Monday, 31 October 2016

डॉ.नरेंद्र दाभोलकरांना वाढदिवसानिमित्त अनावृत्त पत्र....



डॉक्टर...
आज 1 नोव्हेंबर...
तुमचा वाढदिवस...
सर्वप्रथम वाढदिवसाच्या खुप खुप खुप साऱ्या सदिच्छा...!
डॉक्टर कितवा आहे हो हा तुमचा बड्डे...?
1945 जन्मसाल म्हणजे...???
हां...71 वा वाढदिवस...!
डॉक्टर तुम्हाला जाऊन तीन वर्षे होऊन गेलीत...पण,अजुनही
आरोपींना शिक्षा झालेली नाहिये...
पण डॉक्टर...तुम्हाला माहितीय...तुमच्या खुनाचा तपास संथगतीने होत असला तरी तो योग्य मार्गावर आहे असं अजून तरी वाटतंय...डॉक्टर सांगायला वाईट वाटतंय पण, सनातनीच लोक आहेत ओ...तुम्हाला मागून गोळ्या घालणारे...म्हणजे तसं अजुन पूर्णतः सिद्ध नसलं झाल तरी...चार्जशीट दाखल केलीय पोलिसांनी...म्हणजे आरोप निश्चिती तर झालीय...

प्रेम,दया,करुणा यां मूल्यांची शिकवण देणारा 'धर्म' अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होऊन त्याच प्रेम,दया,शांतीच्या शिकवणुकीला पायदळी तूडवून गोळ्या झाडायला कसा बरे उद्युक्त करतो...?

डॉक्टर...
तुम्ही जात हीच एक अंधश्रद्धा आहे' असं म्हणायचात...पण काय सांगू डॉक्टर...'इथं तर
ही अंधश्रद्धा अधिक भडक होत चाललिय...तरूणांच्या मनात अवास्तव गृहितके पक्की होत चालली आहेत...आणि याचा परिपाक अधिक टोकदार जातीय अस्मितेत दिसून येत आहे...!
जाती बळकट करुण जातीअंत होणार नाही...हे कसे समजेल या समाजाला...?

डॉक्टर...परवा परवा तर कहरच झाला आहे...
चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 'नरेंद्र महाराजाच्या पायी झुकले...!'
हो डॉक्टर...तोच भोंदू नरेंद्र सुर्वे ज्याला तुम्ही चमत्काराच्या दाव्यांबद्दल खुलेआम त्याच्याच मैदानात जाऊन चितपट केलं होतं...ज्याने सर्वांसमक्ष सपशेल माघार पत्करली होती...
पण डॉक्टर...तुम्हाला माहितीय...? आता हा भोंदू स्वयंघोषित "जगद्गुरु नरेंद्र महाराज'' झाला आहे ते...

आपण या भेटीचा खुप तीव्र विरोध केला...अगदी मुख्यमंत्र्यांनी भोंदूनरेंद्र सुर्वे  यांना भेटू नये...अशी जाहिर भूमिका घेतली आपण...!
पण...शेवटी अशा वादग्रस्त भोंदू बाबाच्या पायी माथा झुकवून त्यावर कहर म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं की...'पथभ्रष्ट राजसत्तेला धर्मसत्ता ताळ्यावर आणते...हा इतिहास आहे म्हणे...!'

डॉक्टर तुम्ही म्हणायचात की,"अंधश्रद्धा निर्मूलन ते वैज्ञानिक दृष्टिकोण,वैज्ञानिक दृष्टिकोण ते धर्मचिकित्सा,धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता,धर्मनिरपेक्षता ते विवेकवाद...!" असा दीर्घ पल्ल्याचा प्रवास आपल्याला करायचा आहे...!

पण डॉक्टर...मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य जर हे असे असेल...तर आपल्याला अजुन खुप काम करावे लागणार आहे...याच गोष्टीच हे द्योतक आहे...!

आणखी एक सांगायच राहूनच गेलं... परवा भारत कबड्डीमध्ये विश्वविजेता झाला...
डॉक्टर...तुम्ही असता तर खुप खुश झाला असता नै... कधी एके काळी तुमच्या नेतृत्वात जगात गाजवलेल्या भारतीय कबड्डी संघाच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला असता...!
असो...

डॉक्टर...'ते' अजूनही खोटेनाटे आरोप करतात आपल्यावर...आपल्याविषयी सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी मिळेल त्या माध्यमाचा वापर करतात...अगदी टीवीवरील डिबेट शोचाही...!
आणि आता तर...सोशल मीडियासारख माध्यम त्यांच्या हाती अगदी आयतं कोलीत मिळाल्यासम झालेलं आहे...
फारच बुद्धीभेदी प्रचार चालूय...
स्लो पॉईझनिंग म्हणतात ना...अगदी हेच ते...धर्मवेडाचं पॉइझन या माध्यमातून हळूहळू भिनवलं जातयं...!
हरतऱ्हेने सामान्य जनतेला अंधारात ठेवलं जातय...
वाचनाची आणि सत्यशोधनाची सवय नसलेल्या सामान्य लोकांच्या जातीय-धार्मिक अस्मिता अधिक टोकदार बनवल्या जाताहेत...

डॉक्टर...सोशल मिडियात तोंडाचा pout बनवून सेल्फी काढून पाच-पन्नास लोकांना tag करुण शंभरभर likes मिळवण्यासाठी भुकेल्या असलेल्या तरुणाईला माहीतच नाहिये की, Who was Tukaram Maharaj...?
Even they didn't know, who was Jotiba and who was Savitri..? And what they did for us...?

विज्ञानाची सृष्टी घेऊन चैनीत मशगूल झालेल्या आणि सुशिक्षित म्हणवणाऱ्या या तरुणाईला विज्ञानाची दृष्टी बहाल करायची तरी कशी...?

डॉक्टर...जागतिकीकरणाच्या कचाट्यात चंगळवादाच्या भोवर्यात एल.इ.डी नंतर फ्रिज आणि फ्रिज नंतर चारचाकी अशी स्वप्नं उराशी बाळगणाऱ्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत बसलेल्या मध्यमवर्गीय सुशिक्षित वर्गाला चळवळीकडे पुन्हा कसं आकृष्ट करायचं...?
हा कळीचा प्रश्न आहे...

होय...मान्यय डॉक्टर...त्यांच्याप्रत चळवळ पोहचवण्याचे मार्ग आता बदलायला हवेत...नवनवीन मार्ग चोखाळायला हवेत...'कर के तो देखो..' असं म्हणत नवे प्रयोग करायला हवेत...की जे तुम्ही केले होते...काही फसतील...काही यशस्वी होतील...यातूनच विवेकाच्या कालसुसंगत नव्या वाटा सापडतील...नै का...?

म्हणून...डॉक्टर परवा तुमच्या खुनाला तीन वर्षे झाली...तेंव्हा आपण आटपाटच्या मदतीने 'विवेक फिल्म महोत्सव' घेतला...आणि मला सांगायला आनंद होतोय की 250हुन अधिक शॉर्ट फिल्म्स स्पर्धेत उतरल्या...!
आमच्या इचलकरंजी शाखेने तर केवळ व्हॉट्सप ग्रुपच्या माध्यमातून डिजिटल प्रोजेक्टर आणण्यासाठी आवाहन करुण 15 दिवसात 38000 रूपये जमवले...
आणि सांगायला आनंद होतोय...आज आम्ही तुमच्या बड्डेचं औचित्य साधून "निळू फुले फिल्म क्लब" चे उद्घाटन करतोय..ज्या माध्यमातून विचारप्रवृत्त करणारे सिनेमे दाखवले जातील...!
डॉक्टर...तुम्ही असतात तर तुमच्या पाठीवरच्या थापेने काम करायला आणखी मजा आली असती...
पण असो...

डॉक्टर...
'अंनिवा'ला मिळणाऱ्या जाहिरातीत तसूभरही फरक पडला नाहिये...
महात्मा गांधीचं एक वाक्य आहे की,"ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार होत नाहीत त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही...प्रतिवर्षी मिळणारा फंड ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या चालकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी असते,आणि प्रत्येक संस्थेने या कसोटिला उतरलेच पाहिजे...!"
डॉक्टर...गांधींचं हे वाक्य किती यथार्थ आहे ना...?
एकाबाजूला मुद्दाम बुद्धिभेद करुण निव्वळ आणि निव्वळ  इरसाल आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करुन आपली संघटना बदनाम कशी करता येईल...यावर टपून बसलेले लोक...आणि दुसऱ्या बाजुला आपल्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेऊन तितक्याच आपुलकीने मदत करणारे लोक ही खरी संघटनेची ताकद आहे...! नै का...?
नाहीतर ही उदाहरणे काय दर्शवतात...?
लोक यांच्या बुद्धीभेदी प्रचाराला बळी पडणार नाहीत,हेच खरं...!

डॉक्टर...अगदी दोन दिवसांपुर्वीच दिवाळी झाली...आणि यावेळी फटाके कमी वाजले,असं अनेकांना जाणवलं...'पर्यावरणपूरक गणेश विसर्जन',द-दारुचा नव्हे तर द-दुधाचा...' यासारखे आपले उपक्रम की जे नंतर समाजाचेच झाले...अगदी विरोध कणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचेही झाले.... त्याचपद्धतीने "फटाके नको पुस्तक हवे..." हा उपक्रमही लोकांच्या मनात तग धरु लागला आहे असं दिसून येतय...ही खुप आंनदाची बाब आहे....

डॉक्टर...तुमच्या खुनानंतर 250 वर असलेल्या आपल्या शाखा 325 भर झाल्या...
निव्वळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतात निषेधाचा सूर उमटला... प्रलंबित जादूटोणाविरोधी कायदा पारित झाला...जातपंचयातिच्या मनमानी कारभाराविरोधातील कायदा होण्याला आता फक्त राष्ट्रपतींची सही बाकी आहे...
रिंगण नाट्याचे 600 हून अधिक प्रयोग महाराष्ट्र आणि इतर अनेक राज्यातही झालत....
माझ्यासारखे कित्येक तरुण रिंगणाच्या माध्यमातून कायमचे चळवळीकडे आकृष्ट झाले...!

डॉक्टर....
वैचारिक विरोधकांच्या बेछूट आरोपांना पुरुन उरुन जनसामान्यात जाऊन आपण अधिक जोमाने काम करतोय...याचा आनंद खुप आहे...

अविनाश भाई,मुक्ता ताई हमीद दादा,कृष्णात कोरे,कृष्णा चांदगुडे इत्यादी सर्व लोक ठिकठिकाणी आम्हा युवकांच्या सोबत उभे राहत आहेत...
आम्ही यंग ब्रिगेड मोठ्या जोमाने काम करतोय... हातात हात घेऊन 'हम होंगे कामयाब'चा निर्धार मोठ्या निर्भयतेने व्यक्त करत आहोत...
तुमचा सहवास लाभलेली युवा पीढी आम्हां सहवास न लाभलेल्या तरुणांना विश्वासाने चांगली स्पेस देऊ पाहतीय...इतर कोणत्याही संघटनेत असे चित्र पहायला मिळणे तसे दुर्मिळच...
असो...हा तुमच्याच संघटनाबांधणीचा परिपाक आहे...हे मला माहितीय...
डॉक्टर...तुमच्यानंतर सामुदायिक नेतृत्व चांगल्यापद्धतीने आकार घेतयं...ही खुप सुखावह बाब आहे...

डॉक्टर आता थांबतो...
तसं कधी आपलं बोलणं झालेलच नाहिये...ना कधी आपला पत्रव्यवहार...!
माझ्या पहिल्याच पत्रात खुप काही बोललोय मी...! काही अधिक बोललो असेल तर तुम्ही समजून घ्यालच यात शंका नाही...!

अरे हो...
पुनःश्च एकदा...
वाढदिनाभिनंदन....

आपलाच युवा विवेकसाथी...
  विनायक होगाडे...

  

No comments:

Post a Comment