Tuesday 11 April 2017

गुरमेहर...हम आपके साथ है...!






"प्रत्येक प्रखर भावना स्वतःची एक 'रम्य कथा' रचताना दिसते. काही वेळा अशी भावना एकट्याची न राहता सामुदायिक भावना बनते...व ही सामुदायिक भावना सामुदायिक पातळीवर एक रम्य आकार तयार करू लागते.लढाया,युद्धे यांच्यात अशा रम्यत्व पावलेल्या भावना मोकाट सुटलेल्या दिसतात.ही 'मिथ मेकिंग'ची वृत्ती अनेकदा माणसांच्या दुष्टाव्याच्या मुळाशी असते. नाझी लोकांचा ज्यूंबद्दलचा दुष्टावा या कपोलकल्पित कथांचांच परिणाम होय. अशा कथा असल्या म्हणजे सामुदायिक दुष्टपणा हा मोठा भव्य भासू लागतो व या रम्य कथांनी ही दुष्ट प्रवृत्ती 'सभ्य' बनवली जाते,हे खरे..!"
हे शब्द आहेत बर्ट्रेंड रसेल या विख्यात गणिती असलेल्या तत्त्वज्ञाचे...! भारतातील अलिकडील काही घटना पाहिल्या की रसेलने उल्लेखलेल्या 'रम्य कथांच्या कपोलकल्पित सभ्य जाणिवेत' आपण वावरतोय याची जाणीव होईल...! मागील महिन्यात सोशल मिडियात धुमाकूळ घातलेलं 'गुरमेहर कौर'च प्रकरण ही जाणीव गडद करतं...!
दिल्ली विद्यापीठातल्या रामजस कॉलेजमध्ये 'प्रतिरोध की संस्कृती' हा कार्यक्रम घ्यायला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी विद्यार्थी आणि पत्रकारांनाही मारझोड केली. कॉलेजातलं वातावरण दूषित केलं. त्यावर गुरमेहेरने हातात एक पोस्टर घेतलेलं छायचित्र सोशल मिडियात टाकलं आणि बघता बघता ते व्हायरल झालं...!
"मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. मी अभाविपला घाबरत नाही. मी काही एकटी नाही. भारतातला प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे...!"
यावर मोठा गदारोळ सुरु झाला...! आणि दोनेक दिवसातच तिचं आणखी एक पोस्टर अशाच पद्धतीने पसरलं आणि प्रकारणाला खऱ्या अर्थाने सुरवात इथून झाली...!
त्यावर लिहलं होतं..."माझ्या वडिलांना पाकने नव्हे तर युद्धाने मारलं...!"
आणि या स्टेटमेंटवर अक्षरशः गोंधळ उडवला गेला...! सोशल मिडियाच्या माध्यमातून गुरमेहरवर हरेक अंगाने हल्ले करण्यात आले. वीरेंद्र सेहवागसारख्या सीलेब्रिटींनीही उतावळेपणाने आणि उपहासाने "माझं तृतीय शतक मी नव्हे तर माझ्या बॅटनं मारलं...!" अशी टर उडवणारी प्रतिक्रिया देऊन गोंधळ घालणाऱ्या अनेक विरोधाकांना प्रोत्साहनच दिले...
केंद्राचे गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी तर कहर केली. ते म्हणाले, 'या मुलीच्या डोक्यात कुणीतरी घाण भरलीय. तिला बहकवलंय. ती भरकटलीय.' म्हैसूरचे भाजपाचे खासदार प्रताप सिन्हा यांनी आणखी भर घातली...ते म्हणाले, 'ही गुरमेहेर दाऊद इब्राहिमसारखी गद्दार, देशद्रोही, पाकिस्तानधार्जिणी आहे...!'
खरं तर...गुरमेहरने मांडलेल्या आपल्या गंभीर वेदनाव्यथेवर अशापद्धतिने राळ उठेल याची तिला पूर्वकल्पनाच नसेल...! अक्षरशः तिला बलात्काराच्या धमक्या देखील आल्या...!
या सगळ्या प्रकारामुळे हतबल झालेली गुरमेहर "मी आता माझी सुटका करुण घेतीय...मला एकटिला जगू द्या...!" असं उद्विग्नतेने म्हणून दिल्ली सोडून जालंदर या आपल्या गावी निघुन गेली...!
एकंदरित या घडामोडींवर सोशल मिडियात व्यक्त झालेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेणं आवश्यक ठरेल...!

गुरमेहरची माघार ही ताण सहन न झाल्यामुळे आहे...त्याला हे मूर्ख लोक त्यांचा विजय समजत आहेत. तिने विचाराची लढाई कधीच जिंकली आहे तिने हिंसेची लढाई सोडून दिली आहे...
- प्रिया तिडके

बाईला नामोहरम करण्याचा दुसरा मार्ग - तीच्या चारीत्र्यावर हल्ला करा....!
- वैभवी शिंदे

गुरमेहर कौरच्या विडीयोवर 'फयाज खान' नावाच्या एका पाकिस्तानी विद्यार्थ्याने गुरमेहर कौरच्या आवाहनाला प्रतिसाद  देणारा एक सुंदर विडीयो अपलोड केला...
ज्यामध्ये तो  तिला छळणाऱ्या तिच्या पोरकेपणाच्या दुःखात सहभागी होऊन तिला धीर देताना म्हणतोय की,"गुरमेहर, मी तुला तुझ्या शहीद बापाचं प्रेम नाही देऊ शकत पण आज तुझ्या या मन हेलावून टाकणाऱ्या आवाहनामुळं तू 'दुश्मन देश' म्हणवल्या जाणाऱ्या देशातून एक 'भाऊ' मिळवलायस...''
हे गुरमेहरच यश आहे...!
-चेतन तांदळे

गुरुमेहर  शहीदकन्या आहे..तिची मुस्कटदाबी करुन अभिव्यक्ति स्वातंत्र्य चिरडण्यासाठी  धमक्या अत्त्याचार व बलात्काराच्या...! कोणत्याही स्त्रीचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य व विरोध ठेचण्यासाठी या सनातनी दूर्वर्तनींकडील एकमेव साधन..!
" बलात्कार...!"साक्षात शहीद कन्याही यातून सूटणार नाही..!!
- गिरीश पाटील

मीडियाची, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या विचारवंतांची भूमिका आहे की केवळ गुरमेहेर कौरला तिला काय वाटतं ते तिला हव्या त्या शब्दात सांगायचा हक्क आहे, मग ती मते इतरांना देशविरोधी का वाटेनात, पण तिच्या विधानाला कुणी हरकत घेतली, मग ती कितीही सभ्य शब्दात का असेना, ती व्यक्ती लगेच असभ्य, शिवराळ ट्रोल ठरवली जाते. कारण ‘पुरोगामी विचारवंत' माफियाने ठरवून दिलेल्या भूमिकेशी विसंगत अशी भूमिका ह्या देशात कुणी घेऊच कसं शकतं?
- सुशांत पटवर्धन

विषेश म्हणजे सेहवाग सारख्या लोकप्रिय खिलाडूने या ट्रोल गँग मध्ये सामील होऊन नफ्रत वाढवणा-या विकृताना पाठिबा द्यावा....हे खुपच भयंकर आहे.....!
देश कठिन काल मे है...!
- इम्रान शेख

या देशात कोणी आपलं मत मांडू शकत नाही का?? त्या शहिद सैनिकाच्या मुलिने आपलं मत माडलं तर ती देशद्रोही झाली?
तुम्ही कोण रे देश भक्तीची सर्टिफिकेट वाटणारे?? कायदा कानून आहे की नाही या देशात. करा त्या मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल, जा न्यायालयात..... कायदा काय ते ठरवेल...!
- ऋत्विक देसाई

म्हणजे याचं ऐकलं तर देशभक्त आणि नाही ऐकलं तर देशद्रोही ? एका स्वतंत्र भारताच्या महिलेबाबद तुमची असलेली वृत्ती चा धिक्कार आहे !! आता फक्त निपक्षवादी चौकशी व्हावी हीच अपेक्षा !! #Ban_ABVP
- दिशा पाटोळे

गुरमेहर कौरला ट्रोल करणारे वीरेंदर सेहवाग, बबिता फोगट आणि योगेश्वर दत्त हे सगळे अर्धवट डोक्याचे खेळाडू आणि रणदीप हुड्डा हा अभिनेता हरियाणातले आहेत. हे तेच हरियाणा जे खाप पंचायत आणि ऑनर किलिंगसाठी कुप्रसिद्ध आहे. प्रचंड अशा फ्यूडल वातावरणातुन आलेल्या या बिन्डोक लोकांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार म्हणा.
#StandWithDemocracy
#StudentsAgainstABVP
- शिवम यादव

तस पहायला गेल तर दाऊदचा बाप पण प्रामाणिक पोलीस होता...पण तो देशद्रोही निघालाच...!अर्थात ती मुलगी पण देशद्रोही आहे अस नाही पण शहीद जवानची मुलगी आहे याचा अर्थ तीची प्रत्येक गोष्ट देशवासीयांनी मान्य करावी अस पण नाही...! कारण पकिस्तान किती हरामखोर आहे हे जगाला माहितीये त्यात ती पाकिस्तानींची बाजू घेत असेल तर सामान्य भारतीय नाही खपवून घेणार...!
- राजेश निकम

देशात प्रसिद्धी मिळावी यासाठी ती अस वक्तव्य करत असेल नाहीतर तिलाच राजकारणात उतरायची इच्छा असेल आणि आप,कॉंग्रेस सारखे पक्ष आहेतच तिला उमेदवारी द्यायला...! नाही म्हटलं तरी आज पुर्ण देश तिच्यावर चर्चा करतोय...तिच्या शहीद वडिलांची एवढी चर्चा नाही झाली तेवढी चर्चा तीची सध्या होत आहे...देश फुकट महत्व देत आहे तीला...!
- मीनाक्षी पाटील

सध्या 'बघा बघा ना, ती गुरमेहर AAP शी संबंध ठेवते' अशा ओढुन-ताणून मखलाश्या चालल्या आहेत!
थोडक्यात...तुम्ही AAP शी संबंधित स्त्री असल्यास
तुम्हाला बलात्काराची धमकी देणे
क्षम्य असते...!
- हर्षद सावंत

जरूरी नहीं कि शहीद की बेटी देशद्रोही नहि हो सकती,
दाऊद का बाप भी पुलिसवाला था...!
- सुभाष मिश्रा

मला व्यक्तिशः तिच्यावर जी प्रचंड कंबरेखाली टीका झाली आणि तिला ज्या धमक्या मिळाल्या तेंव्हापासूनच अस्वस्थता आली आहे. ती तिची बरी- वाईट, चूक- बरोबर मत घटनेच्या चौकटीत राहून मांडत आहे . आणि हे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत हे धोक्याचे आहे. स्त्रिया हे तर या लोकांसाठी इझी टार्गेट आहे...!
- विभावरी जाधव

ती युनिवर्सिटीत कशासाठी गेलीये तेवढंच करावं असं सांगणारे महाभाग आहेत आपल्याकडे
तिनं काय करावं काय करु नये हे कंट्रोल करण्याची ईच्छाच कशासाठी होते लोकांची काय माहीत
तो सर्वस्वी तिचा प्रश्न नाही का? अजून काय झालं म्हणजे लोकांना पटणारे की असहिष्णू होत चाल्लोय आपण?
- सृजन कागणे

हे अत्यंत दु:खद आहे की लोक गुरमेहेरचा संदेश न समझताच केवळ पाकिस्तान या नावाने गदारोळ करत आहेत...!
- विक्रांत कांबळे

देशप्रेमी नागरिकांना अभिव्यक्ति स्वातंत्र्य नाही तर ते फक्त या डाव्या, कम्युनिस्ट चळवळीतल्या लोकांनाच आहे असा चुकीचा समज मीडीया, कथित पुरोगामी, कथित विचारवंतांनी करून घेतलेला दिसतो आहे.
त्या गुरमेहर कौर च्या शहीद पित्याच्या आत्म्याला काय वाटले असेल जेंव्हा मुलीने त्याच्या हौतात्म्याला एका साध्या युद्धातील हौतात्म्य म्हटले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना ज्या पित्याने सर्वोच्च बलिदान दिले त्याच्या बलिदानाला असे खालच्या स्तरावर आणणे ही कुटिलता फक्त आणि फक्त कम्युनिस्टच करू शकतात यात शंका नाही.
#IStandWithABVP
- सतीश पाटील

"त्या" मुलीने अभाविपवर बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केलाय...
हसावे की रडावे कळात नाही...
एकतर अभाविप असे हीन कृत्य कधीही करणार नाही, याची खात्री आहे...
आणि राहता राहिली गोष्ट त्या जे.एन.यू. फेम देशद्रोही प्रवृत्तींची, तर त्यांना रस्तोरस्ती देशप्रेमी लोकांच्या सनदशीर विरोधाला सामोरे जावे लागणारच आहे... काश्मिर काही यांच्या बापाचे नाही, आणि देशाचे सार्वभौमत्व त्यांना खुपत असले तरी जनता ते विकायला काढू देणार नाही...
- अक्षय माळवे

वरील सर्व उलट-सुलट प्रातिनिधिक प्रतिक्रिया या सर्व प्रकरणाचे बऱ्यापैकी दर्शन घडवतात...!
मात्र तरीही काही झाकोळल्या गेलेल्या बाबी उजेडात आणणे गरजेचं आहे...!
मुळात तिचं युद्धाबाबतचे स्टेटमेंट हे आताचं नाही...! गुरमेहर कौरही गेल्या काही वर्षापासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशात सलोखा निर्माण व्हावा म्हणून 'पीस' या संघटनेसाठी काम करते...! दहा महिन्यांपूर्वी गुरमेहरने एका वीडियोच्या माध्यमातून स्वतःची व्यथा मांडली होती...! विडियोमध्ये ती काही बोलत नाही...शांत चेहर्याने एकामागोमाग एक पाट्या हातात घेऊन व्यक्त होत जाते...! जेंव्हा तिने 'अभाविप'विरोधी जाहिर भूमिका घेतली तेंव्हा तो जूना वीडियो पुन्हा उकरून काढून त्यातील मागाचा-पुढचा संदर्भ गाळून "माझ्या वडिलांना पाकने नव्हे तर युद्धाने मारलं...!" केवळ या एका विधानाला फोकस करुण मुद्दाम सत्यापलाप करुण बुद्धिभेदी,एकांगी चर्चा सोशल मिडियात घडवली गेली...!
संपुर्ण वीडियो पाहिल्यास तिची भावना पटकन समजेल...! ती म्हणते...!
"हाय...! माझं नाव गुरमेहर कौर...! मी जलंधर, भारत येथे राहते...! हे माझे वडील कॅप्टन मनदीप सिंह...! ते १९९९ च्या कारगिल युद्धात मारले गेले...! ते वारले तेव्हा मी २ वर्षांची होते. माझ्याकडे त्यांच्या फार कमी आठवणी आहेत...! वडील नसल्यानं कसं वाटतं याच्या माझ्याकडे जास्त आठवणी आहेत...! मला हेही आठवतं की पाकिस्तान आणि पाकिस्तान्यांचा त्यांनी माझ्या वडलांना मारल्यामुळे मी किती द्वेष करायचे...! मी मुसलमानांचाही द्वेष करायचे कारण सर्व मुसलमान पाकिस्तानी असतात असं मला वाटायचं...! मी ६ वर्षांची असताना एका बुरखा घातलेल्या महिलेला चाकू मारण्याचा प्रयत्न केला होता...!
ती माझ्या वडलांच्या मृत्यूला जबाबदार आहे असं कुठल्याशा विचित्र कारणानं मला वाटलं होतं...! माझ्या आईनं मला आवरलं आणि समजावलं की माझ्या वडलांना पाकिस्ताननं नव्हे, युद्धानं मारलं...! हे कळायला मला जरा वेळ लागला, पण आज मी माझा
द्वेष सोडून द्यायला शिकले आहे...!
हे सोपं नव्हतं, पण कठीणही नाही...! मी हे करू शकते, तर तुम्हीदेखील करू शकता...!
आज मीदेखील माझ्या वडलांसारखीच एक सैनिक आहे...! मी भारत-पाकिस्तानमधल्या शांतीसाठी लढते...! कारण आमच्यात युद्ध झालं नसतं तर माझे वडील आजही इथेच असते...! मी हा व्हिडिओ बनवते आहे कारण माझी अशी मागणी आहे की
दोन्ही देशांच्या सरकारांनी ढोंगबाजी बंद करावी...! आणि समस्या सोडवावी...!जर २ महायुद्धांनंतर फ्रान्स आणि जर्मनी एकत्र येऊ शकतात...! जर जपान आणि अमेरिका आपला भूतकाळ मागे टाकून
प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात...! तर आपणही का नाही? बहुसंख्य सामान्य भारतीयांना आणि पाकिस्तान्यांना
शांती हवी आहे, युद्ध नव्हे...! मी दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह लावते आहे...! तिसर्‍या दर्जाच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्या दर्जाचा देश बनण्याचं स्वप्न पाहू शकत नाही...! कृपा करून कंबर कसा, एकमेकांशी बोला आणि काम तडीला न्या...! राष्ट्रपुरस्कृत दहशतवाद आता पुरे...! राष्ट्रपुरस्कृत हेरगिरी आता पुरे...! राष्ट्रपुरस्कृत द्वेष आता पुरे...! सीमेच्या दोन्ही बाजूंना भरपूर लोक मेलेत...! आता पुरे म्हणजे पुरे...! जिथं आपल्या वडलांना गमावलेल्या गुरमेहर कौर नाहीत अशा जगात मला राहायचंय...! मी एकटी नाही,माझ्यासारख्या खूप आहेत...!"
ती इतक्या परिपूर्णतेने व्यक्त झालीय की यावर फारसं स्पष्टीकरण करण्याची गरजच उरत नाही...! मात्र तिचं युद्धविरोधी विधान पाकिस्तानप्रेमी ठरवलं गेलं आणि एकांगी प्रचार आणि धमक्या, अश्लील प्रतिक्रिया देऊन तिच्या उदात्त विचारांना नामोहरण करण्याचा प्रयत्न केला गेला...!
सुसंस्कृत माणसाने ज्या स्तरावर संस्कृती पुढे नेलेली असते,त्या संस्कृतीचा...युद्ध आणि विध्वंसक विचाराने नाश होतो...अशा विध्वंसक,विखारी विचाराने मानवी संस्कृतीने हजारो वर्षे झटून सिद्ध केलेली मुल्ये काही दिवसातच मातिमोल होतात...! 'परस्परांच्याविषयी परस्परांच्या मनात विश्वास जागा करण्यासाठी प्रयत्न करा...' असे पोटतिडकिने आवाहन करणारी गुरमेहर या समाजाला 'नकोशी' झालीय...ही निश्चितच धोक्याची घंटा आहे...!
गुरमेहरला हतबल होऊन आपल्या गावी
निघून जावं लागणं हे भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं अपयश आहे...हे विसरून चालणार नाही...! 'गुरमेहर,आम्ही तुझ्यासोबत आहोत' असा विश्वास वेळोवेळी सोशल मीडियातून व्यक्त करणं गरजेचं आहे...

- विनायक होगाडे...

प्रसिद्धी : मासिक अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र - एप्रिल 2017

No comments:

Post a Comment