Sunday 5 March 2017

राम के नाम...!



'राम' हे व्यक्तीमत्व हिंदू संस्कृतीच्या अभिमानाचं प्रतीक राहिलेलं आहे...! सत्यवचनी,एकपत्नी,मर्यादापुरुषोत्तम या मूल्यांच 'राम' प्रतिनिधित्व करतो...!

राम जसा तुकारामात आहे तसाच तो आसारामातही आहे...!

तो 'जय श्रीराम' या हिंदुच्या अभिवादनात आहे...तसाच तो गांधींच्या 'हे राम' या अखेरच्या शब्दातही आहे...!

तो रथ यात्रेत वसलेला आहे तसाच तो बाबरी नंतरच्या रक्तपातातही वसलेला आहे...!

तो 'राम मंदिरासाठी' इथल्या सामान्य हिंदुंनी दिलेल्या विटेत वसलेला आहे...तसाच तो बाबरीच्या कोसळणाऱ्या प्रत्येक विटेतही वसलेला आहे...!

जसा तो गांधींच्या 'रघुपती रावघ राजाराम,सबको सन्मती दे भगवान' या प्रार्थनेत वसला आहे तसाच तो 'मंदिर वही बनायेंगे' या रामाची सौगंध असलेल्या चिथावणीखोर घोषणेतही वसलेला आहे...!

जसा तो धार्मिकाच्या प्रेमभावनेत वसलेला आहे...तसाच तो धर्मांधाच्या द्वेषभावनेत वसलेला आहे...!

तो धार्मिकाच्या स्वधर्मप्रेमात वसलेला आहे...
तो धर्मांधांच्या परधर्मद्वेषात वसलेला आहे...

राम रिचर्ड अटोनबरोच्या ऑस्करप्राप्त 'गांधी' कलाकृतीत वसलेला आहे...तसाच राम हा शरद पोंक्षेच्या अनैतिहासिक 'हे राम-नथुराम' नाटकामध्येही वसलेला आहे...!

राम...राम...राम...

फक्त मुल्यांच प्रतिनिधित्व करत असलेला राम आता अनीती,मिथ्याकथन,आणि विकृत मानसिक प्रवृत्तीचंही साधन बनलेला आहे...!
सत्याचं प्रतिनिधित्व करणारा राम आता मिथ्यावाद्यांच प्रतीक बनला आहे..!

सत्य इतिहासापेक्षा मिथके बहुतेकांना प्रिय असतात...या मिथकांमध्ये काळाच्या ओघात नाना प्रकारचे रंग मिसळले जातात...सत्य धुंढाळणाऱ्या सत्यशोधकाने ते रंग खरवडून काढले की भक्तीभावाने मिथकराम उराशी कवटाळून बसलेल्यांना हे सहन होत नाही...धंधेवाईक राजकारणी या मिथकरामाचाच बाजार मांडतात...!

हा बाजार जोरात चालुये...त्याला नोटाबन्दीचाही फटका नाही...!
तीथ फक्त रावण दाखवले जातात...
हां...पण अट इतकीच ते सांगतील तो रावण...!
मग असे रावणदहनाचे कार्यक्रम हीे वानरसेना 'जय श्रीराम' म्हणत गर्वाने पार पाडते...
खुलेआम...भर रसत्यात सकाळ-सकाळी पाठीमागून गोळ्या घालून...

या बाजाराला असे फक्त बिन्डोक वानर हवेयत...प्रश्न न विचारणारे....चिकित्सा न करणारे...!

आता 'राम' तो मुळचा राम राहिलेला नाही...!
राम आता फक्त रामाचही प्रतिनिधित्व करत नाही...
तो आता त्या आडून रावणाचंही प्रतिनिधित्व करतो...!

या रामायणात आता आपली खरी परीक्षा आहे...खरा राम कोणता ते शोधायची...!

- विनायक होगाडे

No comments:

Post a Comment