Sunday 5 March 2017

मी आणि मुसलमान...!



मला आठवतयं....सहावी-सातवीत असताना माझ्यात पराकोटीचा मुस्लीमद्वेष उफाळून आला होता...का..?ते माहीत नाही...!
ना मी कुठल्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचा सदस्य होतो...ना आंधळा फॅन होतो...! तरीही...आपसूकच असं धर्मप्रेम (परधर्मद्वेष) जागृत झालं होतं...मी 7 वीत असताना तर "मिरज-इचलकरंजी" दंगलच झाली होती....सात दिवस कर्फ्यू मस्त एन्जॉय केला होता...खाणे-पिणे-टीवी पाहणे....शाळेला सुट्टी...! त्यानंतर कुणी मला बिनमिशीचा दाढीवाला आदमी दिसला की आपसूकच मनात "ती" शिवी येऊन जायची...
वातावरणच अस बनलं होतं...
'परधर्मद्वेष हीच माझ्या स्वधर्मप्रेमाची व्याख्या बनली होती..! ना मला कुणी कुठल्या तरी दंगलीचे वेचक वीडियो दाखवले होते...ना कुणाचे "माणूस तोडणारे" पुस्तक मी वाचले होते..! तरीही...कुणी एक मारलं तर चार वेळा भिरकटुन पडेल असा मी...त्यावेळी मात्र स्वत:ला 'असा' धर्माभिमानी समजत होतो..!
नंतर नंतर 'राष्ट्र सेवा दलात' जाणं वाढलं...
आणि 'माणुसकिचा शोध' लागला..!

अजुनही मला हे वास्तव आजूबाजूला दिसतं...
हे असं का घडलं...? याचा खोलात जाऊन विचार करण्याची गरज नक्कीच आहे असं मला वाटतं...!
मी लहान होतो...मी कुठल्याही विध्वंसक कृतीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कसाही सामील नव्हतो...आणि तरीही माझ्या बालमनावर फक्त वातावरणाचा परिणाम झाला होता...!

तरुण सुशिक्षित हिंदू मन द्वेषाच्या जाळ्यात अडकलं जातय...हे वास्तव खरच खूप भयानक आहे...!
सुमारे 100-150 वर्षांपूर्वी आजच्या मानाने हिंदू मन आधुनिक नव्हतं...ते मागास,धर्मश्रद्ध आणि रुढी,परंपराप्रिय होतं...पण आजच्या मानाने ही द्वेषपूर्ण जातीयवादी मानसिकता अतिशय कमी आणि दुबळी होती...मात्र आजचा सुशिक्षित,आधुनिक विज्ञानाने सुसज्ज असलेला तरुण हिंदू वर्ग मात्र मोठ्या झपाट्याने या जातीयवादी मानसिकतेकडे वळत आहे किंबहुना वळला आहे...! या जातीयवादी संघटनात असणारा तरुण मनाने धार्मिक वा आधीसारखा रूढी-परंपरा प्रिय असा नाहिये...पण मात्र त्याची कट्टरता अधिक विकोपास गेलीय...!
हिंदूंनी एकत्र यावं आणि हिंदूतेरांचा प्रतिकार करावा...त्यांना राजकीय हक्क असू नयेत,अशी जाणीव त्याच्यात आता बलवान झालेली दिसते...!

भारत-पाकिस्तान फाळणीनंतर जर सगळेच मुस्लिम या देशातून निघुन गेले असते...तर हे आधुनिक म्हणवणारे हिंदू मन तितकेसे कट्टर जातीयवादी बनवता आले असते असं मला वाटत नाही...
हिंदू समाजात असणारी धार्मिकता आणि परंपराप्रियता ही गोष्ट वेगळी आणि द्वेषीय जातीयवादाची वाढ ही बाब वेगळी...!

सध्याचा हिंदू तरुण प्रत्येक मुस्लिम व्यक्तीकडे साशंक नजरेने पाहतो...! ही परिस्थिती फक्त भारतात आणि हिंदू तरुणांचीच आहे...अशातला भाग नाही...इस्लामी मुलतत्ववादाच्या उच्छादामुळे ही परिस्थिती जगभरातच पहायला मिळतेय...हे ही वास्तव नाकारुन चालणार नाही...!

'दहशतवादाला धर्म नसतो..!'
हे विधान मी खुपदा ऐकलय...माझ्या दृष्टीने या विधानाचा अर्थ शब्दशः घेण्याचा नसून 'Reading Between the lines' अशापद्धतीने घेण्याचा आहे...!
एक म्हणजे या विधानातून असं सुचवायचं असतं की...
'दहशतवादी कारवाया म्हणजे धर्म नव्हे...!' तो अधर्म आहे...! धर्माच्या नावावर माजवलेला अधर्म..!

हेच वाक्य दुसऱ्या अर्थानेही घेता येतं...!
तो असा की,'दहशतवादाला कोणताही एक धर्म नसतो...!'
यातील 'कोणताही एक' हा शब्द अव्यक्त पण तितकाच महत्वाचा आहे..! दहशतवादी फक्त इस्लाम धर्मीयच असतात असं नसून ते सगळ्याच धर्मात पहायला मिळतात...!

मला उमजलेल्या या दोन्ही अर्थांमधील दुसरा अर्थ मला पूर्णसत्य वाटतो तर पहिला अर्थ अर्धसत्य वाटतो...!

धर्म दहशतवादाला कारणीभूत ठरतो...हे सत्य आहे...!
सर्व धर्मांची मूळ शिकवण प्रेम,करुणा,त्याग आहे,असं मला तरी सांगितलं गेलेलं आहे...! प्रत्यक्षात मात्र आपलाच धर्म श्रेष्ठ,उदात्त,प्रगल्भ आणि प्राचीन आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच प्रेम व करुणेच्या मूल्यांना झुगारुन फक्त तात्कालिक नव्हे तर जगाच्या विध्वंसालाही एखादा तरुण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अपार हिंसेसाठी स्वतःला सिद्ध करतो...हे दिसून येतं...!

इथं आपण चर्चा फक्त भारतीय मुस्लिमाच्या अंगाने करतोय...!
परवाच IAS झालेला मुस्लिम तरूण अन्सार शेख जर IAS झालाच नसता तर तो शंकेने पाहिला जाणाऱ्या अनेक मुस्लिमांच्यातील एक असाच राहिला असता...
अब्दुल कलाम जर 'अब्दुल कलाम' झालेच नसते तर ते 'राष्ट्रीय मुसलमान' झालेच नसते...!

'राष्ट्रीय मुसलमान' ही एक भयानक संकल्पना आहे...! जे राष्ट्रीय मुसलमान ठरतील ते तेवढे देशभक्त...बाकी सगळे जन्मतःच साशंक नजरेचे लक्ष्य...!

एक गोष्ट सोईस्करपणे विसरली जातीय की,"जी जमात सतत सामुदायिक शंकेचे व द्वेषाचे लक्ष्य बनते...ती जमात जास्तीत जास्त आक्रमक बनत जाणार हे उघड आहे...!
भारतीय मुस्लिम समाज काही विशेष गुन्हेगार आहे, अशी भावना जोपर्यन्त इतर लोक बाळगतील तोपर्यन्त तो समाज त्यांच्या परिसरात समरस होणे कठीणच...!

समरस शब्दावरुन आठवलं...की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची याबाबतीतील भूमिका आपण विचाराल तर आपल्याला ते सांगतील की या भारतातील सगळे लोक हिंदूच...! अगदी मुस्लिम,ख्रिश्चन आदि हिंदूतेर लोकही हिंदूच...सारे आपलेच...! पण तुम्ही द्वितीय संघचालक गोळवलकरांच विचारधन (?) वाचाल तर त्यात त्यांनी भारतात राहणाऱ्या मुस्लिम,खरिश्नांना अंतर्गत धोके म्हणून गणलं आहे...यावर स्वतंत्र प्रकरणे लिहली आहेत...!
सांगायचा उद्देश इतकाच की या कथित हिंदुत्ववादी संघटनांचे खायचे दांत वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत...!

भारतात असलेले मुसलमान आक्रमक आहेत,त्यांनी इथ राज्य केलं...आणि हिंदूंच्या आजच्या दुर्दशेला फक्त आणि फक्त तेच कारणीभूत आहेत...ही मानसिकता हिंदू तरुणावर सततच्या प्रचारामुळे ही बिंबवली गेलीय...!

सध्य घडीला या परिस्थितीवर उपाय काय...? हे मात्र कथित हिंदुत्ववादी लोक स्पष्टपणाने सांगत नाहीत...!
कोट्यवधी मुस्लिम लोकसंख्या मारणे किंवा निर्वासित करणे गोष्ट वाटते तितकी सोपी नाही....! या विध्वंसक कामासाठी हिंदूंनाही एकत्र यावं लागेल...आणि हे काम मुस्लिम समाजाला सुधारण्यापेक्षा अवघड आहे,हे आपण लक्षात घेतलं पाहिजे...!
याबाबत नरहर कुरुंदकर सांगतात की...
'85 % हिंदूंनी मनाने आधुनिक होण्याची प्रक्रिया घडत असताना 15 % आपोआपच आधुनिक होत असतात...! खून आणि विध्वंस या बाबी मूल्यांचा नाश करणाऱ्या असतात...मानवी संस्कृतीने हजारो वर्षे झटून सिद्ध केलेली मूल्ये काही दिवसात मातीमोल होतील...! हा पिसाट सूड घेण्यासाठी भारतातील सारे आधुनिकीकरण,सारी लोकशाही किंबहुना कदाचित भारतीय राष्ट्र यांचा बळी द्यावा लागेल...! म्हणून केवळ मुस्लमानांच्या संरक्षणासाठी नव्हे तर सव्वाशे वर्षांची हिंदुंच्या सर्व पुरोगामी प्रबोधनाचे संरक्षण करण्यासाठी कठोरपणे सेक्युलँरिजमची बाजू घेऊन उभं राहणं आता अपरिहार्य आहे...!'

हिंदू समाजाला सलग दीड-दोनशे वर्षांची विधायक धर्मचिकित्सेची आणि धर्मसुधारणेची परंपरा लाभली आहे...त्यामधे लोकहितवादी होते...महात्मा फुले होते...सावित्रीबाई फुले होत्या...न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते...गोपाळ गणेश आगरकर' होते...'विठ्ठल रामजी शिंदे होते...राजर्षी शाहू महाराज होते...तुकडोजी महाराज होते...गाडगेबाबा होते...डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते... प्रबोधनकार ठाकरे होते...ह्या आणि अशा अनेक लोकांची परंपरा हिंदूतेर समाजाला लाभलेली नाही...!
माझ्या माहितीत मुस्लिम धर्माच्या सुधारनेसाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न फक्त भारतातच झालेले आहेत...
हमीद दलवाईंच्या रूपाने ही चळवळ उभी राहिली...आणि अर्थातच तिलाही कडवा विरोध सहन करावा लागला आणि लागतोय...!
मुस्लिम समाजाच्या आधुनिकीकरणासाठी मुस्लिम तरुणांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे...! भारतीय मुसलमानाला सहानुभुतीची नव्हे तर सहकार्याची गरज आहे...!

खरं तर हा विषय जितका महत्वाचा आहे तितकाच व्यापक आहे...! पण अशा या परिस्थितीत एक सुज्ञ भारतीय नागरिक म्हणून मी काय भूमिका घेऊ शकतो हा विचार प्रत्येक नागरिकाने करणं आता गरजेचं आहे...!

- विनायक होगाडे

पूर्वप्रसिद्धी : राष्ट्र सेवा दल पत्रिका : फेब्रुवारी 2017

No comments:

Post a Comment