Tuesday 13 December 2016

नीती साठी धर्म की विज्ञान...?



प्रश्न नेहमी येतो तो नीतीचा....
माणसान विवेकाने वागावं,नीतीनं वागावं...ही समस्त मनुष्यवर्गांन समस्त मनुष्यवर्गाकडून केलेली अपेक्षा आहे...
आदिम अवस्थेत असलेल्या माणसानं नीतीव्यवस्थेसाठी धर्मव्यवस्था स्थापली...! ईश्वरी अधिष्ठान असुनसुद्धा ह्या व्यवस्थेला गेल्या काही हजारो वर्षात नीती पूर्णपणे प्रस्तापित करता आलेली नाहिये...!
तरीही आजही धर्म तितक्याच पोटतिडकिने नीती प्रस्थापित करण्याचा दावा करतो...!

मूलतः पशुत्व ही माणसाची प्राथमिक भावना आहे...अविवेकी वागण हेच मुळात माणसाचं उपजत वागण आहे...विवेकी वागणुक ही त्याने स्वतःच्या पशुत्वावर मात करुण माणूसपणाकडे केलेली वाटचाल आहे...!
गुहेत राहणारा माणूस...आपापसात लढाया करणारा माणूस...कच्च मांस खाणारा माणूस...माणसालाच मारून माणूस खाणारा माणूस...ह्या अशा पशुत्वाकडून माणूस क्रमाक्रमाने पुढे सरकत सरकत आला आहे...प्रगल्भ होत आला आहे...
आणि म्हणून माणसाने एकंदर स्वतःच्या या प्रगतीचा अभ्यास करुण स्वतःलांच एक शास्त्रीय नाव देऊ केलं आहे...तो स्वतःला Man the homo sapiens sapiens...!
म्हणजे शहाणा होत जाणारा...अस म्हणवतो...!

म्हणजे माणूस हा एकमेव या भूतलावावरील असा प्राणी आहे जो या विश्वासंबंधीची गुढे उकलतो...ज्ञान प्राप्त करतो आणि या उकलनामुळे त्याला आपला भोवताल 'समजतो'...! फक्त विज्ञानाने आजवर माणसाला आपला भोवताल समजला...

नरहर कुरुंदकर एके ठिकाणी म्हणतात की,
"माणूस हा पूर्णपणे विचारप्रधान असा प्राणी कधीच नव्हता...विचारांच्याखेरीज निराळ्या भावना,कल्पना,प्रेरणा या अशा काही बाबी मानवी मनात आहेत...! यातीलच एक मुलभूत सहजप्रेरणा भीतीची आहे...!
या जगात इंद्रियापलिकडले,तर्काच्यापलिकडले वा अनाकलनीय,अलौकिक असे काहीतरी आहे,असे मानण्याची माणसाची पद्धतच त्याच्या मनात असलेल्या मुलभूत भीतीचे एक प्रक्षेपण आहे...!"

म्हणूनच "ह्या विश्वाची निर्मिती ईश्वराने केली..." हा दावा जगातील बहुसंख्य मानवी जनता करते...किंबहुना हे गृहितक आदिम काळापासून माणूस पिढ्यानपिढ्या हस्तांतरित करत आला आहे...
एका बाजूला हा दावा करणारा माणूस दुसऱ्या बाजूला स्वतःच "विश्वाची निर्मिती कशी झाली असावी.." याचा शोध घेण्यासाठी स्वतःच बिंग बॅग थिअरी सारखे मोठमोठाले प्रयोग करतो...
ईश्वराचे अस्तित्व याबाबत आस्तिक आणि नास्तिक यांच्यातला वाद जगाच्या अंतापर्यन्त काही निकालात लागणार नाही,असं म्हणतात...मग खरा आणि महत्वाचा प्रश्न उरतो तो नीतीमत्तेचा...!

स्वतः आस्तिक असणारा न्यूटन जेंव्हा पडलेल्या सफरचंदाबाबत 'हे अस का घडलं...?' याचा विचार करुण गुरुत्वाकर्षणाचा शोध घेतो किंवा गॅलिलिओ जेंव्हा बायबलप्रणीत पृथ्वीमध्य सिद्धांत नाकारुण "पृथ्वीच सूर्याभोवती फिरते" हे सिद्ध करतो...
तेंव्हा ते दोघेही एका वेगळ्या भाषेत ईश्वरी अस्तित्वालाच आणि स्वतःच्या आणि मानवी जातीच्या श्रद्धावादालाच आव्हान देत असतात...!

आणि आता पहिलीचं पोरगंही शिकत असणारे हे आणि असे अनेक सिद्धांत त्याकाळी याच धर्मव्यवस्थेने नाकारुन "परमदयाळु ईश्वराच्या नावाने अनीतीचाच कहर केला होता...!" मग ब्रूनोला जिवंत जाळणे असो वा गॅलिलिओ माफी मागावयास लाऊन नजरकैदेत ठेवण असो...हा सत्यापासून दूर जाऊन धर्मव्यवस्थेने अनैतिकतेने केलेला द्रोहच होता...!


पुन्हा प्रश्न असा येतो की नीती आणण्यासाठी धर्म कुचकामी ठरला तरी विज्ञान ही नीतिमत्ता आणू शकतो का...?
तर विज्ञान आणि धर्म यातील फरक आपल्याला याचं उत्तर देऊ शकेल...

'विज्ञान कधीच अंतिम सत्याचा दावा करत नाही...ते सत्याच्या सातत्यावर उभं असतं...धर्म नेहमीच अंतिम सत्याचा दावा करतो...
विज्ञान जेवढा पुरावा तेवढा विश्वास या सूत्रावर काम करतं...धर्माला पुराव्याची गरजच लागत नाही...!
'तर्क' हे विज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण आहे...तर 'श्रद्धा' हे धर्माचे...! कुठलीच श्रद्धा ही तर्काधिष्टित नसते म्हणून श्रद्धेच्या पराभवातूनच नवे विचार जन्मास येतात...
'प्रश्न विचारणे' हे विज्ञानाचे काम आहे...धर्म मुळातच सर्वज्ञातपणाचा दावा करतो...पण धर्माधिष्ठित उत्तरावर शंका घेणे धर्माला आवडत नाही...!
विज्ञान नम्र आहे...ते काळाच्या ओघात चुकीचे ठरलेले सिद्धांत मागे घेतं किंवा दुरुस्त करतं...धर्म उद्धट आणि कमालीचा स्थितिशील आहे...तो आपले सिद्धांत मागे घेत नाही...!'

धार्मिक दृष्टिकोण असलेला मनुष्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोण असलेला मनुष्य यात या पद्धतीनेच फरक पडत जातो...!

सर्व धर्माची मूळ शिकवण करुणा,प्रेम,त्याग अशी नितिमूल्यांची आहे असे सांगितले जाते,पण प्रत्यक्षात मात्र आपला धर्म अधिक श्रेष्ठ,उदात्त,प्राचीन आहे,हे सिद्ध करण्यासाठी त्याच प्रेम,करुणेच्या नितीमूल्यांना पायदळी तूडवून मनुष्य अपार हिंसेला नव्हे तर जगाच्या विध्वंसालाही तो अत्याधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाने स्वतःला सिद्ध करतो...!


आणि हा विध्वंस तर आपल्या दाराशीच आला आहे...!
"विज्ञानाने निर्माण केलेली दुचाकी घेऊन...विज्ञानाने निर्माण केलेल्या पुलावरून चालवत....विज्ञानाने निर्माण केलेल्या बंदुकीने...विज्ञानवादाचा प्रचार,प्रसार करणाऱ्या 'नरेंद्र दाभोलकर' नावाच्या माणसांवर गोळ्या झाडण्याइतपत नितीमूल्यांचे अधःपतन धर्माने केले आहे...!"


आणि म्हणूनच,धर्माशिवाय माणसाच्या विचारातून,मानवी विवेकातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून नीती निर्माण होऊ शकते...फक्त विज्ञानाची करणी घेतलेल्या मानवाने विज्ञानाची विचारसरणी घेणे आता काळाची गरज बनली आहे...!

"धारण करतो तो धर्म..."अशी सुलभ व्याख्या आपण करतो...खरं तर या अर्थाने सगळ्या मानवांचा धर्म एकच आणि ईश्वरही एकच असायला हवा होता...!
पण सध्या सर्व मानव प्रजातिला धारण केलय ते विज्ञानाने...अशी एकही गोष्ट आणि अस एकही क्षेत्र आता शिल्लक नाही की ज्यात विज्ञान आणि त्याचे तंत्रज्ञान वापरले जात नाही....इतकेच काय सर्व धर्माच्या धार्मिक क्षेत्रातही विज्ञान व्यापून आहे...
मग उपरोक्त व्याखेनुसार विज्ञानच समस्त मानवाला धारण केलेला मानवाचा आधुनिक धर्म नव्हे का...?

अणुच्या विभाजनातून प्रचण्ड शक्ती निर्माण होते...हे विज्ञान सांगतं...परंतु त्या अणुशक्तिचा वापर वीजनिर्मितीसाठी करायचा की बॉंबनिर्मितीसाठी...याचं उत्तर माणसालाच विवेकाने ठरवायच आहे...!
अण्वस्त्रांची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान धार्मिक दहशतवाज्ञाना मिळाल्यास...मानवी जगाच्या विध्वंसाची शक्यता अगदी जवळ येईल...हे जगजाहिर आहे...!
म्हणून...
बर्ट्रान्ड रसेल एका ठिकाणी म्हणतात की,'मानवाची अशी तर्कशून्य धर्मश्रद्धा कशातून निर्माण होते..?' रसेल यांनी पुढे म्हटले आहे की,'याचे एक कारण माणूस हा इररॅशनल म्हणजेच विवेक/तर्कशून्य प्राणीही आहे...आणि तरीही त्याने तितक्याच अतार्किकतेने स्वतःला 'रॅशनल एनिमल' ऊर्फ सूज्ञ विवेक प्राणी असे म्हणवून घेतले आहे...!

म्हणजे निव्वळ विज्ञानाचीच नव्हे तर त्याबरोबरच माणसाला विवेकाचीही कास धरावी लागेल...!
म्हणजेच...स्वतःला विवेकी समजणारा मानवी समाज पूर्ण अर्थाने विवेकी नाही...! विध्वंसाच्या उंबरठ्यावर विवेकमूल्यांच्या प्रस्थापनेसाठी मी काय करु शकतो...? हा प्रश्न स्वतःला विचारल्यावर आपण नक्कीच ''विज्ञान" आणि "नीती" या मूल्याप्रत पोहचू...खऱ्या अर्थाने विवेकी होण्यासाठी मानवाला 'विज्ञान,वैज्ञानिक दृष्टिकोण सर्वात महत्वाचं म्हणजे नितीचीही कास धरावीच लागेल यात शंका नाही...!'

- विनायक होगाडे


   

No comments:

Post a Comment