Sunday, 5 March 2017

पुतळे : अवघड जागेचं दुःखणं..



पुतळ्यांचं राजकारण भलतंच  सोपं होऊन बसलंय...!
महामानवांच्या प्रतिमांच पूजन करणेच सगळ्यांना सोयीच वाटतंय...!
कारण 'अनुयायी' हा प्राणीच आता दुर्मिळ झालाय...
सगळ्यांच्यातच भक्त होण्यासाठी चढाओढ सुरुय...! कारण अनुयायीपेक्षा भक्त होणं सोपं आणि सोयीच आहे...! अनुयायाला विचाराशी बांधीलकी ठेऊन ती व्यक्त करावी लागते...तर भक्ताला फक्त नामजपाशी आणि पूजनाशी मतलब असतो...!
पण अनुयायांच्या भक्त होण्यामुळे नकळत महामानवांचे 'देव' होऊन बसताहेत...हे भीषण वास्तव नाकारुन कस चालेल...?
होय...एखाद्या महामानवाचा 'देव' होणं हा त्या महामानवाचा सगळ्यात मोठा पराभवच आहे...!
कारण एखाद्याचा देव झाला की उरतं फक्त 'पुजणं'...!
आणि 'असं असमान्य कार्य करणं,हे आपल्यासारख्याच काम नव्हे तर त्याला देवच असावं लागतं...' असा संस्कार नकळत रुजतो...!
आणि तसही महामानवांच्या विचारांचं अनुकरण करण्यापेक्षा त्याच्या प्रतिमाचं पूजन करणं फार सोपं आहे...!
महामानवाला देवत्व मिळाल की त्या मानवाला अलौकिकत्व प्राप्त होतं...!
आणि ते अलौकिकत्व टिकवण्यासाठी मग 'विवेक' गहाण टाकला जातो...! आणि इथेच महामानवाचा खरा पराभव होतो...!

काही मानव 'महामानव' म्हणून गणले जातात कारण त्यांनी मानवजातीसाठी असामान्य कर्तुत्व केलेलं असतं...!  महामानवदेखील मानवच...आणि मानव म्हणजे काही चुका आल्याच...!
पण महामानवांना देवत्व बहाल केल्यामुळे त्यांच्यानंतर त्यांच्या चुका दाखवणे म्हणजे त्याच्या देवत्वाला आव्हान दिल्यासारखे होऊन बसते...त्याच्या विचारांची चिकित्सा करणं...त्यावर प्रश्न उभं करणं हे घनघोर पाप होऊन बसतं...!

म्हणूनच हे 'राक्षसी देवत्व' महामानवांना बहाल होऊ नये...म्हणून खऱ्या महामानवांच्या नावापुढे 'पूजनीय-परमपूजनीय' अशी बिरुदं लावणंसुद्धा धोकादायक आहे...!

आणखी एक असं की...
खोटे महामानवदेखील असतात...!
त्यांच छद्मि माहात्म्य उभं करून समाजावर लादलं जातं...! दीर्घ राजकारणासाठी त्यांचेच अनुयायी पूजनीय-परमपूजनीय अशी बिरुदे त्यांच्या नावापुढे रूढ करतात...!
कारण त्यांना आपल्या नेत्याला नसलेलं माहात्म्य बहाल करायचं असतं...!

या सार्यांचे पुतळे कशासाठी...?
त्यांचा वापर 'प्रेरणा' घेऊन मानवजातीचे कल्याण करण्यासाठी की त्यांचा वापर 'द्वेष' पसरवून माणुसकीच्याच छाताडावर नाचण्यासाठी...?
पुतळ्यांना काळे फासणे...पुतळ्यांना चपलांचा हार घालणे...ह्या कृती यातूनच उद्भवतात...
पण खरं वास्तविकतः कुणी पुतळ्याची विटंबना केली म्हणून त्या महामनावाचं अधःपतन होत नाही...! त्याचं अधःपतन तेंव्हा होतं जेंव्हा पुतळ्याचे अनुयायी यावर प्रतिक्रीया करतात...त्याचा पराभव तेंव्हा होतो जेंव्हा या कारणावरुन दंगली भडकतात...!

या विध्वंसाला कारणीभूत विटंबनाखोर जितका असतो...त्याच्यापेक्षा जास्त महामानवाचे भक्त असतात...! कारण विटंबना करणार्याने ज्या उद्देशाने विटंबना केलेली असते त्याचा उद्देश महामानवाचे अनुयायी म्हणवणारे भक्तच पद्धतशिरपणे पुढे तडीस नेतात...!
विटंबनाखोरांना आंबेडकर-शिवाजी महाराज यांचे पुतळे सर्रास दिसतात पण गांधींचा पुतळा दिसत नाही...याचं खरं कारण हे आहे..!

पुतळे जितके जास्त...पुतळे जितके भव्य...तितके त्याचे मोठेपण असतं...हे विचित्रस समीकरण आता स्थिराऊ पाहतय...!
फारशे पुतळे नसलेले नेहरू आणि इतरही अनेक महामानव तितकेच असामान्य होते...हे या समिकारणामुळे खोडून निघतय...!
म्हणून या ह्या घोर अंधश्रद्धेचं निर्मूलन करणं काळाची गरज आहे...!

निव्वळ पुतळे उभारून पुतळ्यांच राजकारण करुन लोकांना प्रतिमापुजनातच गुंतवून ठेवणारे राजकारणीही प्रतिगामीच...आणि पुतळे पाडून लोकांना पुन्हा पुतळ्यातच गुंतवून राजकारण करणारे राजकारणीही प्रतिगामीच...!
ही स्मारकं एकाबाजुला मोठ्या डौलाने उभी राहत असताना महामानवांच्या विचारांचं दफनही खुलेआम होतय...हे भक्तीत गुंतलेल्या सगळ्याच महामानवांच्या भक्तांना कमी महत्वाच वाटतं...!
कारण भक्ताला फक्त भक्तीशी मतलब असतो...आणि त्यातच त्याला समाधान असतं...!

आपल्या सोईसाठी बँक खात्याला जसं आपण आधार कार्ड लिंक करतो...तसं आपण आपल्या महामानवांना
जातीं-धर्मांशी लिंक करुन टाकलेलं आहे...!
आणि विशेष म्हणजे अनुयायी असलेल्यांनी आणि अनुयायी नसलेल्यांनी हे गृहितक मान्य करून टाकलं आहे...! त्यामुळेच 'स्मारक ही कल्पना आता मारक ठरतीय..!'

आपापल्या काळात जात-धर्म-लिंग-भाषा-प्रांत या जन्मदत्त निष्ठांकडून व्यापक मूल्यनिष्ठांकडे घेऊन जाणाऱ्या महामानवांच्या नावानेच जन्मदत्त अस्मितांचे राजकारण खेळलं जातयं...हे वास्तव आहे...!

महामनावांचा संबंध इतिहासाशी असतो...! आणि काही इतिहास राजकारण्यांच्या सध्य राजकारणासाठी गैरसोयीचे असतात...म्हणून प्रतिमांच्या पूजनात गुंतून राहिलेल्या समाजाला राजकारणासाठी इतिहासाचं विकृतीकरण केलं जातय हेही लक्षात येत नाही...!
प्रतिमांच पूजन...विचारांच दफन...आणि इतिहासाचं सोईस्कर विकृतीकरण ह्या सूत्रावर आधारित सोईस्कर समाजकारण...राजकारण घडत आहे वेळीच लक्षात घ्यायला हवं...!

पण मग प्रश्न असा उरतो की...पुतळे उभे करायचे की नाही...?
मला असं वाटत की खरा प्रश्न पुतळ्यांचा नाही तर प्रश्न अनुयायांसहित सगळ्या भारतीय लोकांचा एकंदरीत या सर्व महामानवांकडे आणि त्यांच्या प्रतिमांकडे पाहण्याच्या दृष्टिकोणाचा आहे...!

जोवर हा दृष्टिकोण बदलणार नाही...तोवर हे पुतळे आपल्या अवघड जागेचं दूखणं म्हणूनच राहणार...हे वास्तव आहे...!

- विनायक होगाडे

No comments:

Post a Comment