Saturday 24 December 2016

मनूवृत्ती विनाशाय...




25 डिसेंबर 1927 साली रात्री सुमारे 9 वाजता महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. ही भारताच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना आहे...!

सगळ्यात आधी मनुस्मृती ह्या ग्रंथाविषयी प्राथमिक माहिती समजून घेणं गरजेचं आहे.
साधारण 1600 वर्षापुर्वी उदयास आलेली ही मनुस्मृती 12 अध्याय आणि 2684 श्लोकांची आहे.
12 अध्यायात विविध विषय विभागले गेले आहेत.
आज उपलब्ध असणारी ही मनुस्मृती ही साधारण इ.स. 200 च्या सुमाराची आहे. संशोधकामध्ये काळाबाबतीत मतभेद आहेत. पण इ.स.पू. 200 ते इ.स.200 असा  बहुतेक संशोधक मनुस्मृतीचा संभाव्य काळ चारशे वर्षांचा सांगतात...!
मनुस्मृतीत धर्मशास्त्रकार म्हणून ज्या मनुचा उल्लेख आहे...तो मनू म्हणजे स्वायंभूव मनू...!
'ब्रम्हदेवाने जग निर्माण केल्यावर हा मनू निर्माण केला...! मनू हा ब्रम्हदेवाचा पुत्र...!उरलेली सर्व सृष्टी म्हणजे प्राणी-पक्षी,मानव वगेरे हे सगळे मनूनंतरचे...मनूने हे धर्मशास्त्र भृगुला शिकवले...आणि भृगुने इतर ऋषींना प्रतिपादन केलेली ही स्मृती म्हणजेच ही मनुस्मृती...!'
म्हणजे थोडक्यात...
ब्रम्हदेवाने मनूला,मनूने भृगुला व भृगुने ऋषीला हे धर्मशास्त्र दिले...! हे स्वतः मनुस्मृती सांगते...!

मनुस्मृतीबाबतीत काहीही निरक्षीर भाष्य करताना जातींचा वा वर्णांचा उल्लेख करणे आणि त्यातल्या त्यात ब्राम्हण जातीवर टिका करणे अपरिहार्य बनते. पण याचा अर्थ आजच्या ब्राम्हणांनी हा हल्ला स्वतःवर ओढावून घ्यावयाची आवश्यकता अजिबात नाही.
मनुस्मृती विषम समाजरचनेचा डोलारा पवित्र बनवते...यात ब्राम्हण वर्गाला सर्वोच्च स्थान देते...त्याच्या श्रेष्ठत्वाचे गोडवे एकमुखाने गाते...!
इथवर ठीक आहे...पण ब्राम्हणवर्गाचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्यासाठी ती इतर तीन वर्णांची गुलामगिरी 'धर्म' मानते... त्यांच्या यथेच्छ शोषणाची तजवीज ती या उच्चवर्णाला देऊ करते...!

समाजव्यवस्थेत विषमता असणे ही निराळी बाब आहे विषमता पूज्य आणि पवित्र मानणे...आणि तोच धर्म आहे असं ठासून सांगणे हेच काय ते मनुस्मृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे...!
यावरून लक्षात येतेच की,मनुस्मृतिला अर्थातच स्वातंत्र्य,समता,बंधुता यांच्याशी काडीचेही देनेघेने नाही...!
तिच्यात उल्लेखलेली,आखुन दिलेली सर्व समाजव्यवस्था ब्राम्हण जातीच्या सत्तेसाठीच आणि तिच्या अधिपथ्यासाठीच रचलेली आहे...हे कुणीही सांगेल...!
मनुस्मृती ब्राम्हण जातीच्या श्रेष्ठत्वाचा पुरस्कार करतेच,त्याचबरोबर ती त्यातही फक्त ब्राम्हण पुरुषांच्या श्रेष्ठत्वाचा पुरस्कार करते...! 100 टक्के हिंदू स्त्रियांचे दास्य हा मनूपुरस्कृत धर्म आहे..! ब्राम्हणपुरुषांचे हितसंबंध अबाधित राखण्यासाठी क्षत्रिय पुरुषांची मदत अनिवार्य बनते त्यामुळे त्यात क्षत्रियांचेही हितसंबंध राखण्याचे प्रयत्न दिसुन येतात...! मात्र,ती शूद्रांची गणना प्राण्यांच्यातच करते...!
समाजातील आर्थिक,राजकीय,धार्मिक,सामाजिक अशा सर्व सत्तेच्या नाड्या ती फक्त ब्राहणांकडे सुपुर्द करते.
मनुस्मृती शूद्रांना गुलामगिरिबरोबरच अस्पृश्यता बहाल करते...!
मनुस्मृती अनेक दृष्टीने अत्यंत भयानक किंबहुना विकृत असा ग्रंथ आहे.

डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली याबाबतीतील भूमिका जाणून घेणे आवश्यक आहे.
हा ग्रंथ जागोजागी विषमतेला पूज्य ठरवतो.शूद्रांचा उपमर्द करतो. गुलामगिरीचे समर्थन करुण अस्पृश्यता लादतो.म्हणून तो दहनयोग्य आहे.
पण जिथे दिसेल तिथे हा ग्रंथ जाळून समूळ नष्ट करने,अशी ही भूमिका नाही. ग्रंथप्रिय बाबासाहेब स्वतः ज्ञानसाधक आणि ज्ञानाचे पूजक होते,त्यामुळे त्यांची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे...!
मनुस्मृती दहन म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरून हा ग्रंथच समूळ नष्ट करण्याचा कार्यक्रम नव्हे,हे आधी समजून घेतल पाहिजे.
पुस्तक जाळणे हे प्रतिकात्मक दहन आहे.खरं भांडण या विषम समाजरचनेशी आहे. आणि ही विषमता जतन करू पाहणाऱ्या मनोवृत्तीशी आहे.
मनुस्मृतीदहन हे त्या मनोवृत्तीच्या निषेधासाठी करावयाचे प्रतिकात्मक दहन आहे...!

यासंदर्भात आ.ह.साळुंखे म्हणतात की,
"वस्तुतः जगातून मनुस्मृतीच्या सर्वच प्रती नष्ट झाल्या तर मनुस्मृतीच्या समर्थकांना दुःख होण्याऐवजी आनंदच होईल. कारण समाजसुधारणेविषयी मनुस्मृतीने किती विकृत नियम केले होते,याचा पुरावाच नाहिसा झाल्यामुळे मनुस्मृतीचे वाढीव मोठेपण सांगून तीचे पोवाडे गाणे त्यांना सहज शक्य होईल...!"

डॉ.आंबेडकरांनी महाड सत्याग्रहात ते जाळले याचे कारण निद्रिस्त झालेल्या समजाला मोठा धक्का देऊन जागे करणे,हा त्यांचा उद्देश होता...!
रागाचे मुख्य कारण काल तुमच्या पूर्वजांनी आम्हास गुलाम केले होते,हे नाही,तर रागाचे खरे कारण आजही ही गुलामगिरी समर्थनिय मानणारे लोक आणि प्रवृत्ती अस्तित्वात आहेत,हे आहे,हे त्यांनी स्पष्ट केलं..!

मनू हा क्षत्रिय की ब्राम्हण असा एक वाद उकरुन काढुन त्याला क्षत्रिय ठरवून सगळा दोष ब्राम्हणांवर का...? असा सवाल उभा करुण काही लोक बुद्धिभेदही करतात..!
महाड परिषदेत सहस्त्रबुद्धे यांनी या महत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले की
''मनुस्मृती हा ग्रंथ मनूने लिहला तो ब्राम्हण की क्षत्रिय या वादात आम्हाला रस नाही. हा ग्रंथ ब्राम्हणाने लिहला म्हणून आम्ही जाळत नाही आणि क्षत्रियाने लिहला म्हणून जाळणे टाकित नाही..ग्रंथ कुणीही लिहलेला असो...तो ब्राम्हण्याचा पुरस्कार करतो आणि शूद्रांच्या गुलामगिरीचे समर्थन करतो,हा मुद्दा आहे...!''

काही लोक मनुस्मृतीचे अर्धवट समर्थन करताना दिसतात..त्यांचा बोलण्याचा सूर असा असतो की,की त्यातील ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या तेवढ्या स्वीकारायच्या...पण वाईट गोष्टी मात्र टाकून द्यायला हव्यात...
वरकरणी पाहता हा युक्तिवाद बरा वाटत असला तरी तो फार काळ टिकत नाही...
मनुस्मृतीच्या धर्मशास्त्रकारांनी जी श्रेष्ठ मूल्ये सांगितली आहेत,ती खोलात जाऊन चिकित्सा करु लागताच त्यांचे पितळ उघडे पडते.
'आचार्य देवो भवः' किंवा ' 'अतिथिदेवो भवः' यांसारखी विधाने आपल्याला मोठ्या गौरवाची वाटतात,पण मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे ब्राम्हणाखेरीज आचार्य आणि अतिथि कुणी होऊच शकत नाही...त्यामुळे ही सारी गौरवी विधाने अतिमतः ब्राम्हणगौरवात विलीन होतात...!

थोडक्यात,मनुस्मृतीने समग्र हिंदू समाजाच्या हिताचा व उत्कर्षाचा विचार कधीच केलेला नाही. ती फक्त ब्राम्हण पुरुषांचे वर्चस्व आणि त्यांचे इहलोकातील हितसंबंध प्रस्थापित करुण जपू पाहते...
ती ब्राम्हण-क्षत्रियेतर वर्गांना तुच्छ लेखून त्यांचा उपमर्द करते...त्यांवर गुलामी लादून त्याचे 'धर्म' म्हणून नैतिक समर्थनही करते..!

नरहर कुरुंदकर याबाबत भाष्य करतात की,"हा ग्रंथ माणसाच्या आध्यात्मिक मनोवृत्तीतून वा मोक्षाच्या चिंतेतून निर्माण होतो का...?
त्याचे उत्तर नाही असे आहे. हा ग्रंथ त्या काळच्या श्रद्धेनुसार व्यक्तींच्या पारलौकिक कल्याणाचे चिंतन करतो का..? याचेही उत्तर नाही असे आहे...मनुस्मृती फक्त जन्मने ब्राम्हण असणाऱ्या व्यक्तींच्या इहलोकातील हितसंबधांचा विचार करते आणि ते हितसंबंध जपण्यासाठी विषम समाजरचनेला पूज्य ठरवते. हां धार्मिकपणा आहे की तोंडाने धर्माचा जप करत स्वार्थासाठी धर्म वापरण्याची पद्धत..? याचे उत्तर हे आहे की,इहलौकीक आर्थिक हितसंबंध सांभाळण्यासाठी हा धर्माचा वापर आहे,ही खरी धार्मिकता नव्हे...! त्यामुळे मनुस्मृतीचे दहन समर्थनिय,अपरिहार्य व आवश्यकही मानणे भाग आहे..!"

मनुस्मृतीचं उघड समर्थन करणारी लोकं आज शोधून सापडनार नाहीत,किंबहुना ज्यांनी 4-5 दशकांपूर्वी मनुस्मृतीतील चातुवर्ण्य आदर्श मानले त्यांच्या पिलावळीही आता ते उघड उघड मान्य करायला कचरतात...!

तरीही,मनुस्मृतीची पाळेमुळे आजही इथल्या समाजव्यवस्थेत खोल रुतलेली आहेत...!
ती वरकरणी दिसत नसतीलही...पण आजही काही संघटना,प्रवृत्ती या मुळाना खतपानी घालताना दिसतात...!
त्यांना मनुस्मृतीची जुनी आणि मागास विषमता बहाल करणारी संस्कृतीच आदर्शवत वाटते...!
धर्माभिमानाच्या आड लपून या मनुव्यवस्थेचच समर्थन करणं त्यांना नैतिक वाटतं...!
हिंदू धर्माचा चुकीचा टाकाऊ,अनैतिक भाग म्हणून त्याचे दहन तर सोडाच...साधी निषेधाची भाषाही त्यांच्या मुखी दिसत नाही...!

उलट 2016 मध्ये ही 'मनुवृत्ती' याच वृथा धर्माभिमानातून खुलेआम रस्त्यावर समजसुधारकांना गोळ्या घालते...

म्हणूनच,न्याय्य समाजरचनेच्या शाश्वत उभारणीसाठी आपल्याला अंतिमः स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या मुल्याप्रतच जावेच लागेल...! आणि या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी या सुप्त मनुवृत्तीशी झगडा करावाच लागेल...हां झगडा कुणा एका जातिविरोधातला वा धर्माविरोधातला नाही..हेही विसरून चालनार नाही...!
त्यासाठी एका बाजूला इथल संविधान मजबूत करावं लागेलच यात शंका नाही...आणि दुसऱ्या बाजूला 'मनुवृत्ती विनाशाय' म्हणत मनूवादी प्रवृत्तीच दमन करण्यासाठी शड्डू ठोकून उभं राहिलं पाहिजे...!

-विनायक होगाडे...


1 comment:

  1. मनुस्मृती म्हणजे काय हे खूपच छान स्पष्ट झाले

    ReplyDelete