Sunday 5 March 2017

असत्याचे प्रयोग...



प्रसंग पहिला : नथुराम खुर्चीत बसलेला...हातात अग्रणी...चेहऱ्यावर शांत भाव...तिकडून नारायण आपटेची एंट्री...
_______________

नारायण :
नथुराम...नथुराम...अरे हंत... हंत झाला रे...अरे याचसाठी केला होता का अट्टहास...?
याचसाठी केला होता का वध...त्या पाकपित्याचा...!

नथुराम:
(शांतपणे) काय झालं नारायण...? इतका गर्भगळीत का झाला आहेस...?

नारायण :
पंडीत...अरे तात्यारावांचे जाज्ज्वल्य हिंदुराष्ट्राचे स्वप्न उराशी घेऊन...त्या धगधगत्या धर्मयज्ञात स्वतःस झोकून देऊन...कुंडातील राख भाळी लाऊन...पाकपित्याचा वध केला...तो का याचसाठी...?

नथुराम :
(चेहऱ्यावर मृदु हास्य) नारायण...मला उमजतय...तू कुणाबद्दल आणि कशाबद्दल बोलतोयस ते...!

नारायण :
नथुराम...हे सगळं माहीत असूनही तू असा शांत कसा काय...? आता कुठे आपल्या स्वप्नातील अखंड हिंदुराष्ट्र आपल्या हातात येईल असं वाटत असतानाच आपल्याच सेनापतीने असा केसाने गळा कापावा...?
याहुन घोर दुर्दैव ते कोणते...?
अरे...हे दिवस पहावत नाहीत रे पंडीत....

नथुराम :
नारायण शांत हो...हे घे पाणी पी...

नारायण :
नथुराम...अरे अखंड हिंदुराष्ट्रापासून अलिप्त करुण यवनांच्या स्वाधीन केलेली माझी सिंधू नदी...तिच्या उदरातील पवित्र जलाच्या पावन स्पर्शानेच माझा हा गळा थंड पडेल...!
अरे नथुराम...तुला समजत कस नाहीये...काय अघटित घडतय हे...? अरे त्या गांधीच्या नावाने स्वच्छता अभियान...?
आणि जाज्वल्य हिंदूराष्ट्राच्या स्थापनेप्रीत्यर्थ रणनीती म्हणून ज्या चरख्याचा आपण आयुष्यभर द्वेष केला तोच चरखा हाती घेऊन सूत कातताना आपला सेनापती पाहुन तळपायाची आग मस्तकाला जातेय...!

नथुराम :
होय...पाहतोय मी...
गांधींचा वध केल्यावर आपल्याला ईप्सित असलेल्या हिन्दुराष्ट्राला पटकन गवसणी घालता येणे,शक्य नाही...
अरे...इंग्रजांच्याविरुद्ध लढुन शक्तीअपव्यय करण्याऐवजी आपलेच स्वकीय की जे हिंदुराष्ट्राच्या आड येऊ पाहत होते त्यांना संपवण्यात आपण आपली हयात घालवली...आणि गांधीवध ही हिंदूराष्ट्राची नांदी ठरावी ही आपली मनीषा सत्यसृष्टित उतरवण्यासाठी आपली मातृसंस्था आपल्या फाशीनंतरही कार्यरत राहिली...हिंदुत्वाच्या प्रखर संस्काराच्या मुशीतून जसे आपण घडलो...तसेच आपला सेनापतीही घडला आहे...हे विसरू नको...! त्याच्यावर विश्वास....

नारायण:
(नथुरामचे वाक्य मध्येच तोडत)
उतुंग हिमालयाएवढे...सिंधू नदीच्या शतप्रतिशत पावित्र्याइतके जाज्वल्य हिंदुराष्ट्राचे स्वप्न परदेशात जाऊन "ये बुद्ध और गांधी का देश है..!" असं म्हणून का पूर्णत्वास जाईल...? अरे नथुराम हा तर घात आहे...आपल्याच पट्टशिष्याने केलेला...! अरे सत्ता हाती येताच का हिंदुत्व विसरोनी गांधीचे गुण गावे...?

नथुराम :
(दीर्घ हास्य)
नारायणा...अरे हीच ती कूटनीती आहे...

गांधीवधाचे प्रयत्न आपण  चार वेळा केले...पण अखेरच्या प्रयत्नात आई गंगेने आपल्या पदरी यश घातलं...55 कोटी पाकिस्तानला दिले म्हणून आम्ही वध केला हे कारणही प्रस्थापित करण्यास आपण आणि आपले सेनानी यशस्वी जाहलोे...
गांधीवधानंतर कुजबुज करुण आपल्या सैनिकांनी का कमी प्रयत्न केले...गांधी बदनामीचे...?
पण तरीही या राष्ट्रात गांधी नाव राहिलेच ना...?
अरे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे माझ्यावरील नाटक किती सत्यपलाप करतं..हे तुला आणि मला चांगलच ज्ञात आहे...पण तरीही ते इतिहासाचं विकृतीकरण करण्यात सफल झालेच ना...? अरे हीच कूटनीती आहे...!

नारायण:
अरे हे सर्व मला माहितीय...मला पटतय ही...
पण 70 वर्षांच्या कॉंग्रेसच्या राजवटीनंतर आता आपले स्वकीयांचे राज्य आले...आणि पुनःश्च मनी उत्कटता दाटली आणि वाटलं की आता तो हिंदुत्वाचा प्रखर सूर्य या हिंदुराष्ट्राच्या मातीत आग ओकण्यास सिद्ध होईल...पण हे तर आक्रित घडतय... यवनांच्या पंतप्रधानाच्या वाढदिवशी पाकभूमीत जाऊन शुभेच्छा देणे...ही कसली कूटनीती..?

नथुराम :
पाकभुमी नव्हे...तो अखंड हिंदुस्थानाचा भाग आहे...तिथले लोक आपले नसले तरी तिथली माती आपली आहे...हे विसरू नकोस...अरे...तुलाही माहितीय की,मी माझ्या मृत्यूपत्रात लिहलय की...माझ्या अस्थी पिढ्यान पिढ्या हस्तांतरित कराव्या पण सिंधू अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत त्या विसर्जित करु नयेत...!"

नारायण :
मग काय गांधीना प्रातःस्मरणीय माणून अखंड हिंदुराष्ट्र उदयास येणार अस वाटतंय का पंडीत तुला...? अरे जर आपल्याच माणसांना गांधी आपलासा करायचा होता तर हा वधाचा खटाटोप आपण केलाच कशासाठी...?
अरे ही कूटनीती आहे असं म्हणत भुतकाळात आपल्याच मुळावर उठलेल्या लोकांचा जयजयकार करायचा...? अरे पटेलांनी आपल्या मातृसंस्थेवर बंदी आणली...त्यांचाच भव्य पुतळा...? आणि त्याहुनही कहर म्हणजे आता गांधींचा उद्घोष...?
पंडीत...अशाने का अवतरेल हिंदुराष्ट्र...?

नथुराम :
(गंभीर होऊन...करारी भाषेत...)

नारायण...हाही त्याच दीर्घ कटाचा भाग आहे ज्या कटाची आपण नांदी केलीय...!
गांधी गोळ्या घालूनही संपत नाही...इतपत या मातीचे अवमूल्यन झालय...हेच आपलं दुर्दैव आहे...!
आपण लाख प्रयत्न केले गांधी संपवण्याचे पण...अजुनही गांधी आपल्या हिंदूवासीयांच्या मनात वसला आहे...इतकंच काय तो जगभर विखुरला हे सत्य आहे...
आपण दीर्घकाळ या मूढ समजूतीत राहिलो की देह संपवला तर गांधी संपेल...!

पण हां...! एक लक्षात ठेव नारायण...!
गांधी अजुनही संपले नाहीत म्हणून नथुराम संपला असं समजू नको नारायण...!
तू,मी आपण सगळे राष्ट्रभक्त अजुनही जिवंत आहोतच...

नारायण :
काय बोलतोयस...! नथुराम अरे आपल्याला तर कधीच फाशी दिली गेलीय...

नथुराम :
नाही नारायण,अरे जोवर जाज्वल्य हिंदूत्व जीवंत आहे तोवर नथुराम इथल्या मातीत पुनः पुन्हा जन्म घेईल...
अरे आठवून बघ गेल्या 4 वर्षातल्या घडामोडी...अरे दाभोलकर...पानसरे...कलबुर्गी या नव्या गांधीना आपण  संपवलच आहे...पाठीमागून का होईना पण हिंदूराष्ट्राच्या आड येणाऱ्या हरेक म्हातार्याचा असाच वध केला जाईल...हे लक्षात ठेव...!

नारायण :
नथुराम...अरे पण काय फायदा याचा...? भुतकाळात गांधींना आपण संपवल...त्यानंतर आपल्या शिष्यानी त्यांना धर्मद्रोही...राष्ट्रद्रोही ठरवून...दीर्घकाळ त्यांची बदनामी केलिच ना...? आणि आता तर आपले पट्टशिष्य त्यांना आपलसं करतायत..? मग पुढे या तिघांनाही आपलसं कराव लागलं तर...? अरे ही कसली कूटनीती...?

नथुराम :
नारायण...पर्याय नाहिये...
स्पष्टच सांगतो...
हे लक्षात ठेव की आपले सेनानी फक्त यांच्या प्रतिमांच पूजन करताहेत...इतिहासाचं हिंदुत्वाला पोषक असणारे विकृतिकरण करण्यासाठी ही रणनीती आवश्यक आहे...
लक्षात घे...चरखा हातात घेतला म्हणून आपले सेनानी आपल्याला विसरणार नाहीत...
एकीकडे लोकांच्या हातात झाडू देऊन याच गांधीच्या नावाने स्वच्छता अभियान राबवलं जाईल...आणि दुसरीकडे याच गांधीच्या विचाराचं दफन करत इथले मेंदू साफ केले जातील...
आणि या मेंदूत ओतली जाईल...ती फक्त उतुंग हिमालयासम जाज्ज्वल्य हिंदुराष्ट्राची आग...

नारायण :
(छद्मि हास्य चेहऱ्यावर आणून थोडं थोडं समजतय अशा भावात)
मला समजतय नथुराम...आता कुठे ही कूटनीती डोक्यात येतीय...
खरय...तुझ्या अस्थींची अस्त्रं होतील...असं म्हणून तात्यारावांनी तुला आधुनिक भारताचा दधिची ऋषी म्हटलं होतं...
पण तू त्या पुढचा आहेस नथुराम...
हिंदुराष्ट्राच्या आड येऊन संविधानाचा डोलारा उद्ध्वस्त करणारा तूच खरा आधुनिक हिंदूराष्ट्राचा स्मृतिकार "मनू" आहेस...!

नथुराम :
अरे तात्यारावांनी असं काही नव्हतं रे म्हंटल...पण माझ्यावरच्या नाटकात हे कुठून आलं माझं मलाच ठाऊक नाही...!

(दीर्घ हास्य....थोडा वेळ शांत...चेहऱ्यावर ठाम निश्चयाचे भाव...आणि नारायण कडे करारीपणाने पाहत)

"संविधानाचा डोलारा उखडण्यासाठी आणि हिंदुराष्ट्रासाठीच्या प्रस्थापनेसाठी...
अल्पकाळ का होईना...
"गांधींच अपहरण करावचं लागेल...!"

(एकमेकाकडे पाहत काही सेकंड उभे राहतात...पडदा पडतो...)

....पहिला अंक समाप्त...
नाटकाचे नाव : असत्याचे प्रयोग...!
___________________

(सदरचे नाट्य पूर्णतः काल्पनिक असले तरी त्यातील ऐतिहासिक संदर्भ सत्याला धरून आहेत...)

संदर्भ :
1) नथुरामायण : य दी. फडके
2) लेट्स कील गांधी : तुषार गांधी
3) महात्म्याची अखेर : जगण फडणीस

No comments:

Post a Comment