नवनिर्मितीचा आंनद...!

श्या...
तू काय सुधारणार नाहीस म्हणजे...


No comments:

Post a Comment