'सेक्युलॅरिजम' हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे...!
या न त्या कारणाने ह्यावर आजतागायत भरपूर पण अस्ताव्यस्त अशी चर्चा झालेली आहे...!
सेक्युलॅरिजम की ज्याला आपण 'धर्मनिरपेक्षता' असं संबोधतो...याबाबत अनेक अर्थ घेतले जातात...भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे 'सर्वधर्मसमभाव'...किंवा 'निधर्मीपणा' असं काही लोकांना वाटतं...
मूलतः जायचं म्हंटल तर धर्मनिरपेक्षता या शब्दाच्या अर्थाच्या वेगवेगळ्या छटा आहेत...
त्यातील एक कल्पना अशी आहे...
धर्म आणि राज्य यांनी परस्परांच्या कक्षा ठरवून घेणं. म्हणजे धर्माच्या कक्षेत धर्माला पूर्ण स्वातंत्र्य असतं...आणि या स्वातंत्र्याचे रक्षण राजसत्तेने करावयाचे असते.धर्माने आपले स्वातंत्र्य अबाधित राखून उरलेली जी काही कक्षा आहे...ती राजसत्तेची...! धर्मनिर्पेक्षतेची ही कल्पना जनतेला स्वातंत्र्य देत नाही तर जनतेचे स्वातंत्र्य नियंत्रित करण्याचे स्वातंत्र्य धर्माला देते...धर्मनिर्पेक्षतेची ही कल्पना प्रतिगामी कल्पना आहे...!
धर्मनिर्पेक्षतेची दूसरी कल्पना अशी आहे की,
राजसत्तेला धर्माबाबत उदासीन रहायला लावते.सगळ्याच धर्माबाबत समान आदर...समान प्रतिष्ठा...आणि कोणत्याच धर्मकार्यात हस्तक्षेप न करण्याचे धोरण...हे या धर्मनिर्पेक्षतेचे स्वरूप आहे...!
ज्या राज्यात एकाच धर्माची प्रजा तिथे वरील धर्मनिर्पेक्षतेचे स्वरूप आणि ज्या राज्यात भिन्नधर्मीय लोक राहतात तिथे हे दुसऱ्या प्रकारचे स्वरूप...म्हणजे पहिल्याचीच थोडीशी सुधारित(?) आवृत्ती...!
धर्मनिर्पेक्षतेची तीसरी कल्पना या दोहोंहून निराळी असते...
राजसत्ता ही धर्म व्यवस्थेची शत्रूच असते...! धर्म ही मागास संस्था असल्याने तिचा पाडाव करणे,हेच यात अपेक्षित असते. धर्माचा नाश करने,हे या कल्पनेत अंतर्भूत आहे...!
ही कल्पना व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याच्या विरोधी जाणारीही कल्पना आहे...!
आणि आता धर्मनिर्पेक्षतेची चौथी कल्पना...!
ही कल्पना भारतीय संविधानाने स्वीकारलेली कल्पना आहे...
प्रत्येक व्यक्तीला धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे...! त्याचप्रमाणे धर्म बदलण्याचा,धर्म सोडण्याचा,धर्माचे मर्यादित आचरण करण्याचा अशा सर्व प्रकारचे अधिकार व्यक्तीला असतात..! म्हणजे धर्माबाबतित व्यक्तीचे स्वातंत्र्य हा भारतीय धर्मनिर्पेक्षतेचा गाभा आहे...!
भारतीय संविधान संसदेचे कायदे सर्वश्रेष्ठ मानत असल्यामुळे आपोआपच धार्मिक कायदे बाजूला पडतात...! या प्रकारच्या व्यवस्थेत धर्म ही प्रत्येक व्यक्तीची खाजगी बाब बनून जातो...! भारतीय संविधान स्वातंत्र्याचा पुरस्कार करतं, त्यामुळे...व्यक्ती धर्माच्या परिपेक्षात धार्मिक,निधर्मी वगेरे असू शकते पण शासन व्यवस्था निधर्मीच राहते...!
कुठल्याच धर्माचा अनुनय आणि कुठल्याच धर्माचा द्वेष यात अपेक्षित नाही...!
घटना धार्मिक स्वातंत्र्य देते याचा अर्थ ती धर्माला स्वातंत्र्य देत नाहिये...तर धर्माच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य देतीय...हे लक्षात घ्यायला हवं...! धर्माला स्वातंत्र्य दिलं तर धर्म सांगू शकतो की,जे बीनमिशीचे दाडीवाले बनतील तेच फक्त मुस्लिम आणि जे शेंडी ठेवतील ते तेवढे हिंदू...!
ज्या बुरखा घालतील त्या फक्त मुस्लिम महिला आणि ज्या महिला शाळा शिकतील त्या हिंदू नाहीत...!
म्हणजे...धर्म काय आहे..हे स्पष्ट करण्याचे...सांगण्याचे अधिकार धर्माला नाहीत...धर्म काय आहे...हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय व्यक्तीला आहे...त्याला स्वातंत्र्य आहे...धर्म पाळण्याचा...त्यातील कोणत्या बाबी पाळाव्यात हे ठरवण्याचा,वा धर्म बदलण्याचा अथवा धर्म टाकून देऊन निधर्मी राहण्याचा...!
सर्व नागरिकांना समान कायदे,समान न्याय,समान स्वातंत्र्य हे या धर्मनिर्पेक्षततेचा मुख्य आधार आहे...!
न्याय आणि समता यांच्या विरोधात जाणारे धर्माचे सर्वच क्षेत्र संविधानाला नामंजूर आहे...!
धर्माबाबत व्यक्तीला असलेले हे स्वातंत्र्य काही कारणांनी बाधित करण्याचे सार्वभौमत्वही संविधानला आहे...म्हणजे असं की ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य,सार्वजनिक न्याय...सुव्यवस्था इत्यादि बाबी धोक्यात आहे...असं जर वाटत असेल तर धर्माबाबतीतील ही सारी स्वातंत्र्ये काही काळ स्थगितही करता येऊ शकतात...!
म्हणजे सार्वजनिक जीवनात कोणताही धर्म संविधानाहून मोठा नाही...! धर्म सांगेल तो धर्म नसून नागरिक ठरवतील तो धर्म आणि नागरिकांच्या या हक्काचे रक्षण करण्याचे काम संविधान करतं...!
म्हणजे व्यक्तीला स्वातंत्र्य बहाल करुण धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची पुरेपूर संधी भारतीय संविधान देतं...!
भारतीय राज्यघटना या अशा स्वरूपाच्या धर्मनिर्पेक्षतेचा पुरस्कार करतं...!
"खरा धार्मिक माणूस हा धर्मनिर्पेक्षच असतो...!" असं मला वाटतं...हे विधान फार जाणीवपूर्वक करतोय मी...!
कारण...खऱ्या धार्मिक माणसाला जशी आपली श्रद्धा प्रिय असते...त्याचपद्धतिने त्याला इतरांच्या धार्मिक श्रद्धेचेही अडचण नसते...!
प्रश्न आहे तो धर्मांध व्यक्तीचा...!
धार्मिक माणूस आणि धर्मान्ध माणूस यात फरक आहे...!
धर्मांध माणूस 'परधर्मद्वेष' हीच स्वधर्मप्रेमाची व्याख्या समजतो...! धार्मिक माणसाला परधर्म आणि परधर्मियाबद्दल आदर असतो...!
धर्मांध माणसाला न्याय,समता याची चाड नसते...खरा धार्मिक माणूस न्याय,समता याच्या आड येणाऱ्या धार्मिक समजुतीना तिलांजली देतो...
खऱ्या धार्मिक मनुष्याची भाषा प्रेमाची असते...धर्मांधाची भाषा नेहमीच द्वेषावर आधारलेली असते...!
खऱ्या धार्मिक मनुष्याला नीतीमत्तेचे आचरण हाच धर्म वाटतो...धर्मांधाला नितिमत्तेची अजिबात चाड नसते...
खरा धार्मिक मनुष्य सहिष्णु असतो...धर्मांध मनुष्य अर्थातच कट्टर आणि असहिष्णु असतो...!
संविधानातील अंतर्भूत असणारी धर्मनिरपेक्षता धर्मस्वातंत्र्य बहाल करते...खऱ्या धार्मिक माणसाला आपल्या श्रद्धेशी आणि तिच्या आचरणाशी मतलब असतो...
प्रश्न उपस्थित होतो तो धर्मांध व्यक्तीचा...!
धर्मनिर्पेक्षतेच्या या कल्पनेला मोडीत काढून उठसूठ हिंदूराष्ट्राच्या वल्गना करणारे धर्मांध हे भारतीय संविधानाच्याच आणि पर्यायाने मानवी मूल्यव्यवस्थेच्याच मुळावर उठलेले दिसून येतील...कारण लोकशाही,अभिवयक्ती स्वातंत्र्य आणि समान नागरिकत्व यांचा पुरस्कार करणारी धर्मनिर्पेक्षताच संविधानाचा मुख्य आधार आहे...!
आणि या वल्गना करणार्यां धर्मांधाना हे वल्गना करणे जितके सोपे वाटते...तितकी ती वल्गना प्रत्यक्षात उतरवने तसुभरही सोपे नाही...! पण ज्यावेळी तुम्ही फॅसिस्ट प्रवृत्ती वाढत आहे...असा निर्वाळा देता तेंव्हा दुसऱ्या भाषेत इथली लोकशाही व्यवस्था नीट राबवली गेली नसल्याचीच कबूली एकप्रकारे देत असता...!
त्यामुळे संविधान शिरोधार्य माणनार्या जनतेला मात्र 'जागते रहो'चा पुकारा करणे आवश्यक आहे...
संविधान हे अस्र टिकवणे आणि त्याची पुरेपूर अंमलबजावणी करणे,हाच भारतातील प्रत्येक माणसाला 'माणूस' म्हणून माणुसकीकडे नेणारा आधार आहे...!
सध्या तरी,इथल्या सामान्य माणसाला संविधानाचे महात्म्य पटवून देणं आणि त्याचा जागर सतत करत राहणे...हीच काळाची गरज बनली आहे...!
- विनायक होगाडे
Great information in precise language. Keep it up
ReplyDelete