Thursday, 1 February 2018

चरखा अजूनही फिरतोच आहे...!

तुझ्या कृश देहकाठीवर आच्छादलेली, पण तीन गोळ्यांनी रक्ताळलेली,
ती फक्त सफेद खादी नव्हती...
तर त्यात होतं संपूर्ण भारताचं महाकाय प्रतिबिंब...
जे उमटलं होतं तुझ्या सत्याच्या असंख्य प्रयोगांती...
तू पांघरलेल्या खादीत होता हरेक प्रकारचा धागा...
असा धागा जो आजही त्या शाश्वत मूल्यांची मजबुती घेऊन उभाय...
इथला इतिहासच सांगतो की,
याआधी हे धागे कधीच पुरेसे एकसंध नव्हते... ना होते एकजीव...

भगवे धागे... हिरवे धागे... निळे धागे... न जाणो कित्येक रंगाचे ते धागे...
पण नव्हते ते कधीच एका रंगाचे...
ना ते रंगले कधीच एका रंगात...
पण का कुणास ठाऊक...
त्यांना मात्र अजूनही उमगलं नाहीय...
की अस रंगबिरंगी असण्यातच या खादीचं अपरिमित सौंदर्य दडलेलं आहे...

हा...
पण ते मात्र अजूनही करताहेत तेच प्रयोग... मात्र असत्याचे...
ते भिडवतात धाग्याला धागे...
अन धाग्यानेच उसवतात धागे...
धागे कोसळतात... उध्वस्त होतात...
धागे घायाळ होतात... रक्तबंबाळ होतात...
पण तरीही अजून शमली नाहीय त्यांची अतिरंजित महत्वाकांक्षा...
वस्त्राला एकाच रंगात रंगावायची...

म्हणूनच...
ते सतत उलट फिरवत राहिले तुझ्या चरख्याचं चक्र...
घालत राहिले मध्येच आडकाठी...
तू गती दिलेल्या चरख्यास...
पण मला कमाल वाटते ती याची की,
तरीही,साऱ्या जगाला अचंबित करावंस अस,
कसं काय विणलंस तू हे अशक्यप्राय वस्त्र...

मग मी धुंडाळत गेलो मागे मागे वस्त्राचा इतिहास...
आणि मग मला चरख्यावर बसलेले दिसले अनेक महात्मे...
जे देत होते गती चरख्याला...
तुझ्याचसारखा संघर्ष करत..
अखंड अन अविरतपणे...

आणि मग हे ही लक्षात आलं...
हे वस्त्र विणणं तितकं सोपं नव्हतंच मुळी...
कारण इथं मुळात सुताच्या कातण्यातच अडचणी होत्या...
अडचण होती धाग्या-धाग्यात असलेल्या धर्माच्या भिंतीची...
धाग्याच्या जातीय मानसिकतेची...
आणि ते मात्र खुशाल घालत होते यास खतपाणी... शतकानुशतके...
आणि विखारानेच नासवत होते प्रक्रिया विणण्याची...

पण तरीही ते विणल गेलं...
विणलं गेलं तुझ्या चरख्याने...
प्रेम आणि करुणेच्या मार्गाने...
कारण ,तू कातत राहिलास संथपणे एक अन एक धागा...
त्या शाश्वत मूल्यांनी...
सत्याच्या सातत्याने..
अहिंसेच्या मार्गाने...
कारण,हिंसेचा एक हिसका धागे तोडतो,
हेही तुला उमगलं होत...

आणि मग तू विणत गेलास धागे...
धागा शेतकऱ्यांच्या न्यायाचा...
धागा अस्पृश्यांच्या हक्काचा...
धागा बाईच्या सन्मानाचा...
धागा शोषितांच्या जगण्याचा...
धागा हिंदू-मुस्लीम ऐक्याचा...

सरतेशेवटी...
हे असंख्य चित्रविचित्र धागे जुळवण्याची
किंमत तुलाही चुकवावीच लागली...
त्यांना चरखा थांबवता आला नाही...
त्यांनी तुलाच थांबवलं... नव्हे संपवल...

त्यांना वाटलं तीन गोळ्यांनी विणकर संपेल...
आणि विणकरासंगे चरखाही...
म्हणून त्यांनी पेढेही वाटले...
पण चरखा मात्र फिरतच राहिला...

मग त्यांनी तू आधारासाठी वापरत असलेली काठी शाखेत फिरवली...
आणि पुनःपुन्हा आडवी घातली तुझ्यात चरख्यात...
लांब राहून दात काढणं तर त्यांचं चालूच होतं...
पण त्याच दाताखाली तुझ्या द्वेषाने त्यांची जीभ मात्र चावली जात होती...
ते तुझी इरसाल बदनामी तर नेहमी करतच राहिले...
पण तू लीलया खरा सिक्का ठरत राहिलास...

हा...
एके ठिकाणी तू खोटा ठरलास...
'प्रथम ते दुर्लक्षतात, मग ते तुमच्यावर हसतात,मग ते तुमच्याशी लढतात आणि मग तुम्ही जिंकता...' असं तू म्हणालास...

हो...त्यांनी तुलाही अन्नूलेखलं...
आणि ते तुझ्या विचारांवर सुरवातीला तर हसतच होते...
पण...
अरे पण ते तुझ्याशी लढलेच कुठे...?
तुझ्या विचारांना ते भिडलेच कुठे...?

आणि मग त्यांनी आजमावला त्यांचा असत्याचा प्रयोग...
त्यांनी नेहमीप्रमाणे काढलं...
त्यांच्या अस्तनीतील राखून ठेवलेल शस्त्र...
आणि घातल्या गोळ्या तुझ्यावर...
तू पांघरलेल्या त्या सफेद खादीवर...
नव्हे त्या बिंबावर... ज्यात भारताचं प्रतिबिंब दिसतं...

पण तरीही चरखा फिरतोच आहे...
फिरतोच आहे... फिरतोच आहे...
आणि आज त्यांनाही उमगलंय बहुदा... तुझ्या त्या डेंजर चरख्याचं विधायक उपद्रवमूल्य...

हा...पण ते बदलले नाहीत...
त्यांनी रणनीती मात्र बदललीय...
आता तू त्यांना प्रातःस्मरणीय झालायस...
आता तर ते चरख्यावरही बसतात...
आलेल्या पाहुण्यांना रेशीमबागेत नाही... तर तुझ्या आश्रमात नेतात...

तुझा खून करून झालाय...
पण तुझं त्यांच्या आडवं येणं थांबलेलं नाहीय...
ते आता तयारी करताहेत...
तुझ्या अपहरणाची...
तू मात्र निर्विकारपणे तसाच हसत रहा...
तुला कशाचीच फिकीर नाही...
कारण मला माहितीय...
चरखा अजूनही फिरतोच आहे...
तुझं सूत कातणं चालुच आहे...!

- विनायक होगाडे 

No comments:

Post a Comment