Tuesday 7 March 2017

तो आणि त्याची ती शिवजयंती...!


'ये बघतोस काय रागानं..? मुजरा कर...!' अशी जोरात मोबाईलातल्या अलार्मची काणठळया बसवणारी रिंग वाजली आणि तो दचकूनच जागा झाला...झाकल्या डोळ्यांनीच कसं-बसं तो अलार्म बंद केला...
आज शिवजयंती असल्याने त्याने आठचा गजर लावण्याचा उपद्व्याप केला होता...कसे-बसे डोळे चोळत त्याने हातात ब्रश घेतला...घास-घास दांत घासत बनियन आणि त्याच भगव्या बरमोड्यावर सकाळची गार हवा आणि भगवा सूर्याचं दर्शन घ्यायला बाहेर आला...
          बाहेर थोडा वेळ दात घासतो न घासतो...तवरकानं त्याच्या मोबाईलची 'ये बगतोस काय रागानं...?' वाली रिंग वाजली...
त्याच्या जिगरी दोस्ताचा फोन आलता...'आलो रे...15 मीनटात आलो...!' म्हणून त्याने पटकन फोन ठेवला...
न्हानित जाऊन चूळ भरतो तोवर पुन्हा त्याचा मोबाईल 'बगतोस काय...' म्हणून नरडं फोडू लागला...
रागांनच उचलून 'ये ठेव रे...यायलोय की आई*ल्या...'
म्हणून पटकन तो आंघोळीसाठी शिरला...कशीबशी अंघोळ आटपून त्याने तो हार्ड परफ्यूम साऱ्या बावडीला फासला...
मागल्या दिवळीला घेतलेला तो गडद भगवा आणि ती साखळीची जीन्स पँट घातली...रात्री झोपताना टोचू नये म्हणून उशाला काढून ठेवलेलं ते महाराजांचा फोटो असणारं लॉकेट त्याने आरशात छाती फुगवून पाहत गळ्यात अडकावलं...राजमुद्र्याची ती भली मोठी अंघठी पहिल्या बोटात घातली...
तेवढ्यात पुन्हा त्याच्या फोनने नरडं फोडून ओरडायला सुरवात केली....भुवई उंचाऊन पटकन त्याने केसाला ते इंगलिश जेल लावला आणि आज जरा गडबडीतच त्याने केसाचा कोंबडा केला...
आणि डोळ्यावर काळा गॉगल अडकवून पटकन फोन उचलून कारर्-कारर् वाजनारं कोल्हापूरी चप्पल घालून तो बाहेर पडला...
बाहेर त्याचा जिगरी होंडा घेउनच खडा होता...पटकन उडी मारून तो मागल्या शीटवर बसला...'ऊ*गीच्या...अंघोळ करुस्तवर दम-धीर नाई व्है..?'
थोडा वेळ बाचाबाची होऊन दोघबी चौकातल्या इरफान चाचाच्या ग्यारेजवर आली...
"चाचा...गाडीचं साइलेंसर काढायाचाय...आज शिवजयंती हाय नव्हं...गाडीने कसा भन्नाट आवाज ठोकला पायजे बगा...समद्या पोरी इकडच बघाया पायजेत..!"
अस म्हणून दोगबी पुढच्याच अंगाला असणाऱ्या इस्माईलच्या टपरीवर आली...
         तिनसो बीस हरी पत्ती माव्याची दोघांनी आर्डर दिली...तवरकांन त्याने मोबाइलातलं आपलं फेसबुक आणि व्हाटसाप उघडलं...
शिवजयंतीच्या शुभेच्छाच्या सतराशे साठ म्यासेजेस आणि तीच-तीच महाराजांची चित्र वेगवेगळ्या ग्रुप्स वर येऊन आदळली होती...
'सर्वाना शीव जायंतिच्या हारदिक शुबेच्या...
- शीवभक्त लाल्या"
असं मोठ्या जिकरीनं टाइप केलं आणि फ्रेण्डलिस्टीतल्या 99 जणांना ट्याग करून 'feeling अहं...भगवाच...'
अस लिहून महाराजांच्या एका रापचिक फोटोसंग अपलोड केलं...
तीकडं व्हॉट्सप वर 'भगवं वादळ' नावाच्या ग्रुपवरचे 20-30 msg एका दमात सिलेक्ट केले आणि समद्या साठ-पासठ ग्रुपवर ठोकुन दिले...
तेवढ्यात मावा घासून तयार झाला होता...मोबाईल ठेवून त्याने मावा तोंडात ठेवला...
आणि त्या ग्यारेजवर दोगबी आली...
थोड्या वेळतचं इरफान चाचानं आपलं काम आटापलं...
          आता मात्र गाडी त्याने हातात घेतली...तलवारीचं लोखंडी किचन असणारी किल्ली गाडीत खुपस्ली...आणि डार्र्रर्रर्...करूण किक मारली...
'डाग...डाग...डाग....' असा भला मोठा आवाजात गाडी टाहो फोडत होती...
दोगबी हसली....
आणि सुसाट गाडी हानत पक्षाच्या ऑफिस समोर येऊन थांबली...
त्याच्यासारखी पाच-पन्नास आणखी पोरं गाडीच्या पुंगळ्या काढून हातात भगवा घेऊन जायच्या पवित्र्यात होती...कपाळावर भला मोठा भगवा नामाटा...डोळ्यावर गॉगल...तोंडात मावा...आणि जोडीला 'जय भवानी...जय शिवाजीचा' नारा देत समदी पोरं पोटाच्या बेंबीपासून ओरडून देत होती...
प्रत्येक मागं बसलेल्या पोराच्या हातात भला मोठा भगवा फडकत होता...
आजुबाजुला बाया...आणि म्हातारी-कोतारी माणसं मोठ्या कौतुकांन् समदं भरून पाहत होती...
बारकी शेंबडी पोरं बी 'जय भवानी' म्हणून नाचत होती...
तेवढ्यात पुढल्या एकाने 'चला रे....' म्हणत 'हर हर महादेव...'ची घोषणा दिली...
आणि समदी कल्ला करत गावातनं मिरवणूक काढाया गेली...
           गावभर शिवनामाचा कल्ला करून समदी गावातल्या 'शिवाजी पुतळ्या'जवळ आलीत...
आपापल्या गाड्या एका कडला पार्क केल्या...
आज दुसऱ्या एका सामाजिक संघटनेंन मोठी 'dj मिरवणूकीचही' आयोजन केलं होतं...
dj वाला त्याच्या सेटिंग मधे व्यस्त होता...तवरकानं समद्या पोरांनी आपल्या तोंडावर जरा पानी मारून घेतलं...त्यातली काहीजण कुठेतरी मधुनच गायब झाली...निम्मी चपलाच्या दुकानाच्या बाजुला असणाऱ्या पान-पट्टीवर गेली...
ह्याने आणि ह्याच्या जिगरीने नेहमीचीच आर्डर दिली....
एव्हाना ऊन ओसरत आलं होतं...
गावचे आमदार पाहुणे म्हणून आले...त्यांनी शिवाजी पुतळ्याला हार घातला...नामाटा ओढला...!
आणि तिकडे dj वाल्यांन् ते पक्षांच गाणं लावलं...
आणि समदी पोरं थिरकत पुतळ्याजवळ आली...ह्या दोघांनी पटकन मावा तोंडात टाकला...
आता मिरवणूक पाहायला हळूहळू गर्दी जमत होती...म्हातारी-कोतारी...बाया-बापाय आपापल्या बारक्या पोरानां घेऊन शिव मिरवणुकीचं भव्य देखावा बघत होती...गाडीवरली मानसं जरा गाडी बाजूला थांबवून मिरवणूक पाहत होती...रस्ता तुडुंब भरला होता...आकाशात भगवे उंचावले होते... 'ओ राजे...जीरजीरजी राजे हो जी...' हे गाणे फुल्ल आवाजात छातीचा ठाव घेत होतं...
तेवढ्यात मघाशी मधेच गायब झालेली निम्मी पोरं पुन्हा हात उंचाऊन नाचणाऱ्या गर्दीत सामिल झाली आणि एकच वास सुटला...
त्याच्या सामिल होण्याने एक नवा जोशच पुन्हा सगळ्यांच्या उराउरात भरून आला...आणि मधे औरडत...किंचाळत मिरवणुक पुढे निघाली...
तेवढ्यात 'जपून दांडा धर..' गाणं लागलं...
आणि पोरांनी जोरात ओरडून एकच सहमतीचा आवाज दिला...
आणि पुन्हा नव्या जोशाने कधी एक हात उंचाऊन...तरी कधी दोन्ही...कधी बाजूच्या बरोबर इर्षा करुन एकामेकाला आनंद देत समदी बेहोश होऊन नाचत होती...
           तितक्यात अचानक लाइट गेली आणि dj बंद पडला...
"अरे....." करूण सगळ्यांनी नापसंती दर्शवली...
"आय*लायला....आताच लाईट जायला पायजे होती...?ये बघा रे काय झालय...?" अस एकटा जोरात ओरडला...!
पाच मिनिटांनी पुन्हा dj लागला आणि "चिमनी उडाली भूर्र्..भुर्र्...माझा पोपट पिसाटला..." हे नव्या दमाचं गाणं लागलं...
क्षणाचाही विलंब न करता पुन्हा सगळी नाचू लागली...
हळूहळू पुढे सरकणारी मिरवणूक आता मात्र जणु एका ठिकाणी थांबल्यात जमाच होती...dj वाल्यांन आवाज नकळत अजुन वाढवला...आणि ह्याच्या रिंगटोनचचं गाणं 'बगतोस काय...मुजरा कर...!' dj वर लागलं...आणि समदी लोकं 'जय भवानी...जय शिवाजी'च नारा देत होती...भगवे आधीपेक्षा जास्त वेगाने आकाशाचा ठाव घेत होते...आवाज तर आणखीच वाढला होता...आता नाचाबरोबरच घोषणाही दिल्या जात होत्या....
          मग थोड्या वेळाने मिरवणूकिने म्होर्ं सरकाया सुरवात केली...
कारण गावातली जुनी मस्जिद हळूहळू मागं पडत होती... आणि dj चा आवाज पूर्ववत ओसरला...!
एव्हाना मिरवणूकीत 'शीला...मुन्नी...बेबो...' या आणि आशा सगळ्या येऊन गेल्या होत्या...मधे एकाद-दुसरं शिवाजी महाराजांच गाणही लागत होतं...
रात्री साडे-अकराच्या दरम्यान मिरवणूक संपली...
          हां घरी आला...न जेवताच तसाच अंथरुणावर पडला...मोबाईल काढला...
सकाळच्या fb वरच्या पोस्टवर पाचशेभर लाइका आणि दोनशे भर कमेंटा आल्या होत्या...
ग्रूप्सवर तर ढिगान मॅसेज येऊन पडले होते...
दिवसभर जाम उत्साहात शिवजयंती या मावळ्याने पार पाडली होती...
खुप कंटाळलेल्या अवस्थेतही त्याने व्हाट्सअप वरील चार-पाच नॉनवेज जोक्स वाचले...
आणि रात्री नेहमीप्रमाणे तसला व्हिडिओ पाहुन तो अंग टाकून झोपी गेला...!
मात्र गळ्यातलं लॉकेट न काढताच...!

      -विनायक होगाडे

1 comment:

  1. विनायक खुपच छान लिहलय रे

    ReplyDelete