Sunday 11 September 2016

अंनिस आणि मदर तेरेसाचे संतपद...


     
          येत्या 4 सप्टेंबरला मदर तेरेसांना ख्रिश्चन संतपद बहाल केले जाणार आहे...त्यांचे हे संतपद त्यांनी केलेल्या मानवतावादी सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार नाही तर त्यांनी केलेल्या कथित चमत्कारांसाठी देण्यात येणार आहे....भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही खुद्द या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत...असेही समजले...
      खरं तर मदर तेरेसांचे सेवाकार्यच इतके उदात्त आहे की त्यांना त्यांच्या या सेवाकार्यामुळेच 'संत' ही उपाधी भुषणावह आहे...
परंतू ख्रिश्चन धर्मपद्धतीप्रमाणे कोणाही व्यक्तीस संत ही पदवी दिली जाण्यापुर्वी निर्विवाद सिद्ध झालेले (!) काही चमत्कार त्या व्यक्तीने केले आहेत,हे सिद्ध व्हावे लागते...!
     आणि म्हणून मदर तेरेसा यांच्या मृत्यूनंतर त्यांना संतपद देण्याबाबत पोप जॉन पोल दूसरे यांनी भारतात एक पथक पाठवले होते आणि त्यांनी त्यांच्या परिभाषेतील कॅननाइझेशनची म्हणजेच धार्मिक कायद्यानुसार मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु केली होती...!

        महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या अशा अवैज्ञानिक  निकषावर संतपद देण्याच्या प्रक्रियेला कडाडून विरोध केला होता आणि आजही करत आहे...
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी पोप जॉन पोल दूसरे यांना ईमेल आणि पत्रही लिहून महाराष्ट्र अंनिसची याबाबत असलेली भूमिका कळवली आणि भेटण्याचे आवाहनही केले होते...
त्या पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे...

          "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.देव आणि धर्म याबाबत भारतीय संविधानाने घेतलेली भूमिका हीच समितीची भूमिका आहे.याबरोबरच भारतीय घटनेने नागरिकांचे कर्त्यव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोण आणि शोधक बुद्धि यांचाही आग्रह आम्ही धरत असतो...वैज्ञानिक दृष्टिकोणाने पाहता चमत्कार होऊच शकत नाहीत...यामुळे देव आणि धर्म यांच्यानावे होणाऱ्या चमत्काराच्या दाव्याला आम्ही सतत विरोध करत आलो आहोत...यामुळे माणसे डोळस आणि शहाणी होतील...आणि समाजातील दुःख,दारिद्र्य,शोषण यांच्याविरुद्ध काम करतील असा आम्हाला विश्वास वाटतो...!
       मदर तेरेसा यांच्या अलौकिक मानवतावादी कार्यामुळे त्यांना 'संत' ही पदवी सहज प्राप्त होऊ शकते...मानवी कल्याणासाठी याचप्रकारे झटणाऱ्या अनेक महामानवांना महाराष्ट्राने आदराने 'संत' ही पदवी दिली आहे...परंतु आपल्या निकषाप्रमाणे संत ही पदवी देण्यासाठी अशा व्यक्तींनी आयुष्यात दोन खरे चमत्कार करावे लागतात,त्यासाठी शोध घेण्यास अधिकृत पथकही भारतात आले आहे..!
आम्हाला असे वाटते की,अत्यंत उच्च दर्जाचे सेवाकार्य करणाऱ्या मदर तेरेसा यांना 'संत' ही पदवी देण्यासाठी चमत्काराची गरज नसावी...मात्र अशा चमत्कारांचा शोध होत असल्यास ही प्रक्रिया चुकीची व घटनाविसंगत असल्याने आमची समिती त्याला विरोध करेल हे आम्ही नम्रपणे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो...आपल्या निदर्शनास आम्ही हेदेखील आणू इच्छितो की,गॅलिलिलोला केलेल्या शिक्षेबद्दल त्याच्या मृत्यूनंतर 350 वर्षांनी ख्रिश्चन धर्मपीठांनी माफी मागितली आहे...हे लक्षात घेता मदर तेरेसांचे संतत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले कथित चमत्कार शोधणे,हा त्यांचा सन्मान नसून अवमान आहे...असे आमचे मत आहे...लवकरच आपण भारतात येणार आहात,त्यावेळी याबाबत आम्ही आपणास भेटू इच्छितो...!"

अर्थातच...या ईमेल व पत्राला पोप यांनी उत्तर दिलेच नाही...!भेट देणे तर दूर राहिले...!

       मदर तेरेसा यांना संतपद देण्यासाठी 19 ऑक्टोबर 2003 साली पहिला चमत्काराचा दावा करण्यात आला होता...!
मोनिका बसेरा नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोच्या मधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा दावा त्या वेळी करण्यात आला होता. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता. चौकशी मध्ये पुढे हे देखील समोर आले होते की, प्रत्यक्षात मोनिका बसेरा ह्यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता आणि त्यांच्या पोटातील गाठ देखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारानेती गाठ बरी झाली होती.तिच्यावर उपचार करणारे डॉ.रंजन मुस्ताफी यांनीही याला पुष्टी दिली होती...मोनिकाच्या पतीनेही 'माझी बायको उपचाराने बरी झाली आहे,चमत्काराने नाही' असा निर्वाळा दिला होता...
          या चमत्काराच्या दाव्याला डॉ. नरेद्र दाभोलकर ह्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंनिसने विरोध केला होता व त्याचे वास्तव समजा पुढे ठेवले होते.
त्यानंतर, 17 डिसेंबर 2015ला देखील त्याच पद्धतीने,  2008 मध्ये केवळ मदर तेरेसा ह्यांचे नाव घेवून प्रार्थना केल्या मुळे ब्राझील मधील एका व्यक्तीच्या मेंदुतील गाठी बऱ्या झाल्याचा चमत्काराचा दावा केला गेला आहे. ही व्यक्ती कोण आहे? त्याला नक्की कोणता आजार होता? प्रार्थने मुळेच हा आजार बारा झाला हे कशावरून सिद्ध होते? ह्या मधील कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न देता,केवळ चमत्कार झाला असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवर देखील उतरत नाही...!
15 मार्च ला ख्रिश्चन धर्मपीठाने कॅननाइझेशनची ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे घोषित केले...! त्यानंतर  महाराष्ट्र अंनिस त्याला विरोध करीत आहे अशा आशयाचे पत्रकदेखील महाराष्ट्र अंनिसने 17 मार्च 2016 मध्ये प्रसिद्ध केले होते...!
ते पुढीलप्रमाणे...
         महाराष्ट्र अंनिसचे मुखपत्र असलेल्या 'अंधश्रद्धा निर्मूलन वात्रापत्रात याविषयी सातत्याने लिखाण झालेले आहे...!
महाराष्ट्र अंनिसने पोप फ्रान्सिस यांना इमेल व्दारे पत्र पाठवण्याची मोहीमदेखील चालवली होती...
महाराष्ट्र अंनिसने वेळोवेळी या चमत्काराधारित संतपदाला विरोध केला आहे...!जगभरातील अनेक विवेकवादी संस्था,संघटनांनी यावर आपली भूमिक व्यक्त केली आहे...!

         महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र असणाऱ्या आणि गेल्या 27 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या या समितीने आजवर चमत्काराचा दावा करुण सामान्य लोकांचे आर्थिक शोषण,फसवणूक करणाऱ्या बाबाबुवांचा भांडाफोड करुण त्यांचे श्रद्धेच्या नावाखाली चालू असलेले दूकान बंद पाडलेले आहे...
'चमत्कार करुण दाखवा आणि 21 लाख मिळवा' हे मअंनिस चे आव्हान आजतागायत कुणीही पेलू शकलेला नाहिये...!
 'चमत्कार करणारे बदमाश असतात,त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात,आणि अशा बदमाशांना विरोध न करणारे भ्याड असतात..!' असं विवेकवादी विचारवंत अब्राहम कोवूर म्हणायचे...!
       गंभीर स्वरूपाचे आजार हे चमत्काराने बरे होतात असा समज लोकांच्या मध्ये पसरणे हे त्यांना शास्त्रीय उपचारांच्या पासून दूर नेणारे ठरते आणि त्याच मुळे हानिकारक देखील ठरू शकते त्यामुळे एखाद्या व्यक्तीला संत जाहीर करण्यासाठी चमत्कारांची अट ही विज्ञान विरोधी आहे आणि लोकांच्या शोषणाला देखील कारणीभूत ठरू शकते. मदर तेरेसा ह्यांनी केलेले दिनदुबळ्यांच्या सेवेचे काम हाच त्यांच्या संतप्रवृत्तीचा पुरावा आहे त्यामुळे खरे तर अवैज्ञानिक चमत्काराची अट हे त्यांच्या मानवतावादी कामाचे अवमूल्यन आहे...!
गेल्या 31 ऑगस्टला मुंबईमध्ये महाराष्ट्र अंनिसने पत्रकार परिषद घेऊन 4 सप्टेंबर 2016 ला मदर तेरेसांना चमत्काराच्या निकषावर देण्यात येणाऱ्या संतपदाबाबत पुन्हां एकदा आपली भूमिका जाहिर केली...

1 सप्टेंबरच्या 'सकाळ'  वृत्तपत्राच्या मुंबई एडिशनमध्ये यासंदर्भातील बातमी...
       
         डॉ.नरेंद्र दाभोलकर असं म्हणायचे की,'चमत्कारांना शरण गेलेले मन संघर्षासाठी उठू शकत नाही...!चमत्कार करणाऱ्या व्यक्तीला मानवी मन शरण जाते,कारण चमत्कार माणसाचे मन दुबळे,आंधळे आणि पांगळे करते...!एका अर्थाने चमत्कार हे सिद्ध होण्यासारखे नसतातच.चमत्कार सिद्ध करावयास सांगणे म्हणजे स्वतःला नेमकी किती वाजता झोप लागली हे स्वतः लिहून ठेवण्यासारखे आहे...!"
असो...!
        गॅलिलिलोने 'पृथ्वीमध्य सिद्धांत' नाकारुन सप्रमाण दाखवून दिले की,'सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरते..!'
त्याने केलेल्या सत्यशोधनाला बायबलद्रोही ठरवून त्याच्यावर गुन्हा नोंदवून याच धर्मपीठाने त्याला कठोर शासन केले होते...गॅलिलिओने भीतिपोटी आपले संशोधन मागे घेऊन ख्रिश्चन धर्मपिठाची माफी मागितली होती...!
त्यानंतर या चुकीच्या शिक्षेबद्दल त्याच्या मृत्यूनंतर 350 वर्षांनी ख्रिश्चन धर्मपीठांनी गॅलिलिओची माफी मागितली आहे...हे लक्षात घेता मदर तेरेसांचे संतत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले कथित चमत्कार शोधणे,हा त्यांचा सन्मान नसून अवमान आहे...असे आमचे मत आहे...ख्रिश्चन धर्मपीठाने गॅलिलिओ प्रकरणी जशी सद्बुद्धिने माघार घेतली तशाच सद्बुद्धिने ख्रिश्चन धर्मपीठ 'चमत्काराधारित संतपद' ही अवैज्ञानिक प्रक्रिया बंद करेल,आणि संताच्या मानवतावादी कार्याचा सन्मान करेल,अशी आशा आहे...!

      -विनायक होगाडे

No comments:

Post a Comment