Wednesday 8 March 2017

माझ्या आईस माझं पत्र...

प्रिय आई...

खरंय की...'प्रिय' असा शब्द तुझ्याबद्दल पहिल्यांदा वापरलाय...इतकंच काय मी तुझ्याबद्दल...तुझ्याशी असं मनमोकळेपणानेदेखील मी पहिल्यांदाच व्यक्त होतोय...!

आई...
अगदी सातवीत असताना तुझं लग्न झालं...ज्या वयात लग्न म्हणजे काय हे देखील पूर्ण उमगलेलं नसतं...त्या वयातच तुझ्या हातात चुडा भरला...!
काय करणार...तुझा बाप दारुडा...आणि तुझी आई म्हणजेच तुझ्या अठरा विश्वे दारिद्रय माहेराचा करता-सवरता पुरुष...!
आई...मी ताईकडून ऐकलय की तू 'मोठी झालीस' ते देखील सासरी आल्यावर...! आणि ज्या वयात खेळायचं...त्या वयातच तुझ्या पोटी मुलं...! आजच्या मूलींप्रमाणे तुला धड बालपणही रमवता आलं नाही आणि तारुण्याची मजाही घेता आली नाही ना?
मी तुझा पाचवा ल्योक...!
माझ्याआधी चार बहिणी...! बापरे...! आणि माझ्यासाठीच म्हणून एकामागोमाग एक झालेल्या आपल्या तायड्यांचा हा प्रपंच...! माहेरापेक्षा काकनभर सरस असलं तरी सासरही मेलं फुटकच...! पण माहेरच्या प्रेमाची सर सासुरवासात ती कुठून येणार...? मी झाल्यावर अण्णांनी दारात खुप फटाके लावले होते...असं आजही आपल्या घरासमोरच्या गोडाऊनमधला तो म्हातारा वॉचमन सांगतो...! काय आनंद झालता नाही अण्णा आणि इतर सर्वांनाच...!
मुलगाच हवा...! वंशाचा दिवा...आणि त्या दिव्यासाठी पणत्यांची ही माळ...!
तो काळच तसा होता...काळानं अलिकडं कूस बदलली असली तरीही आजही याच पुरुषी मानसिकतेतून कमी-अधिक छुप्या माध्यमातून स्त्री-भ्रूण हत्त्या मात्र होतच आहेत गं...!
दोष तुझा नव्हताचं गं...ना माझ्या तायांचा...दोष त्या परिस्थितीचाच होता जीणं तुझं संपुर्ण जीनंच बदललं...! पण आई आता मी लढतोय या पुरुषसत्ताकतेविरुद्ध...तुझ्या वाटणीला आलेले भोग इतर कुणा बाईच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून...!

आई... मी अगदीच तीन वर्षाचा असताना अण्णा गेले ना...? त्यावेळी बालवाडीत असलेला मी आणि मला कुणीतरी शाळेतून आणलं होतं म्हणतात...! कळत्या-उमलत्या चार लहान पोरी आणि हां असा मी वंशाचा टवटवीत दिवा...!
कसा सहन केलास ग हां आघात...? अगदीच ऐन तारुण्यात असताना हे असं पाच पाखरांना घरट्यात सोडून जोडीदाराचं तुला एकटीला सोडून जाणं काय आणि किती बिकट असेल...याची कल्पना आहे मला...! त्याहीपेक्षा बिकट आणि कठीण तर पुढचा प्रवास होता आई...कसा सोसलास ग हा संकटांचा भार...एकांडा शिलेदार होऊन परिस्थितिशी झुंजताना कशी नाही घाबरलीस तू...?

नवरा मेल्यानंतर...कपाळीचं वैधव्य ताजं असताना तू संसाराचा गाडा हाकायला घराबाहेर पडलीस...! माझ्यानंतर काय करशील,असं म्हणून...अण्णांनीच तुला सायकल शिकवली होती...!
आपण लवकर जाणार आहोत
याची बहुदा त्यांना आधी चुणूक लागली असावी...असा
तुझा आजही कयास आहे...! त्याशिवाय का त्यांनी जमेल तसं आपल्यापरीने अनेक गोष्टींची न सांगता तजवीज केली असेल...!

राबणारे तुझे दोन हात...आणि तुझ्या त्या दोन हातांच्या ओंजळीत सामावलेली आम्ही पाच रत्नं...!
अरे हां...आठवलं...! आई...तुला आठवतय...तू जेंव्हा नवीन लेडीज सायकल घेतलीस...तेंव्हा सायकलवर नावसुद्धा "पंचरत्न" होगाडे... असं घातलं होतंस...कसं सुचलं गं तुला हे...?
आई इतकी कशी गं तू जाणीवसंपन्न...?

पण आई मी तुझं अक्राळ-विक्राळ रूपही याच कोवळ्या डोळ्यांनी पाहिलय...! आण्णा गेल्यानंतर अगदी काही वर्षानंतरच तुझ्या दिरानं घराच्या वाटणीपायी दिलेला त्रास...! आणि तुझ्या नवर्यांनचं महतकष्टानं उभा केलेला यंत्रमाग धंद्याचा डोलारा दोन भागात विखुरताना...! अगदी तेही कुठ झालं ग सहजासहजी...?
किती किती त्रास दिला आपल्याला...नकोच त्या आठवणी...! अगदी कुणाचीच सोबत नसताना पण पाच पाखरांना पदरात घेऊन तरीही तू खंबीरपणे उभी राहिलीस...!

त्यानंतर दिवस थोडे सुसह्य झाले खरे...पण उमलत्या कोवळ्या चार पोरींना घेऊन परिस्थितिशी झुंजताना तू त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही अगदी लीलया पेललीस गं....!

आई...मला आजही आठवतय...जून महीना आला की आपल्या घरात फारच बिकट अवस्था असायची...शाळा नवीन सुरु झालेली आणि पाच पोरांच्या शिक्षणाच्या नाना तऱ्हा..!
कुणाला यूनिफॉर्म...तर कुणाला पुस्तकं...कुणाची फी...तर कुणाचं डोनेशन...!
सगळं कसं अवघडून जायचं...मग हा गुंता तू हळूहळू सोडवायचीस आणि मग कुठ जुलै ओसरत आला की हायसं वाटायच...!
परिस्थितीच अशी बेताची उभी असताना तू कुणाच्याच शिक्षणावर पाय आणला नाहीस...!
नवरा नसताना 'चार मूली कशातरी खपवून टाकाव्या तिकडं'...अशी भावना कधीच नव्हती ग तुझी...! अगदी चारी मूली मनसोक्त हवं तेवढ शिकल्या...! त्यांची लग्नं ही तू अगदी हिकमतीनं चांगल्या नव्हे तर उत्तम घरात "मुलगी आणि नारळ" या तत्वावर लाऊन दिलिस...!
त्यानंतर मात्र एकापाठोपाठ एक मुलींची लग्नं,बाळंतपणं,बारसं,जावळं,मान-पान यांची मालिका काही थांबता थांबत नव्हतीच...! मी मात्र अगदी शेंबड्या वयात मामा झालो...आणि मग माझ्या व्हटाखाली मिसुरडं फुटुसपर्यंत या भाचावळीची रांक काही थांबली नाहीच...!
आजही में महिन्यात चारी बहिनी आणि ही भाचागँग आली की या गोतावळ्यात घर कसं अगदी गोकुळ होऊन जातं नै...!
पण,या सगळ्यातून तुझी होणारी ओढतान मात्र कधीच स्पष्टपणे तू जाणवून दिली नाहीस गं...इतकं बळ तू आणलसं तरी कुठून...?

आई तूला पालक मिटिंगला माझ्या शाळेत कधीच येता आलं नाही...आपलं हुश्शार पोरं काही वावगं वागणार नाही आणि एक दिवसाच्या कामाचं खाडं करुनही चालणार नाही...ह्याची तुला जाणीव होती...आणि ती मलाही होती म्हणून मी पालक मिटिंगचे निरोपही कधी घरी दिले नाहीत...पण शाळेतली एक आणि एक बक्षीसं मात्र घरी आणलीच...!

रस्त्यावरुन जाताना कुणीही एखादी बाई सायकलवरुन जात असली की खरं सांगू आई, मला तुझी आठवण येते...! शाळेतून आलो की कधी एकदा बाहेरून सायकलचा आवाज येतोय असं व्हायचं ग...तू आलीस की कसं हायसं वाटायचं...! कारण आई मला कधीच 'बाप' नावाचा प्रकार अनुभवायला नाही मिळाला...नकळत्या वयात पोरक्या झालेल्या या पोराचा 'बाप' सुद्धा तूच झालीस गं आई...! कशा निभावल्यास तू या भूमिका...?
आई...मला कधीच आठवत नाही की तू परिस्थितीसमोर हात टाकून तुझ्या दोन भावांसमोर हतबल झाली आहेस वा या अशा परिस्थितीत या संसाराचा गाडा घेऊन लाचारपणे माहेराला धडका मारल्या आहेस...!
हा स्वाभिमान...ही सहनशीलता तू आणलीस कुठून...?
कुठून जमवलंस हे धैर्य...?
वयाच्या तेराव्या वर्षापासून ते आजतागायत तू राबतच आलीस गं...तुझ्या आयुष्याचं उभं-आडवं गणित मांडलं की त्यात परिस्थितिच आडवं असणं...हे गृहितकच बनलेलं दिसून येतं...! या बिकट गृहितकाकडे दुर्लक्ष करुण आयुष्यात अकस्मात घडलेल्या एका मोठ्या वजाबाकीनंतर स्वतःला हातच्याला ठेऊन 5 आकड्यांना सोबत घेऊन कुठल्याही पायरीवर न अडखळता...न चुकता ह्या आयुष्याच्या गणिताचा सारिपाट मांडलास तरी ग कसा...?

आई,
नवरा गेल्यानंतर धीरोदात्तपणे राज्य सावरणारी आणि वाढवणारी "जिजाऊ" मला तुझ्यात दिसते...!
आम्हा पोरांच्या शिक्षणासाठी खस्ता खाणारी तू आई...तुझ्यातच तर ''सावित्री'' दिसते...!
दुःख आणि संकटांचा एव्हरेस्ट लिलया सर करणारी "बच्छेंद्री पाल" मला तुझ्यात दिसते...!
चार मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी नेटाने पार पाडतांना मला तुझ्यातच तर "किरण बेदी" दिसते...!
या सगळ्या सगळ्या कर्तृत्ववान महिलांचं एकत्रित मिश्रण तर तू आहेस...!

आई...हे सगळं सगळं कळून-उमजून आजवर तुला कधी थँक्स म्हणालोच नाहिये ग...!
आणि कधी संधीच नाही मिळाली असं व्यक्त होण्यासाठी...आणि का कुणास ठाऊक तुझ्याबद्दल... तुझ्याशीच असं मोकळेपणाने बोलावं...यासाठी कधी बोलता झालोच नाही...!
पण आज ते धैर्य एकवटलं...आई *"न ऋण जन्मदेचे फिटे"* हे माहितीय मला...! तुझ्याशी असं मोकळ बोलून माझं मन हलकं करायचा छुपा उद्देश यात असला तरी आणखी एक हेतू यात नक्कीच आहे...तो म्हणजे तुला हा विश्वास देण्याचा की "आई,मी आहे...! तुझ्यासोबत आहे...!" तुझा मुलगा म्हणून तुझी मान उंच होईल,असं काही माझ्या हातून घडेलच याची मला आता कल्पना नसली तरी तुझा मुलगा म्हणून तुझी ही मान खाली घालायला लावणार नाही...याची खात्री मात्र मी नक्कीच देऊ शकतो...!

खरं तर लिहता येण्यासारखं खूप खूप खूप आहे...!

पण थांबतो आता...
डोळेही पुसायला हवेत...!

तुझाच
विनायक...!

1 comment:

  1. No words. ...... For comment .... I also rub my tears ....

    ReplyDelete